Wednesday, January 28, 2026

"प्राइड अँड प्रेज्युडिस"




अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.

 "प्राइड अँड प्रेज्युडिस" १८०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर  "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!

पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही  एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.

 १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत.   आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका  एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.

"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.

लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."

 तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."

ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.

-भक्ती 


No comments: