Sunday, September 13, 2026

वातापी गणपती


वातापी गणपती 


कर्नाटकातील बदामी प्राचीन काळातील वातापी. लालसर-तपकिरी वाळूच्या खडकांनी वेढलेली ही नगरी दख्खनच्या इतिहासात केवळ एक प्राचीन राजधानी म्हणून नव्हे, तर स्थापत्य, शिल्पकला, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांचा एक अद्भुत संगम म्हणून उभी आहे. 



 

बदामी लेणी क्रमांक 1 शिल्पसमूहाकडे पाहताना जवळच दिसणाऱ्या गणेशाच्या उपस्थितीमुळे दृश्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते. पित्याचे नृत्य पाहणारा पुत्रही कल्पना मनात घेतली की या शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘बाबा नाचत आहेत,मग आपणही नाचू शकतो का?’ अशी बालसुलभ उत्सुकता जणू या दृश्यातून जाणवते. अर्थात, ही शिल्पावर आधारित रसात्मक व्याख्या आहे. प्राचीन शिलालेख किंवा ग्रंथातून सिद्ध झालेली कथा म्हणून ती मांडलेली नाही . पण शिल्पाचा भावार्थ समजून घेण्यासाठी ती नक्कीच मोहक आहे.छोटा बालगणेश शिव नटराजप्रमाणे हाताची मुद्रा करत आहे.बालकांच्या ठायी उत्सुकतापूर्ण अनुकरण हा शिल्पात दाखवले आहे 

तर रावलफडी मधला बाळगणेश लाडू /मोदक पात्र हाती घेऊन खाण्याच्या मुद्रेत आहे.



बदामी या शिल्पवैभवाची आठवण झाली की पुढे येते ती एका दुसऱ्याच गणपतीची कथा वातापी गणपतीची.

‘वातापी गणपतिं भजेहम्’ हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना अपरिचित नाही. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुथुस्वामी दीक्षितरांनी रचलेली ही संस्कृत कृती तामिळनाडूतील तिरुवारूर जिल्ह्यातील तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपतीला समर्पित आहे. हंसध्वनी रागातील ही रचना आज कर्नाटकी संगीताच्या मैफलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

अशी आख्यायिका आहे की, गजमुखसुराला मारल्याच्या पापाबद्दल गणपतीने येथे शिवाची पूजा केली . गजमुखसुराला शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि त्याने मातंगपुरम येथील आपल्या स्वनिर्मित राजधानीतून मानवांना अतोनात दुःख दिले होते.

हत्तीने गणपती देवाचा सामना केला आणि आपल्या तुटलेल्या उजव्या सुळ्याने त्या राक्षसाचा पराभव केला. असे मानले जाते की, त्या राक्षसाने सांडलेल्या रक्तामुळे येथील जमीन लाल झाली आणि म्हणूनच तमिळमध्ये या जागेला 'तिरुचेनकाट्टनकुडी' असे नाव पडले . जरी येथील मुख्य देवता शिव असले तरी, गणपतीलाच प्रथम सन्मानाचे स्थान दिले जाते.

वातापी गणपतीची मूर्ती बदामीहून तिरुचेंकाट्टनकुडी येथे कशी पोहोचली, याभोवती एक प्रसिद्ध मौखिक परंपरा आहे. 

बदामी किल्ला परिसरातील ‘लोअर शिवालय’ हे सातव्या शतकातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.आज जरी शिवालय ओळखले जाते तरी इथे पल्लव आक्रमणाआधीएक गणेश मूर्ती होती, होय तीच प्रसिद्ध 'वातापी गणपती '!!



इ.स. ६४२ च्या सुमारास पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याने चालुक्यांची राजधानी वातापीवर विजय मिळवला. त्याचा सेनापती परंज्योती याने युद्धानंतर वातापी येथून गणपतीची मूर्ती आणली आणि आपल्या जन्मभूमीत तिची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. पुढे हाच परंज्योती ‘सिरुत्तोंडर’ या नावाने शैव नायनार संतपरंपरेत प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे.

मात्र इतिहास आणि आख्यायिका यांची सरमिसळ होऊ नये. परंज्योतीने वातापीतून हीच गणपतीची मूर्ती आणली, याला ठोस समकालीन लिखित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा ‘मौखिक परंपरेनुसार’ किंवा ‘स्थानिक आख्यायिकेनुसार’ अशीच मांडणे अधिक शास्त्रीय ठरेल.



तिरुचेंकाट्टनकुडीतील उत्तरापतिश्वरस्वामी मंदिराशी वातापी गणपतीची परंपरा जोडलेली आहे. या मंदिरसमूहात गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी-मस्तक असलेले रूपही आढळते. त्यामुळे गणपतीच्या प्रतिमाविश्वातील विविधता आणि स्थानिक धार्मिक परंपरांचे परस्पर संबंधही येथे अभ्यासता येते.

दगडात कोरलेला नटराज, त्याच्या सान्निध्यातला गणेश आणि दूर तामिळनाडूत आजही घुमणारा ‘वातापी गणपतिम्’चा स्वर या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे वातापी.

वातापी म्हणजे आजचे बदामी.ते दख्खनच्या स्मृतीत कोरलेले एक जिवंत सांस्कृतिक पर्व!!

‘वातापि गणपतिं भजेहम्’ ही मुथुस्वामी दीक्षितरांची संस्कृत कृती असून ती हंसध्वनी रागात रचलेली आहे. 

वातापि गणपतिं भजेहम्

वातापि गणपतिं भजेहम् ।

वरणास्यं वरप्रदं श्रीम् ॥

मी वातापीच्या गणपतीचे भक्तिभावाने स्मरण व भजन करतो.सुंदर, विशाल मुख असलेल्या, भक्तांना वरदान देणाऱ्या त्या मंगलमूर्तीची मी उपासना करतो.


भूतादि संसेवित चरणम् ।

भूत-भौतिक-प्रपञ्च-भरणम् ।

वीतरागिणं विनुतयोगिनम् ।

विश्वकारणम् ॥

ज्यांच्या चरणांची पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीतील शक्ती उपासना करतात,जे या संपूर्ण भौतिक विश्वाचे पालन-पोषण करतात,जे आसक्तीपासून मुक्त आहेत आणि योगिजन ज्यांची स्तुती करतात,त्या गणेशाला मी वंदन करतो.जो या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वामागील कारणस्वरूप आहे.


पुरा कुम्भ-सम्भव मुनिवर

प्रपूजितं त्रिकोण-मध्यगतम् ।

मुरारि-प्रमुखाद्युपासितम् ।

मूलाधार-क्षेत्रस्थितम् ॥

ज्यांची पूर्वी अगस्त्य ऋषींनी भक्तिभावाने पूजा केली,जे त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान आहेत,ज्यांची विष्णूसह श्रेष्ठ देवताही उपासना करतात,आणि जे योगशास्त्रातील मूलाधारचक्रात अधिष्ठित आहेत,त्या गणपतीला मी नमन करतो.


परादि चत्वारि वागात्मकं ।

प्रणवस्वरूपं वक्रतुण्डम् ।

निरन्तरं निटिल-चन्द्रखण्डम् ।

निज-वामकर-विधृत-इक्षुदण्डम् ॥


जे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्थांचे स्वरूप आहेत,जे पवित्र ॐकाराचे मूर्त स्वरूप आहेत,ज्यांची सोंड वक्र आहे,ज्यांच्या कपाळावर चंद्रकोरी शोभते,आणि ज्यांच्या डाव्या हातात ऊसाचा दंड आहे.अशा वक्रतुण्ड गणपतीला मी वंदन करतो.


करंबुज पाश बिजापुरं 

कलुषविदुरं भूतकरं हरादी 

गुरुगुहा तोषिता बिंबं 

हमसाध्वनी भूषित हेरंबम ।।५।।

आपल्या कमळधारी हातांमध्ये तो फास आणि लिंबू फळ धारण करतो. तो सर्व अशुद्धतेपासून दूर, सर्व जीवांचे साक्षात स्वरूप आहे. त्याची तेजस्वी प्रतिमा हर (शिव), इतर आणि गुरुगुह (स्कंद) यांना आनंदित करते. तो हेरंबा (दुर्बळांचा रक्षक) असून, हंसध्वनीच्या सुरावटीने अलंकृत आहे.

या स्तोत्रात गणपती केवळ विघ्नहर्ता किंवा वरदायक देवता म्हणून येत नाही. दीक्षितर गणपतीला विश्वाच्या मूलतत्त्वाशी जोडतात. मूलाधारचक्र, ॐकार, वाणीच्या चार अवस्था, पंचमहाभूते आणि विश्वाचे कारण या संकल्पनांमधून गणपतीचे एक अत्यंत व्यापक, तात्त्विक आणि योगपरंपरेशी संबंधित रूप उभे राहते.

म्हणून ‘वातापी गणपतिं भजेहम्’चा भाव केवळ “हे गणपती, माझे विघ्न दूर कर” इतकाच नाही. तो अधिक खोल आहे

“हे वातापी गणपती, तू विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आहेस, वाणीचे आणि प्रणवाचे स्वरूप आहेस; योगी आणि देवताही तुझी उपासना करतात. त्या विश्वव्यापी, मंगलमय गणेशाला मी भक्तिभावाने वंदन करतो.”


राग: हंसध्वनी 

ताल: आदि ताल 

रचनाकार: मुथुस्वामी दीक्षितर

कालखंड: इ.स. १७७५–१८३५; त्यांचा जन्म २४ मार्च १७७५ रोजी झाला आणि निधन २१ ऑक्टोबर १८३५ रोजी झाले. 

भाषा: संस्कृत

देवता: तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपती

परंपरा: कर्नाटक संगीताच्या मैफलीची सुरुवात गणपतीच्या मंगलस्मरणाने करण्यासाठी ही कृती विशेष लोकप्रिय आहे. 

विशेष म्हणजे हंसध्वनी रागाची निर्मिती मुथुस्वामी दीक्षितरांनी केलेली नाही. हा राग त्यांच्या वडिलांना, रामस्वामी दीक्षितरांना, श्रेय दिला जातो. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या रागात मुलाने गणपतीची ही अजरामर कृती रचली, हा संगीतपरंपरेतील सुंदर योग आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘वातापि गणपतिम्’च्या शेवटच्या भागात हंसध्वनीचा उल्लेख येतो, त्यामुळे ही कृती कोणत्या रागात गायची याचाही संकेत रचनेतच मिळतो. 

“वातापीच्या कातळांमध्ये कोरलेली गणपतीची स्मृती पुढे मुथुस्वामी दीक्षितरांच्या ‘वातापि गणपतिम्’मधून स्वररूपाने अमर झाली.आणि त्या स्वरांना लाभला हंसध्वनीचा मंगल नाद.”

-भक्ती 

Friday, September 11, 2026

अष्टमहाभय अवलोकितेश्वर

 #badami बदामीतील अनवट वाटेवरील अष्टमहाभय अवलोकितेश्वर




बदामी म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती चालुक्यकालीन शैव आणि वैष्णव लेणी, त्यांच्या भव्य देवप्रतिमा आणि खडकात कोरलेले स्थापत्य. मात्र याच बदामीच्या कलाविश्वात एक वेगळी आणि तुलनेने अनवट वाट दाखविणारी बौद्ध प्रतिमा आढळते. बदामी लेणी क्रमांक ३ मधील या शिल्पाची ओळख काही कला-इतिहास अभ्यासकांनी अष्टमहाभय अवलोकितेश्वराशी जोडली आहे. या ओळखीचा उल्लेख De Mallmann यांच्या अभ्यासाच्या संदर्भात आढळतो. त्यामुळे या प्रतिमेकडे बदामीच्या प्रामुख्याने प्रतिमाविश्वाच्या चौकटीबाहेर डोकावणाऱ्या महत्त्वपूर्ण शिल्परूप म्हणून पाहता येते.


अवलोकितेश्वर हा महायान बौद्ध परंपरेतील करुणेचा बोधिसत्त्व मानला जातो. संकटात सापडलेल्या भक्ताचे रक्षण करणारा, त्याच्या हाकेला प्रतिसाद देणारा आणि भयातून मुक्त करणारा असा त्याचा स्वरूपविचार विकसित झाला. ‘अष्टमहाभय’ म्हणजे भक्ताला किंवा प्रवाशाला भेडसावणारी आठ महान संकटे. या संकटांपासून रक्षण करणारा अवलोकितेश्वर हा या प्रतिमाविषयाचा केंद्रबिंदू आहे.


पश्चिम दख्खनातील बौद्ध लेण्यांमध्ये अवलोकितेश्वराच्या ‘संकटमोचक’ किंवा ‘रक्षक’ स्वरूपाची अनेक उदाहरणे आढळतात. अजिंठा, कान्हेरी, संभाजीनगर आणि वेरूळ येथील विविध प्रतिमांमधून या संकल्पनेचा विकास दिसून येतो. उपलब्ध अभ्यासानुसार अजिंठ्यात अवलोकितेश्वराच्या संरक्षणरूपाची अनेक उदाहरणे, कान्हेरीत तीन, औरंगाबाद लेणी ७ मध्ये एक आणि वेरूळमध्ये दोन उदाहरणे नोंदली गेली आहेत.


यांपैकी संभाजीनगर  (औरंगाबाद )लेणी क्रमांक ७ हे तुलनेसाठी विशेष महत्त्वाचे उदाहरण आहे. तेथे मध्यभागी उभा अवलोकितेश्वर असून त्याच्या दोन्ही बाजूंना आठ संकटांची स्वतंत्र लघुदृश्ये कोरलेली आहेत. एका बाजूला अग्नी, दरोडेखोर, बंधन किंवा गुलामी आणि जलसंकट, तर दुसऱ्या बाजूला सिंह, सर्प, हत्ती आणि यक्षिणी/राक्षसीपासून होणारे संकट अशी मांडणी केली आहे. प्रत्येक प्रसंगात संकटात सापडलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवलोकितेश्वराचे लघुरूप येताना दाखविले आहे.


बदामीतील प्रतिमा मात्र मोठ्या प्रमाणात झिजलेली आणि अस्पष्ट असल्यामुळे औरंगाबादच्या उदाहरणाप्रमाणे तिच्या भोवतीची प्रत्येक लघुदृश्ये निश्चितपणे कोणत्या महाभयाचे प्रतिनिधित्व करतात, असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. छायाचित्रात मध्यवर्ती उभी आकृती आणि तिच्या दोन्ही बाजूंना लहान मानवी व कथात्मक आकृत्यांची रचना जाणवते. त्यामुळे ‘अष्टमहाभय अवलोकितेश्वर’ ही विद्वत्तापूर्ण ओळख लक्षात घेऊन, प्रत्यक्ष दृश्य पुराव्याच्या आधारे सावधपणे अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल.


यामुळे बदामीतील हे शिल्प विशेष ठरते. एकीकडे बदामी चालुक्यांच्या शैव-वैष्णव कलापरंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे, तर दुसरीकडे त्याच परिसरात महायान बौद्ध प्रतिमेची शक्यतादर्शक उपस्थिती दिसते. ही प्रतिमा तत्कालीन दख्खनमधील धार्मिक परंपरांमधील संपर्क, कलात्मक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक सहअस्तित्व समजून घेण्यासाठी एक वेगळी खिडकी उघडते.

Wednesday, August 26, 2026

ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा

 #



ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा


आज ओनमचा सण. केरळच्या सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत जिव्हाळ्याने जपला गेलेला हा दिवस म्हणजे केवळ उत्सव, फुलांची सजावट आणि सणभोजन यापुरता मर्यादित नाही. या दिवसामागे आहे राजा महाबलीची कथा हि दान, समता, प्रजाप्रेम आणि शब्दाला जागणाऱ्या राजाची कथा.


या चित्रात दिसणारे शिल्प विष्णूच्या त्रिविक्रम अवताराशी संबंधित आहे. कथेनुसार महाबली हा पराक्रमी आणि उदार असुरराजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि दानधर्माला विशेष महत्त्व होते. महाबलीच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देव चिंतित झाले. तेव्हा विष्णूंनी वामनाचे एका लहान ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून महाबलीकडे दान मागितले.


वामनाने राजाकडे फक्त तीन पावलांची जमीन मागितली. इतकी छोटी मागणी ऐकून महाबलीने ती सहज मान्य केली. पण दानाचा संकल्प होताच वामनाने विराट रूप धारण केलेतोच त्रिविक्रम एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नाही.


महाबलीने मग स्वतःचे मस्तक पुढे केले.


हा प्रसंग पराभवाचा नसून समर्पणाचा आहे. महाबलीकडे सत्ता होती, संपत्ती होती, सामर्थ्य होते; पण त्याहून मोठी गोष्ट त्याच्याकडे होती.दिलेला शब्द पाळण्याची तयारी. स्वतःचे सर्वस्व गमावण्याची वेळ आली तरी त्याने दानातून मागे हटणे स्वीकारले नाही.


ओनमच्या कथेत पुढे असे सांगितले जाते की महाबलीला त्याच्या प्रजेशी असलेल्या प्रेमामुळे वर्षातून एकदा आपल्या राज्यात येण्याची संधी मिळाली. म्हणूनच ओनम हा राजा महाबलीच्या स्वागताचा उत्सव मानला जातो. लोक आपल्या घरांची सजावट करतात, फुलांच्या रांगोळ्या पूक्कळम काढतात आणि आनंदाने त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करतात.


या शिल्पाकडे आज, ओनमच्या दिवशी पाहताना, त्यातील प्रसंगाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. येथे केवळ विष्णूचा विराट त्रिविक्रम दिसत नाही,तर त्याच्यासमोर उभा राहून स्वतःचे मस्तक अर्पण करणारा महाबलीही दिसतो. एका बाजूला दैवी विराटता आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी मूल्यांची विराटता.


ओनम आपल्याला महाबलीची आठवण करून देतो अशा राजाची, ज्याचे वैभव त्याच्या सिंहासनात नव्हते, तर त्याच्या दानशूरतेत आणि प्रजेवरील प्रेमात होते.


आजच्या या ओनम पर्वावर, या शिल्पातील बळी-त्रिविक्रम प्रसंगाकडे पाहताना एकच विचार मनात येत


सत्ता क्षणभंगुर असते पण दिलेला शब्द, उदारता आणि लोकांच्या मनात मिळवलेले स्थान अमर असते.


सर्वांना ओनमच्या हार्दिक शुभेच्छा!

ഓണം ആശംസകൾ!


शिल्पशास्त्र -६ वे शतक इ.स.त्रिविक्रम, अष्टभुज (आठ हात असलेला), आपल्या उजव्या पायावर उभा आहे आणि त्याने आपला डावा पाय खांद्यापर्यंत वर उचलला आहे. नमुची अत्यंत आदराने त्याचा उजवा पाय धरून आहे, तो सांगत आहे की दान वामन रुपाला आहे या त्रिविक्रम रूपाला नाही.देवाचे अथांग रूप पाहून थक्क झालेला एक असुर हातात खड्ग घेऊन त्याच्या उजवीकडे उभा आहे. देवाच्या डाव्या बाजूला, त्याच्या वर उचललेल्या पायाच्या खाली वामन हातात छत्री घेऊन उभा आहे, आणि राजा बलीकडून मिळणारे दान स्वीकारत आहे. बलीसोबत त्याची पत्नी आणि गुरू शुक्राचार्य आहेत, जे बलीच्या वतीने कमंडलूतून पाणी ओतण्याच्या क्रियेत दाखवले आहेत. या दृश्याच्या वर, देवाने ज्या वेगाने आपला पाय वर उचलला आहे, त्या वेगाने एक राक्षस हवेत फेकला गेला आहे. डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात एक हसरा चेहरा दाखवला आहे. देवाच्या वर उचललेल्या पायाच्या वर दोन आकृत्या हवेत उडताना दिसत आहेत. एकाचा चेहरा अस्वलासारखा आहे, जो स्पष्टपणे जांबुवंताचे प्रतिनिधित्व करतो आणि दुसरी आकृती गरुडाची आहे. हे दोघेही देवाने केलेल्या या अद्भूत पराक्रमाची स्तुती करत आहेत.

त्रिविक्रमाच्या हातात खड्ग (तलवार), गदा, बाण, चक्र, शंख (हा उचललेल्या पायाला समांतर धरलेला आहे), खेटक (ढाल) आणि धनुष्य.

------------------------------

Monday, August 24, 2026

गंगाधरशिव –ऐहोळे

 #गंगाधरशिव – #रावणफाडी गुहा मंदिर, #ऐहोळे, कर्नाटक





रावणफाडीच्या एका शांत गुहेत, गंगाधर शिवाचे ते अद्भुत शिल्प एकाच शिळेत कोरले गेले आहे. हे शिल्प विकसित भारतीय वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. इ.स. ५५० च्या सुमारास चालुक्य राजवटीत बांधलेल्या या गुहा मंदिरात प्रवेश करताच, दरवाजालगतच्या डाव्या भिंतीवर हे भव्य शिल्प आपले स्वागत करते.


या शिल्पात भगवान शिव समभंग मुद्रेत उभे आहेत. गंगा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळातून प्रवास करत असल्यामुळे तिला त्रिपथागामी असेही म्हटले जाते. ही घटना येथे नमस्कार मुद्रेत असलेल्या तीन एकसारख्या स्त्रियांच्या (गंगा, यमुना आणि सरस्वती) एकत्रीकरणातून भव्यपणे चित्रित केली आहे. महादेवाने आपल्या मस्तकावर उंचावून ही गंगा धरली आहे. त्यांनी जटा आणि अर्धचंद्राने बनलेला मुकुट परिधान केला आहे. त्यांच्या मस्तकाभोवती तेज कोरले आहे, जे चंद्रमौळीश्वरांच्या देवत्वाला अधोरेखित करते.


चतुर्भुज शिव विश्राममुद्रेत उभे आहेत. त्यांचा खालचा उजवा हात कट्यावलंबित मुद्रेत आहे, तर वरचा डावा हात चिन्मुद्रेत आहे. वरच्या दोन हातांनी ते आपल्या काही जटा हवेत उचलून वेगळ्या करून गंगेचा लहानसा अंश पृथ्वीवर सोडत आहेत. त्यांनी आपला पुढचा डावा हात मांडीवर ठेवला असून, त्यात त्यांनी उत्तरीय धारण केली आहे.


त्यांच्या धनुष्यासारख्या भुवयांच्या मधला तिसरा डोळा मिटलेला आहे आणि बाकीचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत. विश्वाच्या कल्याणासाठी त्यांना गंगेचे असह्य ओझे आपल्या मस्तकावर वाहावे लागते. पण त्या प्रचंड दबावाखाली वाकण्याऐवजी, त्यांच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य आहे, कारण त्यांचे हे आणखी एक बलिदान पृथ्वीवरील प्रत्येक जीवनात चांगला बदल घडवून आणणार आहे.


डाव्या बाजूला महाराज भगीरथ एका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या करत आहेत. ते अत्यंत कृश (सडपातळ) दाखविले आहेत, जणू हाडांचा सापळा. भगीरथ इक्ष्वाकु वंशाचे (भगवान रामाचे पूर्वज) एक महान राजा होते. त्यांचे पूर्वज, राजा सागर यांचे साठ हजार पुत्र, कपिल मुनींच्या शापाने भस्म झाले होते. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळावी यासाठी गंगेचे पावित्र्य आवश्यक होते. म्हणून भगीरथाने हजारो वर्षे कठोर तप केले.प्रथम ब्रह्मदेवाची प्रसन्नता मिळवली, नंतर गंगेला पृथ्वीवर येण्यास राजी केले. पण गंगेच्या प्रचंड वेगाने पृथ्वी नष्ट होण्याची भीती असल्याने त्यांनी पुन्हा शिवाची आराधना केली. शिवांनी गंगेला आपल्या जटांत सामावून घेतले आणि हळूहळू पृथ्वीवर सोडले. म्हणून गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते. या शिल्पात भगीरथाचे एकपाद तप आणि त्यांची अत्यंत कृश काया त्यांच्या कठोर तपश्चर्येचे आणि दृढनिश्चयाचे सशक्त प्रतीक आहे.


उजव्या बाजूला पार्वती उभी आहे. पार्वतीने डोक्यावर उंच मुकुट घातला आहे आणि तिचे कानातले तिच्या दिव्य सौंदर्यात भर घालत आहेत. तिने गळ्यात, हातांवर, कमरेवर आणि बाहूंवर सुंदर दागिने घातले आहेत. ती डोळे विस्फारून आपल्यासमोर घडणाऱ्या दृश्याकडे पाहत आहे. तिचा उजवा हात हनुवटीवर ठेवून ती आपल्या पतीकडे पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर गंमत, आश्चर्य, अभिमान, समाधान आणि तृप्ती यांसारख्या भावनांचे मिश्रण दिसून येते.


भगवान शिवाच्या मस्तकावर गंगा, यमुना आणि सरस्वती अंजली मुद्रेत दिसतात. हे संपूर्ण मंदिर एकाच प्रचंड खडकातून कोरले गेले आहे. ऐहोळे येथील रावणफाडी गुहा मंदिरातील हे गंगाधर शिव शिल्प, भगीरथाच्या तपाने गंगेला पृथ्वीवर आणण्याची आणि महादेवाने तिला आपल्या जटांत सामावून घेतल्याची महान पौराणिक कथा अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण रीतीने साकारते.

Saturday, August 22, 2026

‘केवल नरसिंह’ बदामी लेणी ३





 ‘केवल नरसिंह’ ही संज्ञा विष्णूच्या सिंह-मानव अवताराच्या स्वतंत्र, एकाकी आणि शांत स्वरूपाला सूचित करते, ज्यात लक्ष्मी किंवा सक्रिय युद्धाचे घटक दर्शवले जात नाहीत. अनेक अभिजात ग्रंथ केवल -एकांत स्वरूपाला बसलेल्या, ध्यानस्थ मुद्रेशी गिरीष/गिरीजा किंवा योग नरसिंह जोडतात, परंतु बदामी लेणी ३ मधील उभ्या केवल नरसिंहाचे एक दुर्मिळ, प्रारंभिक स्वरूप सादर झाले आहे.

नेहमीच्या स्थूल /स्थौण नरसिंहाच्या जो हिरण्यकशिपूला सक्रियपणे फाडून टाकतो विपरीत, हा नरसिंह शांतपणे त्रिभंग स्थितीत उभा असून एक हात सहजपणे गदेवर ठेवतो. त्याच्या अत्यंत शांत, जवळजवळ हसऱ्या चेहऱ्यामुळे हे राक्षसाच्या वधानंतरचे क्षण दर्शवते, जिथे दैवी शक्ती शांत झाली आहे आणि तो सर्वोच्च स्वामी म्हणून एकटा उभा आहे "केवलाचे सार"!!
चार हातांचा नरसिंह पाय पसरून उभा आहे. त्याचे मस्तक कमळाने सुशोभित आहे, जे सर्व प्रारंभिक नरसिंह मूर्तींमध्ये आढळते.
त्याने यज्ञोपवीत, मकर किंवा मालाकार, कौपीनासारखे अधोवस्त्र आणि हार इत्यादी अलंकार धारण केले आहेत.
उजवा खालचा हात उजव्या स्तनाजवळ धरला असून त्यात अस्पष्ट वस्तू आहे. वर दोन जोड्या गंधर्व-युग्म उडताना दाखवले आहेत.
देवाच्या उजवीकडे खाली असुर प्रह्लादाची बटु आकृती आहे.डावीकडे मानवी रूपात (पंखांसह) गरुड उभा आहे.
हातांतील आयुधे: एका हातात अस्पष्ट वस्तू, चक्र (व्यक्तीरूप), शंख (व्यक्तीरूप) आणि गदा.
अशा प्रतिमेबाबत कोणत्याही प्रतिमाशास्त्रीय ग्रंथात विधान आढळत नाही, तरीही ही मूर्ती देवाची ती अवस्था दर्शवते जिथे त्याने आपले कार्य हिरण्यकशिपूचा वध पूर्ण केल्यानंतर शांत झाला आहे, आणि प्रह्लाद ज्यामुळे अवतार आवश्यक झाला उपस्थित आहे. हातांत व्यक्तीरूप आयुधे धारण करणे विशेष उल्लेखनीय आहे, कारण ते प्रारंभिक चालुक्य शिल्पकलेत अत्यंत दुर्मिळ आहे.
सुरुवातीच्या बदामी चालुक्यांनी या प्रतिमाशास्त्राचा धोरणात्मक वापर करून शांतताप्रिय पण विलक्षण शक्तिशाली एकाकी नरसिंहाच्या चित्रणातून दख्खन प्रदेशावरील आपले स्वतंत्र, अनियंत्रित सार्वभौमत्व (केवल सत्ता) दृष्यरूपात प्रतिबिंबित केले.कर्नाटकात या प्रकारच्या नरसिंहाची फक्त दोन उदाहरणे आढळतात.दुसरे ऐहोळ येथील दुर्गा मंदिरात आहे.
संदर्भ- प्रख्यात कला इतिहासकार डॉ.श्रीनिवास व्ही.पेडिगार-
The Cult of Vishnu in Karnataka from Earliest Times to 1336 a D Based on a Study of Inscriptions and Sculpture

Tuesday, August 18, 2026

पूर्व चालुक्य स्थापत्यशैलीमध्ये काल -वेळ आणि 'काली-मृत्यू.

 युरेका मोमेन्ट इन बदामी!!


महाकुट म्हणजेच दक्षिण काशी मंदिरात फिरतांना पायऱ्या चढत थेट शेवटच्या टोकापर्यंत गेले. एक प्रवेशद्वार होते. ते ओलांडून पलीकडे ते प्रवेशद्वार पाहून मी थक्कच झाले. भीती आश्चर्य अशी अवस्था माझी त्या भव्य माणसाच्या उंचीच्या मूर्ती पाहून झाली होती. युरेका याचसाठी की या मूर्तीविषयी मी आतापर्यंत बदामीचच्या असंख्य पर्यटन लेख, रील्स मध्ये उल्लेखही पाहिला कोणत्याच ठिकाणी पाहिला नाही.

येथे #बदामी #चालुक्य स्थापत्यशैलीतील '#काल #काली' यांच्या 




पूर्व चालुक्य स्थापत्यशैलीमध्ये काल -वेळ आणि 'काली-मृत्यू.

 

सामान्य द्वारपाल ते फक्त मंदिराचे रक्षण करणारे रक्षक म्हणून उभे असतात.काल-काली: हे केवळ रक्षक नसून शैव-शक्त आणि कापालिक संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहेत. 'काल' म्हणजे वेळ आणि मृत्यू. मंदिराच्या गर्भगृहात किंवा पवित्र प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी माणसाने आपला मृत्यूचा आणि काळाचा अहंकार, तसेच शरीराचा मोह इथेच सोडून शुद्ध मनाने आत जावे, हा यामागचा मुख्य दार्शनिक संदेश आहे.शक्तीचे उग्र रूप, अनेकदा चामुंडेशी साधर्म्य असलेले यांच्या मूर्तीशास्त्रातून सुरुवातीच्या मध्ययुगीन मंदिर रक्षक परंपरेत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल दिसून येतो.

पारंपारिक राजेशाही थाटातील, हातात शस्त्रे घेतलेल्या द्वारपालांऐवजी चालुक्य शिल्पकारांनी दारावर या कृश, हाडांचा सापळा असलेल्या उग्र मूर्ती कोरून मंदिराच्या प्रवेशद्वाराला एका खोल आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जोड दिली.


युरोपीय गॉथिक शैलीतील 'गार्गोइल्स' (भितीदायक काल्पनिक प्राणी) किंवा इतर राक्षसी आकृत्यांपेक्षा वेगळेपण जपण्यासाठी चालुक्य कलाकारांनी या मूर्तींना पूर्णपणे मानवी, तरीही अत्यंत कृश आणि हाडांचा सापळा अशा रूपात साकारले आहे.


 प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कोरलेल्या या मूर्ती हे दर्शवतात की 'काळ' (काल) आणि 'मृत्यू' (काली) या जगातील प्रत्येक भौतिक गोष्टीचा नाश करतात. मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी भाविकाला या मृत्यूच्या आणि नश्वरतेच्या विचारांच्या पलीकडे जावे लागते.

 शारीरिक वैशिष्ट्ये आणि शरीररचना 

मूर्तींमध्ये 'भयानका रस' निर्माण करण्यासाठी शिल्पकारांनी शरीररचनेचे अत्यंत बारकावे दाखवले आहेत:

हाडांचा सापळा -मूर्तींच्या बरगड्या, गळ्याची हाडे आणि पायांची हाडे अगदी स्पष्टपणे कोरलेली दिसतात. जणू काही फक्त हाडांवर त्वचा चिकटलेली आहे असे ते रूप आहे.

खोल गेलेले पोट -या मूर्तींची पोटे आत ओढलेली आहेत, जी संपूर्ण विश्वाला गिळंकृत करणाऱ्या त्यांच्या अतृप्त भुकेचे (काळाची भूक) प्रतीक मानली जाते.

उग्र हावभाव-त्यांचे डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे मोठे आणि चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत उग्र, क्रोधित आहेत.

गतिमान मुद्रा -हे रक्षक एका हाताने शस्त्र किंवा दंड धरून बचावात्मक आणि आक्रमक पवित्र्यात उभे राहिलेले दिसतात.


पाशुपत आणि तांत्रिक पंथांचा प्रभाव 

६ व्या ते ८ व्या शतकात कर्नाटकातील धार्मिक परिस्थिती कशी होती, याचे प्रतिबिंब या उग्र मूर्तींमधून उमटते:

बदामीचे सुरुवातीचे चालुक्य राजे पाशुपत शैवपंथ आणि सुरुवातीच्या तांत्रिक परंपरांनी प्रभावित होते.चामुंडा, भैरव आणि काल या देवतांना केवळ संहारक न मानता मंदिराच्या भूमीचे मुख्य रक्षक (वास्तू रक्षक) म्हणून पूजले जात असे.


प्रवेशद्वारावरच या भयंकर रूपाचा सामना केल्यामुळे, मंदिराच्या शांत गाभाऱ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी भक्ताच्या मनातील संसारी मोह-माया गळून पडते, असा यामागील आध्यात्मिक उद्देश आहे.

Wednesday, August 5, 2026

हंपीचा ध्यास -६ (विजयविठ्ठल मंदिर )








हंपीच्या पहिल्या दिवशी हंपी खरेदीसाठी फेरफटका मारला .तेव्हा हॅम्प कापडापासून बनवलेल्या बॅग घेतल्या.भांगेच्या झाडापासून बॅग ?त्यावर तर बंदी आहे ना ?असा प्रश्न मनात आला.
ते शोधाता असे समजले की ,ज्या हेम्प बॅग्स बाजारात विकल्या जातात त्या THC खूप कमी असलेल्या औद्योगिक हेम्पपासून बनवल्या जातात. त्यामुळे त्या सुरक्षित आणि कायदेशीर आहेत.
हंपीत कुठे सूर्योदय कुठे सूर्यास्त याची यादीच मी बनविली होती .पण आदल्या दिवशी इतकी दमली की दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय रम बाहेरच्या गॅलरीतूनच पाहिला .खार सांगते तोही कमाल होता .पाखरांचे थवे स्वछंद्पणे तांबूस आकाशात विहरत होते.विचार आला ,हंपीचे पक्षीही काय सुरेख आहेत :)
हंपीत एक सुंदर काफ्तान पद्धतीचा कुर्ता घेतला होता ,एकदम क्लास लुक झाला.ज्यामुळे आजचे सगळे फोटो मस्त येणार याचा मनात लाडू फुटला :)
आम्ही आधी विठ्ठल मंदिराकडे निघालो 

मंदिर उंच भिंतींनी वेढलेले असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्यांना पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळील तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करावे लागते.या मंदिरात काढलेले २५/- /व्यक्ति तिकीट हे सर्व स्थळांना चालते जसे लोटस महाल,कमलापूर संग्राहालय  इ. 
हम्पी येथील विजया विठ्ठल मंदिरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बग्गी सुरू झाल्या आहेत.वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कंपनांमुळे प्राचीन अवशेषांना होणारे नुकसान टाळण्यासाठी, गेज्जाला मंडप आणि मंदिर परिसरादरम्यानच्या १ ते २ किलोमीटरच्या प्रतिबंधित पट्ट्यातून पर्यटकांची ने-आण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्या सुरू केल्या.
या  इलेक्ट्रिक बग्गीने पुढे मंदिराकडे जाताना लागतो -'विठ्ठल बाजार' हंपीतील विजय विठ्ठल मंदिराच्या समोर पसरलेला विठ्ठल बाजार हा विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचा जिवंत अवशेष आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूर्व-पश्चिम रस्ता तुंगभद्रा नदीला समांतर आहे. एकेकाळी येथे मौल्यवान दगड, रेशीम, मसाले, घोडे आणि हत्ती यांचा मोठा व्यापार चालत असे. आजही येथील स्तंभांच्या रांगा आणि मंडपांचे अवशेष पाहून त्या काळच्या गर्दीच्या बाजाराची कल्पना येते. पश्चिमेकडे विठ्ठल मंदिर आणि पूर्वेकडे गेज्जला मंडप अशा दोन टोकांनी बंदिस्त असलेला हा बाजार हंपीच्या इतिहासाची एक महत्त्वाची कडी आहे.



मंदीराच्या प्रवेश द्वाराशी भग्नावस्थेतील गोपुरम, जरी त्याचा वरचा भाग तुटलेला असला तरी, आपले स्वागत करते.हा गोपुर उद्ध्वस्त करण्यासाठी तोफ वापरून यावर गोळे डागले असण्याची शक्यता वाटते.विजय विठ्ठल मंदिर हे स्थापत्यकला, शिल्पकला, संगीतपरंपरा आणि भक्तिसंस्कृती यांचा अद्वितीय संगम घडवणारे स्मारक म्हणून विशेष महत्त्वाचे आहे.
विजय विठ्ठल मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे. मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात मुख्य मंदिराबरोबरच भव्य महामंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप, दगडी रथ आणि विविध लहान देवळे आहेत. मंदिराच्या दगडी रचनेतून विजयनगरच्या शिल्पकारांचे कौशल्य दिसते,तर त्याच परिसराशी जोडलेल्या पुरंदरदासांच्या परंपरेतून विठ्ठलभक्ती आणि कर्नाटक संगीताचा इतिहास उलगडतो. त्यामुळे विजय विठ्ठल मंदिराचा अभ्यास हा केवळ एका मंदिराचा अभ्यास न राहता विजयनगरच्या व्यापक सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास ठरतो. 




 मंदिराच्या निर्मितीचा इतिहास
विजय विठ्ठल मंदिराच्या बांधकामाची सुरुवात विजयनगरचा राजा देवराय द्वितीय (इ.स. १४२२-१४४६)यांच्या कारकिर्दीत झाल्याचे उपलब्ध माहितीत नमूद केले आहे. मंदिराचा मूळ गाभा या काळात अस्तित्वात आला. पुढे विजयनगर साम्राज्याच्या राजाश्रयामुळे मंदिरसंकुलाचा विस्तार होत गेला.
कृष्णदेवराय (इ.स. १५०९-१५२९)यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या विकासाला विशेष चालना मिळाली. शंभर स्तंभी मंडप, गोपुरे आणि इतर वास्तूंच्या निर्मितीशी त्यांचा संबंध जोडला जातो. पुढे अच्युतराय (इ.स. १५२९-१५४२) आणि सदाशिवराय यांच्या काळातही मंदिरातील काही भाग पूर्ण झाल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे आज दिसणारे मंदिर हे एका राजाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेले बांधकाम नसून, अनेक पिढ्यांच्या राजाश्रयातून विकसित झालेले विस्तीर्ण मंदिरसंकुल आहे. 
विजयनगरच्या काळात विठ्ठलभक्तीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. विठ्ठलाच्या नावावरून काही गावांची नावे बदलण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरातील स्तंभ, भिंती आणि तुळयांवर विठ्ठलाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी राजा आणि राणी विठ्ठलासमोर भक्तिभावाने उभे असल्याचे चित्रणही आढळते. यावरून राजसत्ता आणि धार्मिक भक्ती यांच्यातील संबंध अधोरेखित होतो. 
विजय विठ्ठल मंदिराचे संपूर्ण संकुल एका प्रशस्त तटबंदीच्या आवारात आहे. पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिशांना भव्य गोपुरे असून त्यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो. या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य विठ्ठल मंदिराबरोबरच देवीचे मंदिर, महामंडप, रंगमंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप आणि प्रसिद्ध दगडी रथ आहेत.भारवाहक स्तंभांना केवळ वास्तुशास्त्रीय उपयोगापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यावर देवदेवता, याली, घोडे, हत्ती, योद्धे, पौराणिक प्राणी आणि विविध अलंकारिक आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक वास्तुघटक हा स्वतंत्र कलाकृतीसारखा भासतो. 

मंदिराच्या प्रांगणात शिरताच समोर उभा होता तोच जगप्रसिद्ध "दगडी रथ"



विजय विठ्ठल मंदिराचे सर्वाधिक प्रसिद्ध प्रतीक म्हणजे त्याच्या आवारातील दगडी रथ. रथाच्या स्वरूपात बांधलेली ही वास्तू प्रत्यक्षात गरुडाचे मंदिर आहे. वैष्णव परंपरेनुसार गरुड हा भगवान विष्णूचा वाहन मानला जातो.रथाची संपूर्ण रचना दगडातून साकारलेली असून ती लाकडी मिरवणुकीच्या रथाची प्रतिकृती भासते. रथाच्या चाकांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की ती अक्षाभोवती फिरू शकत होती. पूर्वी ही चाके फिरवता येत असत; मात्र संरक्षणाच्या दृष्टीने आता ती स्थिर करण्यात आली आहेत. 
रथाच्या स्थापत्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे बदलते स्वरूप. आज रथासमोर दोन हत्ती दिसतात,मात्र उपलब्ध निरीक्षणानुसार मूळ रचनेत येथे घोडे असावेत, असे मानले जाते. आजच्या हत्तींच्या मागील भागाजवळ घोड्यांचे मागचे पाय आणि शेपटीसदृश अवशेष दिसतात. यावरून रथाच्या पुढील भागात नंतर बदल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
रथावर पूर्वी विटांचे शिखर होते, असेही नमूद केले जाते. कालांतराने ते नष्ट झाले. त्यामुळे आज दिसणारा रथ हा मूळ वास्तूचा अवशेष असला तरी त्यात काळानुसार झालेले बदलही स्पष्टपणे जाणवतात.
 
रथावरील रंगकामाचे अवशेष
विजयनगरमधील शिल्पे केवळ दगडाच्या नैसर्गिक रंगात ठेवली जात नसत, तर त्यांवर रंगकाम केले जात असल्याचे पुरावे आढळतात. दगडी रथाच्या काही भागांवर आजही जुन्या रंगकामाचे अवशेष पाहायला मिळतात. विशेषतः रथाच्या खालच्या भागातील तुलनेने संरक्षित भागांमध्ये रंगाचे अंश टिकून राहिले आहेत.दगडी रथ आज भारतीय सांस्कृतिक वारशाचे एक प्रसिद्ध प्रतीक बनला आहे. त्याचे चित्रण भारतीय चलनी नोटेवरही करण्यात आले आहे. 






रथाच्या बरोबर समोर नृत्यमंडप किंवा संगीत मंडप /रंग मंडप 


विठ्ठल मंदिर हे आधी बंदिस्त मंडपाचे होते .नांतरच्या काळात याला खुले मंडप जोडले/बांधले गेले.मुख्य बांधकाम कृष्णदेवराय  यांच्या काळात झाले.
विठ्ठल मंदिराच्या काही भागांमध्ये (उदा. प्रवेशद्वारे/गोपुर) कृष्णदेवरायांच्या दोन राण्यांनी तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी योगदान दिले होते 
पण ऐतिहासिक परंपरेनुसार,पूर्वी नृत्य-संगीत कार्यक्रमांच्या वेळी राणी किंवा राजघराण्यातील स्त्रिया प्रेक्षक म्हणून येत असत.
त्यांच्या गोपनीयता राखण्यासाठी मंडपाच्या काही भागांवर किंवा बाजूच्या जागांवर कापडी पडदे / पडदे लावले जात.
काही ठिकाणी नर्तकी किंवा देवदासींच्या कार्यक्रमातही गोपनीयतेसाठी पडदे वापरले जात.यासाठी छतांना आणि पायापाशी काही तुळया दिसतात ज्यांना हे पडदे बांधले जात असावे.काही ऐतिहासिक स्रोतांनुसार ती पूर्वी हम्पीतील विरुपाक्ष मंदिरातील देवदासी / नर्तकी होती. तिच्या सौंदर्य आणि नृत्यकलेमुळे कृष्णदेवराय तिच्या प्रेमात पडले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.तिच्यासाठी हा रंग महाल बांधला असावा अशीही धारणा आहे .

मुख्य सभागृहात रंगा मंडपात ५६ दगडी खांब आहेत.प्रत्येक मुख्य खांबाभोवती लहान खांब कोरलेले आहेत.या खांबांना हळूवार थाप दिल्यास वेगवेगळे संगीत स्वर (सा-रे-ग-म-प-ध-नि) किंवा वेगवेगळ्या वाद्यांसारखे आवाज येतात.मृदंग,वीणा,तबला,झांज,इतर तालवाद्ये.म्हणजे संपूर्ण हॉल एक मोठे वाद्य असल्यासारखे वाटायचे.आता संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास पूर्ण मनाई आहे. पूर्वी गाइड लोक थाप देऊन दाखवत होते, पण आता ते बंद आहे.प्रत्येक मुख्य स्तंभ सुमारे ३.६ मीटर उंच आहे.मुख्य स्तंभाभोवती ४ ते ७ कधीकधी १६ लहान स्तंभ कोरलेले आहेत.हे सर्व स्तंभ एकसंध  ग्रेनाइट शिळेतून कोरलेले आहेत.
काही स्तंभ मृदंग, तबला, डमरू, घंटा, वीणा यांसारख्या वाद्यांचे आवाज देतात.
रहस्य काय होते?-लोकांना वाटायचे की स्तंभ आतून पोकळ असावेत किंवा आत धातु/तार असावी. ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांनी रहस्य जाणून घेण्यासाठी दोन स्तंभ कापून पाहिले. पण आत काहीही नव्हते .पूर्ण ठोस दगडच होता. ते कापलेले स्तंभ आजही मंदिर परिसरात दिसतात.
२००८ मध्ये इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (कल्पाक्कम) येथील शास्त्रज्ञांनी या स्तंभांचे वैज्ञानिक परीक्षण केले. त्यांनी अल्ट्रासोनिक, इम्पॅक्ट-इको आणि मेटलोग्राफी तंत्र वापरले.त्यावर हे दिसते कि,स्तंभ पूर्णपणे ठोस ग्रेनाइट आहेत.
आवाज फ्लेक्सुरल व्हायब्रेशन -स्तंभाच्या बाजूला वाकण्याच्या कंपनामुळे निर्माण होतो. हे ट्युनिंग फॉर्कसारखे काम करते.स्तंभाची लांबी, जाडी, आकार आणि दगडाची घनता यामुळे विशिष्ट फ्रिक्वेन्सी  तयार होते.लहान-जाड स्तंभ उच्च स्वर देतात, तर लांब-बारीक स्तंभ खोल स्वर देतात.
शास्त्रज्ञांनी मोजलेली फ्रिक्वेन्सी आणि प्रत्यक्ष निघणारा स्वर जुळतो. म्हणजे हे जाणीवपूर्वक तयार केले गेले होते.उदाहरणार्थ, एका स्तंभातून सुमारे ६४६ हर्ट्झ आणि दुसऱ्यातून ५३८ हर्ट्झ असा स्पष्ट आवाज निघतो.
आजची स्थिती
आज ASI ने संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास मनाई केली आहे आणि QR कोडद्वारे संगीत ऐकवले जाते.





कल्याणमंडप - विवाहविधी आणि उत्सवांचे दालन 



विजय विठ्ठल मंदिर संकुलातील कल्याणमंडप ही आणखी एक महत्त्वाची वास्तू आहे. ‘कल्याण’ म्हणजे मंगल किंवा विवाहाशी संबंधित असा अर्थ घेतला जातो. या मंडपाचा संबंध देव-देवतांच्या प्रतीकात्मक विवाहसोहळ्यांशी जोडला जातो.
मंडपाच्या मध्यभागी उंच, सुबकपणे घडवलेला मंच आहे. धार्मिक परंपरेनुसार येथे देव-देवतांच्या विवाहविधींचे आयोजन केले जात असावे. उपलब्ध माहितीनुसार विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतीकात्मक विवाहाशीही या मंडपाचा संबंध जोडला जातो.
कल्याणमंडपाच्या स्तंभांवर याली, घोडे, हत्ती, देवदेवता, योद्धे आणि विविध पौराणिक आकृत्यांचे कोरीव काम आहे. छत, तुळया आणि अधिष्ठानावरही सूक्ष्म नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे कल्याणमंडप हा धार्मिक उपयोगाबरोबरच विजयनगरच्या शिल्पकौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. 
मंडपाची खुली आणि प्रशस्त रचना मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यासाठी उपयुक्त होती. त्यामुळे धार्मिक विधी, उत्सव आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा विचार करून मंदिर वास्तूंची आखणी केली जात असल्याचे या रचनेतून दिसते.
महामंडपातील शिल्पे 
विजय विट्ठल मंदिराच्या महामंडप मध्ये अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. महामंडपाच्या अंतर्गत रचनेत मध्यवर्ती भागातील १६ स्तंभांचा समूह विशेष लक्षवेधी आहे. या भागातील स्तंभांवर याली, नरसिंह आणि इतर शिल्पविषयांचे अंकन आढळते.पायावरील शिल्पे,घोडे आणि योद्धे 
हंस ,दशावतारांच्या लहान प्रतिमा,विविध अलंकारिक नक्षीकाम केलेले आहे.


विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह
विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह हे मुख्य मंदिराचा सर्वात आतील आणि पवित्र भाग आहे. हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ आणि आच्छादित प्रदक्षिणापथ अशी रचना येथे दिसते. गर्भगृहावरील कळस विटांचा असून तो त्रितल द्रविड विमानाच्या स्वरूपात बांधलेला आहे.
येथे मूळतः भगवान विठ्ठल यांची मूर्ती स्थापित होती. मूर्ती कटीवर हात ठेवून उभी असण्याची परंपरा आहे. मात्र इ.स. १५६५ मध्ये तालिकोटच्या युद्धानंतर मंदिर उद्ध्वस्त झाले आणि गर्भगृहातील मूर्ती नष्ट झाली किंवा हलवली गेली. त्यामुळे आज गर्भगृह रिकामे आहे.
गर्भगृह आणि सभामंडपाच्या भिंतींवर एकाआड एक सुशोभित स्तंभ तसेच खोल कोनाडे कोरलेले आहेत. प्रवेशद्वारावर वैष्णव द्वारपाल आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असल्याचे उल्लेख आढळतात. गर्भगृह पूजेचे पवित्र स्थान असल्याने आतील भाग तुलनेने साधा ठेवण्यात आला आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ असल्याने भक्त मूर्तीभोवती फिरू शकत असत. 
पंढरपूरची विठठ्ल मूर्ती काही काळ येथे हलवली होती अशी आख्यायिका आहे.तेव्हा रिकाम्या गर्भगृहातील त्या रिकाम्या स्थानावर माथा टेकवतांना अगदी भरून आले होते.पंढरपूर का विजयनगर विठ्ठलाचे मूळ गाव असे वाटले .सध्याच्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या एका शिलालेखावर एक जुना १२३७ चा एक लेख आढळला आहे. त्यावर असे लिहिले आहे की होयासाला राजा सोमेश्वर पंढरपूर हे गाव दान म्हणून दिले.
परंतु बर्‍याच इतिहासकारांचे मत असे आहे की विठ्ठल मंदिर हे तेराव्या शतकाच्या अगोदरच बांधली गेले आहे.पांडुरंग हे नाव सहाव्या शतकातील राष्ट्रकुट साम्राज्याच्या तांब्याच्या एका पत्र्यावर आढळले आहे. त्यामुळे कदाचित हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते.
14 व्या शतकामध्ये ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या मलिक कफूर याने होयसला व यादव साम्राज्याचा नाश केला,त्यावेळेस पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही विजयनगर साम्राज्य हलवण्यात आली .तेच आज हंपी येथे विजय विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तलिकोटा च्या लढाईनंतर हंपी साम्राज्य ढासळले ,तरीसुद्धा आज शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हंपी प्रसिद्ध आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे.
ज्या वेळेस विजयनगर साम्राज्याची राजे कृष्णदेवराय यांना वाटले कि पंढरपूर आता सुरक्षित आहे, त्यावेळेस त्यांनी ती विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांच्याकडे सोपवली व अशाप्रकारे ती मूर्ती परत पंढरपुरास आणली गेली. अशाप्रकारे विठ्ठलाचे वारकरी आणि हरिदास असे दोन सांप्रदायिक असणारे भक्त तयार झाले. वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील आणि हरिदास हे कर्नाटकातील भक्त होय.अजून तरी विठ्ठलाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाच माहीत नाही.



मंदिराच्या बाहेर एक मोठा शिलालेख कोरलेला आहे.एकूण विठ्ठल मंदिर परिसरात २३ हून अधिक शिलालेख आहेत (१५१३ ते १५६४ पर्यंतचे).

१. इ.स. १५१३ : विठ्ठलदेवासाठी गावाची देणगी
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, Dynasties of Vijayanagara, No. 490 (A.R. No. 687 of 1922) मध्ये हा अभिलेख नोंदवला आहे. तो हम्पीच्या जवळील होस्पेट तालुक्यातील मुदलापूरम येथे सापडलेल्या दगडी फलकावर आहे. लेखाचा काल शक १४३५, श्रीमुख, चैत्र शु. ५, म्हणजे इ.स. १५१३ असा दिला आहे. तो कृष्णराय महारायांच्या कारकीर्दीतील आहे.
प्रकाशित इंग्रजी आशयाचा मराठी अनुवाद
“कृष्णराय महारायांनी अंगिरस संवत्सरातील फाल्गुन कृष्ण पक्ष अमावास्येला, सूर्यग्रहणाच्या प्रसंगी, होसूर-मगाणीतील विरुपापूर हे गाव विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी दान केले. या दानातून विठ्ठलदेवाच्या रथोत्सवाबरोबरच दैनिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सवांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असा त्याचा उद्देश होता. हे दान राजाचे वडील नरसन्ना-नायक-वोडेय आणि आई नागाजी-अम्मा यांच्या पुण्यस्मरणार्थ करण्यात आले.”
हा अभिलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो केवळ मंदिराला दिलेल्या जमिनीच्या दानाची नोंद करत नाही, तर विठ्ठल मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांची नियमितता देखील सूचित करतो. दैनिक पूजा, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सव तसेच रथोत्सव यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक आधार उपलब्ध करून दिला जात होता. यावरून मंदिर ही नियमित धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेवर चालणारी संस्था होती, असे दिसते.
१५१३ च्या मंदिरातील शिलालेखाचा आणखी एक संदर्भ
विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशाजवळ इ.स. १५१३ चा कन्नड शिलालेख असल्याचा स्वतंत्र छायाचित्रात्मक पुरावा उपलब्ध आहे. त्या शिलालेखात कृष्णदेवरायांच्या तीन राण्या, त्यांचे वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांची नावे येतात, अशी नोंद छायाचित्राच्या अधिकृत वर्णनात केली आहे.

“विजय विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशभागात इ.स. १५१३ चा कृष्णदेवरायकालीन कन्नड शिलालेख आढळतो. या लेखात राजाच्या कुटुंबीयांचा—त्यांच्या राण्या, वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांचा उल्लेख येतो. त्याच काळातील South Indian Inscriptions मधील No. 490 हा विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी गावदानाची नोंद करणारा स्वतंत्र अभिलेख आहे. या दोन्ही पुराव्यांचा एकत्रित विचार केल्यास कृष्णदेवरायांच्या काळात विठ्ठलदेवाच्या उपासनेला आणि मंदिरव्यवस्थेला राजाश्रय मिळत असल्याचे दिसते.”
२. इ.स. १५१६–१७ : शंभर स्तंभी मंडपाचा शिलालेख
हा पुरावा अधिक स्पष्ट आहे.
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, No. 502 (A.R. No. 711 of 1922) मध्ये तो नोंदवला आहे. हा शिलालेख हम्पीच्या विठ्ठलस्वामी मंदिरातील शंभर स्तंभी मंडपाच्या उत्तरेकडील भिंतीवर असल्याचे प्रकाशित नोंदीत स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची तारीख शक १४३८, धातु संवत्सर, म्हणजे इ.स. १५१६–१७ अशी दिली आहे.
प्रकाशित आशयाचा मराठी अनुवाद
“शक १४३८, धातु संवत्सरात राजा कृष्णराय महाराय यांनी देव विठ्ठलदेवासाठी शंभर स्तंभांचा मंडप बांधून घेतला.”
हा छोटा शिलालेख मात्र मंदिराच्या स्थापत्य इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येथे विशिष्ट वास्तू ‘शंभर स्तंभी मंडप’ कृष्णदेवरायांनी बांधून घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे या मंडपाच्या निर्मितीला कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीशी जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्राथमिक पुरावा ठरतो.


विठ्ठल मंदिरातील अत्यंत गंमतीदार आणि कलात्मक कल्पकतेचे उदाहरण म्हणजे बैल आणि हत्तीचे संयुक्त शिल्प.
या शिल्पात शरीराचा एक भाग बैलाचा आणि दुसरा हत्तीचा दिसतो, दोन्हींचे एकच संयुक्त मस्तक असल्याने पाहणाऱ्याला कोणता प्राणी कुठे संपतो आणि दुसरा कुठे सुरू होतो याचा भास निर्माण होतो. हे शिल्प विठ्ठल मंदिराशी संबंधित म्हणून स्वतंत्रपणे नोंदलेले आहे.
विठ्ठल मंदिरातील एक अद्भुत शिल्प म्हणजे मकर. हा पौराणिक मिश्र प्राणी हत्ती, ससा, वाघ, साप आणि मगर (किंवा मासा/मोर) या पाच प्राण्यांच्या अवयवांचे एकत्रित रूप आहे. विजयनगर काळातील शिल्पकारांनी हे शिल्प आदर्श राजाच्या गुणांचे प्रतीक म्हणून कोरले. हत्ती शक्ती आणि स्थैर्य, वाघ धैर्य, साप चातुर्य व लवचिकता, ससा सतर्कता आणि मगर नियंत्रण दर्शवतो. म्हणजेच राजाकडे हे पाच गुण एकत्र असावेत, तरच तो साम्राज्य यशस्वीपणे चालवू शकतो.असा या शिल्पाचा प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिराच्या खांब, तोरण आणि कल्पाना मंडपावर हे शिल्प दिसते आणि कोनातून पाहिल्यावर वेगवेगळे प्राणी स्पष्ट दिसतात.
विठ्ठल मंदिराच्या छतावरून पावसाचे पाणी कसे नियंत्रित केले जाते.छतावर असलेल्या छिद्रांमधून पाणी आत येते आणि नंतर खाली पडते, जणू मंदिरात मोती टपकत आहेत असल्यासारखे दिसते.तसेच बाहेरील छत चिनी पॅगोडासारखे आहे.
 याच परिसरात आणखी एक अद्भुत शिल्प आहे  पाच-इन-वन शिल्प. एकाच दगडात कोरलेल्या या शिल्पात पाच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात.माकड आणि तिचे पिल्लू, शिवलिंग, हनुमान आणि इतर प्राणी किंवा आकार. कोनातून पाहिल्यावर हे सर्व रूपे स्पष्ट दिसतात, ज्यामुळे विजयनगर काळातील शिल्पकारांची कला आणि कल्पनाशक्ती दिसून येते.हे शिल्प गाईड हमखास दाखवतातच.


उत्सव मंडप हा उत्तर-पूर्व कोपऱ्यात उत्सवांसाठी बांधलेला आहे.तर १०० खांबी मंडप दक्षिण बाजूच्या प्राकारात कृष्णदेवराय कालीन (१५१६) बांधलेला आहे.पायऱ्यांवरील बालस्ट्रेड पूर्वेकडील पायऱ्यांवर हत्ती उत्तर आणि दक्षिण पायऱ्यांवर याली आहे.























हंपीच्या दगडी वैभवात विजय विठ्ठल मंदिराचा दगडी रथ जितका प्रसिद्ध आहे, तितकेच त्याच्या आसपास उभे असलेले हे वयोवृद्ध चाफ्याचे झाडही लक्ष वेधून घेते. ते दगडी रथाच्या अगदी जवळ, मंदिराच्या आवारात आहे. या नोंदीत त्याला “Vitthala Chariot Tree” असे नाव देण्यात आले असून, मंदिर परिसरातील प्रमुख वृक्ष म्हणून त्याची नोंद आहे.
हे झाड आपल्या वाकड्या-तिकड्या, वयाने झिजलेल्या फांद्या, जाड खोड आणि सुरकुतलेल्या सालामुळे विशेष उठून दिसते. दगडी स्थापत्याच्या कठोर, करड्या पार्श्वभूमीवर त्याच्या फांद्यांची सजीव वळणे आणि चाफ्याची फुले एक वेगळाच सौंदर्यबिंदू निर्माण करतात. आम्ही त्या झाडाकडे कौतुकाने पाहत असताना त्यावर एक घुबड दिसले.घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते.लक्ष्मी देवी संपत्ती, समृद्धी आणि शुभतेची देवी असल्याने मंदिरातघुबड दिसणे शुभ लक्षण मानले जाते,हा योगायोग कायम मनावर कोरला गेला आहे.



विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला, तुंगभद्रा नदीच्या उजव्या तीरावर वाळूच्या दगडाच्या स्तंभांचा एक मोकळा विस्तार आहे. सोळाव्या शतकात बांधलेला हा मंडप आता पुरंदरमंडपम म्हणून ओळखला जातो . विठ्ठलाचे महान भक्त पुरंदरदास (१४८४-१५६४) यांच्या नावाने हे ओळखले जाते.पुरंदरदास हे मध्वयती आणि व्यासातीर्थ यांचे अनुयायी होते.


पुरंदरदास -विठ्ठलभक्तीचा संगीतस्वर



विजय विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेले सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'पुरंदरदास'. सु. इ.स. १४८४–१५६४ या काळात होऊन गेलेले पुरंदरदास हे कर्नाटक संगीतपरंपरेतील अत्यंत प्रभावशाली संतकवी मानले जातात.त्यांचे जन्मनाम श्रीनिवास किंवा तिम्मप्पा नायक असे सांगितले जाते. ते सुरुवातीला संपन्न रत्नव्यापारी होते. एका प्रसंगानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झाले आणि त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला.श्रीनिवास नायक यांनी सर्व संपत्ती त्याग केल्यानंतर पत्नी व कुटुंबासह पंढरपूरला गेले आणि तेथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केले.तेथेच त्यांनी विठ्ठलभक्तीत मग्न राहून भक्तीगीते रचली आणि गात फिरले.
नंतर एका स्वप्नात किंवा दिव्य आज्ञेने त्यांना हंपीला जाऊन व्यासतीर्थ (व्यासराय) यांच्याकडे दीक्षा घेण्याची प्रेरणा झाली. तेथे १५२५ च्या सुमारास त्यांना “पुरंदर विठ्ठल” हे नाम मिळाले.
पंढरपूराशी त्यांचा संबंध फक्त वास्तव्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या सर्व रचनांमध्ये 'पुरंदर विठ्ठल' हे अंकित (स्वाक्षरी) आहे, जे पंढरपूरच्या विठ्ठलाचेच आहे. पंढरपूरच्या मंदिरात एक खांब 'पुरंदरदास खांब' म्हणून ओळखला जातो, जिथे ते भक्ती करीत असत अशी आख्यायिका आहे.शेवटी ते हंपीत राहिले आणि तिथेच १५६४ मध्ये समाधिस्थ झाले. पंढरपूर हे त्यांच्या भक्तीचे आणि संगीतकार्याचे महत्त्वाचे केंद्र होते.
त्यांच्या पदांच्या शेवटी ‘पुरंदर विठ्ठल’ हे अंकित आढळते. विठ्ठल हे त्यांचे इष्टदैवत होते. त्यांनी विठ्ठलाला केवळ दुरून पूजला नाही, तर मित्र, आई, वडील आणि स्वामी अशा विविध मानवी नात्यांत अनुभवले. साध्या कन्नड भाषेत रचलेल्या त्यांच्या पदांमधून विठ्ठलभक्ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली.परंपरेनुसार ४,७५,००० रचना रचल्या. आज सुमारे १,००० ते १,२०० रचना उपलब्ध आहेत. हम्पीतील विठ्ठल मंदिराजवळील पुरंदर मंडपाशी त्यांचा संबंध जोडणारी परंपरा आहे. तेथे ते वास्तव्य करून रचना करीत असत, असे मानले जाते. या परंपरेचा उल्लेख मंदिराच्या सांस्कृतिक स्मृतीत आजही आढळतो.


कर्नाटक संगीताला पुरंदरदासांचे योगदान
पुरंदरदासांचे महत्त्व केवळ भक्तिपदांच्या रचनेपुरते मर्यादित नाही. कर्नाटक संगीताच्या शिक्षणपद्धतीला क्रमबद्ध स्वरूप देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या नावाशी जोडले जाते.त्यांनी सरळी वरिसाई, जंत स्वर, अलंकार, गीते इत्यादी क्रमबद्ध सरावपद्धती विकसित केल्याचे मानले जाते. या पद्धतीमुळे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वराभ्यासापासून पुढील संगीतप्रकारांकडे क्रमशः वाटचाल करता येऊ लागली.त्यांनी लोकभाषा आणि लोकजीवनाला संगीताच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या गीतांमध्ये सामान्य माणसाचे जीवन, भावना, भक्ती आणि सामाजिक अनुभव यांना स्थान मिळाले. भाव, राग आणि लय यांचे एकात्मीकरण हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य मानले जाते.यामुळे पुरंदरदासांना कर्नाटक संगीताचे ‘पितामह’' म्हटले जाते. त्यांच्या कार्यामुळे पुढील कर्नाटक संगीतपरंपरेला एक भक्कम पाया आणि स्पष्ट दिशा मिळाली, अशी परंपरागत मान्यता आहे. 
पुरंदरदास यांचे प्रसिद्ध भजन कन्नड भाषेत तर आहेतच ,पण जी भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विक झालेले सध्याचे प्रसिद्ध भजन -"एलम्मा तुलसी कोमलवेणी "...यातला पुरंदर विठ्ठल राणी शब्द किती समर्पक आहे.https://www.youtube.com/watch?v=Y8ZApXcnhy4
ಕನ್ನಡ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ (Kannada Script)
ಪಲ್ಲವಿ
ಏಳಮ್ಮಾ ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ
ನೀಲವರ್ಣನ ರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ||ಪ||
ಚರಣ ೧
ಏಳುತಲೆದ್ದು ಶ್ರೀತುಳಸಿಗೆ ಕೈಮುಗಿದು
ಏಳು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕುತಲಿ
ಏಳು ಜನ್ಮದ ಪಾಪ ಕಳೆವಂಥ ತಾಯೆ ನೀ ||೧||
ಚರಣ ೨
ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಹೃದಯದೊಳ್ ಕೌಸ್ತುಭ
ತೊಟ್ಟ ಮುತ್ತಿನ ಅಂಗಿ ತೋಳ ಬಾಪುರಿಯು
ಇಟ್ಟ ದ್ವಾದಶನಾಮ ನೊಸಲಲ್ಲೆ ತಿಲಕವು
ಲಕ್ಷ್ಮೀರಮಣನು ನಿನಗೊಪ್ಪಿದನಲ್ಲ ತುಳಸಿ ||೨||
ಚರಣ ೩
ಎಡದ ಕೈಯಲ್ಲಿ ಶಂಖ ಬಲದ ಕೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ
ಎಡಬಲಕೊಪ್ಪುವ ಛತ್ರಚಾಮರವು
ಮುಡಿದ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂ ಮುಡಿಯಿಂದಲುದುರುತ
ಒಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರವಿಠಲನ ರಾಣೀ ||೩||
मराठी लिपीत (Devanagari / Marathi Script)
पल्लवी
एळम्मा तुळसी कोमलवेणी
नीलवर्णन राणी नित्य कल्याणी ||प||
चरण १
एळुतलेद्दु श्रीतुळसिगे कैमुगिदु
एळु प्रदक्षिणे हाकुतलि
एळु जन्मद पाप कळेवंथ ताये नी ||१||
चरण २
उट्ट पीतांबर हृदयदोळ् कौस्तुभ
तोट्ट मुत्तिन अंगि तोळ बापुरियु
इट्ट द्वादशनाम नोसलल्ले तिलकवु
लक्ष्मीरमणनु निनगोप्पिदनल्ल तुळसि ||२||
चरण ३
एडद कैयल्लि शंख बलद कैयल्लि चक्र
एडबलकोप्पुव छत्रचामरवु
मुडिद मल्लिगे हू मुडियिंदलुदुरुत्
ओडेय श्री पुरंदरविठलन राणी ||३||

“उठ, आई तुळशी, कोमल वेणी असलेली! नीलवर्ण (श्रीविष्णू) यांची राणी, नित्य कल्याणकारिणी!”


अजून एक भजन आहे ज्याने मला वेड लावले आहे :) https://www.youtube.com/watch?v=uCCaFqRoihQ
पल्लवी
तंबूरी मीटिदव
भवाब्धि दाटिदव ||प||
अनुपल्लवी
ताळव तट्टिदव
सुररोळु सेरिदव ||अ.प||
चरण
गेज्जेय कट्टिदव
खळरेदेय मेट्टिदव
गानव पाडिदव
हरिमूरुति नोडिदव
विठ्ठलन नोडिदव
(पुरंदर) विठ्ठलन नोडिदव
वैकुंठके ओडिदव
अर्थ (मराठीत)
तंबूरी वाजवणारा (हरीदास)
भवसागरा पार झाला
ताळ ठोका ठोकणारा
देवांमध्ये सामील झाला
घुगऱ्या बांधणारा
दुष्टांच्या हृदयावर पाय ठेवणारा
गाणे गाणारा
हरीची मूर्ती पाहणारा
विठ्ठलाला पाहणारा
पुरंदर विठ्ठलाला पाहणारा
वैकुंठाकडे धावणारा (मोक्षप्राप्ती)
जो हरीदास तंबूरी वाजवतो, ताळ ठोकतो, घुगऱ्या बांधून नाचतो आणि हरीनाम गातो, तो भवसागर पार करतो, दुष्टांना जिंकतो आणि शेवटी वैकुंठाला पोहोचतो.
 
पुरंदरदास पंढरपूरला होते तेव्हा रचलेले कानडी भजन 

https://www.youtube.com/watch?v=vE5BsiBtujc
पंढरापुरवेंब दोड्ड नगर
अल्लि विठोबनेम्ब दोड्ड साहुकार ||प||
अनुपल्लवी
विठोबनिरुवदु नदीतीर
अल्लि पंढरिभजने व्यापार ||अ.प||
चरण १
तंदे नीने तायि नीने पांडुरंग
नम्म बंधु नीने बळग नीने पांडुरंग
भक्तर पोषक पांडुरंग
नम्म मुक्तिदायक पांडुरंग ||१||
चरण २
विठोबनिगे प्रिय तुळसिहार
अल्लि भक्त जनर व्यापार
विठोबनिगे प्रिय बुक्किय गंध
अल्लि चंद्रभागा स्नान बलु अंद ||२||
चरण ३
श्रीहरि विठ्ठल पांडुरंग
जय हरि विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
नम्म पुरंदर विठ्ठल पांडुरंग ||३||

पंढरपूर नावाचे मोठे नगर
तिथे विठोबा नावाचा मोठा सावकार -श्रीमंत
विठोबा नदीच्या तीरावर राहतो
तिथे पंढरीची भजन-व्यापार भक्तीचा व्यवसाय चालतो
तूच आमचा बाप, तूच आई, तूच नातेवाईक, तूच कुटुंब
भक्तांचा पालनकर्ता आणि मुक्तिदाता
विठोबाला तुळशीची माळ आवडते, तिथे भक्तजन जमा होतात
विठोबाला बुक्क्याचा गंध आवडतो, चंद्रभागात स्नान करणे फार सुंदर
जय श्रीहरि विठ्ठल पांडुरंग!
आमचा पुरंदर विठ्ठल पांडुरंग!

या  चंद्रचूड शिवशंकर भजनावर मी भरतनाट्यम सादर केले होते :)
चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणने
निनगे नमो नमो ||प||
अनुपल्लवी
सुंदरतर पिनाकधर हर
गंगाधर गजचर्मांबरधर
नमो नमो ||अ.प||
चरण १
नंदिवाहन आनंददिंद
मूर्जगदि मेरेव नीने
अंदु अमृत घटदिंदुदिसिद
विष तंदु भुजिसिदव नीने
कंदर्पन क्रोधदिंद कण्तेरेदु
कोंद उग्रनु नीने
इंदिरेश श्रीरामन नामव
चंददि पोगळुव नीने ||१||
चरण २
बालमृकंडन कालनु एळेवाग
पालिसिदव नीने
कालकूटवनु पानमाडिद
नीलकंठनु नीने
वालयदि कपाल पिडिदु
भिक्षे बेडो दिगंबर नीने
जाल माडिद गोपालनेंब
हेण्णिगे मरुळादव नीने ||२||
चरण ३
धरेगे दक्षिण कावेरितीर
कुंभपुरवासनु नीने
करदल्लि वीणेय नुडिसुव
नम्म उरगभूषणनु नीने
कोरललि भस्म रुद्राक्षव धरिसिद
परम वैष्णव नीने
गरुडगमन श्री पुरंदर विठ्ठलगे
प्राणप्रियनु नीने ||३||
अर्थ (थोडक्यात)
चंद्रचूड (मस्तकावर चंद्र धारण करणारा) शिव शंकर, पार्वतीरमण!
तुला नमस्कार, नमस्कार!
सुंदर पिनाक धनुष्य धारण करणारा, गंगाधर, गजचर्म परिधान करणारा
नंदी वाहन असलेला, तीन जगांत शोभणारा
समुद्रमंथनात निघालेले विष प्यायलेला (नीलकंठ)
मन्मथाचा नाश करणारा उग्र रूप
श्रीरामाच्या नामाचे गुणगान करणारा
बाल मार्कंडेयाला यमापासून वाचवणारा
कपाल घेऊन भिक्षा मागणारा दिगंबर
गोपाल (कृष्ण) याच्यावर मोहित झालेला
कावेरी तीरावरील कुंभकोणमचा वास करणारा
वीणा वाजवणारा, सर्पभूषण धारण करणारा
भस्म-रुद्राक्ष धारण करणारा परम वैष्णव
पुरंदर विठ्ठलाचा प्राणप्रिय मित्र!
ही रचना शिवाला वैष्णव दृष्टिकोनातून स्तुती करते आणि शेवटी पुरंदर विठ्ठलाशी जोडते.
विजयनगर साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात हम्पी हे संगीतकार, कवी आणि विद्वानांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. संगीतशास्त्रातील विविध मतप्रवाहांमुळे संगीताच्या शिक्षण आणि सादरीकरणात एकवाक्यता निर्माण करण्याची गरज होती.या संदर्भात अच्युतरायांच्या काळात रामामात्यांनी ‘स्वरमेल कलानिधी’* हा संगीतशास्त्रीय ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख आढळतो. मात्र त्याचा अपेक्षित प्रभाव पडला नाही, असे उपलब्ध मजकुरात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर पुरंदरदासांनी संगीतशिक्षणाला व्यवहार्य आणि क्रमबद्ध पद्धत दिल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे संगीत केवळ दरबारी किंवा विद्वानांच्या वर्तुळात न राहता सामान्य लोकांपर्यंत पोहोचले.


इ.स. १५६४–६५ च्या सुमारास पुरंदरदासांचा मृत्यू झाला. त्याच काळात विजयनगर साम्राज्याच्या अस्ताची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचली. इ.स. १५६५ मधील तालिकोटच्या युद्धानंतर विजयनगरची राजधानी हम्पी मोठ्या विध्वंसाला सामोरी गेली.मंदिरासह हम्पीतील अनेक वास्तूंचे नुकसान झाले. विजयनगरच्या पतनानंतर अनेक कलाकार, संगीतकार आणि विद्वान दक्षिणेकडील विविध प्रदेशांत गेले. पुढे म्हैसूर आणि तंजावरसारख्या केंद्रांनी या सांस्कृतिक परंपरांना आश्रय दिला.त्यामुळे हम्पीचा राजकीय अस्त झाला असला तरी त्याच्या सांस्कृतिक परंपरा संपल्या नाहीत. त्या विविध प्रदेशांमध्ये स्थलांतरित होऊन पुढील शतकांमध्ये विकसित होत राहिल्या.

आज विजय विठ्ठल मंदिर अंशतः भग्नावस्थेत आहे. मुख्य गर्भगृहात मूळ विठ्ठलमूर्ती नाही. तरीही मंदिराची वास्तुरचना, मंडप, शिल्पे, दगडी रथ आणि संगीत स्तंभ यांमुळे हे हम्पीतील सर्वाधिक महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक आहे.दगडी रथाच्या चाकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्थिर करण्यात आले आहे. संगीत स्तंभांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ठोकून ध्वनी निर्माण करण्यास पर्यटकांना मनाई आहे. मंदिर परिसरात रात्री प्रकाशयोजना करण्यात आली असून, त्यामध्ये मंदिराच्या वास्तूंचे दृश्य विशेष प्रभावी दिसते.मंदिराशी संबंधित पुरंदरदास उत्सवही आयोजित केला जातो. त्यामुळे पुरंदरदासांची संगीतपरंपरा आणि विठ्ठलभक्तीची स्मृती आजही या परिसराशी जोडलेली आहे. 


राजतुला” अर्थात King’s Balance / तुलाभार /तुलापुरुषदान



राजतुला हे विजय विठ्ठल मंदिराच्या नैऋत्य दिशेला, कंपा भूपाच्या मार्गाच्या शेवटी असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी स्मारक आहे. याला King’s Balance, तुलाभार किंवा तुलापुरुषदान अशी नावे आढळतात. रचनेत सुमारे १५ फूट उंचीचे दोन ग्रॅनाइटचे स्तंभ असून त्यांना वरून एक आडवा दगडी तुळई जोडते. तुळईच्या खालच्या बाजूस पूर्वी तराजू किंवा झोळी लटकवण्यासाठी तीन कड्या आहेत..
या वास्तूचा संबंध तुलापुरुषदान या दानपरंपरेशी जोडला जातो. या विधीत राजा स्वतःच्या वजनाइतके सोने, चांदी, धान्य, रत्ने किंवा इतर मौल्यवान वस्तू दान करत असे, अशी परंपरागत माहिती आहे. ग्रहण, राज्याभिषेक, दसरा किंवा इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी अशा दानविधी होत असावेत.
राजतुलेच्या एका स्तंभावर राजा आणि दोन राण्यांची उठावदार प्रतिमा कोरलेली आहे. ही प्रतिमा अनेकदा कृष्णदेवराय आणि त्यांच्या दोन राण्यांचे तिरुमलादेवी व चिन्नादेवी प्रतिनिधित्व करते, असे सांगितले जाते. मात्र येथे एक महत्त्वाची ऐतिहासिक सावधगिरी आवश्यक आहे: या वास्तूवर शिलालेख नाही, त्यामुळे ती निश्चितपणे कृष्णदेवरायांनीच बांधली किंवा त्यांच्याच तुलाभारासाठी वापरली, असे पुराव्याने ठामपणे सांगता येत नाही.
यामुळे राजतुला केवळ दानविधीचे साधन म्हणून न पाहता विजयनगरच्या राजसत्तेतील धर्म, राजकीय प्रतिष्ठा आणि दानधर्म यांचा संगम दाखवणारे स्मारक म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.विजयनगरच्या राजांनी तुलापुरुष विधी केला होता. देवराय प्रथम यांनी राजधानीत मोती तोलले. कृष्णदेवराय यांनी १५१५ मध्ये अमरावतीच्या अमरेश्वर मंदिरात स्वतःला तोलले आणि मिळालेली रक्कम त्यांच्या दोन राण्यांनी ब्राह्मणांना दान केली. अच्युतदेवराय यांनी कांचीपुरममध्ये मोत्यांसह हा विधी केला.कृष्णदेवराय यांनी तेलुगूमध्ये लिहिलेल्या ‘अमुक्तमाल्यदा’ या दीर्घकवितेत असे सूचित केले आहे की तुलापुरुष विधीतून मिळालेली देणगी सर्वांनी नव्हे, तर केवळ अत्यंत गरीब ब्राह्मणांनीच स्वीकारली होती.
त्यांचे राजकवी नंदी तिम्मन यांनी तेलुगूमध्ये ‘पारिजातापहरणम्’ लिहिले. त्यात सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद होतो आणि शेवटी दोघीही आपला पती कृष्णाला तराजूत तोलतात.
आता पुन्हा आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो ...रॉयल एन्क्लोसर उर्फ राजवाडा