Sunday, August 29, 2021

पारनेर -१ ढोकेश्वर लेणी

 

सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता  आसपासच्या ठिकाणांना करोनातला आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा सूटसुटीत बेत आखला .

“श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा देवबाभाळाची आणि  अनोळखी पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी पावसाची इच्छा बाळगत होते.

एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा  थोडा होता.तलावाचा पूल ओलांडल्यावर उंचावर असलेल ढोकेश्वर मंदिराची तटबंदी दिसू लागली.”किल्ला किल्ला “पोरगी ओरडू लागली.(तिला मंदिर आवडत नाही किल्ला पाहायचा अशी शेंडी लावून घराबाहेर काढल होत).नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना आवडली. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे .मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह कोरलेले दिसले.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख आहे. मंदिराचे छत रचना त्रीमित्रिक भासते.समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे.

डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.

पुढे पायऱ्या चढून कमान लागली आणि आणखीन पायऱ्या चढून तीच जिला पाहण्यासाठी डोळे आसुसले होते ती लेणी दिसली .पण माझ दुर्दैव ती बंद होती.तेव्हा जाळीतूनच आतल्या मूर्तींना न्याहाळाव लागलं आपण अंतर फार नसल्याने बऱ्यापैकी पाहता आल्या.

पहिल्यांदा बाहेर यमुना आणि गंगा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत. मंदिर चार मुख्य खांबांवर तोलले आहे .खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत आहेत.मंदिरात डाव्या बाजूला सप्तमातृका पट आहे.शेवटी मोदक घेतलेला गणपती आहे.

उजव्या बाजूला शिवतांडव  भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत.समोर दोन खांब आणि प्रवेशद्वाराजवळ दोन आयुधधारी द्वारपाल आहेत.त्यांच्या आजूबाजूस,त्रिशूळपुरुष,कुबेर व इतर मूर्ती कोरल्या आहेत.

मंदिरात इकून दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.

बाहेर आल्यावर उजव्या हाताला वर चढून एक टाकी आहे पण तिथे जाण्यास बंदी आहे.त्याकडे जाणारी पायऱ्यांची रचना विशेष दगडात खुबे पाडलेली आहे.विचारपूस केली असत पहाटे चार ते सहा मंदिर खुले अपाहता येईल असे समजले आम्ही उभयतांना  एकमेकांकडे पाहिले हसावे कि रडावे समजेना J.

पायऱ्या उतरत उन्ह तरीही चांगलच चढल होत,पावसाळ्यातही पाऊस नव्हता यंदा दुष्काळ जास्त पडला आहे. त्यामुळे जवळच्या तलावापाशी काही वेळ रेंगाळलो .आम्हा दुष्काळातल्या लोकांना एव्हढ पाणी म्हणजे काय आंनद !!!संथ पाण्याकडे पाहत नकळत ओळी गुणगुणल्या J

कार्जुनेचा बेत रद्द केला कारण पोरीच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते,बरोबर आणलेल्या पोळी भाजीला खाण्यास तिने साफ नकार दिला ,तेव्हा बापाच काळीज हळहळळलं आणि बायको हरली आणि माघारी फिरलो.जातांना मात्र नेप्तीच्या भेळीला थांबलो.एक भेळ दोघांना सरता सरत नाही,मटकी,काकडी आणि बरोबरीला तळलेली मिर्ची हि याची खासियत आहे.

ज्यूस पिऊन पोरगी जरा शांत झाल्यावर ,अजून एक लावलेली शेंडी सनफ्लावर दाखवले आणि गाडी खुश झाली.

आता अभ्यासक  मिपाकर प्रचेतस यांचा हा लेख वाचून हि भटकंती सुफळ संपर्ण करा

-भक्ती