Wednesday, December 27, 2023

राजमा गस्सी



गुगला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे 😀 तर दक्षिण भारतात इडली,डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फैन झालेच आहे अगदी डबा भरून ठेवते,लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते.यात डाळी वापरल्या जातात हे आवडतं.त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला गस्सी भाजी.यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो.मी राजमा वापरला.गस्सीसाठी हरभरे,वाटाणे,चवळी असे भिजवून -शिजवून वापरले जाऊ शकतात.

साहित्य -

१ वाटी आठ तास भिजवलेला राजमा

१/२ वाटी चिरलेला बटाटा

१/२ वाटी चिरलेले गाजर

मसाला

२ चमचे धने

२-२ चमचे उडीद डाळ,हरभरा डाळ

१ चमचा तीळ,जिरे

१/२ चमचे मेथी दाणे

१ वाटी ओले वा सुके खोबरे

३-४ लाल मिरच्या

चिंच गूळ कोळ छोटी १/२ वाटी

चिरलेला कांदा टोमॅटो -१/२ वाटी प्रत्येकी

कृती-


१.राजमा आणि बटाटा-गाजर स्वतंत्र मीठ आणि हळद टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यायचे(कमीच शिट्ट्या कारण राजमा,भाज्या गाळ होऊ नये)

२.मसाला -धने व इतर सर्व मसाल्याचे पदार्थ एक चमचा तेलात परतून घ्यायचे.व परतलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर टाकून बारीक वाटायचा , खोबरे सुकं असेल तर किंचित पाणी टाकावं,सरभरीत होण्यासाठी.

३.मोहरीची, कडीपत्ता फोडणीनंतर भाज्या परतून घ्याव्यात. मग मसाला टाकून परतून घ्याव्यात.

४.चिंच-गुळ कोळ टाकावा.

५.१/२  वा १ फुलपात्र पाणी टाकून १० मिनिटे गस्सी भाजी शिजू द्यावी.

खोबर्याचा आणि चिंच गुळाचा स्वाद इतका फ्रेश लागतो की क्या बात है😊

पोळी वा डोसा वा अप्पे वा घावण बरोबर गस्सी करी फस्त करा!

-भक्ती

Saturday, December 16, 2023

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

 


फोटो सौजन्य - livemint.com

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

ब्रिटीश राज्यानंतर स्वतंत्र भारताकडे प्रमुख जबाबदारी होती प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्येला पोसायची.ब्रिटीश धोरणांमुळे शेतीमध्ये क्रांती ऐवजी शेतकरी शोषण आणि दुष्काळ यांसारख्या समस्या सतत आजूबाजूला असता.अजूनही ‘जहाजाच्या अन्नावर ‘अवलंबून असणाऱ्या भारताचे प्रतिमा बदलण्यासाठी प्रथम पंतप्रधान नेहरू यांनी शेतीमध्ये संरचनात्मक ,संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांना उपाययोजना करण्यास सांगितले.१९४७-१९६१ पर्यंत अनेक पायाभूत सुविधनाचा समावेश शेतीत होत गेला.परंतु तंत्रज्ञानातील मागासलेपणामुळे अजुन्ही हवी तशी उत्पादकता मिळत नव्हती.याचा परिणाम असा की अजुनही पीएल-४८० सारख्या करारानुसार अमेरिकेकडून निकृष्ठ गव्हाची आयात भारताला सहन करावी लागत असे.१९६१ चीन युद्धानन्तर त्यात आणखीनच भर पडून दरही खूप वाढवले गेले.पण Begging Bowl to Bread Basket असा प्रवास लवकरच होणार होता.

१९६१ साली डॉ.ए.बी जोशी यांच्या नेतृत्वात एक टीम जगातील  विविध शेती संशोधन संस्था यांना भेट देत होती.तेव्हा मेक्सिकोतील बोरलॉग यांच्या संशोधनाने भारावलेल्या टीमने त्यांना भारतात पाचारण करण्याचे ठरवले.फोर्ड फोंडेशान यांनी याबाबत आर्थिक मदत देण्याचे ठरवले.यासाठी काही टन गहू बियाणे तात्काळ आयात करण्याची परवानगी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली.

बोरलॉग यांची टीम आणि डॉ.स्वामिनाथन यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ही योजना राबविण्याचे ठरविले.

डॉ .स्वामिनाथन आणि सहकाऱ्यांनी राबविलेले काही मुद्दे-

१.HYV high yeilding variety अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरवणे.यासाठी बोरलॉग यांनी बनविलेलेया चार ३.सोनोरा ६४  ४. सोनोरा ६३ ५.लर्मारोजा ६४ आणि मियो ६१४ या प्रजातींबरोबर segregrating lines(F2-F5) याही भारतात आणल्या गेल्या.

(या बुटक्या गव्हामुळे जनावरांना चार कमी पडेल अस म्हणत काही वैज्ञानिकानी याला विरोधही केला.पण या योजनेचा प्रमुख हेतू जनावरांपेक्षा माणसाच्या मुखात  अन्न पडावे हा स्पष्टच होता त्यामुळे याला विरोध मावळला.

२.प्रदेश निवड- प्राथमिक चरणासाठी पाण्याची व जमिनीची उपलब्धता अधिक असणारे राज्ये म्हणजे पंजाब,हरियाणा,पश्चिम उत्तर प्रदेश यांची निवड करण्यात आली.

३.सिंचन-सिंचन सुविधेसाठी अनेक विहिरीई,ट्युबवेल बनविण्यात आल्या.

४.रासायनिक खते-भारतात सैन्द्रीय खतांचा वापराच होत असे.तेव्हा पिकांमध्ये रोग पडू नये,त्यांची रोगप्रतिकार क्षमता सुधारावी यासाठी नायट्रोजन,पोटाशियm,सल्फर युक्त रासायनिक खत पुरविण्यात आले.

५. आधुनिक उपकरणे-ट्रक्टर,नांगर ,मुबलक वीज पुरविली गेली.

६. कृषी सहायत्ता दुप्पट करण्यात आली.

७.कृषी मूल्य आयोग बनवून हमीभाव देण्याचे मान्य केले.

८.कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करून माहिती सहज मिळावी याची उपाय योजना केली.

या सर्व गोष्टींवर योग्य कार्यवाही करण्यात आली.अनेक शेतकर्यांनी याचा स्वीकार केला आणि १९६६-१९६८ या काळात गहू धान्याच्या उत्पादनात तिपटीने वाढ झाली.

याच बरोबर तांदूळाच्या विकसित प्रजाती जया,रत्ना या  तैवान जैपोनिक सुधारित जातीतून IRRI,Philippins यांनी विकसित करून भारतात पाठवल्या.इतर तीन पिके बाजरी,मका,ज्वारी या पिकांच्याही उत्पादनात वाढ झाली.

जून १९६८ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात हरितक्रांती घडली आहे याची घोषणा केली.८ मार्च १९६८ ला विल्ययम एस गौड यांनी जगातल्या वाढत्या शेती उत्पादाकेहून ग्रीन रिव्होल्युशन हा शब्द पहिल्यांदा वापरला होता.


फोटो सौजन्य -ट्विटर

दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७३-८३ मध्ये आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र,पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी गहू ,तांदूळ बरोबरीनेच धने या पिकांत विक्रमी वाढ दिसली.महाराष्ट्रातीलं हरित क्रांतीसाठी पंजाबराव देशमुख आणि वसंत नाईक यांचे योगदानही बहुमुल्य होते.

तिसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील राज्ये बिहार,उडीसा,बंगाल येथे हरित क्रांती घडली.

काही शेतकरी या उत्पादनातील गहू लाल आहे आणि पोळ्या नीट होत नाही याची तक्रार करू लागले तेव्हा segrigrating lines वापरून प्रयागांतीसोनालिका,कल्याण रोजा या सुधारित प्रजाती बाजारात आणल्या.(सध्या लोकवन,शरबती,राजवाडी,खपली गहू इ.या बनवलेल्या प्रजाती लोकप्रिय आहेत).

हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम-

१.अन्नधान्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला.

२.धान्याची निर्यात वाढून आयात थांबली

३.दुष्काळावर सहज मात करता येवू लागली.

४.अल्प भू धारक शेतकरी कमी उत्पादन,कर्जबाजारीपणा या समस्येतून सुटला.

५.उत्पादन वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली.एक संपन्न जीवनशैली शेतकरी जगू लागला.

६.गैर कृषी ग्रामीण समाज उदयाला आला.अनेक इतर शेतीपूरक व्यवसाय वाढले.

हरीक्रांतीचे नकारात्मक परिणाम

१.विषमता-हरितक्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी पणे पंजाब हरियाणा भागात झाला इतरत्र यांची यशस्विता त्याप्रमाणात थोडी कमीच होती.त्यामुळे शेतकरी वर्गात विषमता आढळली.

२.जमीनीच्या किंमती वाढल्या.

३.रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरांमुळे अनेक रोगांचा शिरकाव माणसांत झाला.पोटाश,सल्फर पाण्यात मिसळून संपर्कात येत गेले.कर्करोगाचा विळखा कित्येक कुटुंबात झाली. प्राणी-जनावरही यामुळे अधिक रोगांना बळी पडून वंध्यत्वही दिसले.

एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)

रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे ही ग्रीन रिव्होल्युशन Green Revolution -ग्रीड रिव्होल्युशन(Greed Revolution)मध्ये बदलली होती.ही बाब डॉ.स्वामिनाथन यांना आता अस्वस्थ करीत होती.याबाबत त्यांना हरितक्रांती अशास्त्रीय पद्धतीने राबवल्याचे अनेक आरोप कायम सहन करावे लागले. इस्का,वाराणसी १९६८ मध्ये याबाबत  खंत बोलूनही दाखविली.गांधीजींचे अनुयायी असलेल्या डॉ.स्वामिनाथन यांनी यापुढे  एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)वर काम करण्याचे ठरवले आणि ते आजन्म केलेही....

-भक्ती

Monday, December 11, 2023

रॉबी डिसिल्वा –एका मनस्वी कलाकाराचा प्रवास -पुस्तक परिचय

 


लेखिका वीणा गवाणकर यांच्या सहज सोप्या भाषेतल्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एका आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराची ओळख करून देणारे पुस्तक!

रॉबी डिसिल्वा वसई येथील पोपसाव भागात लहानाचे मोठे झाले.अत्यंत गरिबीतून वाट काढत होते पण आयुष्याशी प्रामाणिक  हा गुण त्यांच्यात होता.आई वारल्यानंतर सावत्र आईचे मायेचे छत्र लाभले,त्यामुळे कुटुंब हेच त्यांचा सतत अग्रस्थानी होते.कलाकार अपघाताने घडत नाही तर ती जाणं ,उर्मी जन्मजात असावी लागते.पण डिसिल्वा याला अपवादच म्हणावे लागतील.पदवीला प्रवेश घेण्यासाठीचे पैसे नव्हते ,वेळही गेली तेव्हा कमी फी मध्ये अर्धवेळ पदवी मिळवता येते ,हे समजल्यामुळे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये रेशनिंग ऑफिसमध्ये काम करत असताना १९५१ साली प्रवेश घेतला.

            कलर अप्लिकेशनचे काम करत असतांना ते चुकले की शिक्षक सरळ तो कागद फाडत असत....नव्हे रॉबीचे काळीज फाटत असे .कारण एक आण्याचा पेपर रॉबी पायी चालत जावून बस भाडे वाचवून मग विकत घेत असत.कधी त्यांच्याच घराजवळ राहणा-या जे जे मधल्या सधन मुलाने खिडकीतून टाकलेले एका बाजूचे कोरे पेपर ते सरावासाठी वापरत.अशा या परिस्थितीनेच त्यांना चुकणे आपल्याया परवडणार नाही ,काम मन लावूनच व्हायला पाहिजे हे शिकवले असावे.लवकरच त्यांनी जेजे मध्ये अनेक विषयात नैपुण्य मिळवले.क्यलिओग्राफिमध्ये,टायपोग्राफीमध्ये त्यांना आवड होती.त्यामुळे त्यांना स्टुडन्त कॉग हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.यापुढे प्रत्येक संधीचे रॉबी यांनी अक्षरशः सोनेच केले.

            अनेक बक्षीसे मिळवली.त्यामुळेच त्यांना ‘मेनी प्राईजेस’ असे टोपण नावही मिळाले.चतुर्थ वर्षात त्यांना अप्लाईड आर्टचा फेलोशिफही मिळाली.याच काळात त्यांनी स्पर्धेत पाठवलेले एक डिझाईन  भारतीय डाक विभागाने तिकिटावरही समाविष्ट केले होते.पुढील उच्च शिक्षणासाठी ते लंडन मधील प्रसिद्ध सेन्ट्रल स्कूल ऑफ आर्ट मध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवला.या साठीच्या खर्च एक धार्मिक संस्थेने ठराविक व्याजदराने कर्ज देत उचलला.लंडनमध्ये शिकत असतानाही गरिबीशी संघर्ष सुरूच होता.अनेक रात्री उपाशी राहणारे,ना ना प्रकारच्या नोकरी करणारे,त्यामुळे शरीराची होणारी अवहेलना हे प्रसंग वाचतांना वाईट वाटते.पण यातूनच रोबींची गुणवत्ता कमालीची होती जी बहरतच गेली.त्यामुळे दुसऱ्या वर्षी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली.इथे त्यांना अनेक जागतिक दर्जाचे शिक्षण ,शिक्षक मिळाले.

            १९६० ला लंडनहून ते कला क्षेत्राची पंढरी इटली येथील बोजेरी स्टुडीओत काम शिकू लागले.तिथे ते ग्राफिक डिझाईन ,इंडस्ट्रीयलं पैकेझिंग ,जाहिरात क्षेत्रात उत्कृष्ट काम करत राहिले.पण त्यांचा ओढा लंडनकडे असल्यामुळे ते परत दीड वर्षांनी लंडनला परतले.केलॉग ,प्लेयर बचलोर,कालवे प्युअर ओई,स्टारलिंग हॉटेल,ब्रीटाइन सी फूड,इत्यादी इत्यादी अनेक उद्योगांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले.हे सर्व असतांनाच कौटुंबिक ओढही वाढू लागली १९६७ साली ते मुंबईत परत आले.

            भारतात ग्राफिक क्षेत्रातील कामाचा वेग लंडनपेक्षा १०-१५ वर्षांनी मागे होता.तसेच त्यांना इथल्या हितसंबंध जपणाऱ्या व्यवस्थेशी सामना करावा लागला.अनेक अनुभवानंतर रॉबीनी स्वत:ची  जाहिरात कंपनी सुरु केली.कैडबरी,ब्रीटाइना ,यांच्या उत्पादनाच्या आवरणाचे डिझाईन त्यांनी केले.आपल्या भावांना,भाच्यानाही त्यांनी या क्षेत्राची ओळख आणि सुंदर वाट दाखवली.पुढील प्रकरणात “गाव तसे चांगले”यात वसई गावातल्या लोकांना हा जागतिक दर्जाचा ,लंडनमधील प्रतिष्ठित FCSDपुरस्कार असणारा कलाकार आपल्यात आहे ही जाणीव तशी उशीरच झाली,तेव्हा अनेक पुरस्कार त्यांनी दिले,विविध कमिटीवर त्यांची नेमणूक केली.आयुष्याच्या उतार काळात योगा सतत ,नियमित केल्याने,गरजा नेहमीच कमी ठेवल्याने रॉबी तंदरुस्त होते.त्यांना राज्य नवशक्ती जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. एका व्रतस्थासारखे अलौकिक तेजाने ते जगले.

 वीणा गवाणकर याही वसईत राहणाऱ्या,एके दिवशी बँकेत त्यांची रॉबीशी अचानक ओळख झाली.हळू हळू अनेक भेटीतून त्यांना समजले रॉबी हे जागतिक कलाकार आपल्यात आहेत हे अनोखे आहे.२०१६ साली हे पुस्तक त्यानी हे पुस्तक प्रकाशित केले.पुस्तकासाठी सुनील महाजन यांनी एका गोधडीची प्रस्त्वाना आकर्षक मांडणीत करत लिहिली आहे.रॉबी यांनी तयार केलेल्या अनेक लोगो,कलाकृतींची चित्रे यांची पुस्तकात रेलचेल आहे.शेवटच्या परिशिष्ट मध्ये रॉबी यांच्या कार्याची टाइम लाईन आहे.

२०२१ साली  वयाच्या ९१ व्या वर्षी रॉबी हे जग सोडून गेले.

 -भक्ती