Sunday, November 14, 2021

पारगाव भातोडी -१

 


गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला  कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.

रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या  बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या  बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.

दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण  मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे  जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.

सुंदर प्रवेशद्वार



मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)

प्रदिक्षणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.

 या घाटाची देखभाल केली तर एका  पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.

मनोहरी जळ...



घाटाचा हाही उपयोग ..



 

 

      उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा  एक उत्तम पायंडा दिला आहे.

शरीफराजे समाधीस्थळ



 १६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.

इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”


पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.

पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.

वीरभद्र