अहो सख्यांनो, ऐका माझ्या या #पावभाजी च्या व्रताची एक गोष्ट! हे व्रत मी अगदी बालपणातच अंगिकारलं होतं – नववीत शाळेत असताना! एका काकूंकडे ती लालभडक भाजी तव्यावर रटरटताना पाहिली, आणि बस्! माझ्या डोक्यात व्रताचा घंटानाद झाला. पुढच्याच रविवारी घरी घाट घातला – "आज पावभाजी होणार!" आता इतकं आठवत नाही, पण ती पहिली पावभाजी एवढी छान जमली होती की, मैत्रिणींमध्ये फुशारकी मारली: "मी अशी मस्त पावभाजी बनवते, काय सांगू? स्ट्रीट स्टाइल भैय्यासारखी!"
एक मैत्रीण म्हणाली, "असं का ग ? मी येते तुझ्याकडे, शिकव ना!" मी म्हणाले, "ये की, माझ्या वाढदिवसाला मी पावभाजीच करणार आहे, तुला स्पेशल शिकवेन!" वाढदिवसाला ती आली, मी भाजी बनवली – मऊसूत, चविष्ट! ती पाहून म्हणाली, "अरे, मिक्सरमधून काढतेस का ग?" मी हसून म्हणाले, "ए बाई, असं काही नसतं करायचं! हाताने स्मॅश करूनच असला स्वाद येतो!" आणि दोघी खो खो हसत सुटलो. (आता विचार करते, तेव्हा मिक्सर वापरलंअसत तर किती सोपं गेलं असतं! )
तेव्हा पावभाजीसाठी कांदा चिरणे हे ऑलिम्पिक गेम्ससारखं महत्वाचं काम होतं! चॉपर-वॉपर काही नव्हतं, फक्त चाकू आणि डोळ्यात पाणी. परतायला, वरून घालायला – कांदाच कांदा! मग शिताफीने हे काम बाबांना देई: "बाबा, प्लीज ना..." आणि बाबा खरंच निगुतीने बारीक बारीक चिरायचे, जणू कांदा त्यांचा बेस्ट फ्रेंड! मटारच्या सीझनमध्ये तर पावभाजी फेस्टिव्हलच! फ्रोजन मटारचं नावही ऐकलेलं नव्हतं, वाळलेले मटार तर आई कधी आणतच नसत – फक्त वाळलेला हरभरा दिसायचा, जणू तोच मटारचा दूरचा नातलाग!
वाढदिवस असो की पाहुणे येणार, आईचं फर्मान: "पावभाजी कर!" मी म्हणे, "आई, अभ्यास आहे गं!" आणि पावभाजीच्या कढईतून अंग काढून पळ काढायचे. पण कॉलेजात मैत्रिणींनी रूमवर जमलो की, पावभाजीचा दरवळ उठे – तोच मैत्रीचा खरा आधार! आता लग्न झालं, दोनाचे चार हात झाले, पावभाजी कधीही होऊ लागली. फ्रोजन मटार, वाळलेले दाणे – सगळं मिळालं, आणि मास्टरी हळूहळू वाढली.
रंग लाल हवा? भाज्या उकडताना थोडं बीट टाका – लाल रंग लवकर येतो! आता तर एक चिमूट पनीर मसाला टाकला की, लालभडक होऊन जाते, जणू भाजीने लिपस्टिक लावली! जास्त पाहुणे येणार तर? बटाटे वाढवा, इतर भाज्या कमी – असा काळाबाजार मनात करून घ्यायचे. बाहेर भैय्या मोठ्या तव्यावर किती वेळ स्मॅश करतो ते पाहायचे, मग घरी बारीक गॅसवर रटरटू द्यायची. पण एकदा गरम शिंतोडे अंगावर उडाले – चार हात लांब उडी मारली! आता शिकले, सावध राहते.
सुहाना, एव्हरेस्ट, बादशाह, MDH ते आता सवाई – या जादूच्या दहा वीएस तीस रुपयांच्या पुडक्यांशिवाय पावभाजी शक्यच नाही! तरीही नवे मसाले शोधते, जणू चोखंदळपणे साडी शोधावी तसे!
आता "अहो, पावभाजी करायची आहे, भाज्या आणा!" म्हटलं की, नवरा फक्त बटाटे, शिमला, फ्रोजन मटार आणतो आणि निर्विकार चेहऱ्याने विचारतो, "काय, अजूनही भाज्या यात असतात?" मग आमची "तीन भाज्यांची स्पेशल पावभाजी" प्रसिद्ध! जैन, मुंबई स्ट्रीट, हिरवी – सगळ्या ट्राय केल्या, पण त्यांची "मिनिमलिस्ट" व्हर्जन बेस्ट!
पण आता तीन जण झालो – लेकीच्या पोटात सगळ्या भाज्या जायला हव्यात! म्हणून स्वतः बाजारात जाऊन आणते: बटाटा, फ्लॉवर, वाटाणे, गाजर, टोमॅटो, शिमला, कोबी, बीट, घेवडा – फुल्ल टू मिक्स व्हेज! नाहीतर लेकी मोठी होऊन म्हणेल, "आई, तू फक्त बटाट्याची भाजी बनवायचीस का?"
पावाचं काय सांगू? आधी पोळ्या लाटायची कटकट नको म्हणून लादी पाव! मग आरोग्यासाठी गव्हाचे पाव, आणि कधी थेट "पोळीभाजी" होऊन जायची! आता मक्खन? अमुलच्या वड्या झपाट्याने संपायच्या, पण आता हेल्थसाठी घरचं साजूक तूप – तरी स्वाद तसाच!
अशी ही पावभाजी व्रताची गमतीदार गोष्ट! चार-पाच वर्षांनी लेकीकडे ही व्रताची ड्यूटी दिल्यावर मी मुक्त होईन असं वाटतं. पण खरंच सुटेन का? की तेव्हाही फोन करून सांगेन, "लेकी, बीट टाकायचं विसरू नकोस!"
कशी वाटली सख्यांनो ही पुराणकथा? तुमची पावभाजी स्टोरी सांगा ना.
---भक्ती

No comments:
Post a Comment