Sunday, September 13, 2026

वातापी गणपती


वातापी गणपती 


कर्नाटकातील बदामी प्राचीन काळातील वातापी. लालसर-तपकिरी वाळूच्या खडकांनी वेढलेली ही नगरी दख्खनच्या इतिहासात केवळ एक प्राचीन राजधानी म्हणून नव्हे, तर स्थापत्य, शिल्पकला, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांचा एक अद्भुत संगम म्हणून उभी आहे. 



 

बदामी लेणी क्रमांक 1 शिल्पसमूहाकडे पाहताना जवळच दिसणाऱ्या गणेशाच्या उपस्थितीमुळे दृश्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते. पित्याचे नृत्य पाहणारा पुत्रही कल्पना मनात घेतली की या शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘बाबा नाचत आहेत,मग आपणही नाचू शकतो का?’ अशी बालसुलभ उत्सुकता जणू या दृश्यातून जाणवते. अर्थात, ही शिल्पावर आधारित रसात्मक व्याख्या आहे. प्राचीन शिलालेख किंवा ग्रंथातून सिद्ध झालेली कथा म्हणून ती मांडलेली नाही . पण शिल्पाचा भावार्थ समजून घेण्यासाठी ती नक्कीच मोहक आहे.छोटा बालगणेश शिव नटराजप्रमाणे हाताची मुद्रा करत आहे.बालकांच्या ठायी उत्सुकतापूर्ण अनुकरण हा शिल्पात दाखवले आहे 

तर रावलफडी मधला बाळगणेश लाडू /मोदक पात्र हाती घेऊन खाण्याच्या मुद्रेत आहे.



बदामी या शिल्पवैभवाची आठवण झाली की पुढे येते ती एका दुसऱ्याच गणपतीची कथा वातापी गणपतीची.

‘वातापी गणपतिं भजेहम्’ हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना अपरिचित नाही. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुथुस्वामी दीक्षितरांनी रचलेली ही संस्कृत कृती तामिळनाडूतील तिरुवारूर जिल्ह्यातील तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपतीला समर्पित आहे. हंसध्वनी रागातील ही रचना आज कर्नाटकी संगीताच्या मैफलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

अशी आख्यायिका आहे की, गजमुखसुराला मारल्याच्या पापाबद्दल गणपतीने येथे शिवाची पूजा केली . गजमुखसुराला शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि त्याने मातंगपुरम येथील आपल्या स्वनिर्मित राजधानीतून मानवांना अतोनात दुःख दिले होते.

हत्तीने गणपती देवाचा सामना केला आणि आपल्या तुटलेल्या उजव्या सुळ्याने त्या राक्षसाचा पराभव केला. असे मानले जाते की, त्या राक्षसाने सांडलेल्या रक्तामुळे येथील जमीन लाल झाली आणि म्हणूनच तमिळमध्ये या जागेला 'तिरुचेनकाट्टनकुडी' असे नाव पडले . जरी येथील मुख्य देवता शिव असले तरी, गणपतीलाच प्रथम सन्मानाचे स्थान दिले जाते.

वातापी गणपतीची मूर्ती बदामीहून तिरुचेंकाट्टनकुडी येथे कशी पोहोचली, याभोवती एक प्रसिद्ध मौखिक परंपरा आहे. 

बदामी किल्ला परिसरातील ‘लोअर शिवालय’ हे सातव्या शतकातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.आज जरी शिवालय ओळखले जाते तरी इथे पल्लव आक्रमणाआधीएक गणेश मूर्ती होती, होय तीच प्रसिद्ध 'वातापी गणपती '!!



इ.स. ६४२ च्या सुमारास पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याने चालुक्यांची राजधानी वातापीवर विजय मिळवला. त्याचा सेनापती परंज्योती याने युद्धानंतर वातापी येथून गणपतीची मूर्ती आणली आणि आपल्या जन्मभूमीत तिची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. पुढे हाच परंज्योती ‘सिरुत्तोंडर’ या नावाने शैव नायनार संतपरंपरेत प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे.

मात्र इतिहास आणि आख्यायिका यांची सरमिसळ होऊ नये. परंज्योतीने वातापीतून हीच गणपतीची मूर्ती आणली, याला ठोस समकालीन लिखित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा ‘मौखिक परंपरेनुसार’ किंवा ‘स्थानिक आख्यायिकेनुसार’ अशीच मांडणे अधिक शास्त्रीय ठरेल.



तिरुचेंकाट्टनकुडीतील उत्तरापतिश्वरस्वामी मंदिराशी वातापी गणपतीची परंपरा जोडलेली आहे. या मंदिरसमूहात गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी-मस्तक असलेले रूपही आढळते. त्यामुळे गणपतीच्या प्रतिमाविश्वातील विविधता आणि स्थानिक धार्मिक परंपरांचे परस्पर संबंधही येथे अभ्यासता येते.

दगडात कोरलेला नटराज, त्याच्या सान्निध्यातला गणेश आणि दूर तामिळनाडूत आजही घुमणारा ‘वातापी गणपतिम्’चा स्वर या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे वातापी.

वातापी म्हणजे आजचे बदामी.ते दख्खनच्या स्मृतीत कोरलेले एक जिवंत सांस्कृतिक पर्व!!

‘वातापि गणपतिं भजेहम्’ ही मुथुस्वामी दीक्षितरांची संस्कृत कृती असून ती हंसध्वनी रागात रचलेली आहे. 

वातापि गणपतिं भजेहम्

वातापि गणपतिं भजेहम् ।

वरणास्यं वरप्रदं श्रीम् ॥

मी वातापीच्या गणपतीचे भक्तिभावाने स्मरण व भजन करतो.सुंदर, विशाल मुख असलेल्या, भक्तांना वरदान देणाऱ्या त्या मंगलमूर्तीची मी उपासना करतो.


भूतादि संसेवित चरणम् ।

भूत-भौतिक-प्रपञ्च-भरणम् ।

वीतरागिणं विनुतयोगिनम् ।

विश्वकारणम् ॥

ज्यांच्या चरणांची पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीतील शक्ती उपासना करतात,जे या संपूर्ण भौतिक विश्वाचे पालन-पोषण करतात,जे आसक्तीपासून मुक्त आहेत आणि योगिजन ज्यांची स्तुती करतात,त्या गणेशाला मी वंदन करतो.जो या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वामागील कारणस्वरूप आहे.


पुरा कुम्भ-सम्भव मुनिवर

प्रपूजितं त्रिकोण-मध्यगतम् ।

मुरारि-प्रमुखाद्युपासितम् ।

मूलाधार-क्षेत्रस्थितम् ॥

ज्यांची पूर्वी अगस्त्य ऋषींनी भक्तिभावाने पूजा केली,जे त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान आहेत,ज्यांची विष्णूसह श्रेष्ठ देवताही उपासना करतात,आणि जे योगशास्त्रातील मूलाधारचक्रात अधिष्ठित आहेत,त्या गणपतीला मी नमन करतो.


परादि चत्वारि वागात्मकं ।

प्रणवस्वरूपं वक्रतुण्डम् ।

निरन्तरं निटिल-चन्द्रखण्डम् ।

निज-वामकर-विधृत-इक्षुदण्डम् ॥


जे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्थांचे स्वरूप आहेत,जे पवित्र ॐकाराचे मूर्त स्वरूप आहेत,ज्यांची सोंड वक्र आहे,ज्यांच्या कपाळावर चंद्रकोरी शोभते,आणि ज्यांच्या डाव्या हातात ऊसाचा दंड आहे.अशा वक्रतुण्ड गणपतीला मी वंदन करतो.


करंबुज पाश बिजापुरं 

कलुषविदुरं भूतकरं हरादी 

गुरुगुहा तोषिता बिंबं 

हमसाध्वनी भूषित हेरंबम ।।५।।

आपल्या कमळधारी हातांमध्ये तो फास आणि लिंबू फळ धारण करतो. तो सर्व अशुद्धतेपासून दूर, सर्व जीवांचे साक्षात स्वरूप आहे. त्याची तेजस्वी प्रतिमा हर (शिव), इतर आणि गुरुगुह (स्कंद) यांना आनंदित करते. तो हेरंबा (दुर्बळांचा रक्षक) असून, हंसध्वनीच्या सुरावटीने अलंकृत आहे.

या स्तोत्रात गणपती केवळ विघ्नहर्ता किंवा वरदायक देवता म्हणून येत नाही. दीक्षितर गणपतीला विश्वाच्या मूलतत्त्वाशी जोडतात. मूलाधारचक्र, ॐकार, वाणीच्या चार अवस्था, पंचमहाभूते आणि विश्वाचे कारण या संकल्पनांमधून गणपतीचे एक अत्यंत व्यापक, तात्त्विक आणि योगपरंपरेशी संबंधित रूप उभे राहते.

म्हणून ‘वातापी गणपतिं भजेहम्’चा भाव केवळ “हे गणपती, माझे विघ्न दूर कर” इतकाच नाही. तो अधिक खोल आहे

“हे वातापी गणपती, तू विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आहेस, वाणीचे आणि प्रणवाचे स्वरूप आहेस; योगी आणि देवताही तुझी उपासना करतात. त्या विश्वव्यापी, मंगलमय गणेशाला मी भक्तिभावाने वंदन करतो.”


राग: हंसध्वनी 

ताल: आदि ताल 

रचनाकार: मुथुस्वामी दीक्षितर

कालखंड: इ.स. १७७५–१८३५; त्यांचा जन्म २४ मार्च १७७५ रोजी झाला आणि निधन २१ ऑक्टोबर १८३५ रोजी झाले. 

भाषा: संस्कृत

देवता: तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपती

परंपरा: कर्नाटक संगीताच्या मैफलीची सुरुवात गणपतीच्या मंगलस्मरणाने करण्यासाठी ही कृती विशेष लोकप्रिय आहे. 

विशेष म्हणजे हंसध्वनी रागाची निर्मिती मुथुस्वामी दीक्षितरांनी केलेली नाही. हा राग त्यांच्या वडिलांना, रामस्वामी दीक्षितरांना, श्रेय दिला जातो. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या रागात मुलाने गणपतीची ही अजरामर कृती रचली, हा संगीतपरंपरेतील सुंदर योग आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘वातापि गणपतिम्’च्या शेवटच्या भागात हंसध्वनीचा उल्लेख येतो, त्यामुळे ही कृती कोणत्या रागात गायची याचाही संकेत रचनेतच मिळतो. 

“वातापीच्या कातळांमध्ये कोरलेली गणपतीची स्मृती पुढे मुथुस्वामी दीक्षितरांच्या ‘वातापि गणपतिम्’मधून स्वररूपाने अमर झाली.आणि त्या स्वरांना लाभला हंसध्वनीचा मंगल नाद.”

-भक्ती 

Friday, September 11, 2026

अष्टमहाभय अवलोकितेश्वर

 #badami बदामीतील अनवट वाटेवरील अष्टमहाभय अवलोकितेश्वर




बदामी म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती चालुक्यकालीन शैव आणि वैष्णव लेणी, त्यांच्या भव्य देवप्रतिमा आणि खडकात कोरलेले स्थापत्य. मात्र याच बदामीच्या कलाविश्वात एक वेगळी आणि तुलनेने अनवट वाट दाखविणारी बौद्ध प्रतिमा आढळते. बदामी लेणी क्रमांक ३ मधील या शिल्पाची ओळख काही कला-इतिहास अभ्यासकांनी अष्टमहाभय अवलोकितेश्वराशी जोडली आहे. या ओळखीचा उल्लेख De Mallmann यांच्या अभ्यासाच्या संदर्भात आढळतो. त्यामुळे या प्रतिमेकडे बदामीच्या प्रामुख्याने प्रतिमाविश्वाच्या चौकटीबाहेर डोकावणाऱ्या महत्त्वपूर्ण शिल्परूप म्हणून पाहता येते.


अवलोकितेश्वर हा महायान बौद्ध परंपरेतील करुणेचा बोधिसत्त्व मानला जातो. संकटात सापडलेल्या भक्ताचे रक्षण करणारा, त्याच्या हाकेला प्रतिसाद देणारा आणि भयातून मुक्त करणारा असा त्याचा स्वरूपविचार विकसित झाला. ‘अष्टमहाभय’ म्हणजे भक्ताला किंवा प्रवाशाला भेडसावणारी आठ महान संकटे. या संकटांपासून रक्षण करणारा अवलोकितेश्वर हा या प्रतिमाविषयाचा केंद्रबिंदू आहे.


पश्चिम दख्खनातील बौद्ध लेण्यांमध्ये अवलोकितेश्वराच्या ‘संकटमोचक’ किंवा ‘रक्षक’ स्वरूपाची अनेक उदाहरणे आढळतात. अजिंठा, कान्हेरी, संभाजीनगर आणि वेरूळ येथील विविध प्रतिमांमधून या संकल्पनेचा विकास दिसून येतो. उपलब्ध अभ्यासानुसार अजिंठ्यात अवलोकितेश्वराच्या संरक्षणरूपाची अनेक उदाहरणे, कान्हेरीत तीन, औरंगाबाद लेणी ७ मध्ये एक आणि वेरूळमध्ये दोन उदाहरणे नोंदली गेली आहेत.


यांपैकी संभाजीनगर  (औरंगाबाद )लेणी क्रमांक ७ हे तुलनेसाठी विशेष महत्त्वाचे उदाहरण आहे. तेथे मध्यभागी उभा अवलोकितेश्वर असून त्याच्या दोन्ही बाजूंना आठ संकटांची स्वतंत्र लघुदृश्ये कोरलेली आहेत. एका बाजूला अग्नी, दरोडेखोर, बंधन किंवा गुलामी आणि जलसंकट, तर दुसऱ्या बाजूला सिंह, सर्प, हत्ती आणि यक्षिणी/राक्षसीपासून होणारे संकट अशी मांडणी केली आहे. प्रत्येक प्रसंगात संकटात सापडलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवलोकितेश्वराचे लघुरूप येताना दाखविले आहे.


बदामीतील प्रतिमा मात्र मोठ्या प्रमाणात झिजलेली आणि अस्पष्ट असल्यामुळे औरंगाबादच्या उदाहरणाप्रमाणे तिच्या भोवतीची प्रत्येक लघुदृश्ये निश्चितपणे कोणत्या महाभयाचे प्रतिनिधित्व करतात, असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. छायाचित्रात मध्यवर्ती उभी आकृती आणि तिच्या दोन्ही बाजूंना लहान मानवी व कथात्मक आकृत्यांची रचना जाणवते. त्यामुळे ‘अष्टमहाभय अवलोकितेश्वर’ ही विद्वत्तापूर्ण ओळख लक्षात घेऊन, प्रत्यक्ष दृश्य पुराव्याच्या आधारे सावधपणे अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल.


यामुळे बदामीतील हे शिल्प विशेष ठरते. एकीकडे बदामी चालुक्यांच्या शैव-वैष्णव कलापरंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे, तर दुसरीकडे त्याच परिसरात महायान बौद्ध प्रतिमेची शक्यतादर्शक उपस्थिती दिसते. ही प्रतिमा तत्कालीन दख्खनमधील धार्मिक परंपरांमधील संपर्क, कलात्मक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक सहअस्तित्व समजून घेण्यासाठी एक वेगळी खिडकी उघडते.