Tuesday, October 19, 2021

वर्षा ऋतू

 

वर्षा ऋतू

जीवनासाठी आसुसली धरणी माय श्रावणापासून सरी झेलत झेलत भाद्रपदभर तुडूंब काठोकाठ पाण्याच्या आनंदाने बहरून पावते.

शेतातल्या बीजांनी थेंब थेंब रुजून घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा तोंडात सुखाचा घास भरवावा असा हा भारतातला महत्वाचा ऋतू..वर्षा ऋतू!

केरळात वर्षा उर्फ मान्सूनचे आगमन झाले की आपल्या घरी हा कधी येतो यासाठी प्राणी,पक्षी,वृक्ष सगळेच चातक झालेले असतात.आभाळ भरून येत ,गरजत आता सर्वत्र थैमान घालण्याच्या तयारीत असतो.त्याला बरसून बरसून स्वच्छ ,निरभ्र होत फळा कोरा करण्याचा ध्यास लागतो.एखाद्या स्वप्नपरीने स्वप्नात रंग भरावे तस आभाळाला सप्तरंगी इंद्रधनुचे स्वप्न वारंवार पडत असते की नाही.डोंगर कपार्यांतून धबधबे कोसळत निसर्ग नटवतात.कासपठार,ताम्हिणी,आंबोली घाट याकडे सहजच पावलं झेपावू लागतात.



झाडांची हिरवी गर्दी,फुलांचे फळांमध्ये होणारी वृद्धी सुखावते.weed आता हळूहळू कमरे पर्यंत आणि डोक्यापर्यंत ऊंच वाढलेले असतात.एक छोटेसे जंगलच शहरापासून जरासाच दूर वाढलेलं असते.त्यात आता नानाविध फुलांवर रंगबेरंगी फुलपाखरे बागडत असतात.काहींना शेंगा लागायला सुरुवात झालेली असते.







रेडिओवर श्रावणमासी हे आर जे सतत आठवण करून देत असतो आणि मध्येच ‘ताल’ मधलं गाण “दिल ये बैचेन ये” प्ले करतो.मनात महाविद्यालयाच्या काळातला श्रावण ,त्याच्या सोबतचे फेर अस गच्च आभाळ भरून येत आणि मनातला श्रावण देवदासमधल्या पारोच्या “सिलसिला ये चाहत का ना मैने बुजने दिया...आजा रे मोरे पिया”, “काहे सताये आजा ..पिया बसंती रे” अशा असंख्य गाण्याच्या प्लेलिस्टसह डोळ्यांतून झरझर वाहू लागतो.टेबलावर उमटलेला चहाच्या  कपाच्या वर्तुळाकार ठसा मात्र मनात बदाम ठेवून जातो.    

दूरच्या वा जवळच्या नात्यातलं कोणाचे तरी मंगळागौरीच निमंत्रणाचे फोन येऊ लागत आणि मन संसारच्या चौकटीत पुन्हा अलगद सामावत.श्रावणात सणांची स्निग्धता आता हळूहळू चढत जाते.पुष्प पत्री वैभव सणांच्या आरासीतून सुशोभित होत राहते.त्यात कलाकाराने कल्पकता दाखवावी.पंचमी,हरतालिका ,रक्षाबंधन,मंगळागौर बाई जरा माहेर पदरात बांधून पुन्हा गौरी गणपतीच्या स्वागताला पदर खोचून सज्ज होते.१६ भाज्या,१६ कोशिबीरींची यादी दर वेळी प्रत्येक नव्या नवरीला सांगताना उगाच आपण काकूबाई होत चालल्याची भावना डोकावून जाते.वर्षा ऋतूतच हिरव्या दुर्मिळ  पालेभाज्या सर्वत्र दिसतात.गणपतीच्या जयघोषाने वातावरण आणि सरींनी आसमंत दुमदुमून गेलेला असतो.

(मी केलेली सजावट ,राख्या)







वर्षा ऋतू सुखाचा जरी रेखाव म्हटल तरी महापूर,ओला दुष्काळ अशा भीतेने मनाच कापर उडवतो.ग्लोबल वार्मिंग या समस्येकडे पुन्हा लक्ष केंद्रित होते.याच साठी का अट्टाहास हा प्रश्न पडतो.

 खिडकीतून बाहेर डोकावल  तर चिमणी पाखर साचलेल्या इवल्याशा डबक्यात होडी सोडून धमाल नाचत असतात आणि मनात पुन्हा जगजीत सिन्हांचे गाण वाजत राहत

ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
अगर छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी

-भक्ती