Monday, November 3, 2008

मृत्यु

येतोस तु ये
रात्रीच्या काळोखाला
दिसाचा उजेडाला
कशा कशाचे
बंधन नाही तुला
येतोस तु ये

येतोस तु ये
आसुसले मी तुझ्या मिठीला
नजर दे ना माझ्या नजरेला
कोणा कोणाचे
देणे नाही तुला
येतोस तु ये

येतोस तु ये
वाटेत तु येशीलच भेटायला
पण गोंजारशील की ओढणार मला
ह्याची-त्याची
पर्वा नाही तुला
येतोस तु ये

येतोस तु ये
राहु नकोस रेंगाळलेला
सलाम तेवढा करु दे या जीवनाला
इकडे-तिकडे
पाहण्याची गरज नाही तुला
येतोस तु ये

हं हं हं
येतोस तु ये
मला मुक्त करायला ये............
भक्त्ती.

निघाले मी निघाले

निघाले मी निघाले

बरसणा~या माझ्यासह काव्य सरी
मंजूळ गाणे माझ्या खोल अंतरी
आशेच्या पंखाने घेईन उंच भरारी
नाजुक सुंदर अशी मी भावपरी
माय मराठीचा आशीर्वाद माझ्या पदरी

निघाले मी निघाले


कवितांचे ममतेने मी कौतुक करी
मोहक वाटेवर सुख येई माझ्या दारी
चुकलं एखाद लेकरु मायाने मी गोंजरी
गोड गोड माझ्याबरोबर अनेक फुले हसरी
असंख्य स्वप्ने मनी मी ता~यांना हाती धरी

निघाले मी निघाले



दूर कधी वाजे बासरी होते मी बावरी
टाळ्यांच्या आवाजाने मज मौज वाटे भारी
विठुराईच्या भक्त्तांच्या अभंगाने अवतरते येथे पंढरी
कोणी शांत शांत कोणी पाखरे चिवचिवणारी
आनंदाच्या विहारणा~या माझ्यासह लहरी

निघाले मी निघाले

-भक्त्ती

Tuesday, October 28, 2008

दिवा

पहिला दिवा **

मांगल्य दे
सुख-समाधान दे
मनाची काजळी दुर सारायला
एक तेजोमय पणती दे !

दुसरा दिवा **

यश दे
समृद्धी-सन्मान दे
किरणांची उधळण करायला
लख्ख लख्ख प्रकाश दे !

तिसरा दिवा **

आरोग्य दे
शांती-पावित्र्य दे
उजेडेची अर्चना घडायला
लक्ष लक्ष तेवणारे दीप दे !

चौथा दिवा **

विश्वास दे
सृजनता-सौख्य दे
जीवनात सप्तरंग भरायला
एक दिव्य आकाश कंदिल दे !

पाचवा दिवा **

आशा दे
सत्व-साम दे
आयुष्यात चांदण बरसायला
टिमटिम करत्या ज्योती दे !

सहावा दिवा **

आशीर्वाद दे
सौजन्य सदैव घडु दे
तिमीर चिरुन टाकायला
अखंड उजळत राहण्याच वरदान हे दे !


-भक्त्ती

Monday, October 20, 2008

चकवा




एकटक नजर
रात्रीचा प्रहर
काळा अंधार
चांदण्या हजार
चंद्र धवल
प्रकाश शीतल
कमळ कोमल
तळ्यात नवल
तुटला तारा
धुंद वारा
खुलला नजारा
हसला आसमंत सारा
मुग्ध गारवा
नक्षत्रांचा गोडवा
टिमटिमता काजवा
एक चकवा
नवा नवा
@भक्त्ती