Sunday, September 5, 2021

शांतीचा रस्ता –मेहेराबाद

 


मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची  परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो....

मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने  संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे काम अनेक क्षेत्रात असून विविध कार्यक्रम राबविले जातात.वर्षातून तीन दिवशी येथे उत्सव असतो आणि जगभरातून त्यांचे अनुयायी येथे येतात.

प्रथम दर्शनी आपल्याला दिसतो मेहेर पिलीग्रीम  रित्रिट उंच दगडी वास्तू!पुढे गेल्यावर आहे मेहेर बाबांची समाधी स्थळ.भक्कम अशी दगडी छोटीशी वास्तू जिच्या वरती घुमत असून त्यावर वेगवेगळ्या धर्मांच्या चिन्हाचे छोटे बुरुज आहेत.जी सध्या बंद आहे.बाहेरून दर्शन घेता येते.बाबांच्या आजूबाजूलाच त्यांच्या मंडळींची(विविध  शिष्यगण )यांच्याही संगमरवरी दगडातील समाधी आहेत .नन्तर पुढे बाबांची रसोई,टीन शेड उजवीकडे आहे. तिथे आम्हांला योगायोगाने trusty भेटले.जे वयाने खूप वृद्ध होते आणि व्हीलचेअरवर होते.नुकत्याच त्यांच्या केअर टेकरने त्यांना औषधे दिली होती.माझ्या लहान मुलीला पाहताच त्यांनी आम्हाला थांबवले आणि मेहेर बाबांचा छोटा फोटो भेट म्हणून तिला दिला.

सगळीकडे हिरवाई आणि शांतता !हा तुकडा जणू बाहेरच्या गर्दीत  हवेत तरंगतो आहे असे वाटलं.फेरफटका मारताना अनेक विदेशी अनुयायी दिसले.सध्या श्रावणात हा परिसर अतिशय मनमोहक झालाय .माझ्या डोळ्यांचे खरच पारणं फिटले.असच भटकत राहिलो तर पुढे संस्थेचीच रोपवाटिका पाहिली.विविध औषधी ,फुलांची रोपं  तिथे बनवून या मोठ्या जागेत लावली जाते.सागाची मोठमोठाली झाडे बहराने फुलून गेली होती. नांगरलेल शेत,पाण्याने भरलेल्या विहिरी आणि निस्सीम शांतता !अमूर्त!मध्येच एका मोरपंखी , लांब चोच  असणाऱ्या इवल्या पक्षाने दर्शन दिले !

जातांना मुख्य रोडला लागल्यावर मेहेरागड आहे जिथे बाबा राहायचे,त्यांची धुनी आहे.पण तो बंद होता.आता नेहमी जमेल तसं इथे डोकावणार आहेच तेव्हा पुढल्यावेळी तिथे गेल्यावर याबद्दल लिहील.

a

खाली दिलेलं संकेतस्थलावर मेहेराबादला कसे पोहचायचे ,राहण्याची सोय काय,संस्थेचे काम काय ,कसे चालते आणि शांतीदूत मेहेरबाबा यांचे कार्य आणि समाधीस्थळ बांधणी याविषयी संपूर्ण माहिती आहे.

https://avatarmeherbabatrust.org/tomb-shrine/