Monday, September 28, 2026

टोमॅटो_बेसन_सार

 #टोमॅटो_बेसन_सार



अहाहा! खरं सांगू का, पूर्वी माहेरी ‘खिचडी’ म्हणजे अगदी क्वचित प्रसंगीच व्हायची. माझी आई इतकी भारी सुगरण होती की काय सांगू! आमच्या घरात रोज रात्री गरमागरम पोळी, छानशी भाजी आणि दुपारी उरलेला नसेल तर ताजा भात... असा मस्त बेत असायचा. त्यामुळे मला आधी कधी खिचडी खायची सवयच नव्हती, उलट खिचडी म्हणजे आजारी माणसाचं जेवण असंच वाटायचं! 😜

पण लग्न झालं आणि सासरी आले, तर बाबो! इथे तर वेगळंच विश्व होतं. रात्रीच्या जेवणात थेट खिचडी, सार, पापड आणि भजी... बास, एवढाच बेत! पहिल्यांदा तर मला जरा नवलच वाटलं. पण म्हणतात ना, सवयीने सगळं होतं. आता नोकरी सांभाळताना संध्याकाळी जेव्हा दमून घरी येते, तेव्हा जाणवतं की ही खिचडी म्हणजे आम्हा नोकरदार बायकांचा हक्काचा, सोपा आणि एकदम स्ट्रेस-बस्टर पदार्थ आहे! आता तर मलाही याची मस्त सवय झाली आहे.

या सगळ्या बेतात माझ्यासाठी सर्वात नवीन आणि भारी प्रकरण ठरलं ते म्हणजे '#टोमॅटो_बेसन_सार'! 🍅

टोमॅटो सूप म्हणून मी आधी खूप वेळा पिला होता, पण जेवणात भातासोबत किंवा खिचडीसोबत हा 'सार' खाणं माझ्यासाठी एकदम नवीन होतं. आता टोमॅटो म्हटले की ते उपजतच आंबट असणार! आणि रात्रीच्या वेळेस जास्त आंबट खाणं अनेकांना चालत नाही, कारण पित्त किंवा खोकल्याचा त्रास होतो. पण आमच्या या सासरच्या साऱ्यात एक भारी 'सायन्स' लपलंय!

टोमॅटोच्या आंबट रसात जेव्हा आपण दोन चमचे बेसन पीठ घालतो ना, तेव्हा टोमॅटोचा तो उग्र आंबटपणा एकदम मऊ पडतो! बेसनामुळे हा सार मस्त रस्सादार, दाटसर होतो आणि त्याला एक वेगळीच अप्रतिम चव येते.

आपल्याकडे जसा मेतकूटाचा सार करतात, किंवा तो खान्देश-विदर्भाकडचा 'येसर' चा सार असतो ना... ज्याची खमंग चव जिभेवर रेंगाळते, अगदी तसाच हा टोमॅटो-बेसन सार लागतो! आणि जर या टोमॅटोच्या सोबतीला घरात तयार असणारी खमंग 'येसर पावडर' असेल, तर मग विचारूच नका, येसर घातलेला टोमॅटोचा सार तर अगदी स्वर्गीय लागतो!

माहेरच्या पोळी-भाजीतून सुरू झालेला माझा हा प्रवास आता सासरच्या या चमचमीत 'खिचडी-सार आणि पापड-भज्यांवर' येऊन स्थिरावला आहे आणि मी तो पूर्ण एन्जॉय करतेय! 😊


टोमॅटो बेसन सार बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.

साहित्य 


* टोमॅटो: २

* बेसन (चणा डाळीचे पीठ): २ मोठे चमचे

* आले-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा

* हिरव्या मिरच्या: ४ 

* गुळ: १ ते २ छोटे चमचे

* लाल तिखट: १ छोटा चमचा

* हळद: १/२ छोटा चमचा

* जिरे व मोहरी: प्रत्येकी १/२ छोटा चमचा

* हिंग: १/४ छोटा चमचा

* कढीपत्ता: ७-८ पाने

* कोथिंबीर: बारीक चिरलेली

* तेल किंवा तूप: २ मोठे चमचे 

* मीठ: चवीनुसार

* पाणी: गरजेनुसार


कृती 


   सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची मऊ प्युरी तयार करा.

एका वाटीत २ मोठे चमचे बेसन घ्या. त्यात थोडे पाणी घालून चमच्याने नीट मिक्स करा, जेणेकरून पिठाच्या गाठी राहणार नाहीत.कढईत तेल किंवा तूप गरम करा.

 तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून छान तडतडू द्या. 

त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतून घ्या.फोडणीमध्ये हळद आणि लाल तिखट टाका. लगेचच त्यावर तयार केलेली टोमॅटोची प्युरी ओता आणि तेल सुटेपर्यंत २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.

आता यात बेसनाचे तयार केलेले मिश्रण आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला (सार फार घटही नको आणि अगदी पातळही नको).

 यात चवीनुसार मीठ आणि गुळ घाला. सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या.

साराला मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून बेसनाचा कच्चापणा निघून जाईल आणि सार छान दाटसर होईल.

   


तुमचा गरमागरम आणि चवदार टोमॅटो बेसन सार तयार आहे!

शेंदुराचे कवच आणि पाषाणाचे मौन

 शेंदुराचे कवच आणि पाषाणाचे मौन

 

रामायणातील ती एक सुवर्ण सकाळ होती... लंकाविजयानंतर अयोध्येत आनंदाचे साम्राज्य होते. माता सीता आपल्या महालात आरशासमोर बसून अत्यंत प्रेमाने आपल्या भाळी रक्तवर्णी शेंदुराचा टिळा लावत होत्या. तितक्यात तिथे प्रभू रामाचे परमभक्त, अथांग शक्तीचे सागर असणारे पवनपुत्र हनुमान आले. माता सीतेला कपाळावर तो लाल रंगाचा पदार्थ लावताना पाहून हनुमानाच्या निष्पाप आणि बालसुलभ मनाला प्रचंड कुतूहल वाटले. त्यांनी हात जोडून अत्यंत आदराने विचारले, "माते, हा कपाळावरील लाल बिंदू काय आहे? आणि तो तुम्ही का लावत आहात?"


माता सीतेने हनुमानाच्या चेहऱ्यावरील तो निष्पाप भाव पाहून मंद स्मित केले आणि म्हणाल्या, "हे मारुती, हा शेंदूर आहे. हा कपाळावर लावल्याने माझ्या स्वामींचे, म्हणजेच तुझ्या प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढते आणि त्यांच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर होते."


'प्रभू रामांचे आयुष्य वाढते आणि संकट दूर होते' हे शब्द हनुमानाच्या कानात पडले आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा जणू एक प्रचंड कल्लोळ उठला! त्यांच्या मनात विचार आला, 'जर माता सीतेने लावलेल्या चिमूटभर शेंदुराने माझ्या प्रभूंचे आयुष्य वाढत असेल, तर मी माझ्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर का माखू नये?' हनुमानासाठी प्रभू रामाच्या आयुष्यापेक्षा आणि सुखापेक्षा जगात दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नव्हती.


ते तडक महालाबाहेर पडले. त्यांनी शेंदुराची मोठी भांडी घेतली, त्यात सुगंधी तेल मिसळले आणि आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत, संपूर्ण अथांग शरीराला त्या शेंदुराने माखून घेतले! त्यांचे रूप आता पूर्णपणे रक्तवर्णी, म्हणजेच धगधगत्या शेंदरी रंगाचे झाले होते. याच अवस्थेत, डोळ्यांत प्रभू रामाच्या नावाचा अश्रू आणि ओठांवर 'जय श्रीराम'चा गजर करत हनुमान थेट राजसभेत पोहोचले.


राजसभेत उपस्थित असलेले सर्व जण हनुमानाचे ते रूप पाहून थक्क झाले, काहींना हसू आवरेना. पण जेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमानाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. रामाने विचारले, "मारुती, हे काय रूप धारण केले आहेस?"


हनुमान प्रभूंच्या चरणी साष्टांग दंडवत घालत गदगद आवाजात म्हणाले, "प्रभू, माता सीतेच्या चिमूटभर शेंदुराने जर तुमचे आयुष्य वाढणार असेल, तर तुमच्या या दासाने आज आपल्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर अर्पण केला आहे. आता मृत्यूही तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करणार नाही!"

भक्तीची ही पराकाष्ठा पाहून साक्षात जगन्निवास प्रभू रामचंद्र भावुक झाले. त्यांनी पुढे होत हनुमानाला घट्ट मिठी मारली. रामाच्या स्पर्शाने हनुमानाचे शरीर पावन झाले. प्रभू रामांनी त्याच क्षणी संपूर्ण विश्वाच्या साक्षीने मारुतीला वरदान दिले: "हे अंजनीसुता, आजपासून जी कोणती व्यक्ती तुला अत्यंत श्रद्धेने शेंदूर अर्पण करेल, तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे आणि इडा-पिडा एका झटक्यात नष्ट होतील. तुझा हा शेंदरी रंग कलियुगात भक्तांच्या रक्षणाचे सर्वात मोठे कवच बनेल!"


...आणि इथूनच 'शेंदूर' आणि 'देवमूर्ती' यांचे अतूट नाते जोडले गेले! हनुमानाच्या या अथांग भक्तीच्या कथेने संपूर्ण समाजमनावर इतका मोठा प्रभाव टाकला की, पुढे चालून वीरश्री, पराक्रम आणि संहारक शक्ती असणाऱ्या मारुती, गणपती, काळभैरव यांसारख्या सर्वच जागृत आणि उग्र देवतांना भक्तांनी मोठ्या श्रद्धेने शेंदूर वाहण्यास सुरुवात केली. भक्तांच्या मनात असा दृढ विश्वास निर्माण झाला की, देवाला शेंदूर अर्पण केल्याने किंवा त्याच्या मूर्तीला शेंदूराचे लेपन केल्याने देव लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या घरावरील सर्व संकटे दूर करतो.


या धार्मिक भावनेला पुढे व्यावहारिकतेचीही साथ मिळाली. जुन्या काळी मंदिरे उघडी असायची, जिथे मूर्तींवर ऊन, वारा, आणि पाण्याचा थेट मारा व्हायचा. प्राचीन शिल्पकारांनी आणि पुजाऱ्यांनी पाहिले की, शेंदूर हा तेलात कालवल्यानंतर एक उत्तम संरक्षक रोगण म्हणून काम करतो. त्यामुळे मूर्तीचा पाषाण  वर्षानुवर्षे सुरक्षित राहावा, त्याला तडे जाऊ नयेत आणि हवामानाचा त्यावर परिणाम होऊ नये, म्हणून मूर्तींना तेल-शेंदूराचे जाड कवच लावण्याची पद्धत रूढ झाली. अशा प्रकारे, हनुमानाच्या पवित्र भक्तीतून जन्माला आलेली ही शेंदूर लावण्याची परंपरा काळाच्या ओघात थेट देवमूर्तींच्या संरक्षणाचे आणि पूजेचे एक अविभाज्य अंग बनली!


सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।

शुभदं कामदं चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥

...ॐ श्री हनुमते नमः, सिंदूरं समर्पयामि।

 हे देवा, हा शेंदूर अत्यंत शोभिवंत, लाल रंगाचा, सौभाग्य आणि सुख वाढवणारा आहे. शुभ फळ देणारा आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा पवित्र शेंदूर आपण माझ्याकडून स्वीकारावा आणि माझ्यावर कृपा करावी.

पण काही मूर्ती या शेंदुराच्या लेपात हरवल्या.....अनेक काळ मूळ स्वरूप लपवून लोक परंपरेच्या भाग होत राहिल्या.


 विलोभन प्रकटीकरणाचा एक अद्भुत प्रवासशतकानुशतके मानवी श्रद्धेने आणि भक्तीच्या भावविभोर थरांनी ज्या पाषाणाला वेढून ठेवले होते, तो पाषाण एका रात्रीत आपले मौन सोडतो आणि त्या शेंदरी गर्भातून एक अलौकिक, सुबक आणि काळ्या पाषाणातील देखणी कलाकृती भूतलावर अवतरते. हा केवळ एका मूर्तीवरील शेंदूर निघण्याचा प्रवास नाही, तर काळाच्या उदरात दडलेला इतिहास आणि भक्तीचे आदिम रूप पुन्हा जिवंत होण्याचा सोहळा आहे. जेव्हा दोन-तीन पिढ्यांची जुनी आवरणे सुकतात, कडक होतात आणि मूर्ती व त्या शेंदरी कवचात एक सूक्ष्मातिसूक्ष्म पोकळी तयार होते, तेव्हा निसर्गाच्या एका अद्भुत नियमाने बाहेरची हवा आत वेगाने घुसते आणि एका मोठ्या आवाजासह ते संपूर्ण कवच गळून पडते. यालाच आपल्या लोकपरंपरेत 'खोळ पडणे' किंवा 'चोला छोडना' ,'वज्रलेप उतरणे 'म्हणतात. एकेकाळी या घटनेला अरिष्ट किंवा अपशकुन मानले जायचे, पण आज हेच प्रकटीकरण भक्तांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे आणि इतिहासकारांना थक्क करणारे ठरत आहे.या दैवी प्रक्रियेतून ज्या मूर्ती भक्तांसमोर आल्या, त्यांचे रूप थक्क करणारे आहे.


नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर  येथे एका अशाच पुरातन मंदिरात शेंदुराखाली दबलेल्या सरस्वतीने मोकळा श्वास घेतला. हे ठिकाण १२ व्या ते १३ व्या शतकातील शिलाहार-यादवकालीन प्रगत शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीवरील बारीक कोरीवकाम, मकरतोरण आणि कीर्तीमुख यांसारखी अद्वितीय मूर्तिशास्त्रीय लक्षणे स्पष्टपणे दिसून आली आहेत, जी प्राचीन ग्रंथांमधील महासरस्वतीच्या वर्णनाशी तंतोतंत जुळतात.पिढ्यानपिढ्या नवजात बालकांचे नशीब लिहिणारी उग्र 'सटवाई देवी' म्हणून पूजली गेलेली मूर्ती, जेव्हा शेंदूर आणि सिमेंटच्या पाशातून मुक्त झाली, तेव्हा १२ व्या शतकातील शांत, सात्त्विक आणि अद्वितीय कलाकुसर असलेली महासरस्वती म्हणून प्रकट झाली. हातात वीणा, अक्षमाला आणि पायापाशी हंस घेऊन अवतरलेल्या या ज्ञानदेवतेने संस्कृतीच्या एका विस्मृत पानावरील धूळ झटकून टाकली.


ऐतिहासिक दृष्टीने हा शोध खूप महत्त्वाचा आहे, कारण याद्वारे मध्ययुगातील एक वैदिक देवतेचे रूप काळानुरूप लोकपरंपरेत आणि मातृदेवता पूजेच्या सटवाई देवी प्रवाहात कसे रूपांतरित झाले, याचा अभ्यास करण्याची एक नवीन दिशा इतिहासकारांना मिळाली आहे.तसेच ग्रामदैवत ,लोकपरंपरा यांचाही प्रवास या घटनांनी नव्याने अभ्यासला जातो .






मध्ययुगात जेव्हा परकीय आक्रमणे किंवा राजकीय अस्थिरतेमुळे मुख्य मंदिरे दुर्लक्षित झाली, तेव्हा सामान्य लोकपरंपरेने या मूर्तींचे रक्षण केले. वैदिक संस्कृतीतील 'सरस्वती' ही ज्ञान आणि कलेची शांत देवतेच्या रूपात पूजली जाते, तर लोकपरंपरेतील 'सटवाई' प्रामुख्याने नवजात बालकांचे रक्षण करणारी आणि नशिबाचे लेख लिहिणारी उग्र किंवा मातृदेवता मानली जाते. या परिवर्तनामुळेच एका शांत आणि सात्त्विक देवतेच्या समोर कोंबड्या-बोकड्यांचा बळी देण्यासारखी उग्र लोकप्रथा सुरू झाली, जी मूळ सरस्वती पूजनात कधीही नसते. 


या अशा अनेक मूर्ती या निमिताने आठवत राहतात.ज्या मूळ रूपाने नाही तर शेंदूर प्रक्रियाने हरवल्या होतात.


१.नागपूर जवळील रामटेक टेकडी ही प्राचीन काळी 'रामगिरी' म्हणून ओळखली जात असे.येथल्या राजसी केवळ नरसिंहानेदेखील अनेक काळ शेंदुराच्या घुसमाटाखाली काढले.तो नरसिंह ना जाणे किती शतके वाट पाहत होता.डॉ. अ. प्र. जामखेडकर या संशोधकाने त्याला अखेर जगासमोर पुन्हा नव्याने येण्याची संधी दिली .




 इ.स. ५ व्या शतकात या भागावर वाकाटक घराण्याचे राज्य होते. गुप्त साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त द्वितीय (विक्रमादित्य) यांची कन्या प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक नरेश रुद्रसेन दुसरा याच्याशी झाला होता. प्रभावती गुप्त ही अत्यंत कर्तबगार आणि विष्णूची परम भक्त (परमवैष्णव) होती. तिने तिच्या शासनकाळात (इ.स. ४२० ते ४५० दरम्यान) रामगिरीवर विष्णूच्या विविध अवतारांची मंदिरे उभारली, ज्यामध्ये केवल नृसिंह मंदिराचा समावेश होता.परंतु, मध्ययुगानंतर राजकीय स्थित्यंतरे आणि आक्रमणांमुळे ही मंदिरे मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित झाली. स्थानिक लोकपरंपरेने या वास्तू जतन केल्या, पण देवतेचे मूळ शास्त्रीय रूप काळाच्या ओघात विस्मरणात गेले. नृसिंहाच्या या मूर्तीचे उग्र रूप आणि त्यावर वर्षानुवर्षे चढवले जाणारे शेंदुराचे जाड थर यामुळे स्थानिक लोक तिला 'हनुमान मूर्ती' मानून तिची पूजा करू लागले.


१९८१-१९८३ च्या दरम्यान, पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आणि इतिहासकार डॉ. अ. प्र. जामखेडकर तसेच कला अभ्यासक हान्स बेकर यांच्या संशोधनादरम्यान या मंदिराच्या वैज्ञानिक जतनाचे काम हाती घेण्यात आले.शेंदूर कवच उतरवणे: जेव्हा मूर्तीवरील शेंदुराचे शेकडो वर्षांचे जाड लेप अत्यंत काळजीपूर्वक, शास्त्रीय आणि रासायनिक प्रक्रियेने काढण्यात आले, तेव्हा हनुमान समजली जाणारी मूर्ती प्रत्यक्षात काळ्या पाषाणातील अत्यंत भव्य आणि देखणी केवल नृसिंहाची द्विभुज मूर्ती असल्याचे उघड झाले. या मूर्तीच्या एका हातात 'प्रयोग चक्र' उभे धरलेले सुदर्शन चक्र स्पष्टपणे दिसले, जे वाकाटक काळातील वैष्णव शिल्पकलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.


या जतन प्रक्रियेदरम्यान केवळ मूर्तीच उघड झाली नाही, तर मंदिराच्या मंडपाच्या आतील भिंतीवर शेंदूर आणि मातीच्या थराखाली लपलेला १५ ओळींचा संस्कृत भाषेतील आणि उत्तर-ब्राह्मी किंवा गुप्त ब्राह्मी लिपीतील शिलालेख प्रकाशात आला.

शिलालेखाचे ऐतिहासिक महत्त्व आणि संदर्भाची पुष्टीहा शिलालेख इतिहासकारांसाठी एक सुवर्णखजिना ठरला, कारण त्याने अनेक ऐतिहासिक रहस्यांवरून पडदा उचलला.या शिलालेखात गुप्त सम्राट चंद्रगुप्त (द्वितीय) आणि वाकाटक राजघराण्याची अधिकृत वंशावळी आणि त्यांच्यातील वैवाहिक संबंधांची सविस्तर नोंद आढळली. प्रभावती गुप्त यांच्या एका अज्ञात कन्येने (अतिभवती) तिच्या आईच्या स्मरणार्थ हे मंदिर आणि 'कदलीवाटक' नावाच्या गावाजवळ पाण्याचा जलाशय बांधल्याचा उल्लेख यात आहे. यावरून मंदिराचा निर्मिती काळ इ. स. ४२० ते ४५० दरम्यानचा असल्याचे तंतोतंत सिद्ध झाले.राजकीय संघर्षाचा पुरावा: इतिहासकारांच्या मते, या शिलालेखात प्रभावती गुप्त यांच्या मुलीचा विवाह तिचा मामा घटोत्कचगुप्त जो माळव्याचा गुप्त राज्यपाल होता याच्याशी झाल्याचा आणि नंतर गुप्त साम्राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा अत्यंत महत्त्वाचा संदर्भ मिळतो.


२.नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सह्याद्रीच्या सात शिखरांच्या कुशीत वसलेले श्री सप्तशृंगी देवी शेंदूर निघाल्यामुळे मूर्तीचा बटबटीतपणा पूर्णपणे नाहीसा झाला असून, देवीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता, मंद स्मित आणि अतीव सात्त्विकता दिसून येते. गडावर येणारा प्रत्येक भक्त मातेचे हे रूप पाहून स्वतःचे भान हरपून बसतो.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ मानले जाते.सप्टेंबर २०२२ मध्ये पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासनाने केलेल्या ऐतिहासिक संवर्धन प्रक्रियेत, या स्वयंभू मूर्तीवरील तब्बल २ हजार किलो वजनाचा शेंदूर लेप अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला, ज्यामुळे आदिमायेचे अतिप्राचीन व विलोभनीय रूप प्रकाशात आले .



थेट जिवंत पाषाणात कोरलेली ही भव्य मूर्ती सुमारे १० फूट उंचीची असून ती अठरा हातांची -अष्टादशभुजा आहे, ज्यामध्ये चक्र, त्रिशूळ, शंख आणि धनुष्य-बाण यांसारखी विविध आयुधे अत्यंत बारीक कोरीवकामासह स्पष्ट दिसू लागली आहेत. शेंदूर निघाल्यानंतर मातेचे विशाल आणि तीक्ष्ण नेत्र थेट भक्तांच्या रोखाने सरळ समोर पाहत असल्याचे उघड झाले, ज्यामध्ये एकाच वेळी दुष्टांचा संहार करण्याचे सामर्थ्य आणि भक्तांसाठीची वात्सल्यपूर्ण करुणा जाणवते. देवीच्या मुखमंडलावरील अलौकिक शांतता, मंद स्मित, कानांतील कुंडले आणि गळ्यातील हार पाषाणावर इतके सुंदर कोरलेले दिसतात की, सभोवतालच्या धुक्या आणि दरीच्या अथांग निसर्गसौंदर्यात गाभाऱ्यात उभी असलेली ही जगदंबा पाहणे भक्तांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव ठरतो.इ.स. १७६८ मध्ये पेशवे काळात देवीचा खोळ नैसर्गिकरीत्या पडल्याची ऐतिहासिक नोंद आहे


३. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मूर्तीवरील दुरुस्ती व जतन प्रक्रियेदरम्यान सुमारे ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काळजीपूर्वक काढण्यात आला. जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण झालेल्या या प्रक्रियेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या काळापासून पूजली जाणारी, अंदाजे १५ व्या शतकातील अत्यंत मनोहारी चतुर्भुज मूर्ती तिच्या मूळ दगडी सिंहासनासह प्रकट झाली.श्री जयति गजानन मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. चतुर्भुज पैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसर्‍या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली असून, उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मासनाची बैठक आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत.




४.उंटाडे मारुती मंदिर हे रास्ता पेठेतील सुमारे 350 वर्षांहून अधिक पुरातन देवस्थान आहे. सरदार रास्ते हे पेशव्यांचे सेनाप्रमुख होते. त्यांच्याकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे उंट येथे बांधले जात. त्यामुळे याला “उंटाडे मारुती’ असे नाव देण्यात आले. सन 1908 साली सरदार श्रीनिवास मुदलीयार यांनी त्यांची जागा केईएम हॉस्पिटलला दिली. त्याचबरोबर या देवस्थानाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे.शेंदूर काढल्यानंतर यातून सुमारे 7 पोती शेंदूर लेपन जमा झाले आहे. यामुळे काळ्या पाषाणातील देखणी, सुबक मूर्ती दिसत आहे. या मूर्तीचा मानवी चेहरा आहे. तर मारुतीच्या डोक्‍यावरील मुकूट कमलपुष्पाप्रमाणे आहे. उजवा हात आशीर्वादपर असून, डाव्या हातात गदा आहे. दोन्ही पायांमध्ये झोपलेला कली असल्याचे धोंडफळे यांनी सांगितले.




 ५.महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांमधील मूर्तींवरही दर अनेक वर्षांनी शेंदूर कवच नैसर्गिकरीत्या गळण्याची किंवा ते शास्त्रोक्त पद्धतीने काढण्याची परंपरा आहे. या प्रक्रियेला धार्मिक परिभाषेत 'खोळ उतरणे' असे म्हणतात. शेंदूर काढल्याने मूर्तीचा मूळ पाषाण दीर्घकाळ सुरक्षित राहतो आणि मूर्तीचा आकार मूळ रचनेनुसार पूर्ववत स्पष्ट होतो.


मूर्तीला शेंदूर लावण्यामागे धार्मिक आणि व्यावहारिक अशी दोन्ही कारणे आहेत.धार्मिक मान्यतेनुसार, लाल किंवा नारिंगी शेंदूर हा ऊर्जा, पराक्रम आणि रजोगुणाचे प्रतीक मानला जातो, तसेच रामायणातील कथेनुसार प्रभू रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानजींनी आपल्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावला होता, म्हणूनच मारुती, गणपती आणि भैरवनाथ यांसारख्या देवतांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून, जुन्या काळात मूर्तीचा पाषाण ऊन, वारा आणि पाण्यापासून खराब होऊ नये म्हणून त्यावर तेल-शेंदूराचे लेपन केले जायचे, जे एका नैसर्गिक वॉटरप्रूफ कोटसारखे काम करायचे. हा शेंदूर प्रामुख्याने दोन पद्धतींनी तयार केला जातो, ज्यातील पहिल्या नैसर्गिक पद्धतीमध्ये 'शेंदरी' नावाच्या झाडाच्या फळांच्या बियांपासून किंवा हळद, चुना आणि विशिष्ट प्रमाणात पारा एकत्र करून पारंपरिक शेंदूर बनवला जातो. तर दुसऱ्या व्यावसायिक किंवा रासायनिक पद्धतीमध्ये शिशाचे ऑक्साईड -Lead Oxide वापरून आधुनिक नारिंगी शेंदूर तयार केला जातो.

 -भक्ती 

संदर्भ -

https://www.loksatta.com/aurangabad/dharashiv-mankeshwar-temple-satwai-goddess-idol-saraswati-archaeology-rnb-99-6153985/

https://sanatanprabhat.org/marathi/992852.html

https://www.prahaar.in/2026/01/01/repair-of-the-vermilion-shell-on-the-kasba-ganpati-idol/

https://pilgrimdata.in/temple/keval-nrsinh-rudra-nrsinh-temple-mahakavi-kalidas-smarak-ramtek-tekadi-ta-ramtek-dist-nagpur/

https://www.dainikprabhat.com/untade-maruti-appeared-in-its-original-form-after-350-years

Sunday, September 13, 2026

वातापी गणपती


वातापी गणपती 


कर्नाटकातील बदामी प्राचीन काळातील वातापी. लालसर-तपकिरी वाळूच्या खडकांनी वेढलेली ही नगरी दख्खनच्या इतिहासात केवळ एक प्राचीन राजधानी म्हणून नव्हे, तर स्थापत्य, शिल्पकला, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांचा एक अद्भुत संगम म्हणून उभी आहे. 



 

बदामी लेणी क्रमांक 1 शिल्पसमूहाकडे पाहताना जवळच दिसणाऱ्या गणेशाच्या उपस्थितीमुळे दृश्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते. पित्याचे नृत्य पाहणारा पुत्रही कल्पना मनात घेतली की या शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘बाबा नाचत आहेत,मग आपणही नाचू शकतो का?’ अशी बालसुलभ उत्सुकता जणू या दृश्यातून जाणवते. अर्थात, ही शिल्पावर आधारित रसात्मक व्याख्या आहे. प्राचीन शिलालेख किंवा ग्रंथातून सिद्ध झालेली कथा म्हणून ती मांडलेली नाही . पण शिल्पाचा भावार्थ समजून घेण्यासाठी ती नक्कीच मोहक आहे.छोटा बालगणेश शिव नटराजप्रमाणे हाताची मुद्रा करत आहे.बालकांच्या ठायी उत्सुकतापूर्ण अनुकरण हा शिल्पात दाखवले आहे 

तर रावलफडी मधला बाळगणेश लाडू /मोदक पात्र हाती घेऊन खाण्याच्या मुद्रेत आहे.



बदामी या शिल्पवैभवाची आठवण झाली की पुढे येते ती एका दुसऱ्याच गणपतीची कथा वातापी गणपतीची.

‘वातापी गणपतिं भजेहम्’ हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना अपरिचित नाही. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुथुस्वामी दीक्षितरांनी रचलेली ही संस्कृत कृती तामिळनाडूतील तिरुवारूर जिल्ह्यातील तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपतीला समर्पित आहे. हंसध्वनी रागातील ही रचना आज कर्नाटकी संगीताच्या मैफलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

अशी आख्यायिका आहे की, गजमुखसुराला मारल्याच्या पापाबद्दल गणपतीने येथे शिवाची पूजा केली . गजमुखसुराला शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि त्याने मातंगपुरम येथील आपल्या स्वनिर्मित राजधानीतून मानवांना अतोनात दुःख दिले होते.

हत्तीने गणपती देवाचा सामना केला आणि आपल्या तुटलेल्या उजव्या सुळ्याने त्या राक्षसाचा पराभव केला. असे मानले जाते की, त्या राक्षसाने सांडलेल्या रक्तामुळे येथील जमीन लाल झाली आणि म्हणूनच तमिळमध्ये या जागेला 'तिरुचेनकाट्टनकुडी' असे नाव पडले . जरी येथील मुख्य देवता शिव असले तरी, गणपतीलाच प्रथम सन्मानाचे स्थान दिले जाते.

वातापी गणपतीची मूर्ती बदामीहून तिरुचेंकाट्टनकुडी येथे कशी पोहोचली, याभोवती एक प्रसिद्ध मौखिक परंपरा आहे. 

बदामी किल्ला परिसरातील ‘लोअर शिवालय’ हे सातव्या शतकातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.आज जरी शिवालय ओळखले जाते तरी इथे पल्लव आक्रमणाआधीएक गणेश मूर्ती होती, होय तीच प्रसिद्ध 'वातापी गणपती '!!



इ.स. ६४२ च्या सुमारास पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याने चालुक्यांची राजधानी वातापीवर विजय मिळवला. त्याचा सेनापती परंज्योती याने युद्धानंतर वातापी येथून गणपतीची मूर्ती आणली आणि आपल्या जन्मभूमीत तिची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. पुढे हाच परंज्योती ‘सिरुत्तोंडर’ या नावाने शैव नायनार संतपरंपरेत प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे.

मात्र इतिहास आणि आख्यायिका यांची सरमिसळ होऊ नये. परंज्योतीने वातापीतून हीच गणपतीची मूर्ती आणली, याला ठोस समकालीन लिखित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा ‘मौखिक परंपरेनुसार’ किंवा ‘स्थानिक आख्यायिकेनुसार’ अशीच मांडणे अधिक शास्त्रीय ठरेल.



तिरुचेंकाट्टनकुडीतील उत्तरापतिश्वरस्वामी मंदिराशी वातापी गणपतीची परंपरा जोडलेली आहे. या मंदिरसमूहात गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी-मस्तक असलेले रूपही आढळते. त्यामुळे गणपतीच्या प्रतिमाविश्वातील विविधता आणि स्थानिक धार्मिक परंपरांचे परस्पर संबंधही येथे अभ्यासता येते.

दगडात कोरलेला नटराज, त्याच्या सान्निध्यातला गणेश आणि दूर तामिळनाडूत आजही घुमणारा ‘वातापी गणपतिम्’चा स्वर या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे वातापी.

वातापी म्हणजे आजचे बदामी.ते दख्खनच्या स्मृतीत कोरलेले एक जिवंत सांस्कृतिक पर्व!!

‘वातापि गणपतिं भजेहम्’ ही मुथुस्वामी दीक्षितरांची संस्कृत कृती असून ती हंसध्वनी रागात रचलेली आहे. 

वातापि गणपतिं भजेहम्

वातापि गणपतिं भजेहम् ।

वरणास्यं वरप्रदं श्रीम् ॥

मी वातापीच्या गणपतीचे भक्तिभावाने स्मरण व भजन करतो.सुंदर, विशाल मुख असलेल्या, भक्तांना वरदान देणाऱ्या त्या मंगलमूर्तीची मी उपासना करतो.


भूतादि संसेवित चरणम् ।

भूत-भौतिक-प्रपञ्च-भरणम् ।

वीतरागिणं विनुतयोगिनम् ।

विश्वकारणम् ॥

ज्यांच्या चरणांची पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीतील शक्ती उपासना करतात,जे या संपूर्ण भौतिक विश्वाचे पालन-पोषण करतात,जे आसक्तीपासून मुक्त आहेत आणि योगिजन ज्यांची स्तुती करतात,त्या गणेशाला मी वंदन करतो.जो या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वामागील कारणस्वरूप आहे.


पुरा कुम्भ-सम्भव मुनिवर

प्रपूजितं त्रिकोण-मध्यगतम् ।

मुरारि-प्रमुखाद्युपासितम् ।

मूलाधार-क्षेत्रस्थितम् ॥

ज्यांची पूर्वी अगस्त्य ऋषींनी भक्तिभावाने पूजा केली,जे त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान आहेत,ज्यांची विष्णूसह श्रेष्ठ देवताही उपासना करतात,आणि जे योगशास्त्रातील मूलाधारचक्रात अधिष्ठित आहेत,त्या गणपतीला मी नमन करतो.


परादि चत्वारि वागात्मकं ।

प्रणवस्वरूपं वक्रतुण्डम् ।

निरन्तरं निटिल-चन्द्रखण्डम् ।

निज-वामकर-विधृत-इक्षुदण्डम् ॥


जे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्थांचे स्वरूप आहेत,जे पवित्र ॐकाराचे मूर्त स्वरूप आहेत,ज्यांची सोंड वक्र आहे,ज्यांच्या कपाळावर चंद्रकोरी शोभते,आणि ज्यांच्या डाव्या हातात ऊसाचा दंड आहे.अशा वक्रतुण्ड गणपतीला मी वंदन करतो.


करंबुज पाश बिजापुरं 

कलुषविदुरं भूतकरं हरादी 

गुरुगुहा तोषिता बिंबं 

हमसाध्वनी भूषित हेरंबम ।।५।।

आपल्या कमळधारी हातांमध्ये तो फास आणि लिंबू फळ धारण करतो. तो सर्व अशुद्धतेपासून दूर, सर्व जीवांचे साक्षात स्वरूप आहे. त्याची तेजस्वी प्रतिमा हर (शिव), इतर आणि गुरुगुह (स्कंद) यांना आनंदित करते. तो हेरंबा (दुर्बळांचा रक्षक) असून, हंसध्वनीच्या सुरावटीने अलंकृत आहे.

या स्तोत्रात गणपती केवळ विघ्नहर्ता किंवा वरदायक देवता म्हणून येत नाही. दीक्षितर गणपतीला विश्वाच्या मूलतत्त्वाशी जोडतात. मूलाधारचक्र, ॐकार, वाणीच्या चार अवस्था, पंचमहाभूते आणि विश्वाचे कारण या संकल्पनांमधून गणपतीचे एक अत्यंत व्यापक, तात्त्विक आणि योगपरंपरेशी संबंधित रूप उभे राहते.

म्हणून ‘वातापी गणपतिं भजेहम्’चा भाव केवळ “हे गणपती, माझे विघ्न दूर कर” इतकाच नाही. तो अधिक खोल आहे

“हे वातापी गणपती, तू विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आहेस, वाणीचे आणि प्रणवाचे स्वरूप आहेस; योगी आणि देवताही तुझी उपासना करतात. त्या विश्वव्यापी, मंगलमय गणेशाला मी भक्तिभावाने वंदन करतो.”


राग: हंसध्वनी 

ताल: आदि ताल 

रचनाकार: मुथुस्वामी दीक्षितर

कालखंड: इ.स. १७७५–१८३५; त्यांचा जन्म २४ मार्च १७७५ रोजी झाला आणि निधन २१ ऑक्टोबर १८३५ रोजी झाले. 

भाषा: संस्कृत

देवता: तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपती

परंपरा: कर्नाटक संगीताच्या मैफलीची सुरुवात गणपतीच्या मंगलस्मरणाने करण्यासाठी ही कृती विशेष लोकप्रिय आहे. 

विशेष म्हणजे हंसध्वनी रागाची निर्मिती मुथुस्वामी दीक्षितरांनी केलेली नाही. हा राग त्यांच्या वडिलांना, रामस्वामी दीक्षितरांना, श्रेय दिला जातो. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या रागात मुलाने गणपतीची ही अजरामर कृती रचली, हा संगीतपरंपरेतील सुंदर योग आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘वातापि गणपतिम्’च्या शेवटच्या भागात हंसध्वनीचा उल्लेख येतो, त्यामुळे ही कृती कोणत्या रागात गायची याचाही संकेत रचनेतच मिळतो. 

“वातापीच्या कातळांमध्ये कोरलेली गणपतीची स्मृती पुढे मुथुस्वामी दीक्षितरांच्या ‘वातापि गणपतिम्’मधून स्वररूपाने अमर झाली.आणि त्या स्वरांना लाभला हंसध्वनीचा मंगल नाद.”

-भक्ती 

Friday, September 11, 2026

अष्टमहाभय अवलोकितेश्वर

 #badami बदामीतील अनवट वाटेवरील अष्टमहाभय अवलोकितेश्वर




बदामी म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती चालुक्यकालीन शैव आणि वैष्णव लेणी, त्यांच्या भव्य देवप्रतिमा आणि खडकात कोरलेले स्थापत्य. मात्र याच बदामीच्या कलाविश्वात एक वेगळी आणि तुलनेने अनवट वाट दाखविणारी बौद्ध प्रतिमा आढळते. बदामी लेणी क्रमांक ३ मधील या शिल्पाची ओळख काही कला-इतिहास अभ्यासकांनी अष्टमहाभय अवलोकितेश्वराशी जोडली आहे. या ओळखीचा उल्लेख De Mallmann यांच्या अभ्यासाच्या संदर्भात आढळतो. त्यामुळे या प्रतिमेकडे बदामीच्या प्रामुख्याने प्रतिमाविश्वाच्या चौकटीबाहेर डोकावणाऱ्या महत्त्वपूर्ण शिल्परूप म्हणून पाहता येते.


अवलोकितेश्वर हा महायान बौद्ध परंपरेतील करुणेचा बोधिसत्त्व मानला जातो. संकटात सापडलेल्या भक्ताचे रक्षण करणारा, त्याच्या हाकेला प्रतिसाद देणारा आणि भयातून मुक्त करणारा असा त्याचा स्वरूपविचार विकसित झाला. ‘अष्टमहाभय’ म्हणजे भक्ताला किंवा प्रवाशाला भेडसावणारी आठ महान संकटे. या संकटांपासून रक्षण करणारा अवलोकितेश्वर हा या प्रतिमाविषयाचा केंद्रबिंदू आहे.


पश्चिम दख्खनातील बौद्ध लेण्यांमध्ये अवलोकितेश्वराच्या ‘संकटमोचक’ किंवा ‘रक्षक’ स्वरूपाची अनेक उदाहरणे आढळतात. अजिंठा, कान्हेरी, संभाजीनगर आणि वेरूळ येथील विविध प्रतिमांमधून या संकल्पनेचा विकास दिसून येतो. उपलब्ध अभ्यासानुसार अजिंठ्यात अवलोकितेश्वराच्या संरक्षणरूपाची अनेक उदाहरणे, कान्हेरीत तीन, औरंगाबाद लेणी ७ मध्ये एक आणि वेरूळमध्ये दोन उदाहरणे नोंदली गेली आहेत.


यांपैकी संभाजीनगर  (औरंगाबाद )लेणी क्रमांक ७ हे तुलनेसाठी विशेष महत्त्वाचे उदाहरण आहे. तेथे मध्यभागी उभा अवलोकितेश्वर असून त्याच्या दोन्ही बाजूंना आठ संकटांची स्वतंत्र लघुदृश्ये कोरलेली आहेत. एका बाजूला अग्नी, दरोडेखोर, बंधन किंवा गुलामी आणि जलसंकट, तर दुसऱ्या बाजूला सिंह, सर्प, हत्ती आणि यक्षिणी/राक्षसीपासून होणारे संकट अशी मांडणी केली आहे. प्रत्येक प्रसंगात संकटात सापडलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवलोकितेश्वराचे लघुरूप येताना दाखविले आहे.


बदामीतील प्रतिमा मात्र मोठ्या प्रमाणात झिजलेली आणि अस्पष्ट असल्यामुळे औरंगाबादच्या उदाहरणाप्रमाणे तिच्या भोवतीची प्रत्येक लघुदृश्ये निश्चितपणे कोणत्या महाभयाचे प्रतिनिधित्व करतात, असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. छायाचित्रात मध्यवर्ती उभी आकृती आणि तिच्या दोन्ही बाजूंना लहान मानवी व कथात्मक आकृत्यांची रचना जाणवते. त्यामुळे ‘अष्टमहाभय अवलोकितेश्वर’ ही विद्वत्तापूर्ण ओळख लक्षात घेऊन, प्रत्यक्ष दृश्य पुराव्याच्या आधारे सावधपणे अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल.


यामुळे बदामीतील हे शिल्प विशेष ठरते. एकीकडे बदामी चालुक्यांच्या शैव-वैष्णव कलापरंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे, तर दुसरीकडे त्याच परिसरात महायान बौद्ध प्रतिमेची शक्यतादर्शक उपस्थिती दिसते. ही प्रतिमा तत्कालीन दख्खनमधील धार्मिक परंपरांमधील संपर्क, कलात्मक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक सहअस्तित्व समजून घेण्यासाठी एक वेगळी खिडकी उघडते.

Wednesday, August 26, 2026

ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा

 #



ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा


आज ओनमचा सण. केरळच्या सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत जिव्हाळ्याने जपला गेलेला हा दिवस म्हणजे केवळ उत्सव, फुलांची सजावट आणि सणभोजन यापुरता मर्यादित नाही. या दिवसामागे आहे राजा महाबलीची कथा हि दान, समता, प्रजाप्रेम आणि शब्दाला जागणाऱ्या राजाची कथा.


या चित्रात दिसणारे शिल्प विष्णूच्या त्रिविक्रम अवताराशी संबंधित आहे. कथेनुसार महाबली हा पराक्रमी आणि उदार असुरराजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि दानधर्माला विशेष महत्त्व होते. महाबलीच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देव चिंतित झाले. तेव्हा विष्णूंनी वामनाचे एका लहान ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून महाबलीकडे दान मागितले.


वामनाने राजाकडे फक्त तीन पावलांची जमीन मागितली. इतकी छोटी मागणी ऐकून महाबलीने ती सहज मान्य केली. पण दानाचा संकल्प होताच वामनाने विराट रूप धारण केलेतोच त्रिविक्रम एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नाही.


महाबलीने मग स्वतःचे मस्तक पुढे केले.


हा प्रसंग पराभवाचा नसून समर्पणाचा आहे. महाबलीकडे सत्ता होती, संपत्ती होती, सामर्थ्य होते; पण त्याहून मोठी गोष्ट त्याच्याकडे होती.दिलेला शब्द पाळण्याची तयारी. स्वतःचे सर्वस्व गमावण्याची वेळ आली तरी त्याने दानातून मागे हटणे स्वीकारले नाही.


ओनमच्या कथेत पुढे असे सांगितले जाते की महाबलीला त्याच्या प्रजेशी असलेल्या प्रेमामुळे वर्षातून एकदा आपल्या राज्यात येण्याची संधी मिळाली. म्हणूनच ओनम हा राजा महाबलीच्या स्वागताचा उत्सव मानला जातो. लोक आपल्या घरांची सजावट करतात, फुलांच्या रांगोळ्या पूक्कळम काढतात आणि आनंदाने त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करतात.


या शिल्पाकडे आज, ओनमच्या दिवशी पाहताना, त्यातील प्रसंगाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. येथे केवळ विष्णूचा विराट त्रिविक्रम दिसत नाही,तर त्याच्यासमोर उभा राहून स्वतःचे मस्तक अर्पण करणारा महाबलीही दिसतो. एका बाजूला दैवी विराटता आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी मूल्यांची विराटता.


ओनम आपल्याला महाबलीची आठवण करून देतो अशा राजाची, ज्याचे वैभव त्याच्या सिंहासनात नव्हते, तर त्याच्या दानशूरतेत आणि प्रजेवरील प्रेमात होते.


आजच्या या ओनम पर्वावर, या शिल्पातील बळी-त्रिविक्रम प्रसंगाकडे पाहताना एकच विचार मनात येत


सत्ता क्षणभंगुर असते पण दिलेला शब्द, उदारता आणि लोकांच्या मनात मिळवलेले स्थान अमर असते.


सर्वांना ओनमच्या हार्दिक शुभेच्छा!

ഓണം ആശംസകൾ!


शिल्पशास्त्र -६ वे शतक इ.स.त्रिविक्रम, अष्टभुज (आठ हात असलेला), आपल्या उजव्या पायावर उभा आहे आणि त्याने आपला डावा पाय खांद्यापर्यंत वर उचलला आहे. नमुची अत्यंत आदराने त्याचा उजवा पाय धरून आहे, तो सांगत आहे की दान वामन रुपाला आहे या त्रिविक्रम रूपाला नाही.देवाचे अथांग रूप पाहून थक्क झालेला एक असुर हातात खड्ग घेऊन त्याच्या उजवीकडे उभा आहे. देवाच्या डाव्या बाजूला, त्याच्या वर उचललेल्या पायाच्या खाली वामन हातात छत्री घेऊन उभा आहे, आणि राजा बलीकडून मिळणारे दान स्वीकारत आहे. बलीसोबत त्याची पत्नी आणि गुरू शुक्राचार्य आहेत, जे बलीच्या वतीने कमंडलूतून पाणी ओतण्याच्या क्रियेत दाखवले आहेत. या दृश्याच्या वर, देवाने ज्या वेगाने आपला पाय वर उचलला आहे, त्या वेगाने एक राक्षस हवेत फेकला गेला आहे. डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात एक हसरा चेहरा दाखवला आहे. देवाच्या वर उचललेल्या पायाच्या वर दोन आकृत्या हवेत उडताना दिसत आहेत. एकाचा चेहरा अस्वलासारखा आहे, जो स्पष्टपणे जांबुवंताचे प्रतिनिधित्व करतो आणि दुसरी आकृती गरुडाची आहे. हे दोघेही देवाने केलेल्या या अद्भूत पराक्रमाची स्तुती करत आहेत.

त्रिविक्रमाच्या हातात खड्ग (तलवार), गदा, बाण, चक्र, शंख (हा उचललेल्या पायाला समांतर धरलेला आहे), खेटक (ढाल) आणि धनुष्य.

------------------------------