Friday, September 29, 2023

ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे पुस्तक परिचय

 

सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत  मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.



अनुक्रमणिका पाहता,चार विविध विषय क्षेत्रातील संस्कृती,दैवत , आस्थेची स्थाने,लोकमान्यता असलेले श्रद्धा विषयांचे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. पहिल्या भागातील लेखांत महाराष्ट्र आणि जवळील राज्यातील माहित नसलेल्या व माहिती असलेल्या ‘गुरु’  परंपरेविषयी समजते.दुसऱ्या भागात स्त्री देवता माहिती वाचायला मिळते.यातील सीता,उमा राधा यांचे निराळे पैलू समोर येतात.राधा या लेखात राधा नाचवणे या परंपरेपासून तमाशा पर्यंतचा प्रवास वाचण्यासारखा आहे.कालिदासरचित  नायिका शकुंतला,यक्ष प्रिया,अनुसया मृछाकटीकम ची नायिका वसंतसेना ,गीतगोविन्दम रचना जयदेव या अभिजात साहित्याची रसाळ वर्णने लेखांत आहे.

संत चक्रपाणी यांवर रा .ची  यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलेच आहे ,पण एका गुजराती मनुष्याचा महाराष्ट्रात संत चक्रपाणि आणि महानुभाव पंथाचा उगम वाढ यात अनेक नवीन माहिती दाखवतो.शैव पंथाविषयी अनेक गोष्टी विविध लेखात विस्तृत मांडली आहे.जय गंगे जय भागीरथी या लेखात एक शिव भक्तीची उगम गंगा आणि एक कृष्णसावळी यमुना यांचा संगम ,कुंभयात्रेसाठीचे महत्व वाचनीय आहे.विंचू चावला लेखात संत एकनाथ यांच्या साहित्याने भारुड ही देणगी जनमानसाला दिली.लंकेची पार्वती हा शब्द अपभ्रंश आहे  ‘लंजा पार्वती’ ‘,लज्जागौरी’ म्हणजेच ‘अनावृत्त जगन्माता’ याचा गंधही सामन्यांना नसेल.निषाद या आदिम जमातींची मनोरंजक तितकीच विश्वसनीय माहिती वाचताना त्यांनी प्रथम नांगर वापरले तसेच अनेक शब्द संस्कृत भाषेला प्रदान केले.वीस अंक निषादसाठी महत्वाचा त्यांनीच अठरा वीसे म्हणजे १८*२०=३६० असे वर्षाचे दिवस मोजले पण अपभ्रंश झाला ‘अठरा विश्वे’ सदाकाळ या अर्थानेच.आदित्य राणूबाई सौराष्ट्र ,काश्मीर,राजस्थान ,नेमाड ,महाराष्ट्र अशा अनेक भागांत सुर्योपासक गटाची माहिती देतेच .तर हिचे मूळ इराणचे राज्ञई (रानी)याच्याशी निगडीत आहे.इराण मधील सुर्योपासक सूर्यच्या राण्या रशन आणि  नर्शेफ नावावरून भारतात झाल्या राज्ञई आणि निक्षुभा.

असे अनेक धर्मोइतिहात्मक संशोधांवर आधारलेले लेख वाचत राहणे या पुस्तका निमित्ताने पर्वणीच आहेत.

रा.चि.ढेरे या उपासकांचे तत्त्वज्ञान ,संस्कृतीचे  महान  कार्य पाहून मी थक्क झाले.

-भक्ती