Friday, May 13, 2022

मेथांबा

 


मेथांबा

कैरी म्हणजे माझ पाहिलं प्रेमच आहे .लहानपणी अशा तिखट मीठ लावून कैरी खायचे की समोर बघणाऱ्याचेच दात आंबायाचे.आता तर कलमी आंब्याच्या कैऱ्या अजिबात आंबट नसतात तेव्हा छान आंबट गोड लागतात.अगदी दुकानदार सुट्ट्या पैशांऐवजी  कच्चा आंब चोकलेट(गोळी) द्यायचा ती पण मलाच दिली जायची ;)

 कैरीच लोणचे घातलं की आई बरणी लपवून ठेवायची ,नाहीतर कधी फडशा पडेल सांगता येत नसे.सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही पण माझ्यासाठे एक बरणी राखीव असते .

साखर आंबा ,गुळांबा एवढा नाही आवडत.पण आता दिवेकरबाई डायटवाल्या यांनी सांगितल्या प्रमाणे गोड खाण्याची इच्छा झाल्यास गुळांबा हा सर्वात योग्य पर्याय आहे,कारण गुळाचे लोह तत्व शरीरास मिळते.

कैरी किसून ,फोडी करून झटपट लोणची करता येतात.त्यातलाच मेथांबा हा एक सुंदर झटपट होणारा प्रकार आहे.

हा मेथांबा कैरीची साल काढून फोडणी देऊन करतात.पण मला जास्त उकडलेल्या कैरीचा आवडतो.फायदा असा कि पन्ह करण्यासाठी कैरी उकडून ठेवल्यावर दोन एक कैऱ्यावापरून कधीही मेथांबा करता येतो.मेथ्या ह्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.तशाही मेथ्या कमीच खाल्या जातात.

आंबट गोड आणि त्यात मेथ्यांचाचा किंचित वेगळा स्वाद बराच काळ जिभेवर रेंगाळत राहतो.


साहित्य:

दोन उकडलेल्या कैरी

१ कप गुळ

१ चमचा मेथ्या

१ चमचे जिरे

१/२ चमचा मोहरी

१/२ चमचा हळद आणि हिंग

फोडणीसाठी तेल

तिखट मीठ आवडीनुसार –मेथांबा हा प्रकार तिखट अधिक छान लागतो.

उगाच कांदा,लसूण हे प्रकार कैरी बरोबर अजिबात आवडतं नाही.कैरीच्या स्वादाचा स्वत:चाच एक तोरा असतो J

कृती

उकडेल्या कैरीचा गर काढावा.सुरीने त्याचे तुकडे करावे.गर smash करू नये.फोडणीसाठी कढईत तेल घ्यावे .तेल गरम झाल्यावर जिरे ,मोहरी, हळद,हिंग घालावे.या सगळ्यांनी तडमताशा करत हळद लावून हिंगाचा अत्तर उधळल की मेथ्या त्यात टाकाव्यात gas मंद करावा.मेथ्या जळू नये याची काळजी घ्यावी.

आता उकडलेल्या  कैरीच्या फोडी त्यात टाकाव्यात.एक वाफ येऊ द्यावी.आता त्यात किसलेला गुळ घालावा .गुळ जसा हळू हळू एक जीव होता आणि पदार्थाचा रंग बदलू लागतो ते मोहक वाटत.आवडीनुसार तिखट टाकावे.मीठ टाकावे.

पुन्हा एक चांगली वाफ येऊ द्यावी,कैऱ्या उकडलेल्या असल्यामुळे अगदी कमी वेळ वाफ द्यावी.पाण्याची तर अजिबात गरज नाही.बरेच दिवस हा तयार मेथांबा बरणीत टिकवता येतो.तो जसा मुरेल तसा आणखीनच कमाल लागतो.

 

-भक्ती