Saturday, December 25, 2021

शरदोत्सव

 परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते. पावसाने पूर्ण रजा घेतल्यावर आल्हाददायी थंड हवा वाहू लागते.चिखल नाहीसा होऊन जमिनी पायी फिरण्यासाठी योग्य आहेत.नितळ शांतता रमू लागते.शेवंती,झेंडूच्या फुलांनी मोहक चादर सृष्टीला नेसविली असते.नवरात्रीच्या उत्सवात या फुलांनी आणि इतर फुलांनी एक उर्जेची उपासना अधोरेखित होत राहते.

त्यांनतर कोवळ्या थंडीने सजलेल्या दीपावलीच्या सुवासिक पहाट! वर्षातील सर्वात निवांत दिवसांची ,माणिकताईंची गाणी,दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमाचे सुख सारी सारी रेलचेल शरदातीलच . काही फुलं प्रकर्षाने मोहित करत राहतात.कांचन –आपट्याची सुंदर गुलाबी फुलं! तलावातील कमळांची मुक्त बहरण.पितृपाठात अनेक भाज्यांची आवाक अधिक दिसते.

ऑक्टोबर उष्णतेचे दहा –वीस दिवस संपले की पानगळीचा हंगाम लाल पिकलेल्या पानांच्या उन्मळून जमिनीवर पडलेला खच नजरेस दिसतो.माझ्या परदेशातील मैत्रिणीने ऑटम AUTUMN च कौतुक करत मस्त फोटो टाकले होते,तिला गमतीने म्हटलं इकडे ये आणि उंबराची गळलेली पान एक तास झाडून घे मग कळेल खरा ऑटम  असा हा इकडे थकलेला ऋतू भासतो.झाडांच्या काड्या न काड्या पसरून ओक बोक रूप त्यांना शोभत नाही.विरक्त झाडाने पायथ्याशीच आपलं जून रूप त्यागलेले !!

पहाटे धुक्याची चादर अलवार पांघरून सृष्टी गुलाबी झालेली आणि थोड्याच वेळात तिची दवांची मोती माळ पानांवर अलगद उतरते.निळे आकाश आणि पिंजलेले पांढरसे नभ पाहतच राहाव वाटत. ज्वारीची पिक पूर्ण तयार होत ताठ डोलत गोजिरवाणी दिसतात.कुरणांवर चरणाऱ्या गाई तृप्त दिसत आहेत. दिवस मावळतीचे रंग जरा लवकरच ओढून शरद रात्रीना मुक्त उधळण बहाल करतो.ढगांना अजिबात या पटलावर फिरण्यास परवानगी नसते. काळ्या रंगांच्या वस्त्रांवर शुभ्र चांदण खडी ,सौंदर्यात रात राणी मुक्त हसत हसते .कोजागिरीला तिच्या भाळीची गोल चंद्र बिंदी आणि त्याची प्रभावळ सोबत केशर दुधाचे पेले ,गप्पा गाण्यांची मैफिल अजून काय पाहिजे.शांता शेळके यांच “शारद सुंदर”हे गीत ही सगळी हुरहूर ,गुलाबी हवा मादक वातावरण निर्मिती करते.

काही शरद ऋतु वर्णन:

अपाम् उद्वृत्तानां निजम् उपदिशन्त्या स्थितिपदं
दधत्या शालीनाम् अवनतिम् उदारे सति फले।
मयूरानाम् उग्रं विषम् इव हरन्त्या मदम् अहो
कृतः कृत्स्नस्यायं विनय इव लोकस्य शरदा ||

(३.८ मुद्राराक्षस ,विशाखदत्ता)
पाण्याच्या फुगलेल्या प्रवाहाला पुन्हा कक्षेत बांधणारा,भाताच्या पिकांना सहज वाकवणारा,मोराची असीम इच्छा नष्ट करणारा पहा हा शरद ऋतू अजस्त्र गोष्टी शांत करतोय .
या वर्णनातच शरदाला शांत असा शारदेचा वरदहस्त असणारा दाखविला आहे.

अभिव्ऱ्ष्टा महामेघैर्निर्मलाश्चित्रसानवः।
अनुलिप्ता इव आभान्ति गिरयश्चन्द्ररश्मिभिः॥

(वाल्मिकी रामायण)
शरद ऋतूमध्ये पर्वतांची शिखरे मेघांनी मुक्त होत ,चंद्राच्या प्रखर किरणांनी न्हाहून गेली आहेत .
या वर्णनात शारदीय चंद्र रात्रीचे सौंदर्य अधोरेखित होते.
तसेच शरदातील अनेक नद्यांना नव वधुंचे रूपक दिले गेले आहे ,ज्या लाजत मुरडत शांत वाहत आहेत.

़काही पुष्पवैभव-
१.आपटा(कान्चन )





Sunday, November 14, 2021

पारगाव भातोडी -१

 


गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला  कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.

रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या  बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या  बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.

दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण  मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे  जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.

सुंदर प्रवेशद्वार



मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)

प्रदिक्षणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.

 या घाटाची देखभाल केली तर एका  पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.

मनोहरी जळ...



घाटाचा हाही उपयोग ..



 

 

      उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा  एक उत्तम पायंडा दिला आहे.

शरीफराजे समाधीस्थळ



 १६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.

इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”


पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.

पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.

वीरभद्र



  

Tuesday, October 19, 2021

वर्षा ऋतू

 

वर्षा ऋतू

जीवनासाठी आसुसली धरणी माय श्रावणापासून सरी झेलत झेलत भाद्रपदभर तुडूंब काठोकाठ पाण्याच्या आनंदाने बहरून पावते.

शेतातल्या बीजांनी थेंब थेंब रुजून घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा तोंडात सुखाचा घास भरवावा असा हा भारतातला महत्वाचा ऋतू..वर्षा ऋतू!

केरळात वर्षा उर्फ मान्सूनचे आगमन झाले की आपल्या घरी हा कधी येतो यासाठी प्राणी,पक्षी,वृक्ष सगळेच चातक झालेले असतात.आभाळ भरून येत ,गरजत आता सर्वत्र थैमान घालण्याच्या तयारीत असतो.त्याला बरसून बरसून स्वच्छ ,निरभ्र होत फळा कोरा करण्याचा ध्यास लागतो.एखाद्या स्वप्नपरीने स्वप्नात रंग भरावे तस आभाळाला सप्तरंगी इंद्रधनुचे स्वप्न वारंवार पडत असते की नाही.डोंगर कपार्यांतून धबधबे कोसळत निसर्ग नटवतात.कासपठार,ताम्हिणी,आंबोली घाट याकडे सहजच पावलं झेपावू लागतात.



झाडांची हिरवी गर्दी,फुलांचे फळांमध्ये होणारी वृद्धी सुखावते.weed आता हळूहळू कमरे पर्यंत आणि डोक्यापर्यंत ऊंच वाढलेले असतात.एक छोटेसे जंगलच शहरापासून जरासाच दूर वाढलेलं असते.त्यात आता नानाविध फुलांवर रंगबेरंगी फुलपाखरे बागडत असतात.काहींना शेंगा लागायला सुरुवात झालेली असते.







रेडिओवर श्रावणमासी हे आर जे सतत आठवण करून देत असतो आणि मध्येच ‘ताल’ मधलं गाण “दिल ये बैचेन ये” प्ले करतो.मनात महाविद्यालयाच्या काळातला श्रावण ,त्याच्या सोबतचे फेर अस गच्च आभाळ भरून येत आणि मनातला श्रावण देवदासमधल्या पारोच्या “सिलसिला ये चाहत का ना मैने बुजने दिया...आजा रे मोरे पिया”, “काहे सताये आजा ..पिया बसंती रे” अशा असंख्य गाण्याच्या प्लेलिस्टसह डोळ्यांतून झरझर वाहू लागतो.टेबलावर उमटलेला चहाच्या  कपाच्या वर्तुळाकार ठसा मात्र मनात बदाम ठेवून जातो.    

दूरच्या वा जवळच्या नात्यातलं कोणाचे तरी मंगळागौरीच निमंत्रणाचे फोन येऊ लागत आणि मन संसारच्या चौकटीत पुन्हा अलगद सामावत.श्रावणात सणांची स्निग्धता आता हळूहळू चढत जाते.पुष्प पत्री वैभव सणांच्या आरासीतून सुशोभित होत राहते.त्यात कलाकाराने कल्पकता दाखवावी.पंचमी,हरतालिका ,रक्षाबंधन,मंगळागौर बाई जरा माहेर पदरात बांधून पुन्हा गौरी गणपतीच्या स्वागताला पदर खोचून सज्ज होते.१६ भाज्या,१६ कोशिबीरींची यादी दर वेळी प्रत्येक नव्या नवरीला सांगताना उगाच आपण काकूबाई होत चालल्याची भावना डोकावून जाते.वर्षा ऋतूतच हिरव्या दुर्मिळ  पालेभाज्या सर्वत्र दिसतात.गणपतीच्या जयघोषाने वातावरण आणि सरींनी आसमंत दुमदुमून गेलेला असतो.

(मी केलेली सजावट ,राख्या)







वर्षा ऋतू सुखाचा जरी रेखाव म्हटल तरी महापूर,ओला दुष्काळ अशा भीतेने मनाच कापर उडवतो.ग्लोबल वार्मिंग या समस्येकडे पुन्हा लक्ष केंद्रित होते.याच साठी का अट्टाहास हा प्रश्न पडतो.

 खिडकीतून बाहेर डोकावल  तर चिमणी पाखर साचलेल्या इवल्याशा डबक्यात होडी सोडून धमाल नाचत असतात आणि मनात पुन्हा जगजीत सिन्हांचे गाण वाजत राहत

ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
अगर छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी

-भक्ती

Sunday, September 5, 2021

शांतीचा रस्ता –मेहेराबाद

 


मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची  परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो....

मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने  संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे काम अनेक क्षेत्रात असून विविध कार्यक्रम राबविले जातात.वर्षातून तीन दिवशी येथे उत्सव असतो आणि जगभरातून त्यांचे अनुयायी येथे येतात.

प्रथम दर्शनी आपल्याला दिसतो मेहेर पिलीग्रीम  रित्रिट उंच दगडी वास्तू!पुढे गेल्यावर आहे मेहेर बाबांची समाधी स्थळ.भक्कम अशी दगडी छोटीशी वास्तू जिच्या वरती घुमत असून त्यावर वेगवेगळ्या धर्मांच्या चिन्हाचे छोटे बुरुज आहेत.जी सध्या बंद आहे.बाहेरून दर्शन घेता येते.बाबांच्या आजूबाजूलाच त्यांच्या मंडळींची(विविध  शिष्यगण )यांच्याही संगमरवरी दगडातील समाधी आहेत .नन्तर पुढे बाबांची रसोई,टीन शेड उजवीकडे आहे. तिथे आम्हांला योगायोगाने trusty भेटले.जे वयाने खूप वृद्ध होते आणि व्हीलचेअरवर होते.नुकत्याच त्यांच्या केअर टेकरने त्यांना औषधे दिली होती.माझ्या लहान मुलीला पाहताच त्यांनी आम्हाला थांबवले आणि मेहेर बाबांचा छोटा फोटो भेट म्हणून तिला दिला.

सगळीकडे हिरवाई आणि शांतता !हा तुकडा जणू बाहेरच्या गर्दीत  हवेत तरंगतो आहे असे वाटलं.फेरफटका मारताना अनेक विदेशी अनुयायी दिसले.सध्या श्रावणात हा परिसर अतिशय मनमोहक झालाय .माझ्या डोळ्यांचे खरच पारणं फिटले.असच भटकत राहिलो तर पुढे संस्थेचीच रोपवाटिका पाहिली.विविध औषधी ,फुलांची रोपं  तिथे बनवून या मोठ्या जागेत लावली जाते.सागाची मोठमोठाली झाडे बहराने फुलून गेली होती. नांगरलेल शेत,पाण्याने भरलेल्या विहिरी आणि निस्सीम शांतता !अमूर्त!मध्येच एका मोरपंखी , लांब चोच  असणाऱ्या इवल्या पक्षाने दर्शन दिले !

जातांना मुख्य रोडला लागल्यावर मेहेरागड आहे जिथे बाबा राहायचे,त्यांची धुनी आहे.पण तो बंद होता.आता नेहमी जमेल तसं इथे डोकावणार आहेच तेव्हा पुढल्यावेळी तिथे गेल्यावर याबद्दल लिहील.

a

खाली दिलेलं संकेतस्थलावर मेहेराबादला कसे पोहचायचे ,राहण्याची सोय काय,संस्थेचे काम काय ,कसे चालते आणि शांतीदूत मेहेरबाबा यांचे कार्य आणि समाधीस्थळ बांधणी याविषयी संपूर्ण माहिती आहे.

https://avatarmeherbabatrust.org/tomb-shrine/

Sunday, August 29, 2021

पारनेर -१ ढोकेश्वर लेणी

 

सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता  आसपासच्या ठिकाणांना करोनातला आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा सूटसुटीत बेत आखला .

“श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा देवबाभाळाची आणि  अनोळखी पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी पावसाची इच्छा बाळगत होते.

एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा  थोडा होता.तलावाचा पूल ओलांडल्यावर उंचावर असलेल ढोकेश्वर मंदिराची तटबंदी दिसू लागली.”किल्ला किल्ला “पोरगी ओरडू लागली.(तिला मंदिर आवडत नाही किल्ला पाहायचा अशी शेंडी लावून घराबाहेर काढल होत).नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना आवडली. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे .मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह कोरलेले दिसले.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख आहे. मंदिराचे छत रचना त्रीमित्रिक भासते.समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे.

डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.

पुढे पायऱ्या चढून कमान लागली आणि आणखीन पायऱ्या चढून तीच जिला पाहण्यासाठी डोळे आसुसले होते ती लेणी दिसली .पण माझ दुर्दैव ती बंद होती.तेव्हा जाळीतूनच आतल्या मूर्तींना न्याहाळाव लागलं आपण अंतर फार नसल्याने बऱ्यापैकी पाहता आल्या.

पहिल्यांदा बाहेर यमुना आणि गंगा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत. मंदिर चार मुख्य खांबांवर तोलले आहे .खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत आहेत.मंदिरात डाव्या बाजूला सप्तमातृका पट आहे.शेवटी मोदक घेतलेला गणपती आहे.

उजव्या बाजूला शिवतांडव  भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत.समोर दोन खांब आणि प्रवेशद्वाराजवळ दोन आयुधधारी द्वारपाल आहेत.त्यांच्या आजूबाजूस,त्रिशूळपुरुष,कुबेर व इतर मूर्ती कोरल्या आहेत.

मंदिरात इकून दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.

बाहेर आल्यावर उजव्या हाताला वर चढून एक टाकी आहे पण तिथे जाण्यास बंदी आहे.त्याकडे जाणारी पायऱ्यांची रचना विशेष दगडात खुबे पाडलेली आहे.विचारपूस केली असत पहाटे चार ते सहा मंदिर खुले अपाहता येईल असे समजले आम्ही उभयतांना  एकमेकांकडे पाहिले हसावे कि रडावे समजेना J.

पायऱ्या उतरत उन्ह तरीही चांगलच चढल होत,पावसाळ्यातही पाऊस नव्हता यंदा दुष्काळ जास्त पडला आहे. त्यामुळे जवळच्या तलावापाशी काही वेळ रेंगाळलो .आम्हा दुष्काळातल्या लोकांना एव्हढ पाणी म्हणजे काय आंनद !!!संथ पाण्याकडे पाहत नकळत ओळी गुणगुणल्या J

कार्जुनेचा बेत रद्द केला कारण पोरीच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते,बरोबर आणलेल्या पोळी भाजीला खाण्यास तिने साफ नकार दिला ,तेव्हा बापाच काळीज हळहळळलं आणि बायको हरली आणि माघारी फिरलो.जातांना मात्र नेप्तीच्या भेळीला थांबलो.एक भेळ दोघांना सरता सरत नाही,मटकी,काकडी आणि बरोबरीला तळलेली मिर्ची हि याची खासियत आहे.

ज्यूस पिऊन पोरगी जरा शांत झाल्यावर ,अजून एक लावलेली शेंडी सनफ्लावर दाखवले आणि गाडी खुश झाली.

आता अभ्यासक  मिपाकर प्रचेतस यांचा हा लेख वाचून हि भटकंती सुफळ संपर्ण करा

-भक्ती