Saturday, April 29, 2023

चर्चबेल-पुस्तक परिचय

 चर्चबेल#लघुकथासंग्रह#लेखक-ग्रेस

शब्द अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण!
सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस काव्यात!
बालपणात “भय इथले संपत नाही” या गीताने आत्मा इंद्रियाची गाठ करून दिली.आत्म्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे शब्द अलगद गाभ्यात घुसून घर करतात. “ती गेली तेव्हा रिमझिम ,पाऊस निनादत होता” या गाण्याची पार्श्वभूभी समजल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावतात.हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरीचे त्यांची गाणी “घर थकले संन्यासाचे”,”तुला पहिले नदीच्या किनारी”,”वार्याने हलते रान” कर्णमाधुर्याच्या निळाईत आत्मसुख देते. माझ्याकडे सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा काव्य संग्रह आहे जो मनोमन पुजला आहे.
तर ग्रेस यांचा पहिला ललितलेख संग्रह “चर्चबेल” कवितेतून मोहक दुर्बोध वाटणारे शब्द गद्यात कसे सजले हे वाचण्याची अनुभवण्याची उत्सुकता होती.सर्व लेख लहू स्वरूपाचे आहेत.पण कमालीचे ओढ लावणारे आहेत.त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तीच्या जीवनकळा अधिकतर वेदानाच्या रूपकातून साकारताना एक मूर्त रूप डोळ्यासमोर नक्क्कीच उभे राहते.
चिमण्या कथेतील त्यांच्या वरचा राग नंतर त्या ण येण्याने वाटणारी हुरहूर आहे.नेपाली,पल्लवीचे पक्षी तारायंत्राचा खांब, हे विशेष व्यक्तीमत्व चंद्रकलेसारखा रेखाटताना मृत्युच्या वेदनेने कधी लाटा ,कधी झाडं त्यावरचे पक्षी यांच्याशी मान्खेलाचे संबंध दाखवतो.
गुलमोहर,टेकडीवरचा पाऊस ,रोशनची गाणी,उरलेला चंद्र ,नूरजहा आणि रिल्के या लेखातून सृजनाचे दान वाचकांना ,रसिकांना मिळते.w.s ,प्रो सम्युल यातून इंग्रजी साहित्यिकांच्या साहित्याप्रती संपूर्ण समर्पण ग्रेस त्यांच्या लेखन शैलीतून घडवतात.
हात ,त्वचा –तंतू,यात्रा शिबानी या कथेतून इंद्रियांचा आत्मा उलगडतो.,माई,उन्हातील आई ,वाळूचे घर हे लेख एका गर्द हिरव्या प्रांतात नेतात.
शेवटचा लेख आहे ‘चर्चबेल’ सुंदर कथा आहे.एका प्रेक्षकाने ग्रेस यांना विचारले,”वाय आर यु रीन्गिंग चर्चबेल?”
ते उत्तरले “आय रीन्गिंग ड चर्चबेल टू आव्हाईड फरदर क्रुसीफीकेशन ईन माय माय लिटल अराउंड”
“माझ्या आजूबाजूला कोणी अजून ख्रिस्त सुळावर चढत नाही ,ते होऊही नये म्हणून मी चर्चबेल वाजवतोय”
साहित्यिकाने कायमच समाजाचे हितमर्म मांडताना एक सृजन जपले आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ काळ्या पांढऱ्या खिडकीतून घुमणारी चर्चबेल आहे जी एक नाद मनावर उमटवते.
-भक्ती
२६ मार्च –कवी ग्रेस स्मृतीदिन

सिद्धेश्वर वाडी ,पारनेर



 सिद्धेश्वर वाडी ,पारनेर मंदिराचा बेत ठरला होताच पण समजल की आज चतुर्थी जामगावच्या मळगंगा देवीची यात्रापण आहे .तेव्हा देवीचे दर्शनही करून पुढे जायचे ठरवलं.आणि सकाळीच दोन घास सांजा खाऊन आपण चतुर्थी मोडली आहे हे ही लक्षात आलं.सुट्टीच्या दिवशी उपवास आले की पारड सुट्टीचच वरचढ ठरत.

रस्ता आता लेकीलाही चांगलाच ओळखीचा झाला आहे .तेव्हा उन्हाळ्याच्या दारात फुललेले पर्पल गुलमोहर,पान गळून झाडांनी धरलेल्या शेंगा त्याही वाळल्या होत्या.चिंचेची झाडं वाळलेल्या चिंचानी लगडल्या होत्या.
जामगावचा वाडा आधी समोर आला त्याच्या पलीकडेच रामेश्वर मंदिरातलं चाफ्याचे झाड पूर्ण पांढर- पिवळसर रंगांनी सजले होत.
मळगंगा देवीच्या वेशीपासून वळालो.तडमताशाचा आवाजाने मनात जागर सुरु झाला.देवीला नवसाचा नैवैद्य म्हणजे गुळ वा शेरणी दाखवला जातो.तो वाजत गाजत डोक्यावर मिरवत आणला जातो.घंटेला छानपैकी ज्वारीची कणसे बांधली होती.अगरबत्तीचा धूप दरवळत होता.हिरव्या रंगाच्या साडीमध्ये देवीचे चांदीचे मुखवटे लखलखत होते.पुरी भाजीचा नैवैद्य ते असंख्य प्रमाणात चढवले जात होते. ताशाचा आवाज दुमदुमत होता,मनाचा जागर असाच राहू दे साकड घातलं.
मध्येच एक मुलगा अचानक समोर आला ,”madam कशा आहात?” जुना विद्यार्थी होता.त्याची प्रगती मला कळाली होतीच पण त्याच्या तोंडून समाधानाने ऐकून छान वाटलं.बायकोला गर्दीतून शोधून आणलं आणि भेट घडवली.
तर ...
यात्रेचे रंगेबेरंगी फोटो घेतले.लेकीला सटर फटर घेतलं.सिधेश्वरला जाण्यासाठी पारनेर कडे जाणाऱ्या रस्त्यानेच पुढे जाऊ लागलो.
पारनेरला पोहोचताच आधी पोटोबा ,मिसळपाव खाल्ली.नवऱ्याला फार आवडली ,मला इतकी आवडली नाही.
पारनेर पासून सहा – सात किलोमीटरवरच दोन डोंगरांच्या मधल्या दरीत आहे सिद्धेश्वर वाडी मंदिर!उन्हातही चाफाच्या झाडांनी नटलेला परिसर दुरूनच मोहक दिसत होता.पावसाळ्यातल्या पाचुंनी तर कमाल होत असणार. मंदिर परिसरात शंकराची दोन मंदिर आहेत .एक भूमिगत आणि एक मुख्य मंदिर आहे.आधी भूमिगत पिंडीचे दर्शन घेतले.संगमरवरी पिंड आणि जवळच संगमरवरी पार्वतीची मूर्ती होती.मंदिराबाहेर एक दगडी मंडप आहे .त्यामध्ये एक भली मोठी घंटा टांगलेली आहे.वसईतल्या विजयानंतर मराठ्यांनी चर्चसाठीच्या घंटा आणून आपल्या देवस्थानांना अर्पण केल्या त्यातील ही एक घंटा आहे,त्यावर क्रासही नीट पाहिल्यास दिसतो.पूर्वी ह्या मंडपाचा /चतुष्कीचा वापर यज्ञासाठी होत असावा.उजव्याबाजुलाच महाभूनाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचे स्थान आहे.भव्य नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात गेलो.आणि मग मूळ गाभाऱ्यात पिंडीजवळ..तर इथे आवाजाचा प्रति ध्वनी ऐकू येतो समजल्यावर “ओम नम: शिवाय” हा जप सुरु केला.खूपच सुंदर वाटत होते.


शांत चित्ताने बाहेर आले.एक गरगरीत दगडी गोल घुमट दिसला. दरीच्या दिशेने खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरले.डावीकडेच पराशर ऋषींचे स्थान आहे.आणि समोर प्रचंड दरी.अनेक पक्ष्यांची साद ऐकू येत होती.निसर्गाच्या जवळ जाणं म्हणजे हेच निर्भेळ त्या झाडांचेच ,पशु पक्ष्यांच्याच सानिध्य,ध्यान या गोष्टीची उकल कशी होत असेल हे समाजत होत,पण असो....
आजूबाजूला असंख्य पिंडी आहेत,काही छोट्या काही मोठ्या आकाराच्या होत्या.जुन्या काळातल्या महिषासुर मर्दिनी,शंकर पार्वती,विष्णू लक्ष्मी,गणपती अशा अनेक मूर्ती होत्या.तसेच मंदिराची रचना पाहून हे यादव कालीन मंदिर असावे आणि जीर्णोधार पेशवाईत झाला असावा हा अंदाज केला.
मी सर्व पाहत असताना माझी लेक बागडणाऱ्या कोकारांकडे पाहत होती आणि शेवटी बाप लेकीने कोकाराशे मैत्री करत त्याला कुशीत घेतल होत.
पुढेच मंदिराच्या वरच्या बाजूस पुष्करणी आहे.तिथे एक शिलालेखही दिसला.विठ्ठल रखुमाईची सोनेरी डोळ्यांची अखंड काळ्या पाषाणातली भरीव मूर्तीने हृदय चोरून घेतले.अक्षरशः डोळ्यांचे पारणं फिटले.
पावसाळ्यात पुन्हा हिरवा निसर्ग अनुभवायायचे ठरवून परतीकडे निघाले.
-भक्ती

दुपानी -पुस्तक परिचय

 दुपानी

लघुलेख संग्रह
लेखिका –दुर्गा भागवत
पुस्तकाच्या सुरुवातीलाच दुर्गाबाई म्हणतात,”आजच्या परिस्थितीला मिनी लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला ‘दुपानी’ उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.”
१९७४ पासून लघुलेख अगदी दोन पानांत बसतील असे लेख दुर्गाबाई लिहित होत्या,एक प्रयोग म्हणून .मनात रुंजी घालणारे विचार शब्दांकित करणे हेच लेखकाचे कौशल्य आहे!
यातील बरचसे लेख पूर्व प्रकाशित आहेत.
निसर्ग ,आणीबाणीचे दिवस ,पाककला,आप्तेष्टांच्यागोष्टी,आशियिक सोसायटी, सुरस पौराणिक कथा,तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असतानाचे प्रसंग अशा विविध विषयावरचे जवळपास ६३ लेख दुपानीत समाविष्ट आहेत.
पुष्प्सुगंध,फसवा पौष,आनंदाचे मोती यासारख्या लेखांत निसर्ग वैभव मनात बहरते.
सौंदर्याची परिसीमा,शुक्र आणि चांदणी,वैशाख अमावस्या,मावळता चंद्र यात बाईनी केलेले मर्मदृष्टी पूरक आकाश दर्शन दिसते.
इंदिरा संत यांना ‘चंद्रकिरनांकुर’ या ’मोहक’ शब्दावर कविता लिहिण्याचे दुर्गाबाई आवर्जून सांगतात ,याचा एक सुंदर लेख आहे.
‘आजीची शेवटची संक्रांत ‘,कृष्णाष्टमीची खुण यात सणांच्या मुलाम्यात बाईंच्या तरळ आठवणी भरभरून वाहतात.
जायफळ,मिरवड,पारिजात ,मृगाचा पाऊस यात निसर्गातील सूक्ष्मगोष्टींची नोंद घेणारी संशोधिका सापडते.
आणीबाणच्या काळातील अनुभव बराचश्या लेखातून दिसून येतात.
तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असताना आलेले खडतर प्रसंग अनेक लेखांत मांडले आहेत.
खापुरला,ती पोळी,सयाजीराव व पाककृती,सीताबाचे लोणचे,थोरोसाठी भाकरी,पाककला यात दुर्गाबाईंच्या पाककलेच्या आवडीशी निगडीत किस्से आहेत.
एवढ्या थोर ज्ञानतपस्वीच्या जीवनात अनेक माणसांचा गोतावळा होता,तोही अनेक लेखांतून वाचायला मिळतो.
दुर्गाबाई ज्या अनेक परिघांसाठी ओळखल्या जातात,ते सर्व परीघएकमेकांना छेदून एक वेन आकृती तयार होते ती म्हणजे ‘दुपानी’ !
-भक्ती
२३/०४/२३
जागतिक पुस्तक दिन

मक्याचे lolipop

 उकडलेले मक्याचे दाणे आलं लसूण मिरची पेस्ट मधून परतून,मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे.भाजणी मध्ये हे वाटलेले सारण कांदा घालून पीठ मळून घ्यायचे.छानपैकी थापून घेऊन,खमंग थालिपीठ भाजून घ्यायचे.तूप ,मका चाट बरोबर निवांत आस्वाद घ्यायचा


Lolipop साठी बट्ट्याबरोबर कटलेट तळून घ्यायचे.

तट्टे इडली पोडी


 तट्टे इडली पोडी

तट्ट इडली म्हणजेच ताटलीतली मोठी इडली आणि पोडी /गनपावडर चटणी चणाडाळ, उडीदडाळ,तीळ,सुकी लाल मिरची स्पाईसी चटणी...
इडली
नेहमी प्रमाणेच तांदूळ , उडीदडाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवले.
सकाळी हे सरभरीत वाटून एकत्र ६ तास फरमेंट होऊ दिले.
इडली करताना पीठ वाटणात मीठ टाकून,मोठ्या ताटलीला तेल लावून इडली पीठ टाकले.इडली पात्रात इडली वाफवून घेतली.
पोडी चटणी साठी -१वाटी चणा डाळ,एक वाटी उडीद डाळ खरपूस भाजली.१/२ वाटी तीळ भाजले.सुक्या लाल ७-८मिरच्या भाजल्या.हे सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून किंचीत जाडसर वाटून घेतले.मीठ घातले.
आता गरमागरम इडली वर आधी साजूक तूप पसरवून घेतले,पोडी चटणी पसरवून घेतली.इडलीचे बारीक तुकडे करून ,आवडत असेल तर तसेच किंवा चटणी/सांबर बरोबर गट्टम् करावी 😋

हळीवचे लाडू


 हळीवचे लाडू

पहिलाच प्रयत्न आहे.थंडीमध्ये हे मुख्यतः खातात. पण आता बनवायचा योग आला आहे 😄
हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.
१००ग्रम हळिव
२वाट्या खोवलेला नारळ
३वाट्या गुळ
३ वाट्या नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी
१/२ वाटी काजू बदाम पुड
१/२ चमचा चमचा जायफळ पावडर
कृती
हळीव स्वच्छ निवडून,नारळाच्या पाण्यात ८ तास भिजवावे.
हळीव , खोवलेला नारळ,गुळ एकत्र करून ४ तास भिजवावे.
हळीव भिजल्यावर हे मिश्रण ३० मिनिटं मंद आचेवर परतावे.
तेव्हा त्यात काजू बदाम पूड,जायफळ पूड टाकावी.
परतल्यानंतर मिश्रण गार करून लाडू वळावे.
रोज एक कोमट दुधाबरोबर खाऊ शकतो.

टोमॅटो,मुळा,बीट- सुप

 


टोमॅटो -मुळा-बीट सुप----

संध्याकाळी कार्ब बंद नको वाटले तेव्हा सुप या प्रांताकडे वळाले.
तीन पिकलेले टोमॅटो
तीन मध्यम आकाराचे मुळा
अर्धे बीट
मसाला- ५-६ मिरी
एक चमचा धने(किंवा धने पावडर)
दालचिनी
एक तमालपत्र
पाच सहा पाकळ्या लसूण
तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा किसलेले आल
चिरलेली कोथिंबीर
एक चमचा तेल
हळद ,हिंग जिरे (१/२ चमचे)
कृती-
१.छोट्या कुकरमध्ये तेल तापल्यावर वरील फोडणीचे मसाल्याचे जिन्नस परतून घ्या.
२.चिरलेले टोमॅटो,मुळा,बीट फोडणीत टाकून परतून घ्या.
३.दोन ते तीन कप पाणी टाकावे.
४.तीन -चार शिट्ट्या होऊ द्याव्या.
५.शिट्ट्या झाल्यावर पुन्हा तीन-चार कप पाणी टाकून १५ मिनिटे उकळी येऊ द्यावी.
६.नंतर हे मिश्रण गाळून घेऊन चाळणीवरील मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
७.पुन्हा चाळणीतून गाळून घ्या.
८.पहिले गाळलेले पाणी हे मिश्रण एकत्र करून वाटल्यास आणखिन पाणी,मीठ, आवश्यक असेल तर तिखट टाकून उकळून घ्यावे.
९.गरमा गरम सुप कोथिंबीर किंवा तुळशीची पाने वापरून निवांत प्यावे.

बीट रूट चकली

 सध्या बीट रूट पदार्थ खूपच आवडीचे झाले आहेत.बीट पुरी,बीट थालिपीठ,बीट डोसा ,बीट सूप,बीट चटणी,बीट कोसांबरी या पदार्थांची वर्णी लागली.



काल कोसांबरी करावी म्हणून मुग डाळ भिजत घातली होती.पण मध्येच बीट सोलताना, मुगडाळ शिजवून करतात तशी चकली आठवली.चला म्हटलं बीट रूटची सुंदर गडद रंगाची काटेदार चकली करावी. अगदी सोपी पाककृती आहे.
दोन छोटे बीट रूट
तीन वाट्या तांदळाची पिठी
एक वाटी बेसन पीठ
एक वाटी मुगडाळ
जिरे पूड
धने पूड
तिखट
मीठ
तळण्यासाठी तेल
कृती-
बीट रूटची सालं काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
कुकरमध्ये बीट आणि मुग डाळ वाफवून घ्यावेत .दोन शिट्या केवळ .जास्त गाळ नको.
वाफवून घेतलेले बीट ,मुगडाळ त्यात तिखट मीठ,धने –जिरे पूड एक एक चमचा टाकली . मिक्सरमधून एकजीव करावे .
आता तांदळाची पिठी,बेसन एकत्र करून दोन चमचा गरम तेलाचे मोहन घातले.
बीट –मुग डाळ मिश्रण त्यात तीळ एकत्र करून घट्ट मळून घेतले.
तेल तापवून मंद आच ठेवली.मस्त गुलाबी चकल्या निगुतीने तळल्या.
इतक भन्नाट वाटत होत.मुगडाळीची विशेष चवही जाणवते.
खुशखुशीत ,खमंग किंचित गोडवा असलेली गुलाबीसर बीट रूट चकली !यम्मी!