Tuesday, July 7, 2026

RoseApple-रोज ॲपल जॅम.




 घराच्या जवळ सापडलेल्या रोज ॲपल पासून बनवलेलं स्वादिष्ट जॅम!🍎✨RoseApple 


मी आणि माझे घरचे अचंबित होतात ते याच गोष्टीने! आमच्या भागात फणस, जांभूळ, पपई, विड्याची पाने, विविध फुले... कसे काय सापडतात तेही फक्त मलाच ? 😅 

जिज्ञासा असेल तर माणूस निरीक्षण करतो आणि त्याला दृष्टीआड सृष्टीचे अद्भुत दर्शन होते. 


मागच्या दोन आठवड्यापूर्वी रविवारी सकाळी फिरायला निघालो आणि तिसऱ्या गल्लीतच एक झाड दिसलं रोज ॲपल (जांब)च्या लाल-गुलाबी फळांनी लगडलेलं! नायर काकू फळं तोडत होत्या. मी गेटच्या आत शिरले आणि विचारलं, “काकू, काही फळं मिळतील का?” 


काकूंनी हसत-हसत कंपाउंडच्या भिंतीवर चढून मला पिशवीभर ताजी फळं दिली. दोन महिन्यांपूर्वी कोकणात ५० रुपयांना वाटा घेतली होती ती आठवण डोक्यात आली. तेव्हा जॅम करायचा विचार होता, पण जमला नव्हता. आणि आज? *किलोभर ताजी, रसाळ फळं घरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर!*


रस्त्याने आंबट-गोड फळं खात-खात घरी पोहोचलो. घरच्यांनी आश्चर्याने विचारलं, “अरे, तू आज कोकणात गेली होतास का?” मी हसत म्हणाले , “नाही बाई... तिसऱ्या गल्लीतूनच आणलीयेत ही!” सगळे थक्क झाले. “तुलाच बाई असं छान-छान सापडतं?” अशी टिप्पणी आलीच.


मग काय, रविवारचा दिवस आणि ताजी फळं... लगेच कामाला लागलो. गूगल केलं आणि समजलं की रोज ॲपल जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त तीन साहित्य आणि थोडंसं प्रेम पुरेसं!


रोज ॲपल जॅम पाककृती

(Rose Apple Jam )


साहित्य

 अंदाजे १ छोटा बाउल जॅम होईल

- १ वाटी रोज ॲपलचा रस (किंवा २-२.५ वाट्या फळं)

- १ वाटी साखर (चवीप्रमाणे समायोजित करा)

- अर्ध्या लिंबाचा रस


कृती:


१.फळं चांगली धुवा.मागचा आणि पुढचा शेंडा काढू टाका. फळाचे बारीक तुकडे करा.


२.ब्लेंडरमध्ये फळांची बारीक प्युरी करा. चाळणीने गाळून स्वच्छ १ वाटी रस घ्या.


३. जॅम शिजवा- जाड तळाच्या कढईत रस आणि साखर एकत्र करा. मंद ते मध्यम आचेवर ठेवा. सतत ढवळत राहा. साखर विरघळल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घाला. 


४. घट्ट होईपर्यंत शिजवत राहावे लागते.मिश्रण जाडसर होईपर्यंत (साधारण १५-२० मिनिटं) शिजवा. 

5. थोडासा जॅम थंड प्लेटवर टाका. बोटाने ओढला की रेष पडली तर तयार! गरम असतानाच स्वच्छ काचेच्या बरणीत भरून झाकण लावा.


५.थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. १ ते १.५ महिने सहज टिकेल..  

- गरमागरम पोळी सोबत jam चाखला...स्वाद अविस्मरणीय!स्वादही इकडं ताज्या फळांची आठवण करून देत होता. 😊


असा एक साधा रविवार, घराजवळ सापडलेली फळं आणि त्यापासून बनवलेलं घरगुती जॅम... केवळ चव  नाही तर एक rose apple आख्यान झालं. 😅


तुम्हीही आजूबाजूला नजर फिरवा. कदाचित तुमच्या गल्लीतही एखादं जादूई झाड लपलेलं असेल! 

-भक्ती