Saturday, January 17, 2026

पत्र निमित्तमात्र....

 


पत्र निमित्तमात्र

सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री... ही मैत्री फक्त शब्दांची नव्हती, ती हृदयाच्या गहन कोपऱ्यातून उमललेली, पत्रांच्या माध्यमाने फुललेली एक अनोखा आयुष्यघन होता.पत्रे ही फक्त कागदावरची अक्षरे नव्हती ती दोन संवेदनशील आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करत गेली.
या पत्रव्यवहाराची सुरुवात अगदी साधी होती – पुलं एकदा दीर्घकाळी बाहेरगावी असताना सुनीताबाईंना जी. ए. यांचे पुलं. यांना लिहिलेले पत्र वाचायला मिळाले. त्यांनी उत्तरासाठी जी. ए. यांना पहिले पत्र लिहिले. त्या पत्राने सुरू झालेला हा संवाद ८ वर्षे (सुमारे १९७७ ते १९८५) चालला.
पुढे या पत्रव्यवहारांची स्वतंत्रपणे या दोन्ही लेखकांच्या नावे पुस्तकेही प्रकाशित झाली.
सुनीताबाईंनी जी.ए यांना लिहिलेली त्यांच्या या पत्रांचे संकलन म्हणजे "प्रिय जी.ए." हे पुस्तक (मौज प्रकाशन, २००३) प्रसिद्ध झाले.जी. ए. यांची उत्तरपत्रे समाविष्ट नाहीत, फक्त सुनीता ताईंची पत्रे.हे पुस्तक २००८ मध्ये पहिल्या "जी. ए. कुलकर्णी पुरस्कार" ने सन्मानित झाले.
तर दुसरे पुस्तक --
"जी.एं.ची निवडक पत्रे" हे जी. ए. कुलकर्णी यांनी विविध आप्तेष्ट, मित्र आणि साहित्यिकांना लिहिलेल्या पत्रांचे संकलन आहे. हे मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले चार खंड आहेत:
खंड १: १९९५
खंड २: १९९८
खंड ३: २००६
खंड ४: नंतरचे (मरणोत्तर प्रकाशन)
हे पत्रव्यवहार जी. ए. यांच्या खोलवरचे, वैचारिक, कधी व्यंग्यपूर्ण, कधी भावनिक आणि नेहमीच साहित्यिकदृष्ट्या समृद्ध आहे.यात सुनीता देशपांडे, पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, जयवंत दळवी, माधव आचावल,अनंतराव कुलकर्णी, मा. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या व्यक्तींना लिहिलेली पत्रे समाविष्ट आहेत.
जणू दोन प्रगल्भ मनांच्या आत्मसंवादाचा एक दस्तऐवज!
जी. ए. यांचे वाचनक्षेत्र अफाट होते.भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चिमात्य साहित्य, कविता, संगीत... सर्व काही त्यांच्या मनात रुजलेले. सुनीताबाईंचीही भारतीय ग्रंथांची ओळख आणि साहित्यिक जाण कमालीची सूक्ष्म होती. या दोघांच्या पत्रांतून साहित्याचा आस्वाद, जीवनमूल्ये, प्रवासवर्णने, थोर-मोठ्यांच्या आठवणी, आरोग्याची काळजी... असे अनेक विषय मायावी धाग्याने गुंफले गेले. कधी ग्रेसच्या कवितांच्या ओळींनी पत्रे काव्यमय होत, कधी बोरकरांच्या शब्दांनी मन उदास होत, तर कधी गायकांच्या गायनशैलीच्या कौतुकाने पत्रे संगीतमय होत. "माया" या संकल्पनेवरचे विचार तर जणू मायावी धुंदीत बुडवत.प्रवासवर्णांनी पत्रांना पंख मिळत,पानाफुलांच्या ओळखीने पत्रात वसंत फुलत असे !
जी. ए. यांचे जीवन अत्यंत सुसंस्कृत, आत्ममग्न आणि संवेदनशील होते. प्रभावती आणि नंदा या बहिणींची साथ, कथांच्या रंगीत-गूढ मालिका, मित्रांचे गोतावळे... हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देत. सुनीताबाईंचास्पष्टवक्तेपणा हाही पत्रांत ठळकपणे उमटतो .पण तोही प्रेमळ, जिव्हाळ्याचा. माधव आचवल, वसंतराव देशपांडे यांच्या जाण्याने दोघांच्या आयुष्यात एक आभाळच हरवले, हे त्यांनी पत्रांतून स्पष्टपणे व्यक्त केले. ते शब्द वाचताना थोरांच्या आयुष्यातली पोकळी अनुभवली.
जी. ए. यांच्या आजारपणाची बातमी लागल्यावर सुनीताबाईंच्या पत्रांत काळजीचा सूर अनेकदा येत असे . "पुण्यात या, इथल्या डॉक्टरांकडून इलाज करून घेऊ या" असा आग्रह अनेकदा त्या करत .पण जी. ए. यांचा स्वाभिमान अढळ होता. त्यांनी कधीच आजारपणाचा विषय सुनीताबाईंच्या मदतीपर्यंत पोहोचू दिला नाही. हा स्वाभिमान... अखेरच्या श्वासापर्यंत जपलेला. अगदी शेवटच्या क्षणी सुनीताबाईंच्या घराजवळच हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पण ती बातमीही त्यांनी सुनीताबाईंना लागू दिली नाही. किती गहन, किती दुःखद...
दोघांमध्ये अनेक विषयांवर मतभेदही होते. शरदचंद्रांच्या लेखन त्यातला नायिकांचे दु:ख सुनीईताबाईंना कथा-पात्रांचा उत्कृष्ट नमुना वाटत .तर जी.ए. यांना चक्क हास्यपद वाटत .अशा अनेक रुपरेखेवर,साहित्यातील एकमेकांच्या विरुद्ध विचारांवर पत्रामध्ये विचारांच्या फेऱ्या चालत
कधी पत्रांत खंड पडत.दोघांमध्ये गैरसमजाणे जागा घेतलीय काय ,असा विचार येऊन उदास वाटत होत, मन रुखरुखत होत.पण एकाच्या तीन-चार पत्रांनंतर दुसऱ्याचे सावकाश होईना ... उत्तर येत असे .सूर्याच्या स्वच्छ प्रकाशासारखे निर्मळ, भावनांच्या लवलेशाशिवाय शुद्ध!!तेव्हा हायसे वाटत... नाते पुन्हा ताजे, अधिक गहिरे होत.
जी. ए. गेल्यानंतर सुनीताबाईंनी "Good Bye Friend " हे निरोपाचे अखेरचे पत्र लिहिले.ते वाचताना सुनीताबाईप्रमाणे जी. ए. आपल्याला असे अचानक कसे सोडून गेले असे गहिवरून येते.आपणही एक मैत्र गमावला असे वाटते. कोलाहलाच्या या जगात दोन बुद्धिवादी, संवेदनशील आत्मे इतक्या निर्मळपणे, जिव्हाळ्याने पत्रव्यवहार करत होते... हे ऐकणे-वाचणे म्हणजे आपल्यातही असाच समंजसपणा, प्रेमळ स्पष्टता आणि गहन आदर रुजवण्यासाठी एक प्रेरणा आहे.
हा पत्रसंवाद फक्त साहित्यिक नाही,तो हृदयाचा आहे. वाचताना जाणवते.खरी मैत्री ही पत्रांच्या ओळींमधून नव्हे, तर दोन आत्म्यांच्या मधल्या शांत, गहन संवादातून उमलते. आणि ती मैत्री... काळाच्या पलीकडे अमर राहते.
-भक्ती

No comments: