Monday, April 29, 2024

चॉकलेट आईस्क्रीम

 विना साखर, दूध आईस्क्रीम-

रोज बाहेरचे आईस्क्रीम देण्यापेक्षा घरी थंडा थंडा कूल कूल चॉकलेट


आईस्क्रीम/म्युस केले.विना साखर पदार्थ करायचा म्हणजे खजूर वापारायचे हे सूत्र आहेच.

नुसतं चॉकलेट फ्लेवर ऐवजी केळी पण वापरली.

साहित्य -तीन पिकलेली केळी, आवडीनुसार चॉकलेट कंपाऊंड(डार्क चॉकलेट) कोको पावडर,मखाना/ओट्स सुकामेवा पावडर,सात आठ खजूर

कृती-

चार केळी काप करून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवून गार करायचे.नंतर मिक्सरच्या भांड्यात ही थंड झालेली केळीची काप,मखाना सुकामेवा पावडर,  डार्क चॉकलेट बारीक केलेले खजूर टाकून फिरून  टाकायचे.मग चांगले फिरवून घ्यायचे.स्मूद मिश्रण झाल्यावर आवडत्या आकारात ओता.वरतून आवडीनुसार सुकामेवा,ट्रुटीफ्रुटी टाकायची. ३-४ तास डीप फ्रीजमध्ये मिश्रण ठेवायचे.नंतर मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.मी वड्या केल्या आहेत 

-भक्ती

Sunday, April 28, 2024

ब्राह्मणी बारव आणि इतर पुरातन पाऊलखुणा

 


खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते‌ गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.

 तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.

पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).

 पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12 किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही.

ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.

 बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे.

आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.


बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस मराठे)

बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षांपूर्वीचा  असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो. शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे. 

पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे. 

मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.

या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते.. 

मंदिरामागे  एक भव्य तलाव  आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर  प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.

अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.

-भक्ती




















Sunday, April 21, 2024

आजचामेन्यू-४

 #countbiomolecule  




मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा  कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात. 


१.वाटीभर मेथ्या रात्रभर भिजवल्या.

२.दुसर्या दिवशी एका किंचित हवा जाऊ शकेल अशा पसरट डब्यात त्या मोड यायला पसरून ठेवल्या.

३.तीन दिवसांनी मेथ्यांना छान मोड आले होते.

४.भाजी नेहमीप्रमाणे फोडणी देत बारीक  चिरलेला कांदा टोमॅटो परतून त्यात हे मोड आलेले मेथी दाणे परतून वाफवून घेतले.

दरवेळी त्याच त्याच चवीपेक्षा वेगळया चवीची भाजी मस्त लागते.चव खरच अप्रतिम आहे किंचीत कडू अगदी नाममात्र.

fenugreek sprouts taste delicious and have an excellent result on health & skin. They are a rich source of protein, fiber, vitamins A and C, calcium, and iron. It contains photochemical in a high quantity like phenols, alkaloids, tannins, and flavonoids it is a proven remedy for diabetes, carcinogenic, hypo cholesterol. Many types of research have proven their antioxidant and immunity booster properties.(Copied)

बाकी मेन्यू..



फ्लॉवर भाजी, मोड आलेल्या मेथी दाणेची भाजी, घरचं लिंबाचे लोणचे,भात तुरीचे वरण,अर्धी पोळी.वरण अळणी आहे.भातही अळणी आहे.वरण भात खातांना मीठ न घालता कमी मिठातल्या भाज्या एकत्र करून खाल्ला.

-भक्ती

Thursday, April 18, 2024

रेडिओअक्टिव्ह -सिनेमा परिचय



 #radioactive

काही स्त्रिया बंडख़ोर असतात.जाचक नियमांचे ओझं त्या अलगद दूर करतात  आणि नाविन्याचा शोधत घेत झगडतात  नकळत त्याचा आवाज घुमत राहतो.त्या इतक्या असामान्य होत्या म्हणून आजच्या युगातल्या स्त्रियांना बळ मिळते.

मेरी क्युरी...नावच खुप आहे ना‌‌..या थोर स्त्री वैज्ञानिकीची जितकी थोरवी सांगावी तितकी कमीच आहे.

रेडिओअक्टिव्ह' हा सिनेमा कणखर मेरीचे असेच माहित असलेले  आणि नसलेले पैलू प्रभावीपणे दाखवतो.

व्यक्तिशः मला पहिली नोबेल  विजेता स्त्री,दोन वेगवेगळ्या क्षेत्रात (केमिस्ट्री आणि फिजिक्स)यात नोबेल मिळविणारी एकमेव व्यक्ती इतकीच ओळख होती.पण वडिल गणितज्ञ , लहानपणीच आईचे छत्र हरवलेली मारिया स्क्लोदोव्स्का' उर्फ मेरी क्युरी .शिक्षण मिळवण्यासाठी अत्यंत झगडा देत पोलंड स्वदेश सोडून फ्रान्स गाठते.एक वैज्ञानिक होते.तिथेच पेरी क्युरी यांची विज्ञानाच्या प्रेमापोटी भेट होते आणि दोघांतही प्रेम फुलते.या दोघांतले नाते इतके सुंदर दाखवले आहे की सिनेमात नोबेल घ्यायला पेरी एकटाच जातो (कारण मेरी नुकतीच आई झालेली असते) तेव्हा मेरी चिडून त्याला एक थप्पड मारते पण म्हणते तुझा राग आलाय पण तुझ्यावर तितकेच प्रेम करते.

पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी यांना नोबेल मिळते.रेडिओअक्टिव्ह ही संकल्पना ,हा शब्द मेरीने जगाला पहिल्यांदा दिला.ती म्हणतच असते मला जग बदलायचे आहे.पेरीच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर दोन मुलींचे संगोपन असूनही विज्ञानाचा ध्यास ती अजिबात सोडत नाही.त्याकाळातही एका सहकार्याबरोबर असलेले इंटीमसीचे नातं नाकारत नाही,दुसरे नोबेल पारितोषिक घेण्यासाठी सध्याच्या अफेअरमुळे येऊ नका असे पत्र मिळाल्यावर 'नोबेल मला ट्यालेंटसाठी मिळाले आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा याच्याशी संबंध नाही 'हे ती ठणकावून सांगत सोहळ्याला जाते.

मेरीच्या शिक्षणासाठी तिच्या बहिणीनेही तिला खुप साथ दिली होती.पहिल्यांदा बहिणीच्या शिक्षणासाठी मेरीने शिकवणी,शिक्षकीची नोकरी करत आर्थिक साहाय्य केले.नंतर बहिणीने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मेरीला शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले.

पुढे मुलीही तेवढ्याच कणखर पहिल्या महायुद्धात आई मेरी क्युरी  बरोबर त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .


कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरी क्युरीने (मेरी क्युरी यांची मोठी मुलगी)पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .

सिनेमात रेडिओ अक्टिव्ह शोधाने जगात जे मोठे बदल झाल्या अशा घटनांचे मध्येमध्ये चित्रणही दाखवलेले आहे -1956 मध्ये क्लीव्हलँड येथील रुग्णालयात बाह्य बीम रेडिओथेरपी , हिरोशिमा आणि नागासाकी ,1961 मध्ये नेवाडा येथे अणुबॉम्ब चाचणी आणि चेर्नोबिल आपत्ती यासह तिच्या शोधांचा भविष्यातील परिणाम दर्शविणाऱ्या दृश्यांसह मेरीच्या आयुष्यातील दृश्ये गुंतलेली आहेत(सौ.विकी)

आई जेव्हा वारली तेव्हापासुन तिने अध्यात्माचही त्याग केला, कदाचित तेव्हापासुन ती केवळ‌ फैक्टवर विश्वास ठेवू लागली.विज्ञानाची सम्राज्ञी मेरी क्युरीच्या आयुष्याचा हा 'रेडिओ अक्टिव्ह' सिनेमा नक्कीच पहा..

-भक्ती

OTT - Amazon Prime

Friday, April 12, 2024

इकिगाई


 इकिगाई


अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई

पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे.

*दीर्घायुषी ठणठणीत राहण्यासाठी भूकेपेक्षा ८० % च जेवा.जेवणामध्ये ताट रंगबिरंगी भाज्या फळ नैसर्गिक आंन्टीओक्सिडेंट यांनी भरू द्या.

*कार्यमग्नता देणारे काम म्हणजे ईकिगाई.आवडणार्या कामात आनंद तर मिळतोच आयुष्य सहज पूर्ण जगण्याचा फ्लो पण मिळतो.

*मल्टीटास्किंग न करता एका कार्यावर लक्ष केंद्रीत करा.

*काम अगदीच सोपे नको की आळस येईल जरा आव्हानात्मक कार्य करा पण क्षमतेच्या बाहेरचे काम घेऊन काळजीही वाढवू नका.

*सामाजिक जीवनात यशस्वी करा.मित्रांत,आप्तीयांमध्ये जा.खेळ, सामूहिक खाणपान साजरे करा, एकांतवास दीर्घ नको.

*भारतीय योगा प्रमाणेच जपानमध्येही फार महत्त्वाचे व्यायाम महत्वाचा आहे.रेडिओ ताईसो, ताई ची,क्विगोंग असे जपानी व्यायाम प्रकार लोकप्रिय आहेत जे सोपेही आहेत.

*विशेष बुद्धिझम ,कन्फुसियन्स यांचा जपानवर प्रभाव आहे,सर्वस्व त्यागाऐवजी वर्तमानात जगा!

*मूळ स्वभावापासून दूर नेणाऱ्या गोष्टी टाळा.


पुस्तक वाचताना जपान आणि भारत तुलना करता जपानमध्ये संन्यास दिसला नाही.तसेच एक

रोचक उदाहरण म्हणजे तिथली घरं लाकडाची आहेत.सर्व काही क्षणभंगुर आहे.कशातही जीव गुंतवू नका म्हणून तिथे पिढ्यांपिढ्या दिसणाऱ्या वास्तू फार कमीच आहेत असं पुस्तकात लिहिले आहे.

-भक्ती

Wednesday, April 10, 2024

श्रीखंड श्रीखंड

 


श्रीखंड श्रीखंड ..
गोठ्यातून ओह माफ करा
डेअरीतून आणा दूध एक लीटर
उकळी द्या येऊ एकदम बेटर
ऊन ऊन दूध हो द्या कोमट
विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट
सूती कापडात दह्याला बांधा
निथळया पाणी पुरचुंडी टांगा
टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा
चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा
फेटा फेटा.. पुरणयंत्री,कोण्या चाळणी
वा हैण्ड मिक्सी
एकास एक सम चक्का-पिठी करा एक
भुरभुरा इलाईची-सुकामेवा आवडीचा
निगुतीने करा हा श्रीखंड बेत आहे सवडीचा
-भक्ती
लेट पण थेट
#श्रीखंडपुरी