Saturday, February 19, 2022

हेमंत ऋतू!

 

हेमंत ऋतू!

हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं.

थंडी ही हेमंत आणि शिशिर या ऋतूत विभागली आहे. या दोन ऋतुंमध्ये फारसा फरक करायचा तर तापमानावरून करता येईल. तरीही काही ठिकाणी याचा उल्लेख प्री-विंटर असा आहे. तापमान १० डिग्री ते २५ डिग्री असते.

ऋतूसंहार मध्ये कालिदासाने हेमंतचे वर्णन असे केले आहे

नवप्रवालोद्रमसस्यरम्यः प्रफुल्लोध्रः परिपक्वशालिः।
विलीनपद्म प्रपतत्तुषारोः हेमंतकालः समुपागता-यम्‌॥ 

बीज अंकुरित झाले आहेत .फुले लगडली आहेत.धान्य आता कापणीस योग्य आहे.परंतु कमळ कोठेही दिसत नाही त्यामुळे स्त्रिया अन्य फुलांचा वापर श्रुंगारासाठी करत आहेत.दवबिंदू पडायला लागले आहेत,पूर्व थंडीचा हा असा काळ आहे.स्त्रिया सुगंधी चंदनाचा वापर उटणे म्हणून करत आहेत.शेत आणि सरोवर पाहून मन हर्षित होत आहेत.

चरक संहिता मध्ये देखील हेमंत ऋतूला स्वास्थ्य प्रदान करणारा सांगितलं आहे.

"शीते शीतानिलस्पर्शसंरुद्घो बलिनां बलीः।
पक्ता भवति..."

गजपतिद्वयसीरपि हैमन्तस्तुहिनयत्सरितः पृषतां पतिः।

सलिलसंततिमध्वगयोषितामतनुतातनुतापकृतं दृशाम्॥

 

हिवाळ्यातील  थंड वारे,दवबिंदू ,खोलवर गोठलेलली नदी अगदी बलाढ्य हत्तीएवढी,त्यात उष्ण काही उष्ण वारे अशा वेळी जिचा पती दूरदेशी आहे तिच्या डोळ्यांतून दुख:दायी अश्रू वाहत आहेत.

कवी माघ

अवश्यायतमोनद्धा नीहारतमसा ऽवृता।

प्रुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः॥

 

हेमंत काळातील पुष्पहीन वातावरण असूनही दूरवर पसरलेले हे रान पंखांप्रमाणे भासणाऱ्या बर्फाच्या चादरीच्या अंधारात निजलेले आहे.

वाल्मिकी रामायण

हा गुलाबी थंडीचा काळ प्रेमी युगालासाठी अतीव आनंद देणारा.एकमेकांच्या मिठीत शेकोटीजवळ रात्रभर ऊब अनुभवण्याचा.यावर  ओडिसातील पट्टचित्र सुंदर हेमंत ऋतू दाखवतांना.



तसेच भारतीय टपाल खात्याने प्रसिध्द केलेले हेमंत ऋतुवरील तिकीट एक ऊबदार म्हणाव लागेल.



पण याच ऋतूमध्ये प्रवाशांची थंडीत गारठून ततपप होत असते.

सायबेरियन व इतर पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्र भिगवण ,गुजरात या ठिकाणी या काळात  स्थलांतर करतात.

गुलाब ,प्राजक्त याच काळात दवाने भिजलेली सुंदर दिसतात. 

गोल्डन शॉवर



डिसेंबर मधली स्लाईम वीड




मराठी महिन्यांनुसार मार्गशीर्ष आणि पौष महिन्यातील दत्त जयंती,श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली ती गीता जयंती येते.

सूर्याची उपासना आणि शेतात गव्हाच्या ओंब्या डुलू लागतात.कोवळी पिके पाहून सृजनाची भावना होते.बर्याचशा झाडांना आता फळ,शेंगा लगडलेल्या दिसून येतात.लवकरच ही चांगली पक्व होणार असतात.

संक्रांत ,बैसाखी,ओणम अश्या वेगवेगळ्या नावाने पिक अन्न धान्याबद्दल कृतज्ञता दाखवली जाते.तीळ-गुळाचा गोडवा आणि स्निग्धता नात्यांत उतरावा अशी कामना करून यथेच्छ सेवन केले जाते.

तीळगुळ वड्या


सुवासिनी सुगट

हेमंत ,शिशिर ऋतू साऱ्या थकलेल्या पानांना,सृष्टीला बर्फाच्या चादरीमध्ये निवांत निजायला सांगत आहे कारण त्यांना लवकरच वसंताचे स्वागत करायचे आहे.

---भक्ती