Tuesday, January 23, 2024

पंजाबी पिन्नी करंजी

 





थंडीचे छान गार गुलाबी दिवस आहेत.पोटातला अग्नी खारीक-खोबर्याने तृप्त होतो.ऊबदार होतो.पण माझी लेक खारीक खोबरं लाडूंना तोंड लावेल तर शपथ!मग आईने त्यात एक वाटी गव्हाचे पीठ भाजून टाकले (अशा लाडूंना पंजाबी पिन्नी म्हणतात हे मी #Mumbai Swayampakghar  च्या एका पोस्टमध्ये वाचलं होतं).तरीही खाईना.लहान मुलांचे खाण्याचे अजब गणित असतं.आता यात गव्हाचे पीठ पडलाच आहे ,तर करंज्या कराव्यात.तर यात तीळही घालावेत असं वाटलं.मला करंज्यांना मूरड पाडता येत नव्हत्या चारचौघी फराळ करतांना त्यांना पटापट करंज्यांना मूरडी घालताना , आपल्याला येत खुप वाईट वाटायचं.चित्त एकाग्र केले आणि करंज्यांच्या कडांना  मूरड घातल्या(चुकल्या तरी आपल्यालाच खायच्या आहेत हे समजून).अशा मस्त जमत गेल्या ,खरच #डरकेआगेजीतहै हे ब्रीद काय खोटं नाही.

म्हणून रव्या मैद्याच्या करंज्या केल्या.अहो आश्चर्यम गरमा गरम पाच एक करंज्या तिने खाल्ल्या.आणि ही डिजाइन काय मस्त आहे करंजीची , म्हणून मी या खातेय अस म्हणाली :).खरच मस्त खुसखुशीत पंजाबी पिन्नी करंजी या पुढे आता हमखास करत राहणार!


साहित्य -

खारीक -खोबरे बारीक केलेले-दोन वाटी

गुळ-एक वाटी

सुकामेवा बारीक केलेला-एक वाटी

डिंक तळलेला-अर्धी वाटी

भाजलेले गव्हाचे पीठ -एक वाटी

मेथ्यापूड-अर्धा चमचा


करंजी साठी १:१/२ प्रमाणात बारीक रवा मैदा एक चमचा मोहन टाकून दूधात भिजवून अर्धा तास ठेवला.


कृती-

वरील साहित्य एकत्र करून घेतले .

करंज्या लाटून दोन चमचे सारण भरून कडांना मूरड पाडली.

किंचित लालसर तळल्या.

गरमागरम तयार!

-भक्ती

Monday, January 15, 2024

हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे

 

हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे

तारामती शिखरवरून सूर्योदय 



हरिश्चंद्रेश्वर मंदिर 
पुष्पवैभव
कोकणकडा 
गडावरील मंदिरशिल्प 




३१ डिसेंबरला हरिश्चंद्रगडला जायचं होत पण त्यादिवशी त्यावर मनाई सरकारकडून झाली.परत ट्रेक  कैम्प कडून १४ जानेवारीला हा ट्रेक होणार होता ,मग जायचं ठरलच.ट्रेकला डॉक्टर,अधिकारी,बँकर,पत्रकार पासून विद्यार्थी सर्व वयोगटातले मंडळी होती.सागर आणि प्रियांका ट्रेक लीड करणार होते.

या आधी सोपे सिंहगड ,शिवनेरी,रायरेश्वर ,केंजळगड केले होते.पण हरिश्चंद्रगड ‘भटक्यांची पंढरी’ का मनाला जातो ते या ट्रकने उमगले.रात्री ११ ला नगरहून निघालो ,रात्रीचा प्रवास झोप लागलीच कोतुळच्या अलीकडे जाग आली कुट्ट अंधार आणि खिडकीतून पाहिलं तर आकाशातला सप्तर्षी बरोबर येत होता(किंवा कदाचित सप्तर्षीच ओळखता येत असल्याने खच्च भरलेल्या चांदण्यांच्या आकाशातून तो म्होरका माझ्यासाठी झाला.

रात्रीच पाचनई गावात चारच्या सुमारास पोहचलो.अंधारात टोर्चच्या मदतीने गडाकडे निघालो.हवेत गारवा होता आकाशात ताऱ्यांची पखरण उधळली होती .इतके तारे खूप म्हणजे खूपच दिवसांनी डोळे भरून पाहिले होते.गड चढायला सुरुवात केली.जसे जसे पुढे जात होतो तस तसे अंधारात एक वेगळच धाडस वाटू लागले.पुढे एका सपाट जागी आलो तर तारे पाहून प्रचंड आनंद वाटत होता.हा ध्रुव का तो शुक्र म्हणत शुक्रतारा मंद वारा ओळी गुणगुणल्या गेल्या.शिडी  चढून गेल्यावर भव्य कपारीला अनुभवत पुढे निघालो .अजून किती महंत म्हणत एक दीड तास झाले होते.तीन चार दुसरे ग्रुपही चालत होते.माझी घाई सुर्योदयापूर्वी तारामती शिखर पर्यंत जायला पाहिजे ही होती.काही ठराविक वेळाने पाणी आणि विश्रांतीसाठी पाच मिनिटे थांबत असू.चांगली दोन अडीच तास पायांची दौड केल्यावर गडावरच्या मंदिराचे मोहक दर्शन झाल्यावर शांततेचा स्पर्श मनाला झाला.

आता मागचे लोक अजून गडावर पोहचायचे होते गडावर वाट  रेंगाळले कारण तारामती पर्यंतची वाट माहित नव्हती .सूर्योदय चुकतोय ही रुखरुख मनाला होती,किती वेळ झाली तरी मागची मंडळी येईना पुढे जाता येईना ,मला बाई रडूच यायला लागल होत.पण मंडळी आली.काहीच जण वर चढण्यासाठी निघाले आणि प्रियांकाने लीड केलं.मी झपझप पुढे निघाले.तारामती वेळेत गाठणे शक्यच नव्हते.एका पठारावर आलो ,समोर पहुडलेले  डोंगर ,उजनीचे पाणी,क्षितिजापाशी लाल केशरी रंगाची उधळण झाली होती.मी सर्वात पुढे होते.सर्वाना या जागी बोलवायला परत मागे गेले आणि तिथे घेऊन गेले.समोरच दृश्य पाहून मुली म्हणाल्या ‘वाह ,काकू ब्रो मानल तुम्हाला तुमच्या मुळे हा नजारा दिसतोय’ .आणि तत्क्षणी सुर्यनारायण बिंदूरूपातून हळू हळू क्षितीजातून उगवत होता.तुझ्याचसाठी थांबलो होतो अस सूर्य म्हणत होता जणू.दुर्गभ्रमंतीचे खूप लेख आणि फोटो पाहत असल्याने समोरचा ‘नेढ’ मला अचानक  ओळखता आला सर्वांना तो मी दाखवला.सोनेरी प्रभा सगळीकडे पसरली होती.सोनेरी उन्हात न्हाहून खाली उतरलो.

खाली उतरल्यावर कोकणकड्याकडे निघालो.कोकणकड्याचे अपूर्व सौदर्य डोळ्याचे पारणे फेडीत होते.एका टोकाकडून शेवटच्या  टोकापर्यंत अर्धगोलाकार कडा पाहत गेले.जमिनीवर उलट झोपून पाहत राहिले.नळीचा मार्ग, आजोबा डोंगर,सतीचा डोंगर,जुन्नर गेट,साधाल,नळीचा मार्ग,रोहिदासगड असे काही गड,वाटा ओळखता आले.कोकणकडा इथे सुर्योदया पूर्वी आलो तर हवामानाच्या अनुकुलतेनुसार इंद्रव्रज पाहण्याचा योग घडू शकतो.जे पहिल्यांदा इंग्रज शासनातील एका अधिकार्याने पहिल्यांदा पाहिलं आणि यांची नोंद केली .

नाश्ता केला आणि परत फिरल्यावर मंदिराकडे जाताना जागोजागीचे टेंट ,आबाल वृद्धांची मांदियाळी या पंढरीत दिसत होती.मंदिराचे शिखर आकर्षक आहे. इथे असलेल्या लेण्या पाहिल्या तारामती शिखरावर लेण्यात दिगंबर बालगणेश मूर्ती आहे.त्याबजुलाच अनेक मुर्तीविरहीत विश्राम गृह आहेत. ज्ञानेश्वर आणि इतर भावंडानी समाधी घेतल्यानंतर इथेच चांगदेवाने ‘तत्वसार’ १३ वे शतक ग्रंथ लिहिला त्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आणि सौंदर्याची महती(श्लोक -१०२८ -१०३३)  त्यात आहे .तसेच अनेक पुराणातही या गडाचा उल्लेख आहे ,हे रा.चि.ढेरे यांच्या ‘चक्रपाणि’ या ग्रंथात सांगितले आहे.तसेच इथे सापडलेला शिलालेख हा पुण्यातील चांगावटेश्वर शिलालेखा सारख्याच शैलीत आहे.गोनीदा यांनीही आपल्या पुस्तकांत हा शिलालेख आणि या गडाचा उल्लेख आहे.

हरिश्चंद्रगड या विषयी प्रा.प्र.के.घाणेकर यांचे एक उत्कृष्ट व्हिडीओ मी पहिला होता.त्यात सांगितल्या प्रमाणे नवव्या शतकातील  झांज या शिलाहार  राजाने गोदावरी व भीमाशंकर या व या दरम्यान उगम पावणाऱ्या नदींच्या उगम स्थानच्या जवळ एका शैलीची  इतर बारा शिव मंदिर उभारले.त्यातील पाच नाशिक ,पाच पुणे तर दोन(रतनवाडी,हरीश्चंद्रगड) नगर जिल्हातील आहेत.हरिश्चंद्रगड गडावर मंगळगंगा नदीचा उगम होतो तिथे हे हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर आहे.हीच नदी पुढे मुळा नदी होते.त्यामुळेच इथे पाण्याचा अनेक नैसर्गिक टाक्या ज्या अत्यंत स्वच्छ पिण्यायोग्य आहे.मंदिराबाहेर दोन शिलालेख आहेत ज्यात चांगदेवाचा उल्लेख आहे.समोरच असलेली सप्ततीर्थ पुष्करणी आणि १४ मंदिर सदृश्य कोनाडे पाहिले.तसेच जागोजागी अनेक छोटे छोटे मंदिरे आहेत.

त्यांनतर केदारनाथ गुफेत गेलो.त्याच्या जवळच असलेल्या ओढ्यामुळे इथे पावसाचे पाणी आत शिरते .ओव्हर फ्लो नंतरचे अतिरक्त पाणी २ मीटरच्या आसपास उंची असलेल्या भव्य शिवपिंडीच्या आजूबाजूला थंडगार पाणी सतत असते.पाण्यात उतरून दर्शन घेतले.एका भिंतीवर असलेले शिवपूजन शिल्प पाहिले.

मनाची थंडाई झाल्यावर या सुंदर गडाच्या आठवणी साठवून गड उतरायला लागलो.चढतांना अंधार होता आता सजगतेने गड पाहत उतरू लागलो. गावात पोहचल्यावर गरमागरम बाजरीची भाकरी ,मटकी,इंद्रायानी भात वाट पाहतच होत.इतक्यात समोर जालावरचे मित्र असणारे ,योग,ट्रेकिंग याचे सच्चे जाणकार विवेक पाटील समोर दिसले.वाह ,अमला तर खूप आनंद झाला.इतक्या दिवस त्यांच्या सर्व पोस्ट वाचत आले आहे आणि ९९.९९% त्या मला पटतात आणि आवडतातच अनेकदा तिथे मी मत मांडते.आम्ही बराच वेळ  आरोग्य,ट्रेकिंग,सिनेमा अनेक विषयांवर मोकळ्या गप्पा मारल्या.मला तर भारी ट्रेक नन्तर हा बोनसच आनंद मिळाला.



माझे काही जुजबी -निरीक्षण हरीश्चंद्रगड हा वेगवेगळया मार्गांनी चढता येतो.त्यातील सर्वात सोपी पाचनई ही वाट आहे तर अवघड माकडनाळ आहे असे समजले.तसेच खिरेश्वर,नळीची वाट ,टोलारखिंडीची वाट ट्रेकरकडून जास्त परिचितपणे वापरली जाते.कोकणकड्याहून सूर्यास्त वा सूर्योदय पाहण्यासाठी,तारामती शिखर सूर्योदय ,रात्रीचे आकाश निरीक्षण (अभ्यास) करण्यासाठी एक रात्र टेंट मध्ये राहण्याचे ,एक दिवस गड असे नियोजन पाहिजे.पावसाळ्यात मार्गदर्शक सह गडाचा माहोल अनुभवायला पाहिजे.पुष्पवैभव पाहण्यासाठी पावसाळ्यानंतर एक ट्रेक पाहिजे.आता मोजा मी आणखी किती वेळा हरिश्चंद्रगडावर जाणार आहे :)

-भक्ती

 

 

Sunday, January 7, 2024

स्मृतिचित्रे-लक्ष्मीबाई टिळक

 

 


स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे? असे त्या म्हणतात.पण नारायण टिळक आहेतच अगदी विलक्षण आणि हे लक्ष्मी नारायणाचे जोडपं दुधात साखर विरघळावी अगदी तसच अविरत गोडीचे ,हे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात पानोपानी समजते.

या पुस्तकाचे लिखाण त्यांनी टिळकांच्या हयातीनंतर त्यांच्या आठवणी मांडण्यासाठी तत्कालीन पाक्षिकात तीन भागात केले आहे.सासर माहेर दोन्ही अगदी धार्मिक कुटुंब आहेत.इतके की लक्ष्मीबाई लहानपणी त्यांच्या वडिलांना सोवळे कसे होत,व ती खोड भावंड कशी मोडत ते वाचतांना कमाल वाटते.सासरी सासू नाही पण सासरेही देशवार सुनेची नेहमी परीक्षा घेत.हे सगळ वाचताना सासू –सून मालिका प्लॉट वाचतोय अस वाटत .पण त्यातच नारायण टिळकांची चंचल वृत्ती सतत दिसून येते.ते खूप ज्ञानी,वेद जाणणारे पंडित पण ‘दामाजी’ त्यांना कधीच प्रसन्न नसे.तेव्हा ते सतत नोकरी निमित्त स्थलांतर करीत राहत.यात लक्ष्मी बाईंना कधी सासरी,माहेरी,आत्याकडे,बहिणीकडे अनेकदा मदत मिळत पण कडक बोलणेही मंडळीची ऐकावी लागत.टिळक कवीही थोर ,कीर्तनही करत .अशा प्रसंगाची कविता ते सहज रचत आणि कीर्तनातूनही सादर करत .असेच काव्य त्यांनी भिकुताई,’मंबाजीबाई’इतर अनेकांवर रचलेली लक्ष्मीबाईंनी सांगितले आहेत.पहिल्या अपत्य निधनानंतर टिळकानी रचलेले बापाचे अश्रू हे काव्य आणि घारू ताईला शब्दांचे घातलेले दागिने हे काव्य खूपच सुंदर आहे.

अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.”

टिळकाना रेल्वेत एक ख्रिस्ती भेटतात वादविवाद आणि व्याख्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या टिळकांनी ख्रिस्ती धर्माविषयी अनेक प्रश्न केले,तेव्हा त्यांच्या हाती पडला ख्रिस्ती धर्मग्रंथ ,आणि प्रभू ‘येशू’यांचे ते हळू हळू अनुयायी होऊ लागले.टिळक धर्मांतर करणार तेव्हा लक्ष्मीबाई बहिणीकडे होत्या.उच्च धर्मियाने धर्मांतर करणे त्या काळात गहजबच होता.लक्ष्मी बाईंचे त्या व नंतर पाच वर्षेचे दुसऱ्याकडील जीवन जीव आहे पण आत्मा नाही असेच होते.आजारांनी त्यांना बेजार केलेच आपण टिळकांवरचे त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच  प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या.व्याख्याने ,ख्रिस्ती कीर्तनेही करायच्या.

आणि नगरमधील त्यांचे वास्तव्य सुरु झाले नगर हे माझेच गाव तेव्हा तिथल्या स्टेशन ,चांदबीबी,डोंगरगण,फर्ग्युसन गेट,हिवाळे,रोबर्ट ह्यूम,राहुरी  इत्यादी विषयी त्या सांगताना कोणी शेजारीणच माझ्याशी गप्पा मारत आहे असे वाटले.

लक्ष्मीबाईंकडे  माणस जोडण्याची टिळकांप्रमाणे कला होती.अनेक मुले त्यांनी सांभाळली काही अनाथ,गरीब,आई नसलेली त्यात मराठीचे थोर कवी बालकवी हेही होते.तसेच अतरंगी लोकही भेटले.हे सगळे प्रसंग- काही प्लेगच्या कारुण्याचे त्यातही दांपत्याचा सेवाभाव दाखवणारे,ठोंबरे (बालकवी)बरोबरच्या आंबट गोड तरीही  आई मुलांच्या नात्याच्या हळव्या आठवणी आहेत.नगरला असतांना टिळकांनी अभंगांजली,ख्रिस्ती दरबार रचला.टिळक अनेकदा अडलेल्या मदत करत तेव्हा या कुटुंबाची काळजी रोबर्ट ह्यूम यांना असत व ते विविध योजनांद्वारे मदत करत हे जागोजागी त्यानी लिहिले आहेच.लोणावळा,सातारा येथले दिवस त्या उबदार आठवणी लिहिल्या आहेत.

दत्तूचे लग्न, बेबीचे शिक्षण ,शेवटच्या दिवसांत टिळकांची संन्यस्त वृत्ती या बाबतचे एक कौटुंबिक सौख्य शब्दोतीत होते.टिळकांनंतर  मुंबईत एक मुलींच्या वसतिगृहावर मेट्रन ही नोकरी स्वीकारली  तेव्हा कुटुंबाला स्थिरत्व देतांनाही  त्यांना आनंदच होतो,मी अशिक्षित मला नोकरी मिळाली हेही खूप महत्वाचे असे त्यांना वाटत.त्यांनी इंग्रजी शिकण्याचा,अगदी नर्सही होण्याचा प्रयत्न केला पण नशीब साथ देईना.मराठी वाचता ,लिहिता येत पण जोडाक्षरे त्यांना लिहायला अवघड जात त्याचा बालकवीबरोबरच ‘मनुष्य’ शोधतेय हा आणि बालकवी यांनी त्यांच्या पुस्तकासाठी लिहिलेली खोटी खोटी प्रस्तावना खूप गमतीशीर आहे.

बेबी ,सून रुथ आणि नातवंड नाना ,अशोक बरोबरचे कराचीचे पारप्रांतातले घराचा अनुभव अखेरच्या पानांवर आहेत.

नारायण टिळक नावच शब्दांचे,लोकसेवेचे ,असामान्य वादळात लक्ष्मीबाई यांनी अनेक उतार चढाव करत परिपूर्णपणे अनुभवलं.त्या याच वर्णन करताना लिहितात , “आमच्यात जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा सवेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा.डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटार्याची जी आदळआपट होईल ती माझी होत असे.त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येये पटवून घेण्यास अवसर मिळाला ,की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चाले”

लक्ष्मी बाईचा कविता प्रवासही या स्मृतिचित्रांतून उलगडतो.टिळक धर्मांतरासाठी दूर जातात तेव्हा-नवरा,करंज्यातील मोदक,पतीपत्नी,श्रीमती,नातवावरची कविता यात वाचायला मिळतात.
टिळक लिहित असलेल्या अपूर्ण  ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय लिहून लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ पूर्ण केले. १९३३च्या साहित्य संमेलनात त्या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.

या आत्मचरित्रात अनेक प्रसंग कालानुसारच पण आठवतील असे गप्पांसारखे लिहिले आहेत.सहजच आनंद,दुखा:ची रेशमी झालर,माणसांची ऊब,ईश्वाराची असीम कृपा पानोपानी वाहत आहे.म्हणूनच एका शतकानंतरही लक्ष्मीबाईन्चे ही स्मृति चित्रे अजरामर आहेत. 

-भक्ती

नारायण वामन टिळक यांहही नगरमधील सिद्धार्थ नगर येथील ख्रिस्ती दफनभूमितले स्मृतीस्मारक(त्यांचे दहन करून त्यांच्या अस्थी येथे ठेवण्यात आल्या आहेत).टिळकांच्या शेवटच्या इच्छेनुसार इथे पांढऱ्या दगडात “पुष्कळ अजुनी उणा प्रभू,मी पुष्कळ अजुनी उणा रे !”  ह्या ओळी कोरला आहेत.पुस्तकातील ८० व्या “छाया” टिळकांच्या मागेच जवळ त्यांचे अखंड हितचिंतक रोबर्ट ह्यूम यांचेही पुढील काळात  दफन करण्यात आले आहे.स्मृतीभागात त्याच्या मृत्युपत्र सविस्तर सांगितले आहे.त्यामुळे हे स्थळ आज पाहताना काळ मागे गेला व समोर उभा राहिला असे वाटले.