Wednesday, August 5, 2026

हंपीचा ध्यास -६ (विजयविठ्ठल मंदिर )








हंपीच्या पहिल्या दिवशी हंपी खरेदीसाठी फेरफटका मारला .तेव्हा हॅम्प कापडापासून बनवलेल्या बॅग घेतल्या.भांगेच्या झाडापासून बॅग ?त्यावर तर बंदी आहे ना ?असा प्रश्न मनात आला.
ते शोधाता असे समजले की ,ज्या हेम्प बॅग्स बाजारात विकल्या जातात त्या THC खूप कमी असलेल्या औद्योगिक हेम्पपासून बनवल्या जातात. त्यामुळे त्या सुरक्षित आणि कायदेशीर आहेत.
हंपीत कुठे सूर्योदय कुठे सूर्यास्त याची यादीच मी बनविली होती .पण आदल्या दिवशी इतकी दमली की दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय रम बाहेरच्या गॅलरीतूनच पाहिला .खार सांगते तोही कमाल होता .पाखरांचे थवे स्वछंद्पणे तांबूस आकाशात विहरत होते.विचार आला ,हंपीचे पक्षीही काय सुरेख आहेत :)
हंपीत एक सुंदर काफ्तान पद्धतीचा कुर्ता घेतला होता ,एकदम क्लास लुक झाला.ज्यामुळे आजचे सगळे फोटो मस्त येणार याचा मनात लाडू फुटला :)
आम्ही आधी विठ्ठल मंदिराकडे निघालो 

मंदिर उंच भिंतींनी वेढलेले असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्यांना पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळील तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करावे लागते.या मंदिरात काढलेले २५/- /व्यक्ति तिकीट हे सर्व स्थळांना चालते जसे लोटस महाल,कमलापूर संग्राहालय  इ. 
हम्पी येथील विजया विठ्ठल मंदिरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बग्गी सुरू झाल्या आहेत.वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कंपनांमुळे प्राचीन अवशेषांना होणारे नुकसान टाळण्यासाठी, गेज्जाला मंडप आणि मंदिर परिसरादरम्यानच्या १ ते २ किलोमीटरच्या प्रतिबंधित पट्ट्यातून पर्यटकांची ने-आण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्या सुरू केल्या.
या  इलेक्ट्रिक बग्गीने पुढे मंदिराकडे जाताना लागतो -'विठ्ठल बाजार' हंपीतील विजय विठ्ठल मंदिराच्या समोर पसरलेला विठ्ठल बाजार हा विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचा जिवंत अवशेष आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूर्व-पश्चिम रस्ता तुंगभद्रा नदीला समांतर आहे. एकेकाळी येथे मौल्यवान दगड, रेशीम, मसाले, घोडे आणि हत्ती यांचा मोठा व्यापार चालत असे. आजही येथील स्तंभांच्या रांगा आणि मंडपांचे अवशेष पाहून त्या काळच्या गर्दीच्या बाजाराची कल्पना येते. पश्चिमेकडे विठ्ठल मंदिर आणि पूर्वेकडे गेज्जला मंडप अशा दोन टोकांनी बंदिस्त असलेला हा बाजार हंपीच्या इतिहासाची एक महत्त्वाची कडी आहे.



मंदीराच्या प्रवेश द्वाराशी भग्नावस्थेतील गोपुरम, जरी त्याचा वरचा भाग तुटलेला असला तरी, आपले स्वागत करते.हा गोपुर उद्ध्वस्त करण्यासाठी तोफ वापरून यावर गोळे डागले असण्याची शक्यता वाटते.विजय विठ्ठल मंदिर हे स्थापत्यकला, शिल्पकला, संगीतपरंपरा आणि भक्तिसंस्कृती यांचा अद्वितीय संगम घडवणारे स्मारक म्हणून विशेष महत्त्वाचे आहे.
विजय विठ्ठल मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे. मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात मुख्य मंदिराबरोबरच भव्य महामंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप, दगडी रथ आणि विविध लहान देवळे आहेत. मंदिराच्या दगडी रचनेतून विजयनगरच्या शिल्पकारांचे कौशल्य दिसते,तर त्याच परिसराशी जोडलेल्या पुरंदरदासांच्या परंपरेतून विठ्ठलभक्ती आणि कर्नाटक संगीताचा इतिहास उलगडतो. त्यामुळे विजय विठ्ठल मंदिराचा अभ्यास हा केवळ एका मंदिराचा अभ्यास न राहता विजयनगरच्या व्यापक सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास ठरतो. 




 मंदिराच्या निर्मितीचा इतिहास
विजय विठ्ठल मंदिराच्या बांधकामाची सुरुवात विजयनगरचा राजा देवराय द्वितीय (इ.स. १४२२-१४४६)यांच्या कारकिर्दीत झाल्याचे उपलब्ध माहितीत नमूद केले आहे. मंदिराचा मूळ गाभा या काळात अस्तित्वात आला. पुढे विजयनगर साम्राज्याच्या राजाश्रयामुळे मंदिरसंकुलाचा विस्तार होत गेला.
कृष्णदेवराय (इ.स. १५०९-१५२९)यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या विकासाला विशेष चालना मिळाली. शंभर स्तंभी मंडप, गोपुरे आणि इतर वास्तूंच्या निर्मितीशी त्यांचा संबंध जोडला जातो. पुढे अच्युतराय (इ.स. १५२९-१५४२) आणि सदाशिवराय यांच्या काळातही मंदिरातील काही भाग पूर्ण झाल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे आज दिसणारे मंदिर हे एका राजाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेले बांधकाम नसून, अनेक पिढ्यांच्या राजाश्रयातून विकसित झालेले विस्तीर्ण मंदिरसंकुल आहे. 
विजयनगरच्या काळात विठ्ठलभक्तीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. विठ्ठलाच्या नावावरून काही गावांची नावे बदलण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरातील स्तंभ, भिंती आणि तुळयांवर विठ्ठलाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी राजा आणि राणी विठ्ठलासमोर भक्तिभावाने उभे असल्याचे चित्रणही आढळते. यावरून राजसत्ता आणि धार्मिक भक्ती यांच्यातील संबंध अधोरेखित होतो. 
विजय विठ्ठल मंदिराचे संपूर्ण संकुल एका प्रशस्त तटबंदीच्या आवारात आहे. पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिशांना भव्य गोपुरे असून त्यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो. या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य विठ्ठल मंदिराबरोबरच देवीचे मंदिर, महामंडप, रंगमंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप आणि प्रसिद्ध दगडी रथ आहेत.भारवाहक स्तंभांना केवळ वास्तुशास्त्रीय उपयोगापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यावर देवदेवता, याली, घोडे, हत्ती, योद्धे, पौराणिक प्राणी आणि विविध अलंकारिक आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक वास्तुघटक हा स्वतंत्र कलाकृतीसारखा भासतो. 

मंदिराच्या प्रांगणात शिरताच समोर उभा होता तोच जगप्रसिद्ध "दगडी रथ"



विजय विठ्ठल मंदिराचे सर्वाधिक प्रसिद्ध प्रतीक म्हणजे त्याच्या आवारातील दगडी रथ. रथाच्या स्वरूपात बांधलेली ही वास्तू प्रत्यक्षात गरुडाचे मंदिर आहे. वैष्णव परंपरेनुसार गरुड हा भगवान विष्णूचा वाहन मानला जातो.रथाची संपूर्ण रचना दगडातून साकारलेली असून ती लाकडी मिरवणुकीच्या रथाची प्रतिकृती भासते. रथाच्या चाकांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की ती अक्षाभोवती फिरू शकत होती. पूर्वी ही चाके फिरवता येत असत; मात्र संरक्षणाच्या दृष्टीने आता ती स्थिर करण्यात आली आहेत. 
रथाच्या स्थापत्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे बदलते स्वरूप. आज रथासमोर दोन हत्ती दिसतात,मात्र उपलब्ध निरीक्षणानुसार मूळ रचनेत येथे घोडे असावेत, असे मानले जाते. आजच्या हत्तींच्या मागील भागाजवळ घोड्यांचे मागचे पाय आणि शेपटीसदृश अवशेष दिसतात. यावरून रथाच्या पुढील भागात नंतर बदल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
रथावर पूर्वी विटांचे शिखर होते, असेही नमूद केले जाते. कालांतराने ते नष्ट झाले. त्यामुळे आज दिसणारा रथ हा मूळ वास्तूचा अवशेष असला तरी त्यात काळानुसार झालेले बदलही स्पष्टपणे जाणवतात.
 
रथावरील रंगकामाचे अवशेष
विजयनगरमधील शिल्पे केवळ दगडाच्या नैसर्गिक रंगात ठेवली जात नसत, तर त्यांवर रंगकाम केले जात असल्याचे पुरावे आढळतात. दगडी रथाच्या काही भागांवर आजही जुन्या रंगकामाचे अवशेष पाहायला मिळतात. विशेषतः रथाच्या खालच्या भागातील तुलनेने संरक्षित भागांमध्ये रंगाचे अंश टिकून राहिले आहेत.दगडी रथ आज भारतीय सांस्कृतिक वारशाचे एक प्रसिद्ध प्रतीक बनला आहे. त्याचे चित्रण भारतीय चलनी नोटेवरही करण्यात आले आहे. 






रथाच्या बरोबर समोर नृत्यमंडप किंवा संगीत मंडप /रंग मंडप 


विठ्ठल मंदिर हे आधी बंदिस्त मंडपाचे होते .नांतरच्या काळात याला खुले मंडप जोडले/बांधले गेले.मुख्य बांधकाम कृष्णदेवराय  यांच्या काळात झाले.
विठ्ठल मंदिराच्या काही भागांमध्ये (उदा. प्रवेशद्वारे/गोपुर) कृष्णदेवरायांच्या दोन राण्यांनी तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी योगदान दिले होते 
पण ऐतिहासिक परंपरेनुसार,पूर्वी नृत्य-संगीत कार्यक्रमांच्या वेळी राणी किंवा राजघराण्यातील स्त्रिया प्रेक्षक म्हणून येत असत.
त्यांच्या गोपनीयता राखण्यासाठी मंडपाच्या काही भागांवर किंवा बाजूच्या जागांवर कापडी पडदे / पडदे लावले जात.
काही ठिकाणी नर्तकी किंवा देवदासींच्या कार्यक्रमातही गोपनीयतेसाठी पडदे वापरले जात.यासाठी छतांना आणि पायापाशी काही तुळया दिसतात ज्यांना हे पडदे बांधले जात असावे.काही ऐतिहासिक स्रोतांनुसार ती पूर्वी हम्पीतील विरुपाक्ष मंदिरातील देवदासी / नर्तकी होती. तिच्या सौंदर्य आणि नृत्यकलेमुळे कृष्णदेवराय तिच्या प्रेमात पडले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.तिच्यासाठी हा रंग महाल बांधला असावा अशीही धारणा आहे .

मुख्य सभागृहात रंगा मंडपात ५६ दगडी खांब आहेत.प्रत्येक मुख्य खांबाभोवती लहान खांब कोरलेले आहेत.या खांबांना हळूवार थाप दिल्यास वेगवेगळे संगीत स्वर (सा-रे-ग-म-प-ध-नि) किंवा वेगवेगळ्या वाद्यांसारखे आवाज येतात.मृदंग,वीणा,तबला,झांज,इतर तालवाद्ये.म्हणजे संपूर्ण हॉल एक मोठे वाद्य असल्यासारखे वाटायचे.आता संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास पूर्ण मनाई आहे. पूर्वी गाइड लोक थाप देऊन दाखवत होते, पण आता ते बंद आहे.प्रत्येक मुख्य स्तंभ सुमारे ३.६ मीटर उंच आहे.मुख्य स्तंभाभोवती ४ ते ७ कधीकधी १६ लहान स्तंभ कोरलेले आहेत.हे सर्व स्तंभ एकसंध  ग्रेनाइट शिळेतून कोरलेले आहेत.
काही स्तंभ मृदंग, तबला, डमरू, घंटा, वीणा यांसारख्या वाद्यांचे आवाज देतात.
रहस्य काय होते?-लोकांना वाटायचे की स्तंभ आतून पोकळ असावेत किंवा आत धातु/तार असावी. ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांनी रहस्य जाणून घेण्यासाठी दोन स्तंभ कापून पाहिले. पण आत काहीही नव्हते .पूर्ण ठोस दगडच होता. ते कापलेले स्तंभ आजही मंदिर परिसरात दिसतात.
२००८ मध्ये इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (कल्पाक्कम) येथील शास्त्रज्ञांनी या स्तंभांचे वैज्ञानिक परीक्षण केले. त्यांनी अल्ट्रासोनिक, इम्पॅक्ट-इको आणि मेटलोग्राफी तंत्र वापरले.त्यावर हे दिसते कि,स्तंभ पूर्णपणे ठोस ग्रेनाइट आहेत.
आवाज फ्लेक्सुरल व्हायब्रेशन -स्तंभाच्या बाजूला वाकण्याच्या कंपनामुळे निर्माण होतो. हे ट्युनिंग फॉर्कसारखे काम करते.स्तंभाची लांबी, जाडी, आकार आणि दगडाची घनता यामुळे विशिष्ट फ्रिक्वेन्सी  तयार होते.लहान-जाड स्तंभ उच्च स्वर देतात, तर लांब-बारीक स्तंभ खोल स्वर देतात.
शास्त्रज्ञांनी मोजलेली फ्रिक्वेन्सी आणि प्रत्यक्ष निघणारा स्वर जुळतो. म्हणजे हे जाणीवपूर्वक तयार केले गेले होते.उदाहरणार्थ, एका स्तंभातून सुमारे ६४६ हर्ट्झ आणि दुसऱ्यातून ५३८ हर्ट्झ असा स्पष्ट आवाज निघतो.
आजची स्थिती
आज ASI ने संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास मनाई केली आहे आणि QR कोडद्वारे संगीत ऐकवले जाते.





कल्याणमंडप - विवाहविधी आणि उत्सवांचे दालन 



विजय विठ्ठल मंदिर संकुलातील कल्याणमंडप ही आणखी एक महत्त्वाची वास्तू आहे. ‘कल्याण’ म्हणजे मंगल किंवा विवाहाशी संबंधित असा अर्थ घेतला जातो. या मंडपाचा संबंध देव-देवतांच्या प्रतीकात्मक विवाहसोहळ्यांशी जोडला जातो.
मंडपाच्या मध्यभागी उंच, सुबकपणे घडवलेला मंच आहे. धार्मिक परंपरेनुसार येथे देव-देवतांच्या विवाहविधींचे आयोजन केले जात असावे. उपलब्ध माहितीनुसार विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतीकात्मक विवाहाशीही या मंडपाचा संबंध जोडला जातो.
कल्याणमंडपाच्या स्तंभांवर याली, घोडे, हत्ती, देवदेवता, योद्धे आणि विविध पौराणिक आकृत्यांचे कोरीव काम आहे. छत, तुळया आणि अधिष्ठानावरही सूक्ष्म नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे कल्याणमंडप हा धार्मिक उपयोगाबरोबरच विजयनगरच्या शिल्पकौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. 
मंडपाची खुली आणि प्रशस्त रचना मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यासाठी उपयुक्त होती. त्यामुळे धार्मिक विधी, उत्सव आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा विचार करून मंदिर वास्तूंची आखणी केली जात असल्याचे या रचनेतून दिसते.
महामंडपातील शिल्पे 
विजय विट्ठल मंदिराच्या महामंडप मध्ये अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. महामंडपाच्या अंतर्गत रचनेत मध्यवर्ती भागातील १६ स्तंभांचा समूह विशेष लक्षवेधी आहे. या भागातील स्तंभांवर याली, नरसिंह आणि इतर शिल्पविषयांचे अंकन आढळते.पायावरील शिल्पे,घोडे आणि योद्धे 
हंस ,दशावतारांच्या लहान प्रतिमा,विविध अलंकारिक नक्षीकाम केलेले आहे.


विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह
विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह हे मुख्य मंदिराचा सर्वात आतील आणि पवित्र भाग आहे. हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ आणि आच्छादित प्रदक्षिणापथ अशी रचना येथे दिसते. गर्भगृहावरील कळस विटांचा असून तो त्रितल द्रविड विमानाच्या स्वरूपात बांधलेला आहे.
येथे मूळतः भगवान विठ्ठल यांची मूर्ती स्थापित होती. मूर्ती कटीवर हात ठेवून उभी असण्याची परंपरा आहे. मात्र इ.स. १५६५ मध्ये तालिकोटच्या युद्धानंतर मंदिर उद्ध्वस्त झाले आणि गर्भगृहातील मूर्ती नष्ट झाली किंवा हलवली गेली. त्यामुळे आज गर्भगृह रिकामे आहे.
गर्भगृह आणि सभामंडपाच्या भिंतींवर एकाआड एक सुशोभित स्तंभ तसेच खोल कोनाडे कोरलेले आहेत. प्रवेशद्वारावर वैष्णव द्वारपाल आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असल्याचे उल्लेख आढळतात. गर्भगृह पूजेचे पवित्र स्थान असल्याने आतील भाग तुलनेने साधा ठेवण्यात आला आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ असल्याने भक्त मूर्तीभोवती फिरू शकत असत. 
पंढरपूरची विठठ्ल मूर्ती काही काळ येथे हलवली होती अशी आख्यायिका आहे.तेव्हा रिकाम्या गर्भगृहातील त्या रिकाम्या स्थानावर माथा टेकवतांना अगदी भरून आले होते.पंढरपूर का विजयनगर विठ्ठलाचे मूळ गाव असे वाटले .सध्याच्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या एका शिलालेखावर एक जुना १२३७ चा एक लेख आढळला आहे. त्यावर असे लिहिले आहे की होयासाला राजा सोमेश्वर पंढरपूर हे गाव दान म्हणून दिले.
परंतु बर्‍याच इतिहासकारांचे मत असे आहे की विठ्ठल मंदिर हे तेराव्या शतकाच्या अगोदरच बांधली गेले आहे.पांडुरंग हे नाव सहाव्या शतकातील राष्ट्रकुट साम्राज्याच्या तांब्याच्या एका पत्र्यावर आढळले आहे. त्यामुळे कदाचित हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते.
14 व्या शतकामध्ये ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या मलिक कफूर याने होयसला व यादव साम्राज्याचा नाश केला,त्यावेळेस पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही विजयनगर साम्राज्य हलवण्यात आली .तेच आज हंपी येथे विजय विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तलिकोटा च्या लढाईनंतर हंपी साम्राज्य ढासळले ,तरीसुद्धा आज शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हंपी प्रसिद्ध आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे.
ज्या वेळेस विजयनगर साम्राज्याची राजे कृष्णदेवराय यांना वाटले कि पंढरपूर आता सुरक्षित आहे, त्यावेळेस त्यांनी ती विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांच्याकडे सोपवली व अशाप्रकारे ती मूर्ती परत पंढरपुरास आणली गेली. अशाप्रकारे विठ्ठलाचे वारकरी आणि हरिदास असे दोन सांप्रदायिक असणारे भक्त तयार झाले. वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील आणि हरिदास हे कर्नाटकातील भक्त होय.अजून तरी विठ्ठलाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाच माहीत नाही.



मंदिराच्या बाहेर एक मोठा शिलालेख कोरलेला आहे.एकूण विठ्ठल मंदिर परिसरात २३ हून अधिक शिलालेख आहेत (१५१३ ते १५६४ पर्यंतचे).

१. इ.स. १५१३ : विठ्ठलदेवासाठी गावाची देणगी
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, Dynasties of Vijayanagara, No. 490 (A.R. No. 687 of 1922) मध्ये हा अभिलेख नोंदवला आहे. तो हम्पीच्या जवळील होस्पेट तालुक्यातील मुदलापूरम येथे सापडलेल्या दगडी फलकावर आहे. लेखाचा काल शक १४३५, श्रीमुख, चैत्र शु. ५, म्हणजे इ.स. १५१३ असा दिला आहे. तो कृष्णराय महारायांच्या कारकीर्दीतील आहे.
प्रकाशित इंग्रजी आशयाचा मराठी अनुवाद
“कृष्णराय महारायांनी अंगिरस संवत्सरातील फाल्गुन कृष्ण पक्ष अमावास्येला, सूर्यग्रहणाच्या प्रसंगी, होसूर-मगाणीतील विरुपापूर हे गाव विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी दान केले. या दानातून विठ्ठलदेवाच्या रथोत्सवाबरोबरच दैनिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सवांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असा त्याचा उद्देश होता. हे दान राजाचे वडील नरसन्ना-नायक-वोडेय आणि आई नागाजी-अम्मा यांच्या पुण्यस्मरणार्थ करण्यात आले.”
हा अभिलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो केवळ मंदिराला दिलेल्या जमिनीच्या दानाची नोंद करत नाही, तर विठ्ठल मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांची नियमितता देखील सूचित करतो. दैनिक पूजा, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सव तसेच रथोत्सव यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक आधार उपलब्ध करून दिला जात होता. यावरून मंदिर ही नियमित धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेवर चालणारी संस्था होती, असे दिसते.
१५१३ च्या मंदिरातील शिलालेखाचा आणखी एक संदर्भ
विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशाजवळ इ.स. १५१३ चा कन्नड शिलालेख असल्याचा स्वतंत्र छायाचित्रात्मक पुरावा उपलब्ध आहे. त्या शिलालेखात कृष्णदेवरायांच्या तीन राण्या, त्यांचे वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांची नावे येतात, अशी नोंद छायाचित्राच्या अधिकृत वर्णनात केली आहे.

“विजय विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशभागात इ.स. १५१३ चा कृष्णदेवरायकालीन कन्नड शिलालेख आढळतो. या लेखात राजाच्या कुटुंबीयांचा—त्यांच्या राण्या, वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांचा उल्लेख येतो. त्याच काळातील South Indian Inscriptions मधील No. 490 हा विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी गावदानाची नोंद करणारा स्वतंत्र अभिलेख आहे. या दोन्ही पुराव्यांचा एकत्रित विचार केल्यास कृष्णदेवरायांच्या काळात विठ्ठलदेवाच्या उपासनेला आणि मंदिरव्यवस्थेला राजाश्रय मिळत असल्याचे दिसते.”
२. इ.स. १५१६–१७ : शंभर स्तंभी मंडपाचा शिलालेख
हा पुरावा अधिक स्पष्ट आहे.
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, No. 502 (A.R. No. 711 of 1922) मध्ये तो नोंदवला आहे. हा शिलालेख हम्पीच्या विठ्ठलस्वामी मंदिरातील शंभर स्तंभी मंडपाच्या उत्तरेकडील भिंतीवर असल्याचे प्रकाशित नोंदीत स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची तारीख शक १४३८, धातु संवत्सर, म्हणजे इ.स. १५१६–१७ अशी दिली आहे.
प्रकाशित आशयाचा मराठी अनुवाद
“शक १४३८, धातु संवत्सरात राजा कृष्णराय महाराय यांनी देव विठ्ठलदेवासाठी शंभर स्तंभांचा मंडप बांधून घेतला.”
हा छोटा शिलालेख मात्र मंदिराच्या स्थापत्य इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येथे विशिष्ट वास्तू ‘शंभर स्तंभी मंडप’ कृष्णदेवरायांनी बांधून घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे या मंडपाच्या निर्मितीला कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीशी जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्राथमिक पुरावा ठरतो.


विठ्ठल मंदिरातील अत्यंत गंमतीदार आणि कलात्मक कल्पकतेचे उदाहरण म्हणजे बैल आणि हत्तीचे संयुक्त शिल्प.
या शिल्पात शरीराचा एक भाग बैलाचा आणि दुसरा हत्तीचा दिसतो, दोन्हींचे एकच संयुक्त मस्तक असल्याने पाहणाऱ्याला कोणता प्राणी कुठे संपतो आणि दुसरा कुठे सुरू होतो याचा भास निर्माण होतो. हे शिल्प विठ्ठल मंदिराशी संबंधित म्हणून स्वतंत्रपणे नोंदलेले आहे.
विठ्ठल मंदिरातील एक अद्भुत शिल्प म्हणजे मकर. हा पौराणिक मिश्र प्राणी हत्ती, ससा, वाघ, साप आणि मगर (किंवा मासा/मोर) या पाच प्राण्यांच्या अवयवांचे एकत्रित रूप आहे. विजयनगर काळातील शिल्पकारांनी हे शिल्प आदर्श राजाच्या गुणांचे प्रतीक म्हणून कोरले. हत्ती शक्ती आणि स्थैर्य, वाघ धैर्य, साप चातुर्य व लवचिकता, ससा सतर्कता आणि मगर नियंत्रण दर्शवतो. म्हणजेच राजाकडे हे पाच गुण एकत्र असावेत, तरच तो साम्राज्य यशस्वीपणे चालवू शकतो.असा या शिल्पाचा प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिराच्या खांब, तोरण आणि कल्पाना मंडपावर हे शिल्प दिसते आणि कोनातून पाहिल्यावर वेगवेगळे प्राणी स्पष्ट दिसतात.
विठ्ठल मंदिराच्या छतावरून पावसाचे पाणी कसे नियंत्रित केले जाते.छतावर असलेल्या छिद्रांमधून पाणी आत येते आणि नंतर खाली पडते, जणू मंदिरात मोती टपकत आहेत असल्यासारखे दिसते.तसेच बाहेरील छत चिनी पॅगोडासारखे आहे.
 याच परिसरात आणखी एक अद्भुत शिल्प आहे  पाच-इन-वन शिल्प. एकाच दगडात कोरलेल्या या शिल्पात पाच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात.माकड आणि तिचे पिल्लू, शिवलिंग, हनुमान आणि इतर प्राणी किंवा आकार. कोनातून पाहिल्यावर हे सर्व रूपे स्पष्ट दिसतात, ज्यामुळे विजयनगर काळातील शिल्पकारांची कला आणि कल्पनाशक्ती दिसून येते.हे शिल्प गाईड हमखास दाखवतातच.


उत्सव मंडप हा उत्तर-पूर्व कोपऱ्यात उत्सवांसाठी बांधलेला आहे.तर १०० खांबी मंडप दक्षिण बाजूच्या प्राकारात कृष्णदेवराय कालीन (१५१६) बांधलेला आहे.पायऱ्यांवरील बालस्ट्रेड पूर्वेकडील पायऱ्यांवर हत्ती उत्तर आणि दक्षिण पायऱ्यांवर याली आहे.























हंपीच्या दगडी वैभवात विजय विठ्ठल मंदिराचा दगडी रथ जितका प्रसिद्ध आहे, तितकेच त्याच्या आसपास उभे असलेले हे वयोवृद्ध चाफ्याचे झाडही लक्ष वेधून घेते. ते दगडी रथाच्या अगदी जवळ, मंदिराच्या आवारात आहे. या नोंदीत त्याला “Vitthala Chariot Tree” असे नाव देण्यात आले असून, मंदिर परिसरातील प्रमुख वृक्ष म्हणून त्याची नोंद आहे.
हे झाड आपल्या वाकड्या-तिकड्या, वयाने झिजलेल्या फांद्या, जाड खोड आणि सुरकुतलेल्या सालामुळे विशेष उठून दिसते. दगडी स्थापत्याच्या कठोर, करड्या पार्श्वभूमीवर त्याच्या फांद्यांची सजीव वळणे आणि चाफ्याची फुले एक वेगळाच सौंदर्यबिंदू निर्माण करतात. आम्ही त्या झाडाकडे कौतुकाने पाहत असताना त्यावर एक घुबड दिसले.घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते.लक्ष्मी देवी संपत्ती, समृद्धी आणि शुभतेची देवी असल्याने मंदिरातघुबड दिसणे शुभ लक्षण मानले जाते,हा योगायोग कायम मनावर कोरला गेला आहे.



विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला, तुंगभद्रा नदीच्या उजव्या तीरावर वाळूच्या दगडाच्या स्तंभांचा एक मोकळा विस्तार आहे. सोळाव्या शतकात बांधलेला हा मंडप आता पुरंदरमंडपम म्हणून ओळखला जातो . विठ्ठलाचे महान भक्त पुरंदरदास (१४८४-१५६४) यांच्या नावाने हे ओळखले जाते.पुरंदरदास हे मध्वयती आणि व्यासातीर्थ यांचे अनुयायी होते.


पुरंदरदास -विठ्ठलभक्तीचा संगीतस्वर



विजय विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेले सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'पुरंदरदास'. सु. इ.स. १४८४–१५६४ या काळात होऊन गेलेले पुरंदरदास हे कर्नाटक संगीतपरंपरेतील अत्यंत प्रभावशाली संतकवी मानले जातात.त्यांचे जन्मनाम श्रीनिवास किंवा तिम्मप्पा नायक असे सांगितले जाते. ते सुरुवातीला संपन्न रत्नव्यापारी होते. एका प्रसंगानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झाले आणि त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला.श्रीनिवास नायक यांनी सर्व संपत्ती त्याग केल्यानंतर पत्नी व कुटुंबासह पंढरपूरला गेले आणि तेथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केले.तेथेच त्यांनी विठ्ठलभक्तीत मग्न राहून भक्तीगीते रचली आणि गात फिरले.
नंतर एका स्वप्नात किंवा दिव्य आज्ञेने त्यांना हंपीला जाऊन व्यासतीर्थ (व्यासराय) यांच्याकडे दीक्षा घेण्याची प्रेरणा झाली. तेथे १५२५ च्या सुमारास त्यांना “पुरंदर विठ्ठल” हे नाम मिळाले.
पंढरपूराशी त्यांचा संबंध फक्त वास्तव्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या सर्व रचनांमध्ये 'पुरंदर विठ्ठल' हे अंकित (स्वाक्षरी) आहे, जे पंढरपूरच्या विठ्ठलाचेच आहे. पंढरपूरच्या मंदिरात एक खांब 'पुरंदरदास खांब' म्हणून ओळखला जातो, जिथे ते भक्ती करीत असत अशी आख्यायिका आहे.शेवटी ते हंपीत राहिले आणि तिथेच १५६४ मध्ये समाधिस्थ झाले. पंढरपूर हे त्यांच्या भक्तीचे आणि संगीतकार्याचे महत्त्वाचे केंद्र होते.
त्यांच्या पदांच्या शेवटी ‘पुरंदर विठ्ठल’ हे अंकित आढळते. विठ्ठल हे त्यांचे इष्टदैवत होते. त्यांनी विठ्ठलाला केवळ दुरून पूजला नाही, तर मित्र, आई, वडील आणि स्वामी अशा विविध मानवी नात्यांत अनुभवले. साध्या कन्नड भाषेत रचलेल्या त्यांच्या पदांमधून विठ्ठलभक्ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली.परंपरेनुसार ४,७५,००० रचना रचल्या. आज सुमारे १,००० ते १,२०० रचना उपलब्ध आहेत. हम्पीतील विठ्ठल मंदिराजवळील पुरंदर मंडपाशी त्यांचा संबंध जोडणारी परंपरा आहे. तेथे ते वास्तव्य करून रचना करीत असत, असे मानले जाते. या परंपरेचा उल्लेख मंदिराच्या सांस्कृतिक स्मृतीत आजही आढळतो.


कर्नाटक संगीताला पुरंदरदासांचे योगदान
पुरंदरदासांचे महत्त्व केवळ भक्तिपदांच्या रचनेपुरते मर्यादित नाही. कर्नाटक संगीताच्या शिक्षणपद्धतीला क्रमबद्ध स्वरूप देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या नावाशी जोडले जाते.त्यांनी सरळी वरिसाई, जंत स्वर, अलंकार, गीते इत्यादी क्रमबद्ध सरावपद्धती विकसित केल्याचे मानले जाते. या पद्धतीमुळे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वराभ्यासापासून पुढील संगीतप्रकारांकडे क्रमशः वाटचाल करता येऊ लागली.त्यांनी लोकभाषा आणि लोकजीवनाला संगीताच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या गीतांमध्ये सामान्य माणसाचे जीवन, भावना, भक्ती आणि सामाजिक अनुभव यांना स्थान मिळाले. भाव, राग आणि लय यांचे एकात्मीकरण हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य मानले जाते.यामुळे पुरंदरदासांना कर्नाटक संगीताचे ‘पितामह’' म्हटले जाते. त्यांच्या कार्यामुळे पुढील कर्नाटक संगीतपरंपरेला एक भक्कम पाया आणि स्पष्ट दिशा मिळाली, अशी परंपरागत मान्यता आहे. 
पुरंदरदास यांचे प्रसिद्ध भजन कन्नड भाषेत तर आहेतच ,पण जी भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विक झालेले सध्याचे प्रसिद्ध भजन -"एलम्मा तुलसी कोमलवेणी "...यातला पुरंदर विठ्ठल राणी शब्द किती समर्पक आहे.https://www.youtube.com/watch?v=Y8ZApXcnhy4
ಕನ್ನಡ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ (Kannada Script)
ಪಲ್ಲವಿ
ಏಳಮ್ಮಾ ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ
ನೀಲವರ್ಣನ ರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ||ಪ||
ಚರಣ ೧
ಏಳುತಲೆದ್ದು ಶ್ರೀತುಳಸಿಗೆ ಕೈಮುಗಿದು
ಏಳು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕುತಲಿ
ಏಳು ಜನ್ಮದ ಪಾಪ ಕಳೆವಂಥ ತಾಯೆ ನೀ ||೧||
ಚರಣ ೨
ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಹೃದಯದೊಳ್ ಕೌಸ್ತುಭ
ತೊಟ್ಟ ಮುತ್ತಿನ ಅಂಗಿ ತೋಳ ಬಾಪುರಿಯು
ಇಟ್ಟ ದ್ವಾದಶನಾಮ ನೊಸಲಲ್ಲೆ ತಿಲಕವು
ಲಕ್ಷ್ಮೀರಮಣನು ನಿನಗೊಪ್ಪಿದನಲ್ಲ ತುಳಸಿ ||೨||
ಚರಣ ೩
ಎಡದ ಕೈಯಲ್ಲಿ ಶಂಖ ಬಲದ ಕೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ
ಎಡಬಲಕೊಪ್ಪುವ ಛತ್ರಚಾಮರವು
ಮುಡಿದ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂ ಮುಡಿಯಿಂದಲುದುರುತ
ಒಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರವಿಠಲನ ರಾಣೀ ||೩||
मराठी लिपीत (Devanagari / Marathi Script)
पल्लवी
एळम्मा तुळसी कोमलवेणी
नीलवर्णन राणी नित्य कल्याणी ||प||
चरण १
एळुतलेद्दु श्रीतुळसिगे कैमुगिदु
एळु प्रदक्षिणे हाकुतलि
एळु जन्मद पाप कळेवंथ ताये नी ||१||
चरण २
उट्ट पीतांबर हृदयदोळ् कौस्तुभ
तोट्ट मुत्तिन अंगि तोळ बापुरियु
इट्ट द्वादशनाम नोसलल्ले तिलकवु
लक्ष्मीरमणनु निनगोप्पिदनल्ल तुळसि ||२||
चरण ३
एडद कैयल्लि शंख बलद कैयल्लि चक्र
एडबलकोप्पुव छत्रचामरवु
मुडिद मल्लिगे हू मुडियिंदलुदुरुत्
ओडेय श्री पुरंदरविठलन राणी ||३||

“उठ, आई तुळशी, कोमल वेणी असलेली! नीलवर्ण (श्रीविष्णू) यांची राणी, नित्य कल्याणकारिणी!”


अजून एक भजन आहे ज्याने मला वेड लावले आहे :) https://www.youtube.com/watch?v=uCCaFqRoihQ
पल्लवी
तंबूरी मीटिदव
भवाब्धि दाटिदव ||प||
अनुपल्लवी
ताळव तट्टिदव
सुररोळु सेरिदव ||अ.प||
चरण
गेज्जेय कट्टिदव
खळरेदेय मेट्टिदव
गानव पाडिदव
हरिमूरुति नोडिदव
विठ्ठलन नोडिदव
(पुरंदर) विठ्ठलन नोडिदव
वैकुंठके ओडिदव
अर्थ (मराठीत)
तंबूरी वाजवणारा (हरीदास)
भवसागरा पार झाला
ताळ ठोका ठोकणारा
देवांमध्ये सामील झाला
घुगऱ्या बांधणारा
दुष्टांच्या हृदयावर पाय ठेवणारा
गाणे गाणारा
हरीची मूर्ती पाहणारा
विठ्ठलाला पाहणारा
पुरंदर विठ्ठलाला पाहणारा
वैकुंठाकडे धावणारा (मोक्षप्राप्ती)
जो हरीदास तंबूरी वाजवतो, ताळ ठोकतो, घुगऱ्या बांधून नाचतो आणि हरीनाम गातो, तो भवसागर पार करतो, दुष्टांना जिंकतो आणि शेवटी वैकुंठाला पोहोचतो.
 
पुरंदरदास पंढरपूरला होते तेव्हा रचलेले कानडी भजन 

https://www.youtube.com/watch?v=vE5BsiBtujc
पंढरापुरवेंब दोड्ड नगर
अल्लि विठोबनेम्ब दोड्ड साहुकार ||प||
अनुपल्लवी
विठोबनिरुवदु नदीतीर
अल्लि पंढरिभजने व्यापार ||अ.प||
चरण १
तंदे नीने तायि नीने पांडुरंग
नम्म बंधु नीने बळग नीने पांडुरंग
भक्तर पोषक पांडुरंग
नम्म मुक्तिदायक पांडुरंग ||१||
चरण २
विठोबनिगे प्रिय तुळसिहार
अल्लि भक्त जनर व्यापार
विठोबनिगे प्रिय बुक्किय गंध
अल्लि चंद्रभागा स्नान बलु अंद ||२||
चरण ३
श्रीहरि विठ्ठल पांडुरंग
जय हरि विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
नम्म पुरंदर विठ्ठल पांडुरंग ||३||

पंढरपूर नावाचे मोठे नगर
तिथे विठोबा नावाचा मोठा सावकार -श्रीमंत
विठोबा नदीच्या तीरावर राहतो
तिथे पंढरीची भजन-व्यापार भक्तीचा व्यवसाय चालतो
तूच आमचा बाप, तूच आई, तूच नातेवाईक, तूच कुटुंब
भक्तांचा पालनकर्ता आणि मुक्तिदाता
विठोबाला तुळशीची माळ आवडते, तिथे भक्तजन जमा होतात
विठोबाला बुक्क्याचा गंध आवडतो, चंद्रभागात स्नान करणे फार सुंदर
जय श्रीहरि विठ्ठल पांडुरंग!
आमचा पुरंदर विठ्ठल पांडुरंग!

या  चंद्रचूड शिवशंकर भजनावर मी भरतनाट्यम सादर केले होते :)
चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणने
निनगे नमो नमो ||प||
अनुपल्लवी
सुंदरतर पिनाकधर हर
गंगाधर गजचर्मांबरधर
नमो नमो ||अ.प||
चरण १
नंदिवाहन आनंददिंद
मूर्जगदि मेरेव नीने
अंदु अमृत घटदिंदुदिसिद
विष तंदु भुजिसिदव नीने
कंदर्पन क्रोधदिंद कण्तेरेदु
कोंद उग्रनु नीने
इंदिरेश श्रीरामन नामव
चंददि पोगळुव नीने ||१||
चरण २
बालमृकंडन कालनु एळेवाग
पालिसिदव नीने
कालकूटवनु पानमाडिद
नीलकंठनु नीने
वालयदि कपाल पिडिदु
भिक्षे बेडो दिगंबर नीने
जाल माडिद गोपालनेंब
हेण्णिगे मरुळादव नीने ||२||
चरण ३
धरेगे दक्षिण कावेरितीर
कुंभपुरवासनु नीने
करदल्लि वीणेय नुडिसुव
नम्म उरगभूषणनु नीने
कोरललि भस्म रुद्राक्षव धरिसिद
परम वैष्णव नीने
गरुडगमन श्री पुरंदर विठ्ठलगे
प्राणप्रियनु नीने ||३||
अर्थ (थोडक्यात)
चंद्रचूड (मस्तकावर चंद्र धारण करणारा) शिव शंकर, पार्वतीरमण!
तुला नमस्कार, नमस्कार!
सुंदर पिनाक धनुष्य धारण करणारा, गंगाधर, गजचर्म परिधान करणारा
नंदी वाहन असलेला, तीन जगांत शोभणारा
समुद्रमंथनात निघालेले विष प्यायलेला (नीलकंठ)
मन्मथाचा नाश करणारा उग्र रूप
श्रीरामाच्या नामाचे गुणगान करणारा
बाल मार्कंडेयाला यमापासून वाचवणारा
कपाल घेऊन भिक्षा मागणारा दिगंबर
गोपाल (कृष्ण) याच्यावर मोहित झालेला
कावेरी तीरावरील कुंभकोणमचा वास करणारा
वीणा वाजवणारा, सर्पभूषण धारण करणारा
भस्म-रुद्राक्ष धारण करणारा परम वैष्णव
पुरंदर विठ्ठलाचा प्राणप्रिय मित्र!
ही रचना शिवाला वैष्णव दृष्टिकोनातून स्तुती करते आणि शेवटी पुरंदर विठ्ठलाशी जोडते.
विजयनगर साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात हम्पी हे संगीतकार, कवी आणि विद्वानांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. संगीतशास्त्रातील विविध मतप्रवाहांमुळे संगीताच्या शिक्षण आणि सादरीकरणात एकवाक्यता निर्माण करण्याची गरज होती.या संदर्भात अच्युतरायांच्या काळात रामामात्यांनी ‘स्वरमेल कलानिधी’* हा संगीतशास्त्रीय ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख आढळतो. मात्र त्याचा अपेक्षित प्रभाव पडला नाही, असे उपलब्ध मजकुरात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर पुरंदरदासांनी संगीतशिक्षणाला व्यवहार्य आणि क्रमबद्ध पद्धत दिल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे संगीत केवळ दरबारी किंवा विद्वानांच्या वर्तुळात न राहता सामान्य लोकांपर्यंत पोहोचले.


इ.स. १५६४–६५ च्या सुमारास पुरंदरदासांचा मृत्यू झाला. त्याच काळात विजयनगर साम्राज्याच्या अस्ताची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचली. इ.स. १५६५ मधील तालिकोटच्या युद्धानंतर विजयनगरची राजधानी हम्पी मोठ्या विध्वंसाला सामोरी गेली.मंदिरासह हम्पीतील अनेक वास्तूंचे नुकसान झाले. विजयनगरच्या पतनानंतर अनेक कलाकार, संगीतकार आणि विद्वान दक्षिणेकडील विविध प्रदेशांत गेले. पुढे म्हैसूर आणि तंजावरसारख्या केंद्रांनी या सांस्कृतिक परंपरांना आश्रय दिला.त्यामुळे हम्पीचा राजकीय अस्त झाला असला तरी त्याच्या सांस्कृतिक परंपरा संपल्या नाहीत. त्या विविध प्रदेशांमध्ये स्थलांतरित होऊन पुढील शतकांमध्ये विकसित होत राहिल्या.

आज विजय विठ्ठल मंदिर अंशतः भग्नावस्थेत आहे. मुख्य गर्भगृहात मूळ विठ्ठलमूर्ती नाही. तरीही मंदिराची वास्तुरचना, मंडप, शिल्पे, दगडी रथ आणि संगीत स्तंभ यांमुळे हे हम्पीतील सर्वाधिक महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक आहे.दगडी रथाच्या चाकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्थिर करण्यात आले आहे. संगीत स्तंभांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ठोकून ध्वनी निर्माण करण्यास पर्यटकांना मनाई आहे. मंदिर परिसरात रात्री प्रकाशयोजना करण्यात आली असून, त्यामध्ये मंदिराच्या वास्तूंचे दृश्य विशेष प्रभावी दिसते.मंदिराशी संबंधित पुरंदरदास उत्सवही आयोजित केला जातो. त्यामुळे पुरंदरदासांची संगीतपरंपरा आणि विठ्ठलभक्तीची स्मृती आजही या परिसराशी जोडलेली आहे. 


राजतुला” अर्थात King’s Balance / तुलाभार /तुलापुरुषदान



राजतुला हे विजय विठ्ठल मंदिराच्या नैऋत्य दिशेला, कंपा भूपाच्या मार्गाच्या शेवटी असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी स्मारक आहे. याला King’s Balance, तुलाभार किंवा तुलापुरुषदान अशी नावे आढळतात. रचनेत सुमारे १५ फूट उंचीचे दोन ग्रॅनाइटचे स्तंभ असून त्यांना वरून एक आडवा दगडी तुळई जोडते. तुळईच्या खालच्या बाजूस पूर्वी तराजू किंवा झोळी लटकवण्यासाठी तीन कड्या आहेत..
या वास्तूचा संबंध तुलापुरुषदान या दानपरंपरेशी जोडला जातो. या विधीत राजा स्वतःच्या वजनाइतके सोने, चांदी, धान्य, रत्ने किंवा इतर मौल्यवान वस्तू दान करत असे, अशी परंपरागत माहिती आहे. ग्रहण, राज्याभिषेक, दसरा किंवा इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी अशा दानविधी होत असावेत.
राजतुलेच्या एका स्तंभावर राजा आणि दोन राण्यांची उठावदार प्रतिमा कोरलेली आहे. ही प्रतिमा अनेकदा कृष्णदेवराय आणि त्यांच्या दोन राण्यांचे तिरुमलादेवी व चिन्नादेवी प्रतिनिधित्व करते, असे सांगितले जाते. मात्र येथे एक महत्त्वाची ऐतिहासिक सावधगिरी आवश्यक आहे: या वास्तूवर शिलालेख नाही, त्यामुळे ती निश्चितपणे कृष्णदेवरायांनीच बांधली किंवा त्यांच्याच तुलाभारासाठी वापरली, असे पुराव्याने ठामपणे सांगता येत नाही.
यामुळे राजतुला केवळ दानविधीचे साधन म्हणून न पाहता विजयनगरच्या राजसत्तेतील धर्म, राजकीय प्रतिष्ठा आणि दानधर्म यांचा संगम दाखवणारे स्मारक म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.विजयनगरच्या राजांनी तुलापुरुष विधी केला होता. देवराय प्रथम यांनी राजधानीत मोती तोलले. कृष्णदेवराय यांनी १५१५ मध्ये अमरावतीच्या अमरेश्वर मंदिरात स्वतःला तोलले आणि मिळालेली रक्कम त्यांच्या दोन राण्यांनी ब्राह्मणांना दान केली. अच्युतदेवराय यांनी कांचीपुरममध्ये मोत्यांसह हा विधी केला.कृष्णदेवराय यांनी तेलुगूमध्ये लिहिलेल्या ‘अमुक्तमाल्यदा’ या दीर्घकवितेत असे सूचित केले आहे की तुलापुरुष विधीतून मिळालेली देणगी सर्वांनी नव्हे, तर केवळ अत्यंत गरीब ब्राह्मणांनीच स्वीकारली होती.
त्यांचे राजकवी नंदी तिम्मन यांनी तेलुगूमध्ये ‘पारिजातापहरणम्’ लिहिले. त्यात सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद होतो आणि शेवटी दोघीही आपला पती कृष्णाला तराजूत तोलतात.
आता पुन्हा आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो ...रॉयल एन्क्लोसर उर्फ राजवाडा 


No comments: