Wednesday, June 3, 2026

श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे

 श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे 


त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.मंदिरात एक भूमिगत तळघर आहे, जे वर्षातून फक्त एकदाच  (गुरुपौर्णिमेला) भक्तांसाठी उघडले जाते.हे तळघर पाण्यात बुडलेले असते आणि त्यात विशेष पूजा-अर्चा होते.

 

हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी.

 


इतिहास

शाहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शाहापुरा पेठ वसवली.पुढे थोरले बाजीराव पेशव्यांनी १७३५ मध्ये या भागाचा विकास करून त्याला सोमवार पेठ असे नाव दिले.

हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत. सरकारी नोंदीत इ.स. १९१७ पर्यंत मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली; तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले. त्यांनी झाड समूळ तोडून टाकले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार चालू केली; तर मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. १९४५ साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचे नाव लागले. पण, कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. सन १९८५ साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला.


मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.


तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठराविक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.


 मंदिराच्या गर्भगृहातील तीन शिलालेखांपैकी उल्लेखानुसार , येथील बांधकाम २६ ऑगस्ट १७५४ रोजी धामपूर (इंदूरजवळ) येथील भीमजीगिरी गोसावी यांनी सुरू केले. हे मंदिर १६ वर्षांनंतर, १७७० मध्ये पूर्ण झाले.मंदिराची वास्तुकला राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतीय शैलींचे मिश्रण आहे. एकेकाळी गर्भगृहावर एक उंच शिखर होते, जे काही काळापूर्वी नष्ट झाले, किंवा कदाचित ते कधीच पूर्ण झाले नाही.


मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अत्यंत सुंदर कोरलेली शिल्पे आहेत.ज्यातलं सर्वात आश्चर्यकारक शिल्प आहे एका गेंड्याचे !!पुण्यात तर गेंडे नव्हते तर हे चित्रण का केले गेले ?



एक गैंडा लोखंडी साखळदंडांनी बांधलेला आहे. ब्रिटिश सैनिक किंवा इंग्रज सैनिक त्याला नियंत्रित करत आहेत. काही शिल्पांमध्ये एकापेक्षा जास्त ब्रिटिश सैनिक दाखवले आहेत.

प्रतीकात्मक अर्थ असा आहे  किती गेंडा हा  आसाम ,बंगालचे प्रदेशाचे प्रतीकमानले गेले गैंड्याला साखळदंडांनी बांधणे याचा अर्थ  ब्रिटिशांनी बंगाल आणि आसामवर विजय मिळवल्याचे आणि नियंत्रण प्रस्थापित केल्याचे प्रतीक.हे शिल्प १७५७ च्या प्लासी युद्धानंतरच्या ब्रिटिश विजयाचे ऐतिहासिक चित्रण मानले जाते.ज्या खाली दोन हत्तीची झुंज दाखविली आहे .जे भारतीय सत्ता अंतर्गत एकमेकांशी लढत आहेत हे दाखवायचे आहे का ??या शिल्पावरच सुरेख कोरलेले देवकोष्टक कोरलेले आहे ,ज्यावर अप्रतिम मोर रचना दाखवल्या आहेत.

स्तंभांवर साखळदंड, घंटा आणि भारवाहक यक्ष यांची सुंदर नक्षी आहे.प्रवेशद्वाराजवळ ऊंच  द्वारपालांची शिल्पे आहेत.

मंदिराच्या बाहेरील व आतील दोन द्वारशाखावरील ललाटबिंब हे सर्वार्थाने सुबक आणि कोरीव लेणे आहे जी पाहत राहावे असे आहे .

१.बाहेरील द्वार 

येथे सर्वात वरती शेषशायी विष्णू आहे .तर गजांत लक्ष्मीचे चित्र आहे.मकरमुखातून निघालेले तोरण आहे .तीन मोर आहेत,ज्यापैकी मधल्याने पिसारा फुलवला आहे  वानर शिल्पमाला आहे .तसेच एक अद्भुत गजव्याल आहे जो दुर्मिळ आहे.तसेच विठ्ठल रुक्मिणी ,विष्णू ,राम यांचे शिल्प आहे .









२.सभामंडप 

येथील द्वारशाखेवरील पट्टीवरील गजांत लक्ष्मीचे शिल्प स्पष्ट पाहता येते .तसेच येथून आत प्रवेश करताना भाविकांच्या डोक्याचा स्पर्श गणेशयंत्राशी होईल अशा प्रकारे ते कोरले आहे .





३.गर्भगृह 

येथे ललाटबिंबावरील मनुष्यरूपी शिल्पात शिव आहे ,ज्याचा मांडीवर एका बाजूला शक्ती (बाजूला सिंह वाहन दिसते )तर दुसर्या बाजूला गंगा असावी (वाहन नंदी दिसतो ).




त्रिशुंड गणपती मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण तीन शिलालेख आहेत. हे शिलालेख मंदिराच्या इतिहास, बांधकाम आणि धार्मिक संदर्भाबद्दल महत्त्वाची माहिती देतात.




१. पहिला शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)-“पुण्यनगरीपुरी” -पुण्याचे प्राचीन नाव पुण्यनगरी किंवा पुणेश्वर दर्शवतो.

यात मंदिराच्या बांधकामाची तारीख स्पष्टपणे नमूद आहे-२६ ऑगस्ट १७५४ (मंदिर बांधकाम सुरू किंवा स्थापना).मंदिर रामेश्वर (शिव) मंदिर म्हणून सुरू झाल्याचे उल्लेख.|| श्री गणेशाय नमः || श्री || सारखे मंगलाचरण.


२. दुसरा शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)यात भगवद्गीतेतील श्लोक कोरलेला आहे (सामान्यतः प्रारंभिक श्लोक).मंदिरातील आध्यात्मिक आणि वेदिक संदर्भ दर्शवतो.


३. तिसरा शिलालेख (फारसी भाषा) मंदिर गुरुदेव दत्तात्रेय यांचे असल्याचे उल्लेख.गोसावी संप्रदायाशी (दत्त परंपरा) संबंध दर्शवतो.


गर्भगृहातील गणपती मूर्ती 





या गणपतीचं मूळ नाव हे श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती असे आहे . ही भारतातील एकमेव गणेश मूर्ती आहे ज्यात तीन सोंड (त्रिशुंड) आणि सहा हात आहेत.सामान्य गणपती उंदरावर (मूषक) बसतात, पण हे मोरावर (मयूर) बसलेले आहेत. यामुळे त्यांना मयूरेश्वर असेही म्हणतात.काळ्या बेसाल्ट दगड पासून कोरलेली मूर्ती.

मुख: एक मुख (एक चेहरा) आणि तीन सोंड आहेत.


उजवी सोंड ही  मोदकाच्या पात्राला स्पर्श करत आहे.मधली सोंड पोटावर किंवा शरीरावर रुळत आहे वा मोराला स्पर्श करत आहे .डावी सोंड ही  डाव्या मांडीवर बसलेल्या शक्ती देवी च्या हनुवटीला स्पर्श करत आहे(त्यामुळे हा तांत्रिक उच्छिष्ट गणेश असावा का ?). सहा हात असून ज्यात आयुधे आहेत.उजवा बाजू: अंकुश, त्रिशूल मोदकपात्र.डावा बाजू: परशू, पाश , आणि खालचा हात शक्ती देवीला आधार देत आहे. मोरावर आरूढ, शांत आणि शक्तिशाली मुद्रेत गणपती दिसत आहे .


या मूर्तीचा प्रतीकात्मक अर्थ असा लावता येतो की ,तीन सोंडा या तीन जग (भूलोक, स्वर्गलोक, पाताललोक) किंवा सृष्टी, पालन आणि संहार यांचे प्रतीक,वा भूत,वर्तमान,भविष्यकाळ , काहींनुसार त्रिगुण (सत्त्व, रज, तम) यांचे प्रतीक आहे .गणपती आरूढ असलेले मोर वाहन ब्रह्मांडाच्या विस्ताराचे किंवा सौंदर्य/ऊर्जेचे प्रतीक आहे .शक्ती आणि गणेश यांचा मिलाफ, तांत्रिक/हठयोगी परंपरेशी संबंध.

मूर्तीच्या मागे भिंतीवर शेषशायी विष्णू आणि गणेश यंत्र कोरलेले आहे.ही मूर्ती पेशवाई काळातीलआहे. मंदिर मूळतः शिव मंदिर म्हणून बांधले गेले होते, नंतर गणेश मूर्ती स्थापित झाली.

बाह्य प्रदक्षिणा मार्गात तीन भिंतीवर तीन विविध सहसा दुर्मिळ असे शिल्प आहेत.

दक्षिण भिंत शिल्प- नटराज 


शिवाचे नृत्यरूप (Cosmic Dance).हातात डमरू, अग्नी आणि विशिष्ट मुद्रा. विश्वातील सूक्ष्म ऊर्जा, काळ, कंपन आणि सृष्टी-संहार चक्र याचे हे प्रतीक आहे .


२. पश्चिम भिंत - लिंगोद्भव शिव 




शिव लिंगाच्या रूपात प्रकट होताना, ब्रह्मा (हंस रूपात) आणि विष्णू (वराह रूपात) त्यांचा शोध घेताना दाखवलेले.

ही कथा पुराणातील प्रसिद्ध आहे .शिव ही अनंत ऊर्जा आहे, ज्याची सुरुवात किंवा अंत सापडत नाही.

या मंदिरातील लिंगोद्भव शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आणि गहन अर्थाने कोरलेले आहे.

कथा अशी आहे कि ,जेव्हा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वासाठी संघर्ष झाला होता. येथे लिंगाच्या रूपात दर्शविलेल्या शिवाने (जरी कथेत तो कधीकधी ज्योत किंवा प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात दिसतो), त्यांना आपला उगम शोधण्याचे आव्हान दिले. विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि तळाशी शिवाच्या पायांचा शोध घेऊ लागला, तर ब्रह्माने हंसाचे (हंसाचे) रूप धारण केले आणि शिवाच्या मस्तकाचा शोध घेण्यासाठी उंच आकाशात उड्डाण केले.


ब्रह्मा आणि विष्णू दोघेही आपल्या शोधात अयशस्वी झाले आणि भगवान शिवाकडे परत आले. विष्णूने जाहीर केले की त्याला भगवान शिवाचे चरण सापडले नाहीत आणि त्याने आपल्या अहंकाराबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. तथापि, ब्रह्माने दावा केला की त्याने भगवान शिवाचे मस्तक पाहिले होते आणि पुरावा म्हणून त्याने केतकीचे फूल, तुळस आणि एक गाय साक्षीदार म्हणून आणली.भगवान शिवाने घोषित केले की अनंततेच्या मर्यादा मोजणे अशक्य आहे. त्यांनी शाप दिला की पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे मंदिर असणार नाही आणि त्यांच्या पूजेसाठी केतकीचे फूल व तुळस कधीही वापरली जाऊ नये. भगवान शिवाने गाईलाही शाप दिला की, तिने तोंडाने खोटे बोलल्यामुळे तिचे तोंड यापुढे अपवित्र राहील. आज शिवरात्रीचा अपवाद वगळता, शिवपूजेमध्ये केतकीच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर निषिद्ध मानला जातो.



३. उत्तर भिंत - हरिहर 



एकाच मूर्तीत विष्णू (हरि) आणि शिव (हर) यांचा अर्ध-अर्ध मिलाफ दिसतो .दोन्हीही हातात शिवाचे डमरू आणि विष्णूचे आयुध आहेत .शिव आणि विष्णू एकच आहेत (अद्वैत).हे शिल्प शिव-विष्णू ऐक्य दर्शवते. “शिवाय विष्णुरूपाय, विष्णवे शिवरूपिणे...”

मागेले बाजूला छताकडे पाहातांनाही अश्व,व्याल /सिंह ,हत्ती कोरलेले दिसतात जे आता जीर्ण होत आहेत .


मंदिराचा आत सम्राट सरोदे यांनी मंदिर रचनेचा लावलेला एक माहिती फलक दिसला .जो बराच रोचक आहे .जो वैज्ञानिक, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक अर्थाने लिहिले आहे. यात वेद, शिल्पशास्त्र, नक्षत्र आणि वास्तुशास्त्र यांचा मेळ सांगितला आहे.यातला क्रमांक १३ मुद्दा फारच वेगळा आहे .




क्रमांक १३ - सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जा (Subtle Energy and Gross Energy)

Energy = Natraj Shilp, M = Inner sculptures of Garbhgraha, C² = Lingodbhav Shilp

सविस्तर मराठी स्पष्टीकरण:


या शिल्पकलेत वैज्ञानिक सूत्र E=MC² (आइनस्टाइनचे ऊर्जा-सूत्र) याचाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय अर्थ सांगितला आहे.


E (Energy) = नटराज शिल्प

नटराज मूर्ती ही सूक्ष्म ऊर्जा (Subtle Energy) चे प्रतीक मानली आहे.

नटराज हे काल, कंपन, ऊर्जा आणि सृष्टीच्या गतिमान स्वरूपाचे प्रतीक आहे. त्यांचे नृत्य हे विश्वातील सतत चालणारे ऊर्जेचे रूपांतर दर्शवते.

M (Mass) = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे

गर्भगृहाच्या आत असलेल्या विविध शिल्पांना स्थूल पदार्थ (Gross Matter) किंवा स्थूल ऊर्जा चे प्रतीक मानले आहे.

म्हणजे मंदिरातील दृश्य स्वरूपातील देवता, आकृत्या यांच्यात स्थूल ऊर्जा आहे.

C² = लिंगोद्भव शिल्प

पश्चिम भिंतीवरील शिव लिंगोद्भव शिल्प हे C² (प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाचे) प्रतीक आहे.

लिंगोद्भव शिल्प अनंत सूक्ष्म ऊर्जेचे (Infinite Subtle Energy) प्रतीक मानले जाते.


संपूर्ण समीकरण:

E = MC²सूक्ष्म ऊर्जा = स्थूल पदार्थ × (प्रकाशाचा वेग)²मंदिरातील शिल्परचनेत हे सूत्र दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे


नटराज = ऊर्जा

गर्भगृहातील शिल्पे = पदार्थ (Mass)

लिंगोद्भव = C² (अनंत गती/ऊर्जेचे रूप)


बाकीचा फलक मराठीत -


क्र.विषय (Topic)माहिती (Information)
1मुख्य देवतात्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
2“गणपती” चा सामान्य अर्थत्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
3“गणपती” चा वैदिक अर्थसर्व प्राणिमात्रांचा स्वामी (सर्व गटांचा प्रमुख)
4गणपतीचा वैज्ञानिक अर्थविश्व हे असंख्य सूक्ष्म, घनाकृती ऊर्जा-भरलेल्या अणूंपासून बनलेले आहे. सर्व गटांचा स्वामी गणपती आहे.
5त्रिशुंडचा अर्थवास्तुकलेच्या दृष्टीकोनातून विश्वाच्या तीन आयामांचे प्रतीक – लांबी, रुंदी, उंची (३ आयाम)
6विश्वाचा चौथा आयाम (४थे dimension)नटराज मूर्ती (काळ / ऊर्जा / कंपन / निरपेक्ष काळ)
7दक्षिण भिंतीवर नटराज आणि हातातील प्रतीकशिव नृत्य = निरपेक्ष काळ, डमरू → ॐ ध्वनी, अग्नी → ॐ प्रकाश
8गर्भगृहातील विष्णू मूर्तीस्थूल जगाचे (Gross world) प्रतीक
9गर्भगृहातील विष्णू मूर्तीच्या वरची यंत्रवरच्या त्रिकोण = पुरुष/अग्नी/उर्ध्व ऊर्जा, खालचे त्रिकोण = स्त्री/प्रकृती/अधो ऊर्जा. दोन्ही केंद्रस्थानी एकत्र होणे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती.
10ब्रह्मदेवाचे पाच चेहरेपाच वेदांचे प्रतीक – प्रणव, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, स्कंद)
11शिव लिंगोद्भव शिल्पअनंत सूक्ष्म ऊर्जेचे प्रतीक (सूक्ष्म ऊर्जा)
12पश्चिम भिंतीवरील लिंगोद्भव शिल्पाची गुप्त कथाप्रणव वेदाचे चार भाग – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, अध्याय ९, अध्याय १४, श्लोक ४८)
13सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जाऊर्जा = नटराज शिल्प, M = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे, C² = लिंगोद्भव शिल्प
14उत्तर भिंतीवरील हरिहर शिल्पE = MC²
15मोरावर गणपतीमोर = ब्रह्मांडाच्या विस्तारित रूपाचे प्रतीक. गणपती मोरावर बसणे म्हणजे विश्वातील सर्व ऊर्जा-घनाकृती (कॉस्मिक क्यूब्स) सर्व दिशांनी विस्तार पावत आहेत.
16मंदिराचे निर्मातेभीमजीगिरी गोसावी महाराज यांचा नक्षत्र = मूळा
17गर्भगृहातील देवतेचा नक्षत्रत्रिशुंड गणपती - शततारका (संदर्भ: डॉ. गणपती शास्त्री - “Who Created God”)
18कार्तिकेय देवतेचा नक्षत्रविशाखा नक्षत्र
19पुण्याच्या नावाचा नक्षत्रउत्तर फाल्गुनी नक्षत्र
20गर्भगृहाची लांबी व रुंदी८'२"–११/१६ × ८'२"–११/१६
21अंगुलानुसार गर्भगृहाचा परिमिती२८७ किष्कु अंगुल
22गर्भगृहाचा नक्षत्रअश्विनी (भगवान कार्तिकेय आणि दत्तात्रेय यांना अनुकूल)
23गर्भगृहाचा वारशनिवार (भयंकर)
24गर्भगृहाची रासवृश्चिक रास
25गर्भगृहाच्या ऊर्जेचे आयुष्य (Life Span)बांधकामाच्या वर्षापासून ४९० वर्षे
26हस्तानुसार गर्भगृहाचा परिमिती१२ किष्कु हस्त (परिमिती)
27ऊर्जेची दिशा४ (कुत्रा) → संघर्ष
28वारमंगळवार → आर्थिक नुकसान
29निष्कर्ष (यादीप्रमाणे)या मंदिराचे मापदंड भगवान मुरुगन (कार्तिकेय) आणि दत्तात्रेय यांच्या नक्षत्राशी अधिक जुळते.
30सुधारणेचा सल्ला२८३ किष्कु अंगुल परिमिती गणपतीसाठी अधिक शुभ आहे.



संदर्भ -https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0


https://kevinstandagephotography.wordpress.com/2020/06/04/trishund-ganpati-temple-pune-trishunda/


https://youtu.be/Cw1BRT7jqU4?si=-02MrQZWgC7evug0


https://youtu.be/MorEQTQnlbA?si=MTlsqDGsWJT9cz6M


No comments: