Friday, June 12, 2026

खान्देश स्पेशल दुधातलीशेवभाजी

 खान्देशी_स्पेशल_दुधातली_शेवभाजी



अमुक तमुकचा खान्देशी special भाग पहिला. त्यात दुधातली शेवभाजी याचा खुप कौतुक झालं. मी शेवभाजी खुप भारी तयार करते. असा माझा समज होता 

पण धुळे, जळगाव इथल्या ढाबा स्पेशल शेवभाजी तीही दुधातली यां बाबत नविनच समजलं.

दुधातले अधिक तर गोड पदार्थ खाल्ले जातात.


आज काहीतरी खास, वेगळं आणि खान्देशी स्टाईलचं बनवायचं!


 मनात थोडी धाकधूक होती, कारण दुधातली शेवभाजी मी पहिल्यांदाच स्वतःहून तयार करत होते.


 नगरच्या चाफे फरसाणची खुसखुशीत, ताजी शेव, दूध, कांदा-टोमॅटो, आलं-लसूण आणि खान्देशी मसाले आणले. याशिवाय मी यात काजू पेस्ट, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीमही घातली. डिश आणखी रिच आणि मलईदार व्हावी म्हणून!



सर्वप्रथम लसूण, आलं पेस्ट, टमाटर कांदा खोबरे घेतलेली प्युरी यांची फोडणी केली. मसाला भाजत असताना खान्देशी खास सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागला.शेवभाजीत इलायचीने खुप छान चव येते म्हणाल तर हिच यातली प्रमुख सामग्री आहे.

 मग त्यात काजू पेस्ट घातली त्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येतात. फ्रेश क्रीम घालून सर्व मिश्रण तेल सुटू पर्यन्त परतले. 


त्यानंतर हाताने चुरलेली कसुरी मेथी टाकली. 


मग आला मुख्य टप्पा भरपूर दूध(4 कप )ओतलं! दूध उकळू लागल्यावर नगरच्या चाफे फरसाची ती खुसखुशीत शेव हळूहळू टाकली. शेव मुरत असताना शेवटी परत कसुरी मेथी भुरभुरली. वाह! रंग गुलाबी-केसरी झाला, घट्टपणा अगदी मलईदार दिसू लागला आणि सुगंध तर असा दरवळला!!


शेव पूर्ण मऊ झाली होती. दूध, क्रीम, काजू आणि मसाल्याचा रस तिच्यात चांगलाच भिनला होता.कसुरी मेथी भुरभुरवली. पहिला चमचा घेतला आणि मी स्वतःच, अरे वा! म्हणून टाकलं.


खुसखुशीत शेव, खान्देशी तिखट-गोड-खारट चव, काजू-क्रीममुळे आलेला मलईदारपणा आणि कसुरी मेथीचा हलका सुगंध सगळं एकत्र इतकं अप्रतिम!!

माझ्या काही टिप्स

• मीठ शेवटीच टाका नाहीतर दूध फाटेल.

• काजू पेस्ट आणि फ्रेश क्रीममुळे डिश खूप रिच आणि लक्झरी वाटते,मात्र त्याचं प्रमाण जास्त ठेवू नका.

• कसुरी मेथी शेव शिजल्यावर शेवटी टाका, म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो.

• नगरच्या चाफे फरसाची शेव नक्की वापरून पाहा 😊ती खुसखुशीत, चवदार आणि शिजल्यानंतरही उत्तम लागते.

• जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल, तर खान्देशी मसाल्यात लाल तिखटाचं प्रमाण वाढवा.

-भक्ती

https://youtube.com/shorts/TPDer0BWZ04?si=uYx4h4r_oy27jKMN

No comments: