Monday, June 29, 2026

आंत्रप्रेन्युअर- शरद तांदळे

 आंत्रप्रेन्युअर या शब्दाचा मागमूसही नसताना एक जिद्दी आणि मेहनती व्यक्ती सरकारी कामाचा काँट्रॅक्टर बनते आणि पुढे ब्रिटनच्या राजघराण्याकडून प्रतिष्ठित पुरस्कार मिळवते. ही व्यक्ती म्हणजे मराठी साहित्यातील लोकप्रिय लेखक, ‘न्यू इरा पब्लिशिंग हाऊस’चे संस्थापक आणि यशस्वी उद्योजक शरद तांदळे सर होय.

वडील शिक्षक असल्यामुळे शरद तांदळे यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड जडली. बारावीनंतर त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र या वयात अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, मैत्री, राजकारणाची ओढ आणि वडिलांचे सल्ले न ऐकणे अशा अनेक अजाणत्या चुका घडल्या. अनेक तरुणांच्या महाविद्यालयीन जीवनात असेच स्वप्नांचे जग असते, त्यामुळे शरद सरांचा हा संघर्ष अनेकांना आपल्या जीवनाशी जोडल्यासारखा वाटतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच यश मिळाले नाही. पुण्यात नोकरीसाठी अनेक ठिकाणी उंबरे झिजवले, पण यश मिळत नव्हते. आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे अधिकच वाढले होते. अशा निराशेच्या काळात सरकारी विविध कामांचे काँट्रॅक्टर होण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. बँक खाते उघडणे, विविध लायसन्स मिळवणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टी ते स्वतः करत. इतरांना ते नेहमी सल्ला देत की, “बेसिक गोष्टी स्वतः करा, म्हणजे तुमची इमारत भक्कम उभी राहील.” कामाच्या बोज्यात अनेकदा तोटा झाला, तरीही सतत मेहनत करण्याची उर्मी आणि जिद्द त्यांना पुढे नेत राहिली. या प्रवासात अनेक चांगली माणसे जोडली गेली आणि त्यांच्या हातून अनेकांचे भलेही झाले.

या व्यस्त उद्योग जीवनात वडिलांच्या मायेपासून काहीसे दूर जावे लागले. अशा अवघड प्रसंगी बहुविविध वाचनाने त्यांना मोठी मानसिक ताकद मिळाली. वाचनामुळे मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख ते आपल्या लेखनात वारंवार करतात. त्यांच्या ‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीची जन्मकथा देखील त्यांनी आपल्या अनुभवांतून सांगितली आहे.

शरद तांदळे यांना ब्रिटन राजघराण्याकडून दिल्या जाणाऱ्या Young Entrepreneur of the Year २०१३ या जागतिक पुरस्कारासाठी भारतातून निवडलेल्या मोजक्या नवउद्योजकांमध्ये स्थान मिळाले. अनेक मुलाखती आणि छाननीनंतर शेवटी लंडनमध्ये एका भव्य कार्यक्रमात प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिल्या पिढीतील (First Generation) उद्योजक म्हणून विशेष उल्लेखनीय आहेत.

‘रावण – राजा राक्षसांचा’ ही केवळ रामायणातील रावणाची पारंपरिक कथा नाही, तर पराक्रमी, विद्वान, वेदपंडित, कट्टर शिवभक्त, आयुर्वेदज्ञ आणि दूरदर्शी शासक म्हणून रावणाला नव्या दृष्टिकोनातून मांडणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. लेखकाने रावणाला खलनायक न मानता त्याच्या गुणवत्तेवर, महत्वाकांक्षेवर आणि निर्मितीक्षमतेवर भर दिला आहे. ही कादंबरी मराठीत लोकप्रिय झाली असून तिचे इंग्रजी भाषांतरही (‘Ravan: The King of Rakshasas’) प्रकाशित झाले आहे.

हे पुस्तक वाचताना शरद तांदळे सरांचा प्रामाणिकपणा आणि खुल्या मनाने केलेला आत्मपरीक्षण वाचकाला जिंकून घेतो. जणू आपला एखादा जवळचा मित्रच आपल्याशी आपल्या यश-अपयशाची, संघर्षाची आणि शिकवणुकीची गोष्ट सांगत आहे, असा प्रत्यय येतो. त्यांचे बोलणे ऐकण्याची संधी मिळाली तर नक्की ऐका — उत्साहाचा फेसाळता झरा त्यांच्या अखंड आणि जोमदार भाषणातून तुम्हाला भरपूर प्रेरणा देईल.

शरद तांदळे यांचे ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे आत्मकथनात्मक पुस्तक आणि ‘रावण’ ही कादंबरी मराठी उद्योजक साहित्य आणि ऐतिहासिक कादंबरी या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान आहेत. त्यांचा जीवनप्रवास आणि लेखन नव्या पिढीला मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची प्रेरणा देत राहील.

No comments: