बिजापूर डायरी
विकसित भारताची चमकदार प्रतिमा आपण नेहमी पाहतो. मोठमोठी शहरे, आधुनिक सुविधा, वेगाने धावणारे जीवन आणि विकासाच्या गप्पा. पण या सगळ्याच्या पलीकडे अजूनही एक भारत असा आहे, जो जंगलात हरवलेला आहे. जिथे आजही रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुरक्षित आयुष्य या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर हा असाच एक दुर्गम, नक्षलवादाच्या सावटाखाली जगणारा भाग. या भागात एक तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणून पोहोचते.बस्तर विभागातील बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि सुकमा या जिल्ह्यांतील सकारात्मक बदलांविषयीची लेखमालिका डॉ. ऐश्वर्या यांनी साधना साप्ताहिकासाठी लिहिली होती. त्याच लेखांतुन पुढे तिच्या अनुभवांतून जन्माला येते ती “बिजापूर डायरी”.
याआधीही डॉ. ऐश्वर्या यांनी सर्च, स्पर्श आणि आरोही या संस्थांमार्फत वंचित समाजासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवाकार्य केले होते.
डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली ही डायरी केवळ एका डॉक्टरच्या अनुभवांची नोंद नाही, तर ती बस्तरच्या माणुसकीची, संघर्षाची आणि आशेची कहाणी आहे. इथल्या आदिवासी जीवनाचे वास्तव, त्यांच्या वेदना, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, त्यांच्या डोळ्यांतील भीती आणि तरीही न हरवणारी जगण्याची जिद्द या पुस्तकातून अत्यंत संवेदनशीलपणे समोर येते.
पुस्तकातील अनेक प्रसंग मन हेलावून टाकतात. गर्भवती स्त्रिया अनेक किलोमीटर चालत, कधी जंगलातून जीव धोक्यात घालून रुग्णालयात पोहोचतात. काही वेळा त्यांची अवस्था इतकी गंभीर असते की जगण्याची आशाच उरत नाही. पण अशा परिस्थितीतही डॉक्टर म्हणून डॉ. ऐश्वर्या शांतपणे, संयमाने आणि कौशल्याने उपचार करत राहतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात निर्माण होणारा विश्वास पुस्तकात अत्यंत हळुवारपणे उमटतो.
या भागातील वास्तव फक्त दारिद्र्याचे नाही, तर सततच्या संघर्षाचे आहे. एका बाजूला नक्षलवादी, दुसऱ्या बाजूला पोलीस आणि प्रशासन यांच्या संघर्षात सामान्य आदिवासी माणूस भरडला जातो. संशय, भीती, असुरक्षितता आणि हिंसा या वातावरणातही इथली माणसे जगण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही या पुस्तकात निराशेपेक्षा आशेचा सूर अधिक जाणवतो.
डॉ. ऐश्वर्या यांनी फक्त समस्याच मांडलेल्या नाहीत, तर या भागात काम करणाऱ्या सकारात्मक व्यक्तींची ओळखही करून दिली आहे. बारसूरमधील गोडबोले दांपत्य, शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, मुलांच्या भविष्यासाठी सुरू असलेले “बचपन बनाओ” अभियान, खेळातून मुलांना नवी दिशा देणारी बिजापूर स्पोर्ट्स अकादमी, सेंद्रिय शैलीच्या शेती प्रसारासाठीचा भूमगादी प्रकल्प, पर्यटनासाठी झटणारे निसर्गप्रेमी जीतसिंह आर्य,आदिवासी संस्कृती जपणारे विविध उपक्रम या सगळ्यांमुळे बस्तरचा एक वेगळाच चेहरा समोर येतो.
IAS अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, IPS अधिकारी डॉ. दिव्यांग पटेल यांसारखे अधिकारी केवळ प्रशासन चालवत नाहीत, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, हे पुस्तकातून जाणवते. पंचशील आश्रमसारख्या संस्थांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची आणि सुरक्षित आयुष्याची नवी संधी मिळताना दिसते.
“बिजापूर डायरी”चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील माणुसकी. पुस्तक कुठेही कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक अनुभव हा जगलेल्या वास्तवातून आलेला असल्याने तो थेट मनाला भिडतो. आदिवासी समाजाविषयी सहानुभूती निर्माण करतानाच त्यांच्या संघर्षशील वृत्तीबद्दल आदरही निर्माण होतो.
बस्तरमधील आदिवासी समाजाचे जीवन जंगलाशी घट्ट जोडलेले आहे. आदिवासी संस्कृती जंगलातील विविध झाडे, फुले आणि फळांपासून ते पारंपरिक पेये तयार करतात. महुआच्या फुलांपासून बनवलेले पेय हे त्यांच्या सण, समारंभ आणि धार्मिक विधींचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच सल्फीच्या झाडातून मिळणारा गोड रस पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पेय मानले जाते.
तेंदू, इमली आणि इतर वनफळांपासूनही स्थानिक पेये तयार केली जातात. ही पेये केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नसून आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक आहेत.
बिजापूर डायरीमध्ये इंद्रावती नदीचा उल्लेख केवळ एका नदीप्रमाणे नाही, तर बस्तरच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आलेला दिसतो. दाट जंगलातून शांतपणे वाहणारी इंद्रावती बस्तरच्या निसर्गसौंदर्याला अधिक गूढ आणि मोहक बनवते.
सलवा जुडूम चळवळीमुळे बस्तरचे सामाजिक जीवन हादरून गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही इथला आदिवासी समाज पूर्णपणे कोसळला नाही. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनून गेला आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या लोकांमध्ये जगण्याची विलक्षण ताकद आहे, हे पुस्तक वारंवार जाणवून देते.
' बिजापूर डायरी ' वाचताना आपण फक्त एका प्रदेशाची माहिती घेत नाही, तर एका वेगळ्या भारताला भेटतो. संवेदनशील मनाने समाजाकडे पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. वंचितांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षामागे किती माणुसकी आणि समर्पण दडलेले असते, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक मनाला अंतर्मुख करते.


No comments:
Post a Comment