#हंपीतील गणेश मंदिर
विरुपाक्ष मंदिरास आम्ही हेमकूट पर्वतावर पोहचलो .हेमकूट पर्वतावरून विरुपाक्ष मंदिराचा उंच सुंदर गोपुर पाहून टेकडीच्या पायथ्याकडे निघालो .
हम्पीच्या हेमाकुटा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्याशी, गजमुखी देव गणेशाला समर्पित दोन मंदिरे आहेत. ससिवेकलु मंदिर आणि कडलेकू मंदिर या दोन्ही ठिकाणी भगवान गणेशाची वेगवेगळी रूपे आहेत.या दोन्ही मूर्ती एकाश्म मूर्ती म्हणजे एकाच दगडात कोरलेल्या अशा भव्य आहेत.
#ससिवेकलु गणेश मंदिर
ससिवेकलु मंदिर १५ व्या शतकातील आहे. हे एक अतिशय साधे खुले गर्भगृह असून, त्यावर अनेक चौकोनी खांबांवर फक्त छत आहे. येथील मूर्ती भगवान गणेशाची असून ती ८ फूट उंच, एकाच शिळेतून बनवलेली भव्य प्रतिमा आहे.
गणपतीच्या पोटाचा आकार मोहरीच्या दाण्यासारखा जवळजवळ गोलाकार असतो, म्हणूनच हे नाव ससिवेकलू पडले आहे,ज्याचा कन्नड अर्थ मोहरीचा दाणा आहे .
गणेशाला चार हात असून, प्रत्येक हातात विविध चिन्हे आहेत.
उजवा वरचा हात-अंकुश (goad)
उजवा खालचा हात- तुटलेला दात (broken tusk)
डावा वरचा हात -पाश (noose)
डावा खालचा हात-मोदक (लाडू) हा हात तुटलेला आहे आणि पुनर्निर्माण केलेला नाही.
पोटाभोवती नाग गुंडाळलेला दिसतो .हिंदू पुराणानुसार, गणेशजी खूप खाणारे आहेत. एकदा त्यांनी इतके जेवण केले की पोट फुटण्याच्या बेतात आले. पोट वाचवण्यासाठी त्यांनी एक साप पकडला आणि त्याला कंबरेच्या भोवती पट्ट्यासारखा बांधला. याच कथेचे दर्शन या मूर्तीत आहे.
या मूर्तीला पार्वती गणेशही म्हणतात .कारण ही मूर्ती मागच्या बाजूने पहिली असता ,मूर्तीच्या मागे पार्वतीचा हात दिसतो . गणेश आईच्या मांडीवर बसलेला असल्याचे दृश्यभास होतो.तर डोक्यावर पार्वतीची विशेष केशरचनाही दिसते .
एका साध्या सोळा-खांबी मंडपाच्या आश्रयाखाली, सशिवेकलु गणेश आपल्या आसनावर शांतपणे विराजमान आहेत. जवळच्याच एका शिलालेखात असा उल्लेख आहे की,इ.स. १५०६ , राजा नरसिंह द्वितीय यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे मंदिर आहे .चंद्रगिरी (आताचे आंध्र प्रदेश) येथील एका श्रीमंत व्यापाऱ्याने हे मंडप बांधले आहे .जवळच कृष्ण मंदिर आहे.
मूर्तीला झालेल्या नुकसानीमुळे ती विधीपूर्वक पूजेसाठी अयोग्य ठरल्याने, आता येथे कोणतेही विधी किंवा पूजा केल्या जात नाहीत.
#कडालेकालू गणेश मंदिर हंपी
ससिवेकलु मंदिराच्या अगदी जवळ कडलेकलु मंदिर आहे. ते हेमाकुटा टेकडीच्या ईशान्य उतारावर आहे. हे मंदिर एका बंदिस्त आवारात असून, त्यात अधिक सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत.हंपीमधील सर्वात मोठ्या एकाश्म गणेश मूर्तींपैकी एक येथे आहे, जी जवळपास ४.६ मीटर (१५ फूट) उंच असून एकाच ग्रॅनाइटच्या शिळेतून कोरलेली आहे.
गणपतीचे गोल पोट हरभऱ्याच्या दाण्यासारखे दिसते म्हणून मंदिराला कडलेकालु (कन्नडमध्ये हरभरा ) हे नाव मिळाले आहे. या स्तंभयुक्त सभागृहात विजयनगर स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य असलेले, बारीक घडवलेले स्तंभ असून त्यावर फुलांचे आणि पौराणिक कथांचे गुंतागुंतीचे कोरीवकाम आहे.
यांच्या बांधकामाचा काळ इ.स. १५०० आसपास आहे .स्तंभयुक्त सभागृह असलेली विजयनगरची मंडप शैली येथे दिसते .
मंदिरात बऱ्यापैकी अंधार होता, त्यामुळे फोटो काढण्यासाठी मला फ्लॅश वापरावा लागला.मूर्ती चतुर्भुज आहे. एका हातात मोदक /लाडू धरलेला असून, सोंड त्याकडे वळलेली आहे. उरलेले हात आशीर्वाद मुद्रेत आहेत.राजेशाही खांब विजयनगर शैलीचे आहेत.बारीक, उंच, आणि अत्यंत सुंदर कोरलेले. खांबांवर फुलं, पौराणिक कथा, देवता आणि खोडकर बालकृष्ण झाडावर लपलेला, स्त्रियांचे कपडे चोरून लटकवलेला सारखी नक्षी कोरलेली आहे.
एका खांबावर हनुमान ची सुंदर मूर्तीही आहे.
No comments:
Post a Comment