Monday, April 13, 2026

वेळास कासव महोत्सव -2026

 वेळास कासव महोत्सव पाहण्याची अनेक वर्षांची तीव्र इच्छा मला अखेर काल या पिटुकल्या कासवांच्या जन्मसोहळ्याला घेऊन गेली.



जाणार तर एखाद्या सहल आयोजित करणाऱ्या ग्रुपसोबत हे नक्की होत.इन्स्टा ,फेसबुक धुंडाळले.अनेक नंबर रील्स सेव्ह केले .मग फेसबुकवर एक खणखणतीत आवाजात वेळास कासव महोत्सवाची माहिती देणारा "सह्याद्री मेट्स "Sahyadri Mates ओमचा व्हिडीओ सापडला .जो आवडला.यावेळी आईला ट्रीपला न्यायचं ,आई -लेकीने धमाल करायचं ठरवलं.ट्रिपची संध्याकाळ उगवली डेक्कनला भटकंती वेडे जमा झाले .ट्रॅव्हलरमध्ये शिरताच २४ तासाच्या ट्रीपसाठी ट्रॉलीभर कपडे आणणारा आणि एनर्जीने भरलेला मैत्रिणींचा -त्यांचा मुलांचा मोठा ग्रुप ट्रीपमध्ये धमाल आणणार हे समजलं .मग काय हम गड्डी लेकरं निकले वेळास कि और ..

पहाटेच्या थंड वारा झेलत ,समुद्राची धीर-अधीर गाज कानी भरत वेळास किनाऱ्याकडे कूच केले .जाताना कांदळवनाच्या मुळांनी जमिनीला घट्ट धरलेलं पाहून निसर्गाच्या प्रत्येक मॅनेजमेंटचे कौतुक अक्षरशः आश्चर्य चकित करत राहते .पुढे किनाऱ्यावर गेल्यावर वेध लागले कासवांच्या पिलांना पाहायचे .

एका बंद जाळीच्या आत कासवांची अनेक घरटी समुद्राच्या मऊशार मातीत खोल केलेली असतात त्यावर एक बांबूचे मोठे टोपडे झाकलेले असते .खूप वेळ त्या बंद जाळीच्या बाहेर वाट पाहिल्यावर तेथील वन संवर्धन करायला मदत करणारे गावकरी आले .इथे निसर्गाने धीर ,संयम किती महत्वाचा याचा प्रत्ययच जणू दिला .त्यांनी सर्व घरटे उघडून पहिले,दुसरे,तिसरे पण अंडे फोडून बाहेर आलेले पिल्ले सापडले नाही.तेव्हा आज पिल्ले दिसणार कि नाही अशी शंका आली ,कारण कधी कधी अजिबात एकही पिल्ले बाहेर पडत नाही.पण अखेर चौथ्या टोपल्या खालच्या घरट्यात दोन छोटुले कासव दिसले..आणि ओह वाह अशा जमलेल्या लोकांच्या आनंदाच्या आवाजाने परिसर घुमला .चला रिकाम्या हाती नाही तर थोड्या तरी उत्तम अनुभव आपल्याला मिळणार याचे समाधान वाटले .




मग हि पिल्ले समुद्र किनाऱ्यावर सोडण्यासाठी नेण्यात आली .जिथे दोरीचे एक छोटे कुपन करून तिन्ही बाजूने पर्यटक उभे राहून हा सोहळा अनुभवणार होते .या आधी तेथील वनरक्षक अधिकाऱ्यांनी कासव संवर्धनाची खूप मोलाची माहिती दिली.

यात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये समुद्री कासवांच्या (Sea Turtles) संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ५ प्रकारचे समुद्री कासव आढळतात. त्यात सर्वात जास्त ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) कासव असतात. समुद्री कासव आणि जमिनीवरील कासव यात फरक सांगितला आहे .समुद्री कासवांना फ्लिपर्स (पंखासारखे पाय) असतात, ते समुद्रात राहतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मादी कासव किनाऱ्यावर येऊन ९० ते १०० अंडी घालते. नंतर ती समुद्रात परत जाते. अंडी वाचवण्यासाठी स्थानिक लोक (वन विभागाकडून मानधन घेऊन) रात्री पेट्रोलिंग करतात. लाल दिवा वापरतात जेणेकरून कासवांना त्रास होऊ नये. अंडी घालल्यानंतर लगेचच काढून घेऊन हॅचरी (सुरक्षित जागी) ठेवतात. तिथे ५२ ते ५८ दिवसांत पिल्ले (हॅचलिंग्स) बाहेर पडतात. पिल्लांचे लिंग (मादी/नर) अंड्यांच्या तापमानावर अवलंबून असते, त्यामुळे तापमान नियंत्रित ठेवले जाते.ज्यात गार पाण्याने भिजलेले पोत इत्यादी वापरले जाते. पिल्ले बाहेर पडल्यानंतर लगेच समुद्रात सोडले जातात. त्यांना मानवी हस्तक्षेप टाळावा लागतो कारण एक हजार पैकी फक्त एक पिल्लू जगते. कासव महोत्सव दरम्यान पिल्ले सोडण्याची प्रक्रिया आणि लोकांना आवाहन केले की, पिल्ले सोडल्यानंतर एक तास समुद्राकडे कमी यावे जेणेकरून पिल्लांना अडचण येऊ नये.

सांगितलेल्या ठराविक काळानंतर समुद्राच्या लाटांशी खेळण्याची मजा अनुभवली. मग नाशत्यासाठी एका कोकणी घरी निघालो.अत्यंत आपुलकीने हे कुटुंब आम्हांला हवं नको ते पुरवत होते ...खरंच की कोकणची माणसं साधी भोळी ,यांच्या काळजात भरली शहाळी !!!

पुढचा भटकंती टप्पा होता 'बाणकोट' उर्फ हिम्मतगड ! या किल्ल्याची ,किल्ल्याला हिम्मतगड नाव देणारे कान्होजी आंग्रे खुप महत्वाची माहिती आमचे sahyadri mates चे टीम लीडर ओम याने दिली. हिम्मतगड उर्फ बाणकोट किल्ला (ज्याला फोर्ट व्हिक्टोरिया म्हणूनही ओळखले जाते) हा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात, सावित्री नदीच्या मुखावर (समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी) एका ३०० फूट उंच टेकडीवर वसलेला सागरी किल्ला आहे. हा किल्ला मुख्यतः खाडीतील व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला.  ग्रीक प्रवासी टॉलेमी (१ल्या शतकात) याने याचा उल्लेख मंदगोर/मंदारगिरी म्हणून केला. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने इ.स. ६४० मध्ये येथे वास्तव्य केल्याची नोंद आहे. १५४८ ला बीजापूरच्या आदिलशहाकडून पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला. १७०० ला मराठा सरसेनापती कान्होजी आंग्रे यांनी किल्ला जिंकून त्याला "हिम्मतगड" हे नाव दिले. तो मराठा आरमाराचा महत्त्वाचा तळ बनला. १७५५ ला तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमधील वादामुळे पेशव्यांनी इंग्रजांशी युती केली. इंग्रज कमोडोर जेम्स याने सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर बाणकोटही ताब्यात घेतला आणि "फोर्ट व्हिक्टोरिया" नाव दिले. नंतर इंग्रजांना किल्ला ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नसल्याने तो पेशव्यांकडे परत दिला. १८३७ ला मामलेदार कार्यालय मंडणगड किल्ल्यावर हलवले गेले. हा किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा आहे. समुद्र, खाडी आणि हिरवीगार निसर्गाचा अप्रतिम नजारा येथून दिसतो. तो कोकणातील सागरी वर्चस्व आणि मराठा आरमाराच्या शौर्याची साक्ष देतो.


किल्ल्यास भेट दिल्यांनतर ठरलेल्या ठिकाणी पुन्हा रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन हरिहरेश्वरकडे रवाना झालो .वेळास ते हरिहरेश्वर पोचण्यासाठी समुद्री जेट्टीने जायचे हा एक रोमांचक अनुभव घेण्याच्या वाट पाहत होतो. वेळास (रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका) ते हरिहरेश्वर (रायगड जिल्हा, श्रीवर्धन तालुका) जाण्यासाठी सावित्री नदी खाडी ओलांडण्यासाठी वेसवी जेट्टी ते बागमंडळे जेट्टी ही फेरी बोट सेवा उपलब्ध आहे.ही फेरी बोट घेतल्याने रस्त्याने लांबचा चकरा टाळता येतो. प्रवास फक्त १०-१५ मिनिटे लागतो. गाडी (कार, बाईक, छोटी बस) सुद्धा फेरीत घेता येते.

आणि उणापुऱ्या ३० मिनिटांत रत्नागिरीतून रायगड जिल्हात जेट्टी +ट्रॅव्हलर मार्गे हरिहरेश्वरला पोहचलो. १७२३ मध्ये आगीत मंदिर नष्ट झाल्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पूर्ण जीर्णोद्धार केला. पेशव्यांचे कुलदैवत मानले जाते.चंद्रराव मोरे यांनी प्रदक्षिणा मार्ग बांधला.छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कान्होजी आंग्रे आणि पेशवे यांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.काळभैरव हे क्षेत्राचे रक्षक देवता मानले जातात. दर्शनाची पद्धत म्हणजे प्रथम काळभैरव, नंतर हरिहरेश्वर आणि शेवटी पुन्हा काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे .

त्यानंतर सुप्रसिद्ध मंदिराभोवती एक खास डोंगर-समुद्र प्रदक्षिणा मार्ग-हरिहरेश्वर मंदिरातील "कोसाची प्रदक्षिणा" सुमारे १ ते १.५ किमी हा मार्ग कोकणातील एक अनोखा मार्ग चालायला सुरुवात केली .मार्ग डोंगर, खडकाळ कडा आणि समुद्रकिनाऱ्याजवळून जातो, ज्यामुळे तो केवळ धार्मिक नव्हे तर निसर्गरम्यही आहे. सुरुवातीलाच काही अंतरानंतर क्लिफ कट दिसतात . पायऱ्या खडकातच कोरलेल्या आहेत. मंदिरामागे दोन मोठ्या खडकांमधून मार्ग जातो. एक प्रसिद्ध आख्यायिका आहे की भीमने मार्गात अडथळा ठरत असलेला मोठा खडक दोन तुकड्यांत फोडला.

पुढे दिसणार्या हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गातील खडक रचना ज्याला कॉम्ब खडक रचना म्हणतात. हा मार्ग डोंगर, खडकाळ कडा आणि समुद्रकिनाऱ्याजवळून जातो, जिथे लाटा, वारा आणि पाण्याच्या दीर्घकाळीन प्रभावामुळे खडकांमध्ये विविध आकार साकार झाले आहेत.समुद्राच्या लाटा आणि भरती-ओहोटीमुळे हे खडक वेव्ह-कट (wave-cut) झाले आहेत.खडकांच्या भिंती आणि उतारांवर मधमाशीच्या पोळ्यासारखी छोटी-छोटी खोबरे किंवा गुहा तयार झालेली दिसतात. हे टाफोनी म्हणून ओळखले जाते. हे शतकानुशतके वारा, पाणी आणि मीठ यांच्या weathering -क्षरण मुळे तयार झाले.खडकांमध्ये लाटांनी कोरलेल्या छोट्या गुहा आणि niches आहेत.लाटांच्या मार्‍याने तयार झालेले मनमोहक, नैसर्गिक आकार काही ठिकाणी गुळगुळीत, काही ठिकाणी खडबडीत आणि अद्भुत डिझाइन दिसतात. काही खडकांवर छोटे कोरल आणि शेवाळ देखील वाढलेले होते.

या खडकांमुळे मार्गावरून चालताना एकीकडे खडक आणि दुसरीकडे अथांग समुद्र यांचा थरारक नजारा मिळतो. अगदी प्रत्येकाने अनुभवी अशी ही रोमांचक प्रदक्षिणा आहे . पिटुकल्या जीवांचा समुद्राकडे सुरू होणारा प्रवास ,अथांग सुंदर वेळास किनारा ,बाणकोटची ऐतिहासिक माहिती,हरिहरेश्वरची धार्मिक व नैसर्गिक चमत्कारांची दृश्ये डोळ्यांत -मनात भरून एक सुंदर अविस्मरणीय अनुभव जीवन खाती जमा झाला .



या पूर्ण प्रवासात संपूर्ण अनोखळी पण भन्नाट-एनर्जेटिक मैत्रिणी अनुभवल्या,सर्वात छोट्या तीन वर्षाच्या लेकराचा समुद्र पाहून झालेला आनंद अनुभवला ,लहानपणी काळजीने आई समुद्र काठी तिकडे जाऊ नको म्हणायची ,तसेच काळजीने मी म्हणत होते "आई फार समुद्रात जाऊ नको "असा काळाचा गॉड उलट माहीम अनुभवला .कोणत्याही परिस्थितून टीम लीडरने कसे वातावरण हलके फुलके आणि आनंददायी ठेवायचे याचा अनुभव टीमलीडर ओम कडून मिळाला .मागे असणाऱ्यांना प्रोत्साहन देणारा सुमित याची चिकाटी अनुभवली .पियुष आणि रमझान यांनी चालत राहा ,खुश राहा हा अनुभव दिला .मैत्रिणीने "मुलींनो स्वतः:साठी वेळ द्या " या माझ्या एका वाक्यावर या ट्रीपवर येण्याचे ठरवले याचा समाधानकारक अनुभव मिळवला . सांसारिक जीवनातुन वाचन,अध्यात्म,लिखाण ,नवमैत्र यांचे अधिष्ठाण देताना स्वतःच्या भटकंतीच्या एक एक इच्छा पूर्ण करतांना ...मी मला पुन्हा पुन्हा सापडत राहते..पुन्हा नव्याने !!! -भक्ती





No comments: