Friday, January 30, 2026

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(आता कोणाच्या वाटण्याने आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:))

तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.

तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा  "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती.

सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता. 

या अभ्यासक्रमात हीनयान (थेरवाद) आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला.

सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली.

तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही.

त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो.

बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात.







पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली.

तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात.




बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही.  

बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत .

अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप

मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ

वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप

क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा

समंतभद्र -घोड्यावर बसलेला





इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या .

तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत.

सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे.


इतर प्रमुख बौद्ध देवी 

महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे.

प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक.

मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित.

भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते.

जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी.

हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.



काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो.

मी काही अभ्यासक नाही हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.

परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते.

कायप्पा संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी - 


-भक्ती 

Wednesday, January 28, 2026

"प्राइड अँड प्रेज्युडिस"




अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.

 "प्राइड अँड प्रेज्युडिस" १८०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर  "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!

पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही  एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.

 १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत.   आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका  एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.

"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.

लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."

 तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."

ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.

-भक्ती 


Tuesday, January 27, 2026

"मंतरलेले बेट" -व्यंकटेश माडगूळकर



 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff. हे पुस्तक १९५३ मध्ये प्रकाशित झाले असून, ते लेखकाच्या स्वतःच्या बालपणावर आधारित आहे .१८९८ ते १९०० च्या आसपासच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावरचे जीवन.

पुस्तकाची सुरुवातच खूप जादुई आहे. नायक असलेला लहान मुलगा म्हणतो, "जन्माला यावे ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला. मॅनहॅटन म्हणजे एक लहानसे जगच होते." त्याला हे बेट "मंतरलेले" वाटते ,कारण ते त्याच्यासाठी जादुई, छोटे, स्वतंत्र आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेले आहे. पहिल्या चार-पाच वर्षांच्या आयुष्यात तो शहरात मोकळेपणाने भटकतो, रस्ते, इमारती, लोक, दुकाने, पार्क हे सर्व त्याच्या बालक नजरेतून जिवंत होतात.

तेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यात तणाव होता, स्पॅनिश-अमेरिकन युद्धाची धमकी होती. लहान मुलगा सैनिक होण्याची स्वप्ने पाहतो, तशी इटुकली पिटुकली मित्रांबरोबर तयारी करतो .हे सगळे त्याच्या बालसुलभ उत्सुकतेने आणि गमतीने वर्णन केले आहे. शहरात अनेक इमिग्रंट्स राहतात .वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांच्या संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ, व्यवसाय, एकमेकांशी तालमेल हे सगळे मुलाच्या डोळ्यातून खूप रोचक दिसते. ते "मेल्टिंग पॉट" सारखे आहे, जिथे सगळे एकत्र येऊन नवीन अमेरिकन जीवन बनवतात.

१९०० साल सुरू झाल्यावर विज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीमुळे जीव वाचवले जाण्याचे अनुभव येतात. मुलाला हे आश्चर्य वाटते. नंतर तो न्यूयॉर्क जवळच्या खेड्यात -Countryside जातो (मला लहानपणापासून Countryside शब्द फार आवडतो.) तिथे पहिल्यांदा दूध काढणे पाहतो, कुत्र्याशी मैत्री होते, निसर्ग आणि ग्रामीण जीवन त्याला नवीन जग दाखवते. शहर आणि खेडे यांच्यातील फरक त्याच्या मनात रुजतो.

मोठा होताना तो विचार करतो .जीवनात काय करावे? धावपटू व्हावे की नाटकात काम करावे, की दुसरे काही? अनेक वाटा धुंडाळतो. शेवटी अब्राहम लिंकनवर एक लेख लिहितो, तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध होतो आणि पदक मिळते. तेव्हा त्याला खात्री होते , "आपण लेखक व्हायचे!" आणि तिथूनच त्याचे लेखनकार्य सुरू होते.

हे पुस्तक लहान मुलांसाठी तर नक्कीच वाचण्यासारखे आहे .भाषा सोपी, उत्सुकता कायम ठेवणारी, आणि शहर,देश,संस्कृती यांची ओळख करून देणारी. पण मोठ्यांनाही आवडते, कारण २०व्या शतकाच्या सुरुवातीचे न्यूयॉर्कचे जिवंत चित्रण आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या मराठी अनुवादामुळे ते मराठी वाचकांना खूप जवळचे वाटते .जणू आपल्याच भाषेत न्यूयॉर्क फिरत आहोत!

न्यूयॉर्क करून आठवले, असाच न्यूयॉर्क जवळच्या 'स्टेटन आयलंडचा' 'नानास' सिनेमा मी पाहिला होता.तेव्हापासून इथल्या मंतरलेल्या बेटांच्या  मोहात आहे...आता ब्रूकलिन, क्वीन्स या बेटांवर आधारित खुसखुशीत पुस्तक किंवा सिनेमा पाहायचा ,शोधायचा आहे.

-भक्ती 





Saturday, January 24, 2026

महामाया निळावंती (लेखक-सुमेध)

 महामाया निळावंती 

लेखक-सुमेध



दोन वर्षांत  २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे.

जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते. जीवनदेवी महामाया निळावंती सतत सूचवत असते,

"गेलेल्याला आपल्या ठिकाणी जाऊ द्यावे,तुझ्यामध्ये विश्व आहे, त्याचा शोध घे!"

सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून उगवलेली एक प्राचीन दंतकथा, रहस्यमयी निळावंतीची कथा, आजच्या काळात पुन्हा जिवंत होते. चारशे वर्षांपूर्वी निळावंती ही एक रहस्यमयी स्त्री होती .ती पशु-पक्ष्यांची, झाडांची, निसर्गातील मूक चेतनांची भाषा जाणत होती. तिच्याकडे मृत्यूला आव्हान देण्याची, प्राण फुंकण्याची कला होती.काळाच्या अनंत चक्रात निळावंती पुन्हा पुन्हा जागी होते.काळपुरुषाचा अवतार हा निळावंतीचा साथीदार हाही पृथ्वीच्या जन्मापासून तिचा शोधक आहे. काळाच्या अनंत उलथापालथीनंतर माणूस स्वार्थी-आत्मकेंद्रित होत गेला. 

निळावंतीशी निगडित एक प्राचीन पोथी आहे, जी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर खेळते. आधुनिक काळात एक बाप आपल्या वैयक्तिक दु:खातून या पोथीचा शोध घेत सह्याद्रीत येतो, आणि तिथून कथा उलगडू लागते.कादंबरीत अनेक रहस्य एकात एक गुंफलेले आहेत. विक्रम, बाजिंदा, हेलबर्ग यांच्या रूपाने निळावंतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची कला त्या स्वार्थी माणसाला आपल्या कडे पाहिजे. तेव्हा निळावंतीचा भाबडा जीव, मूक प्राणीमात्रांचे अस्तित्व याचा त्याला सतत विसर पडत राहतो.निळावंती मात्र निसर्गाशी एकरूप असते, ती मायाजाळ सहज पार करते, प्राण फुंकते, पण स्वार्थी मनाच्या काळ्या बाजू तिला पूर्णपणे समजत नाहीत आणि शेवटपर्यंत दगाफटका होत राहतो.

लेखक सुमेध यांनी अठरा पौराणिक पोथ्या, ऐतिहासिक दस्तऐवज आणि तांत्रिक आख्यायिकांचा अभ्यास करून ही मेटाफिक्शन कादंबरी निर्माण केली आहे. वाचकांना खिळवून ठेवते आणि वाचून झाल्यावरही विचार करायला लावते.

आणि हो, त्या ताम्हण फुलाच्या गूढाबद्दल तर खूप चर्चा झाली होती! काही आवृत्त्यांमध्ये वाचकांसाठी ताम्हण फुलांच्या बिया दिल्या होत्या.कोणाकोणाला मिळाल्या ताम्हण फुलांच्या बिया ?? कोणाकोणाचे त्या बिया रुजल्या?

लेखकाच्या हस्ते हस्ताक्षरीत अशी प्रत मिळालेली मी एक भाग्यवान वाचक आहे!

-भक्ती 




Thursday, January 22, 2026

पक्षी रूपके

 #पक्षी_रूपके 



पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ।

पिलुवाट पाहे उपवासी ॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥

तान्हे वत्स घरी बांधलेसे देवा ।

तया हृदयी धावा माउलीचा ॥३॥

नामा म्हणे केशवा तु माझा सोईरा ।


इवलाश्या पक्ष्यांचे दाणे टिपयाची सकाळची लगबग रोज पाहते हे दाणे टिपून त्यांना पिल्लाना भरवायचे असते.संतांनी यात रूपक शोधलं .मराठी संतांची निसर्गातील घटना रूपक म्हणून वापरायची प्रतिभा अभंग ओव्या वाचताना एका प्रतिसृष्टीत डोकवायचा आनंद देतात.या अभंगात ईश्वराच्या मातृत्वपूर्ण कृपेचे प्रतीक आहे. जसे आई पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे आणते आणि ते उपाशी राहून वाट पाहतात तरी आई येऊन पोसते, तसे भक्त विरहात असला तरी विठ्ठल त्याच्याकडे धावतो.


 आणि हे दाणे संचय करणे हे पक्षांत नाही ते रोजच्या रोज येणार दाणे टिपणारी ...हवे तेव्हडेच मग अजून रूपक यावर आहे ,

पक्षी अजगर न करी संचित ।

तयासी अनंत प्रतिपाळी ॥२॥

तुका म्हणे तया भार घातलिया ।

उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

निसर्गातील प्राणी -पक्षी, अजगर, बेडूक हे उदाहरण देत तुकोबा सांगतात की, जो संचित करत नाही, त्यालाही ईश्वर पोसतो. भक्तानेही प्रपंच करावा, पण त्यात गुंतून जाऊ नये..सर्व ईश्वरावर सोपवावे.


पक्ष्यांचे हि वागणूक इसापनीतीतही रूपकाने कथांमध्ये गुंफली गेली.चतुर कावळा कथा तर प्रसिद्धच आहे .


असाच एक चतुर कावळा मला रविवारी भेटला.एक कावळा इतका काव काव करत होता. तब्बल १५ मिनिटे न थांबता तो काव काव करत होता ..काय आज पाहुणे येणार का ? वगैरे विचार झाले .पण हा आपला काव काव करीत होता .मग लक्षात आलं कठड्यावर उरलेली खिचडी ठेवली होती. याला ती पाहिजे तो मला काव काव संदेश देऊन तिथून उठायला सांगतोय .मी हळूच उठून दूर गेले .तर पटदिशी आला आणि खिचडी खात बसला.एक मोठा घास घेऊन उडून गेला .खरंच कावळा किती हुशार त्या दिवशी पटले.


त्याच्या काव काव ने मला ज्ञानेश्वर माउलींचा अभंग/विरहिणी आठवली .भक्ताची विठ्ठलभेटीची तळमळ इतकी तीव्र आहे की साधा कावळा ओरडला तरी तो शुभशकुन वाटतो. कावळ्याला प्रेमाने, सन्मानाने बोलावले जाते ,जसे आई मुलाला बोलावते


पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

-ज्ञानेश्वर महाराज

#आळशीचे_शेत

 #आळशीचे_शेत



स्वतःच्या दुर्गुणांचा उदोउदो कोणी करत नाही, मी तर स्वतःचा "आळशी" हा मेडल घालून फिरते. शेत-बागकाम? अरे बाबा, "जर झाडं स्वतः उगवत नाहीत तर मी काय करू? रिज्युम पाठवू का त्यांना?" तशी ती खूप चंचल-तरबेज आहे. पण शेत-बागकामाबाबत मी आळशी आहे. आता बागकाम केलं नाही तरी काही अडणार नाही. पण इथलाच कोपरा बहरतोय. सुगंधी कुंड्या दिसतात, त्यांची काळजी घेणं हे किती सुखकारक असतं! आता उंच आकाशाकडे कोणी धावतंय असं वाटतं. पण नाही, मी अशा कित्येक कुंड्या आणल्या, जोपासल्या, तरी खूप कमी टिकल्या. उरलेल्यांना कृश होताना पाहून त्रासच होतो. वाटतं, आपणच आळशी आहोत.
मागच्या महिन्यात स्वयंपाकासाठी आणलेले कांदे… ओलसर-खराब, एकदम "डिप्रेशन मोड" मध्ये. रोज चिरायला घेतला तर कधी छोटे, कधी मोठे त्यांच्या डोक्यावर हिरवा कोंब / पात फुटलेली. राग यायचा. एकदा असाच हिरवा शेंडा फुटलेला कांदा माझ्याकडे दु:खाने टुकूटुकू पाहत होता मी म्हटलं, "चल रे, तुझी पात होईल का? पात उगवून तरारली की "कापणी करूया!" मग कांद्याच्या पातींचा फेस्टिव्हल सुरू ...धपाटे ,भरीत ,डाळीची भाजी,सॅलड "ऑर्गेनिक लाइफ!"
जुन्या पसरट भांड्यात तो टुकुटुकु बघणारा हिरव्या फेट्याचा कांदा काळ्याभोर, पाण्याने ओलसर मातीत रोवला. दुरडीतले इतर हिरव्या फेट्यावाले भाऊबंदही आमचा भाऊ कुठे म्हणून विचारू लागले . तेव्हा त्यांचीही रवानगी मातीत झाली. फेटेवाले गॅंग!!!"अरे भाऊबंद, तुम्ही स्वतः उगवा, मी फक्त लाईक्स देतो!" लवकरच पाती तरातरा उगवल्या .मी कात्री घेऊन ,माझ्या शेताची कापणी करते "आजचा क्वोटा पूर्ण!"
कांद्याचा तो ताजा गंध मला फार आवडतो! "हे गंध नाही, माझ्या आळशीपणाचा परफ्यूम आहे!" कोवळेपणा जीभेला ताजेपणा देतो .
आता जमिनीत नाही, तरी ही शेती कशी? अरे, ही आळशी शेती आहे! झाडं उगवली की मी सेलिब्रिटी!!
बाबा-काका सांगतात. लहानपणी शाळेत 'क्रॉप सायन्स' सारखा विषय होता. त्यात शेतजमिनी सुपीक करणे, वाफे करणे, बियाणे तयार करणे, रोप लावणे, सेंद्रिय खत वापरणे... असा सगळा जम… मध्यंतरी काळात शिक्षण कारकुनी व्यवस्थेसाठी जुंपलं गेलं. मग माझ्यासारखे आळशी शेतकरी तयार झाले. AI च्या जमान्यात सगळं काम माणसाच्या हातून निसटतंय. पण येणाऱ्या काळात AI करू शकणार नाही असं फळं-भाज्या पिकवायचं.
आळशी शेतकरी म्हणजे काय? जो काम टाळत नाही, तर कामाला सोपं बनवतो. ज्याला माहिती आहे की, एका छोट्या कुंडीतही जग बदलता येतं .आपलं आरोग्य, आपला स्वाद, आणि आपला मूड!
तुम्हीही सुरू करा ना? एक छोटी कुंडी, थोड्या बिया, आणि भरपूर आळशीपणा. पाहा, कसं मजेत "शेत" उभं राहतं!

Saturday, January 17, 2026

पत्र निमित्तमात्र....

 


पत्र निमित्तमात्र

सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री... ही मैत्री फक्त शब्दांची नव्हती, ती हृदयाच्या गहन कोपऱ्यातून उमललेली, पत्रांच्या माध्यमाने फुललेली एक अनोखा आयुष्यघन होता.पत्रे ही फक्त कागदावरची अक्षरे नव्हती ती दोन संवेदनशील आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करत गेली.
या पत्रव्यवहाराची सुरुवात अगदी साधी होती – पुलं एकदा दीर्घकाळी बाहेरगावी असताना सुनीताबाईंना जी. ए. यांचे पुलं. यांना लिहिलेले पत्र वाचायला मिळाले. त्यांनी उत्तरासाठी जी. ए. यांना पहिले पत्र लिहिले. त्या पत्राने सुरू झालेला हा संवाद ८ वर्षे (सुमारे १९७७ ते १९८५) चालला.
पुढे या पत्रव्यवहारांची स्वतंत्रपणे या दोन्ही लेखकांच्या नावे पुस्तकेही प्रकाशित झाली.
सुनीताबाईंनी जी.ए यांना लिहिलेली त्यांच्या या पत्रांचे संकलन म्हणजे "प्रिय जी.ए." हे पुस्तक (मौज प्रकाशन, २००३) प्रसिद्ध झाले.जी. ए. यांची उत्तरपत्रे समाविष्ट नाहीत, फक्त सुनीता ताईंची पत्रे.हे पुस्तक २००८ मध्ये पहिल्या "जी. ए. कुलकर्णी पुरस्कार" ने सन्मानित झाले.
तर दुसरे पुस्तक --
"जी.एं.ची निवडक पत्रे" हे जी. ए. कुलकर्णी यांनी विविध आप्तेष्ट, मित्र आणि साहित्यिकांना लिहिलेल्या पत्रांचे संकलन आहे. हे मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले चार खंड आहेत:
खंड १: १९९५
खंड २: १९९८
खंड ३: २००६
खंड ४: नंतरचे (मरणोत्तर प्रकाशन)
हे पत्रव्यवहार जी. ए. यांच्या खोलवरचे, वैचारिक, कधी व्यंग्यपूर्ण, कधी भावनिक आणि नेहमीच साहित्यिकदृष्ट्या समृद्ध आहे.यात सुनीता देशपांडे, पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, जयवंत दळवी, माधव आचावल,अनंतराव कुलकर्णी, मा. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या व्यक्तींना लिहिलेली पत्रे समाविष्ट आहेत.
जणू दोन प्रगल्भ मनांच्या आत्मसंवादाचा एक दस्तऐवज!
जी. ए. यांचे वाचनक्षेत्र अफाट होते.भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चिमात्य साहित्य, कविता, संगीत... सर्व काही त्यांच्या मनात रुजलेले. सुनीताबाईंचीही भारतीय ग्रंथांची ओळख आणि साहित्यिक जाण कमालीची सूक्ष्म होती. या दोघांच्या पत्रांतून साहित्याचा आस्वाद, जीवनमूल्ये, प्रवासवर्णने, थोर-मोठ्यांच्या आठवणी, आरोग्याची काळजी... असे अनेक विषय मायावी धाग्याने गुंफले गेले. कधी ग्रेसच्या कवितांच्या ओळींनी पत्रे काव्यमय होत, कधी बोरकरांच्या शब्दांनी मन उदास होत, तर कधी गायकांच्या गायनशैलीच्या कौतुकाने पत्रे संगीतमय होत. "माया" या संकल्पनेवरचे विचार तर जणू मायावी धुंदीत बुडवत.प्रवासवर्णांनी पत्रांना पंख मिळत,पानाफुलांच्या ओळखीने पत्रात वसंत फुलत असे !
जी. ए. यांचे जीवन अत्यंत सुसंस्कृत, आत्ममग्न आणि संवेदनशील होते. प्रभावती आणि नंदा या बहिणींची साथ, कथांच्या रंगीत-गूढ मालिका, मित्रांचे गोतावळे... हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देत. सुनीताबाईंचास्पष्टवक्तेपणा हाही पत्रांत ठळकपणे उमटतो .पण तोही प्रेमळ, जिव्हाळ्याचा. माधव आचवल, वसंतराव देशपांडे यांच्या जाण्याने दोघांच्या आयुष्यात एक आभाळच हरवले, हे त्यांनी पत्रांतून स्पष्टपणे व्यक्त केले. ते शब्द वाचताना थोरांच्या आयुष्यातली पोकळी अनुभवली.
जी. ए. यांच्या आजारपणाची बातमी लागल्यावर सुनीताबाईंच्या पत्रांत काळजीचा सूर अनेकदा येत असे . "पुण्यात या, इथल्या डॉक्टरांकडून इलाज करून घेऊ या" असा आग्रह अनेकदा त्या करत .पण जी. ए. यांचा स्वाभिमान अढळ होता. त्यांनी कधीच आजारपणाचा विषय सुनीताबाईंच्या मदतीपर्यंत पोहोचू दिला नाही. हा स्वाभिमान... अखेरच्या श्वासापर्यंत जपलेला. अगदी शेवटच्या क्षणी सुनीताबाईंच्या घराजवळच हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पण ती बातमीही त्यांनी सुनीताबाईंना लागू दिली नाही. किती गहन, किती दुःखद...
दोघांमध्ये अनेक विषयांवर मतभेदही होते. शरदचंद्रांच्या लेखन त्यातला नायिकांचे दु:ख सुनीईताबाईंना कथा-पात्रांचा उत्कृष्ट नमुना वाटत .तर जी.ए. यांना चक्क हास्यपद वाटत .अशा अनेक रुपरेखेवर,साहित्यातील एकमेकांच्या विरुद्ध विचारांवर पत्रामध्ये विचारांच्या फेऱ्या चालत
कधी पत्रांत खंड पडत.दोघांमध्ये गैरसमजाणे जागा घेतलीय काय ,असा विचार येऊन उदास वाटत होत, मन रुखरुखत होत.पण एकाच्या तीन-चार पत्रांनंतर दुसऱ्याचे सावकाश होईना ... उत्तर येत असे .सूर्याच्या स्वच्छ प्रकाशासारखे निर्मळ, भावनांच्या लवलेशाशिवाय शुद्ध!!तेव्हा हायसे वाटत... नाते पुन्हा ताजे, अधिक गहिरे होत.
जी. ए. गेल्यानंतर सुनीताबाईंनी "Good Bye Friend " हे निरोपाचे अखेरचे पत्र लिहिले.ते वाचताना सुनीताबाईप्रमाणे जी. ए. आपल्याला असे अचानक कसे सोडून गेले असे गहिवरून येते.आपणही एक मैत्र गमावला असे वाटते. कोलाहलाच्या या जगात दोन बुद्धिवादी, संवेदनशील आत्मे इतक्या निर्मळपणे, जिव्हाळ्याने पत्रव्यवहार करत होते... हे ऐकणे-वाचणे म्हणजे आपल्यातही असाच समंजसपणा, प्रेमळ स्पष्टता आणि गहन आदर रुजवण्यासाठी एक प्रेरणा आहे.
हा पत्रसंवाद फक्त साहित्यिक नाही,तो हृदयाचा आहे. वाचताना जाणवते.खरी मैत्री ही पत्रांच्या ओळींमधून नव्हे, तर दोन आत्म्यांच्या मधल्या शांत, गहन संवादातून उमलते. आणि ती मैत्री... काळाच्या पलीकडे अमर राहते.
-भक्ती

Tuesday, January 13, 2026

अदृश्य जगाचे कुतूहल -१.४

 अदृश्य जगाचे कुतूहल -१.४

सूक्ष्मदर्शिका -०५



Atomic microscope म्हणजे मुख्यतः Atomic Force Microscope (AFM) – एक अत्यंत उच्च रिझोल्यूशनचा स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोप जो अॅटॉमिक स्तरावर (fractions of a nanometer, म्हणजे ०.१ नॅनोमीटरपेक्षा कमी) सर्फेस इमेजिंग करतो. हे "atomic microscope" म्हणून ओळखले जाते कारण ते अॅटॉमिक फोर्सेस (interatomic forces) वापरून सॅम्पलच्या पृष्ठभागाला "फील" करून इमेज बनवते – जणू एका सूक्ष्म सुईने सर्फेसला स्पर्श करून तिचे नकाशे काढते!

१९८१ मध्ये गर्ड बिनिग आणि हेनरिक रोहरर यांनी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप (STM) शोधला – ज्याने अॅटॉम्स दिसले आणि त्यांना १९८६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. पण STM फक्त कंडक्टिव्ह सॅम्पल्ससाठी काम करत असे.

मग १९८६ मध्ये बिनिगने Calvin Quate आणि Christoph Gerber यांच्यासोबत Atomic Force Microscope (AFM) चा शोध लावला – हे STM चे "बहिण" आहे! त्यांच्या पहिल्या पेपरमध्ये त्यांनी सांगितले की हे यंत्र insulating सॅम्पल्स (जसे प्लास्टिक, बायोलॉजिकल सेल्स) साठीही काम करेल आणि अॅटॉमिक रिझोल्यूशन देईल. पहिल्या AFM मध्ये एक diamond shard टिप gold foil cantilever वर लावलेली होती – आणि van der Waals forces ने इंटरॅक्शन मोजले!
१९८९ मध्ये पहिले व्यावसायिक AFM बाजारात आले, आणि आज ते नॅनोटेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, बायोलॉजीचा आधार आहे. १९९३ मध्ये पहिल्यांदा ambient (हवेत) आणि liquid मध्ये अॅटॉमिक रिझोल्यूशन मिळाले!

प्रयोगांमध्ये हे समाविष्ट आहे:

नमुन्यांमधून अणू ओळखणे
अणूंमधील बल परस्परसंवादाचे मूल्यांकन करणे
अणूंच्या भौतिक बदलत्या गुणधर्मांचा अभ्यास करणे
प्रथिने संकुल आणि सूक्ष्मनलिकांसारख्या असेंब्लीच्या संरचनात्मक आणि यांत्रिक गुणधर्मांचा अभ्यास करणे.
कर्करोगाच्या पेशी आणि सामान्य पेशींमध्ये फरक करण्यासाठी वापरले जाते.

शेजारच्या पेशींचे मूल्यांकन आणि फरक करणे, त्यांचा आकार आणि पेशीभित्तीची कडकपणा.

"खुल जा सिम सिम "



 "तीळगूळ घ्या, गोड बोला" उद्या या घोषणेत आपण सर्वजण वाहून जाणार. तिळाच्या वड्यांनी ,हलव्याने,लाडवांनी तोंड तर गोड होईलच,लाहानपणीच्या आठवणीने मनही कायम गोड  गोड होत.लहानपणी मी सगळ्या घरांत तीळगुळ  गोळा करायला जायचो .वड्या लाडू बरोबर नेलेल्या डब्यात तर हलवा ,तीळ गुळ दिले तर डब्यात न जाता तो बकाणा तोंडात कोंबला जायचा आणि हात ते चिकट ते चिकट व्हायचे.आताशा मोबाईवरच "तीळगूळ घ्या, गोड बोला" संदेशासह तिळगुळ वाटला जातो ,तो इतका टनभर येतो की 'मोबाईल गोडाने चिकट होईल नाहीतर त्याला मुंग्या तरी लागतील' असे वाटते . 

असाहा तीळ गुळाबरोबर तर गोड़ लागतो पण त्याचे स्निग्ध गुणधर्मही अनेक आहेतच ना . त्याचा जरा स्वतंत्र विचार करू लागले . 

तिळाची प्राचीनता 

Sesamum indicum L. हे तीळ (sesame) चे वैज्ञानिक नाव आहे! हे जगातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे, ज्याची लागवड हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मूळ सेमिटिक  भाषा -šamaššammu किंवा šamaššammū

हे Akkadian (प्राचीन असीरियन) भाषेतील शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ "तेलाचा रोप" (oil plant) असा आहे.

हे दोन भागांत विभागता येतं:

šaman- "तेल" किंवा "फॅट/ऑइल"

šammum- "रोपटा" किंवा "वनस्पती" 

म्हणजे, "तेल देणारा रोपटा" – अगदी योग्य, कारण तीळ हे तेलबिया पीक आहे! तीळाच्या बियांमध्ये ५०-६०% तेल आणि २५% प्रथिने असतात ज्यात अँटिऑक्सिडंट लिग्नान्स असतात.

 आता indicum हे स्पेसिज नाव Latin मध्ये "of India" किंवा "भारतातील" – कारण हे पीक मुख्यतः भारतातून (Indian subcontinent) मूळचे आणि प्रसिद्ध झाले.भारतात आणि हडप्पा संस्कृतीत (Indus Valley Civilization) तीळाची लागवड सुमारे ५५०० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. हडप्पा आणि मोहनजो-दारो सारख्या ठिकाणी जळालेल्या तीळाच्या बिया सापडल्या आहेत. हे जगातील सर्वात जुने पुरावे आहेत!

हडप्पा संस्कृतीत (सुमारे इ.स.पू. २७००–१९००) तीळ हे मुख्य तेलबिया पीक होते. ते तेल काढण्यासाठी आणि अन्नासाठी वापरत असत.

बलुचिस्तानमधील मिरी कलाट येथील हडप्पा ठिकाणी अशाच प्रकारची तारीख असलेली बीज सापडली. आणखी अनेक उदाहरणे ई.स.पू. दुसऱ्या सहस्राब्दीतील आहेत, जसे की पंजाबमधील हडप्पा टप्प्याच्या उत्तरार्धात. दुसऱ्या सहस्राब्दीच्या उत्तरार्धापर्यंत, भारतीय उपखंडात तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती.नंतर ते मेसोपोटेमिया,आफ्रिका,चीन इतरत्र व्यापार हस्तांतरण प्रकियेत सर्वत्र पसरले.दुसऱ्या काळ्या तिळाचा काळा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असून तो त्याच्या बाहेरील आवरणात असलेल्या पोषणमूल्यांमुळे आणि रंगद्रव्यांमुळे (मेलॅनिन  आणि अँथोसायनिन्स )असतो.

जड जड अभ्यासू माहितीनंतर रोचक तिळाच्या मनोरंजक माहितीविषयी पाहूया 



लहानपणी "अली बाबा आणि चाळीस चोर" या अरेबियन नाइट्स कथेतील "खुल जा सिम सिम " हे वाक्य गारुडासारखं मनात बसलं आहे ना !

मूळ अरबी कथेत हे वाक्य होत ,

 "Iftah ya simsim"  म्हणजे "उघड, हे तीळ!" --- "खुल जा सिम सिम " :)

तीळा  उघड?? हे काय गौडबंगाल आहे ??

अरबीत तीळाला "simsim" म्हणतात.तिळाचे वैज्ञानिक नाव 'सेसमे'"Sesame" (सिम सिम) आहे .त्याचा हा अपभ्रंश किंवा व्हाईसा वर्सा हे असावे . 

का तीळच का ? कारण तीळाच्या शेंगा पूर्ण वाळल्यावर पिकल्यावर आपोआप फुटतात -pop, आणि आतले तीळ बाहेर पडतात.  जणू जादुई दरवाजा उघडला! हे प्रतीक आहे खजिना उघडण्याचे गुफा तीळाच्या शेंगेसारखी फुटून उघडते, आणि आत खजिना (तीळासारखा मौल्यवान) दिसतो!

 तीळ हे जरी एक प्रकारचे बी असले, तरी या वाक्याचा अर्थ अनेकदा "सुप्त क्षमतांना जागृत करणे" किंवा "मनाचे दरवाजे उघडणे" अशा रूपाकात्मक अर्थाने घेतला जातो.त्यातूनच जगभर "Open Sesame" किंवा "खुल जा सिम सिम" हे वाक्य प्रसिद्ध झालं.



मराठीतील ती प्रसिद्ध म्हण -एक तीळ सात जणांनी खाल्ला-अत्यंत कमी साधनसामग्री असूनही ती सर्वांमध्ये मिळून-मिसळून किंवा आनंदाने वाटून घेणे.मात्र पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत. त्याच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.म्हण  सुपरसें उपर कामगिरीने खरी करून दाखवली. 

तीळासंबंधीही अजून मजेशीर म्हणी आहेत ... 

--घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ-म्हणजे दिखावा करतो . 

--तिळपापड होणे- एखाद्या गोष्टीमुळे अतिशय राग येणे.

--तिळाएवढे- अतिशय लहान/ नगण्य गोष्ट दर्शवण्यासाठी . 

--जिवात तीळ नसणे- खूप घाबरणे. 

--जिभेवर तीळ टिकत नाही-कोणतीही गोष्ट गुप्त ठेऊ न शकणे. 

हिंदी म्हणी 

--तिल का ताड़ बनाना-एखाद्या अगदी शुल्लक गोष्टीचा मोठा बाऊ करणे 

--इन तिलों में तेल नहीं - एखाद्या व्यक्तीकडून किंवा गोष्टीकडून कोणतीही मदत मिळण्याची आशा नसणे.

--तिल धरने की जगह न होना-प्रचंड गर्दी असणे

तमिळ म्हण   

--"इलैथवन्नक्कू एल्लम कोळुथवन्नक्कू कोल्लम" - अशक्त माणसासाठी तीळ  आणि लठ्ठ माणसासाठी 'हुलगा'  गुणकारी असतो

इंग्रजी/इतर (English/International):

इंग्रजी म्हणी 

--Pick up a sesame seed only to lose a watermelon-लहान फायद्यासाठी मोठे नुकसान.

--Before the nut is cooked, a sesame is burnt -लवकर धीर सोडणे.

--One sesame seed won't make oil- एकट्याने काहीच होत नाही, एकत्र येणे गरजेचे.

आता पोटोबा पाहूया :)

तीळ हे जगातील सर्वात जुने तेलबिया पीक असल्यामुळे, ते अनेक देशांच्या खाद्यसंस्कृतीत मुख्य भूमिका बजावतं.



--ताहिनी – तीळाची पेस्ट . हे हुमस, बाबा गणूश ,आणि फलाफेलमध्ये मुख्य घटक आहे. 

लेबनॉन, इस्रायल, तुर्की, ग्रीसमध्ये खूप प्रसिद्ध. 

--हलवा – ताहिनी + साखर/मध + कधी कधी नट्स. मध्य पूर्व, तुर्की, ग्रीस, इराणमध्ये सुपर पॉप्युलर. ऊर्जा देणारा, लांब काळ टिकणारा मिठाई!

--Pasteli – ग्रीसमध्ये तीळ + मधाची कॅंडी बार. 

--Jian dui / Sesame Balls – चीनमध्ये तळलेले ग्लुटिनस राइस बॉल्स, बाहेर तीळ लावलेले. 

--सेसमे चिकन  (चीन)-तळलेल्या चिकनला तिळाच्या चटणीत घोळवून बनवलेला हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज पदार्थ आहे

--Sesame  Buns – अमेरिका, युरोपमध्ये ब्रेडवर तीळ शिंपडलेले असतात 

--गझक-उत्तर भारतात थंडीच्या दिवसात मिळणारी तीळ आणि गुळाची कुरकुरीत पट्टी 

--तिळ पिठा (आसाम)- तांदळाच्या पिठात तिळाचे सारण भरून बनवलेला आसामातील पारंपरिक पदार्थ.

आणि आपल्या महाराष्ट्रात कोथिंबीर वड्या ,पंचामृत तर तीळाच्या कुरकुरीतपणा आणि लज्जत वाढवतात. 

आज भोगीला आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची आपली संस्कृती ,जी शरीर आणि मनाची शुद्धी, नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि आरोग्य वाढवण्यासाठी केली जाते.तिचे पालन करून मी मस्त शेतात नव्याने बहरलेल्या  हरभरा,वाल, घेवडा, मटार, वांगी, गाजर,शेंगदाणे, कांद्याची पात, या सगळ्या ताज्या, हंगामी भाज्या एकत्र करून भारी भोगीची (भोग-आनंद देणारी) भाजी तयार केली. बाजरीच्या भाकरीवर खूप सारे तीळ भुरभुरले आणि खमंग भाजली .आणि उद्याच्या संक्रातीसाठीचे स्पेशल तिळगुळाच्या वड्या केल्या.असा हा मकर संक्रातीचा मुख्य नायक -तीळ !!!


तीळगुळ वड्या

दोन वाटी भाजलेल्या तिळाचा जाडसर कुट,एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा कूट,अर्धी वाटी शेंगा दाणे कुट, इलायची पूड, ४०० ग्रॅम गूळ,साजूक तूप.

चार मोठे चमचे साजूक तूप कढईत गरम करायचे.त्यात किसलेला गूळ घालावा.१० मिनिटे उकळी फुटेपर्यंत हलवत राहावा.नंतर त्यात तिळाचा,खोबऱ्याचा,शेंगा दाण्यांचा कूट ,इलायची पावडर टाकावी.काही अख्खे तिळ यात टाकावे.मंद आचेवर परतावे.साधारण १० मिनिटे.नंतर गरम गरमच हाताला/वाटीला गार पाणी लावून वड्या थापून घ्यायच्या.गरम असतांनाच वड्या कापायच्या.गार झाल्यावर काढायच्या.

तीळगुळ घ्या गोड गोड बोला!!



-भक्ती 

Monday, January 12, 2026

अदृश्य जगाचे कुतूहल -१.३

अदृश्य जगाचे कुतूहल -१.३

सूक्ष्मदर्शिका -०4


****फ्लूओरेसेन्स मायक्रोस्कोप/सूक्ष्मदर्शक

 १९११ साली, जर्मनीत (तेव्हा ऑस्ट्रिया-हंगेरी भागात) ऑस्कर हाइमस्टॅड्ट नावाच्या एका भौतिकशास्त्रज्ञाने. तो C. Reichert कंपनीत काम करत होता. त्याच्या डोक्यात एक वेड होती – UV प्रकाशाने काही वस्तू चमकतात (फ्लूओरेसेंस)! त्याने cadmium arc lamp (एक तीव्र UV लाइट सोर्स) घेतला, त्यातून फक्त UV फिल्टर करून सॅम्पलवर टाकला. पण समस्या उत्सर्जित फ्लूओरेसेंस इतकी कमकुवत होती की ती दिसतच नव्हती!

हाइमस्टॅड्टने हुशारीने डार्क फील्ड इल्यूमिनेशन वापरले – म्हणजे उत्सेजक UV प्रकाश ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये येऊ नये, फक्त विखुरलेला फ्लूओरेसेंट प्रकाश यावा! पहिल्यांदाच जीवाणू, प्राण्यांच्या ऊती आणि वनस्पती चमकू लागल्या – जणू अंधारात चमकणारे तारे! त्याने १९११ मध्ये पेपर लिहिला: "Das Fluoreszenzmikroskop" आणि शेवटी लिहिले, "हे किती उपयुक्त ठरेल हे फक्त भविष्य सांगेल!" आणि ते खरे ठरले!

पण हे यंत्र अजूनही अवघड होते – UV लाइट खूप तीव्र, सॅम्पल जळू शकत होते, आणि फोटोग्राफी करणे कठीण!

मग येते १९२९ ची खरी थ्रिलर ट्विस्ट! फिलिप एलिंगर (Philipp Ellinger), एक ज्यू फार्माकॉलॉजिस्ट, आणि ऑगस्ट हिर्ट (August Hirt), एक एनाटॉमिस्ट – दोघे हायडेलबर्गमध्ये एकत्र काम करत होते. एलिंगरला समस्या समजली. ट्रान्समिटेड लाइटमध्ये उत्सेजक प्रकाश फ्लूओरेसेंसला दाबतो!

त्यांनी एपी-इल्यूमिनेशन (epi-illumination) शोधला – म्हणजे उत्सेजक UV आणि उत्सर्जित फ्लूओरेसेंट प्रकाश एकाच बाजूने (vertical) येतो! एक dichromatic बीम स्प्लिटर वापरून UV सॅम्पलवर टाकला, आणि फ्लूओरेसेंट प्रकाश तेच लेन्समधून गोळा केला – पार्श्वभूमी काळी, फ्लूओरेसेंस चमकदार!

कार्ल झाइस कंपनीने १९२९ मध्ये हे व्यावसायिक यंत्र बनवले – "Intravitalmikroskop"! एलिंगर आणि हिर्ट यांनी मेंढक आणि उंदीरांच्या जिवंत किडनी आणि लिव्हरमध्ये fluorescein आणि trypaflavin डाई इंजेक्ट करून पाहिले – डाई कशी वितरित होते, हे पहिल्यांदाच जिवंत अवयवात दिसले! जणू शरीरातील रंगीबेरंगी नदी वाहताना पाहिली!

पण इथे डार्क ट्विस्ट येते, १९३३ मध्ये नाझी सत्तेत एलिंगर (ज्यू असल्याने) देश सोडावा लागला – त्याला नोकरी गमावली, पळून जावे लागले. हिर्ट (नाझी SS सदस्य) याने नंतर स्वतःला एकटाच शोधकर्ता म्हणून दाखवले! पण इतिहास आज एलिंगरला मुख्य क्रेडिट देतो – एका ज्यू वैज्ञानिकाने बनवलेले यंत्र नाझी काळातही जग बदलत राहिले!

हे यंत्र पाहा – किती रंगीबेरंगी आणि जादुई दिसते!




नंतर १९४० च्या दशकात Albert Coons ने इम्यूनोफ्लूओरेसेन्स (antibodies with fluorescent dyes) आणली, आणि १९६२ मध्ये GFP (Green Fluorescent Protein) ने क्रांती घडवली – आज कॅन्सर सेल्स, व्हायरस, न्यूरॉन्स सगळे रंगीबेरंगी नाचताना दिसतात!


***इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक




१७ व्या शतकात शोधलेल्या प्रकाश सूक्ष्मदर्शकाने शास्त्रज्ञांना मानवी डोळ्याचा पहिला विस्तार प्रदान केला, परंतु कोणत्याही गोष्टीचे अधिक तपशीलवार निरीक्षण करणे प्रकाशाच्या तरंगलांबीमुळे मर्यादित आहे. ज्याप्रमाणे मोठ्या समुद्राच्या लाटांवर लहान वस्तूंचा फारसा परिणाम होत नाही, त्याचप्रमाणे दृश्यमान प्रकाशासाठी प्रथिने आणि अणूंसारख्या वस्तूंची प्रतिमा तयार करणे अशक्य आहे जे त्याच्या तरंगलांबीपेक्षा लहान आहेत.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या विकासामुळे पूर्वी लपलेले हे जग उघडले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक या तत्त्वावर काम करतो की विद्युत प्रवाह वाहून नेणारी एक लहान कॉइल इलेक्ट्रॉनला लेन्स ज्या प्रकारे प्रकाश विचलित करते त्याच प्रकारे विचलित करू शकते. अर्न्स्ट रस्का यांनी १९२८ मध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी असताना या सिद्धांताबद्दल ऐकले, जे नंतर एक धाडसी गृहीतक होते. फक्त पाच वर्षांत त्यांनी पहिले इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक डिझाइन केले आणि तयार केले, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनसाठी चुंबकीय लेन्स म्हणून दोन कॉइल्सचा वापर केला. इलेक्ट्रॉनची तरंगलांबी प्रकाशापेक्षा खूपच कमी असल्याने, हे सूक्ष्मदर्शक प्रकाश सूक्ष्मदर्शकाने शक्य असलेल्यापेक्षा कितीतरी पटीने लहान तपशील पाहू शकते.


१९८६ मध्ये, ८० वर्षांच्या वयात रुस्काला नोबेल पुरस्कार मिळाला (physics) – "electron optics आणि पहिल्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपसाठी"! (इतर अर्धा Gerd Binnig आणि Heinrich Rohrer ला scanning tunneling microscope साठी.)

***स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप


१९३५ साली मॅक्स नॉल (Max Knoll) यांनी टीव्ही कॅमेरा ट्यूब्सच्या सर्फेस स्टडीसाठी पहिल्यांदा इलेक्ट्रॉन बीम स्कॅन करून इमेज घेतली. हे SEM चे बीज होते! पण खरी क्रांती १९३७-३८ मध्ये मॅनफ्रेड वॉन आर्डेन (Manfred von Ardenne) यांनी केली. त्यांनी एक अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रॉन बीम तयार करून सॅम्पलवर छोट्या रास्टर (grid) प्रमाणे स्कॅन केले. हे जगातील पहिले हाय-रिझॉल्यूशन SEM होते! वॉन आर्डेनने TEM च्या chromatic aberration समस्या टाळण्यासाठी हे केले – आणि त्याने सर्फेस इमेजिंगचा मार्ग मोकळा केला.

१९४८ साली इंग्लंडच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये चार्ल्स ओटली (Charles Oatley) यांनी हे काम पुन्हा सुरू केले. ओटलीला वॉन आर्डेनच्या पेपर्स वाचून प्रेरणा मिळाली. त्यांच्या विद्यार्थ्यांनी (जसे Dennis McMullan) SEM ला सुधारले – सेकंडरी इलेक्ट्रॉन्स डिटेक्टर, बेटर व्हायब्रेशन कंट्रोल, आणि ३-डी इमेजिंग!

१९६५ मध्ये Cambridge Scientific Instrument Company ने जगातील पहिले व्यावसायिक SEM "Stereoscan" लाँच केले – पहिला ग्राहक DuPont कंपनी! मार्केटिंग एक्स्पर्ट्स म्हणाले, "फक्त ६-१० युनिट्स विकतील!" पण ते चुकीचे ठरले – SEM ने जग जिंकले!

आपण रोजच्या जगात राहतो – पानांवरची धूळ, कीटकांचे पंख, आपल्या त्वचेवरची केस – हे सगळे सामान्य वाटते. पण SEM (स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप) ने एका इलेक्ट्रॉन बीमला सॅम्पलच्या पृष्ठभागावर स्कॅन करून, जणू एखाद्या लेसर सोर्सने अंधाऱ्या गुहेत प्रकाश टाकून, लपलेले रहस्य उघडले!

हे यंत्र १९६५ मध्ये Cambridge कंपनीने व्यावसायिक बनवले तेव्हा वैज्ञानिक थक्क झाले – कारण SEM ने ३-डी लुक दिला! पारंपरिक मायक्रोस्कोपमध्ये फक्त फ्लॅट, २-डी दिसत होते, पण SEM च्या डार्क फील्ड आणि डेप्थ ऑफ फील्ड मुळे सर्फेस जणू एखाद्या एलियन लँडस्केपसारखी दिसू लागली. छोट्या इलेक्ट्रॉन बीमने सॅम्पलवर स्कॅन करताना सेकंडरी इलेक्ट्रॉन्स (SE) आणि बॅकस्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स (BSE) गोळा केले – आणि अचानक पृष्ठभागावरचे खड्डे, उभार, टेक्सचर स्पष्ट झाले!

मानवी त्वचा आणि केस – आपल्या त्वचेवरची केस SEM मध्ये जणू जंगलातील झाडासारखी दिसते – स्केल्स, खड्डे, फॉलिकल्स! हे इमेजेस कॉस्मेटिक्स, डर्मेटॉलॉजी आणि फॉरेन्सिकमध्ये वापरले जातात – उदा. एखाद्या गुन्ह्यातील केसाचे सर्फेस मॅच करून.

Human skin and hair, SEM - Stock Image - P720/0281 - Science Photo ...

Human skin and hair, SEM - Stock Image - P720/0281 - Science Photo ...
SEM ने हे सगळे उघडले – एका छोट्या इलेक्ट्रॉन बीमने! जणू एखाद्या जादूच्या काठीने अंधारातून रंगीबेरंगी, ३-डी जग बाहेर काढले. आज नॅनोटेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, जीवशास्त्र – सगळे याच्यावर अवलंबून आहेत. छोट्या जगातील हे रहस्य उघडणे म्हणजे खरंच एक मोठा थरार!

*****




एका "सूक्ष्म" जगात टेम (TEM) आणि सेम (SEM) नावाचे दोन जादूई भाऊ राहत होते. दिसायला ते दोघेही अवाढव्य होते, पण त्यांचे काम मात्र अतिशय बारीक गोष्टींवर लक्ष ठेवणे हे होते.
१. मोठा भाऊ - टेम (TEM):
टेम हा थोडा शांत आणि गंभीर स्वभावाचा होता. त्याला कोणत्याही गोष्टीच्या "आत" काय चालले आहे हे बघायला आवडायचे. जेव्हा एखादा रुग्ण पेशी (Cell) किंवा व्हायरस टेम कडे यायचा, तेव्हा टेम त्यातून आपले 'इलेक्ट्रॉन किरण' आरपार सोडायचा. जसा आपण 'एक्स-रे' काढतो, तसा टेम त्या पेशीचा अंतर्गत नकाशा तयार करायचा. तो इतका हुशार होता की त्याला अणू (Atoms) सुद्धा स्पष्ट दिसायचे. त्याचे म्हणणे असायचे, "बाहेरून काय बघताय? खरे सौंदर्य तर आत दडलेले असते!" 
२. धाकटा भाऊ - सेम (SEM):
सेम हा थोडा कलात्मक आणि बाह्य सौंदर्याचा चाहता होता. त्याला गोष्टींच्या "वरचा भाग" किंवा त्वचा कशी दिसते, हे बघण्यात रस होता. जेव्हा एखादा कीटक किंवा परागकण त्याच्याकडे यायचा, तेव्हा सेम त्यावर आपले इलेक्ट्रॉन फिरवायचा. सेम त्या वस्तूचा ३डी (3D) फोटो काढायचा. त्याच्या फोटोंमुळे मुंगीचे तोंड एखाद्या राक्षसासारखे किंवा फुलपाखराचे पंख एखाद्या मखमली कापडासारखे दिसायचे. सेम म्हणायचा, "आतले नंतर बघू, आधी बाहेरून जग किती सुंदर आणि गुंतागुंतीचे आहे ते पहा!" 
दोघांमधील फरक:टेम (TEM): हा वस्तूच्या आरपार बघतो. आपल्याला वस्तूची अंतर्गत रचना (Internal structure) दाखवतो. याची शक्ती (Resolution) खूप जास्त असते.सेम (SEM): हा वस्तूच्या पृष्ठभागावरून (Surface) फिरतो. आपल्याला वस्तूचा थ्री-डी (3D) आकार दाखवतो. 
विज्ञानाच्या जगात या दोन्ही भावांची गरज असते. जर आपल्याला एखादा रोग मुळापासून समजून घ्यायचा असेल, तर आपण टेम कडे जातो आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा आकार आणि पोत अभ्यासायचा असेल, तर आपण सेम कडे जातो. दोघेही मिळून आपल्याला न दिसणारे अद्भुत जग उलगडून दाखवतात.रोमांचक उदाहरणे – हे जग कसे उघडले.

Sunday, January 11, 2026

मी सध्या काय पाहतेय (२०२६)



 शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी!

एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे.

नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या  चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे.

एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत.

स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.

*************************************************************************



यंग शेल्डन -Young Sheldon ,माझी कन्याच हा मालिकेची माझ्यासाठी शोधकर्ती आहे .टी ही मालिका पाहत असताना ,तिच्यासोबत याचे अर्ध्या तासाचे दोनच भाग पाहिले आणि या शेल्डन प्रेमातच पडले.आता आम्ही दोघी याचे रोज एकत्र भाग पाहतो.... तेव्हा हास्यांचा एक कल्लोळच उठतो. 

Young Sheldon अमेरिकन कॉमेडी टीव्ही सिरीज -९ वर्षांचा शेल्डन कूपरचे एक जीनियस, पण सामाजिकदृष्ट्या वेगळाच मुलगा आहे.त्याचे टेक्ससमधले जीवन,रोजशी अभ्यासू पण अनेकदा बालसुलभ गोष्टींनी भरलेली धमाल यात आहे. तो हायस्कूलमध्ये लवकर जाते कारण त्याचा बुध्यांक उच्चं आहे  त्याच्या कुटुंबाशी आई-बाबा, भावंडे,आजी आणि आजूबाजूच्या पात्रांसोबत त्याच्या गमती जमाती पाहायला मजा येते .साधे जीवन यांच्यात त्याची बुद्धिमत्ता कशी बसते हे मजेदार आणि भावनिक आहे.याविषयी शोधताना कळाले की,Young Sheldon ही The Big Bang Theory प्रीक्वेल आहे, ज्यात शेल्डन कूपर या मुख्य पात्राचे बालपण दाखवले आहे.मी The Big Bang Theory चे नाव केवळ ऐकले आणि त्याचे काही रील्स पाहिले नाही. साधारण जे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मालिका पाहायचे त्यांची खूप आवडती मालिका होती हे समजले. 

Friday, January 9, 2026

अदृश्य जगाचे कुतूहल -१.२

 अदृश्य जगाचे कुतूहल -१.२

सूक्ष्मदर्शिका -०३

***इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप



१८५० साली अमेरिकेतील लुइझियाना युनिव्हर्सिटी (आजची Tulane University) मध्ये केमिस्ट्रीचे प्रोफेसर जे. लॉरेन्स स्मिथ (J. Lawrence Smith, १८१८-१८८३) यांनी इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप चा शोध लावला! त्यावेळी सामान्य मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स वर असत आणि कंडेन्सर खाली – पण स्मिथ यांना सूक्ष्म रासायनिक प्रयोग करताना समस्या येत होती: रसायनांच्या वाफा ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर बसून दिसणे खराब होत होते, आणि स्पेस कमी पडत होता.

त्यांनी उलटे केले – लाइट सोर्स आणि कंडेन्सर वर (सॅम्पलच्या वर), ऑब्जेक्टिव्ह लेन्स खाली (सॅम्पलच्या खाली)! हे पहिले इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप १८५२ च्या वर्ल्ड फेअरमध्ये दाखवले गेले. यामुळे पहिल्यांदाच जिवंत आणि मोठ्या सॅम्पल्स (जसे फ्लास्क किंवा डिशमध्ये) दिसू लागले – पूर्वी सगळे सॅम्पल छोटे आणि स्लाइडवर फिक्स करावे लागत होते!

स्मिथ यांच्या पेपरमध्ये ते म्हणतात: "रसायनांच्या वाफांनी ऑब्जेक्टिव्ह खराब होत होते, म्हणून मी उलटे केले!" – ही एक छोटीशी समस्या सोडवण्यातून मोठी क्रांती झाली!

हा कशासाठी वापरतात? (खास जादू) जिवंत पेशींची मजा: समजा तुम्हाला एका बाटलीमध्ये वाढणाऱ्या जिवंत पेशी पाहायच्या आहेत. साध्या मायक्रोस्कोपमध्ये ते शक्य नाही, कारण बाटली लेन्सच्या खाली बसणार नाही. पण इन्व्हर्टेड मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही पूर्ण बाटली किंवा पेट्री डिश तशीच ठेवून खालून पेशींचा 'लाईव शो' पाहू शकता. IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी: जेव्हा लॅबमध्ये शुक्राणू आणि अंड्याचे मिलन घडवून आणले जाते, तेव्हा अत्यंत बारीक सुया वापरून काम करावे लागते. वरून जागा मोकळी असल्यामुळे शास्त्रज्ञ आरामात हे काम करू शकतात.



अल्ट्रामायक्रोस्कोप 

झ्सिग्मोंडी यांनी अल्ट्रामायक्रोस्कोप विकसित केला यात प्रकाश साइडने (डार्क फील्ड इल्यूमिनेशन) टाकला जातो, ज्यामुळे छोटे कण प्रकाश विखुरतात आणि चमकतात (टिंडल इफेक्ट)! यामुळे ४ नॅनोमीटरपर्यंतचे कण दिसू लागले – ऑप्टिकल मायक्रोस्कोपची मर्यादा पार करून! कोलॉइड्सचा शोध  -कोलॉइड्स माध्यमात बारीक विखुरलेले लहान कण यावर संशोधन केले. दूध हे कोलाइडल सिस्टमचे उदाहरण आहे: त्याचा पांढरा रंग पाण्यातील लहान चरबीच्या थेंबांद्वारे प्रकाशाच्या विखुरण्यामुळे होतो. अशा प्रकारे झ्सिग्मोंडी हे पहिल्या "नॅनोटेक्नॉलॉजिस्ट" पैकी एक होते. उदाहरणार्थ, त्यांच्या शोधांमुळे त्यांना नवीन प्रकारचे रंगीत काचेचे काच तयार करता आले. १९२५ मध्ये, त्यांच्या कोलाइड संशोधनासाठी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

मुख्य कार्य तत्त्व: डार्क फील्ड इल्यूमिनेशन + टिंडल इफेक्ट (Tyndall Effect)




सामान्य मायक्रोस्कोपमध्ये प्रकाश खालून वर येतो आणि सॅम्पलमधून जातो (ट्रान्समिटेड लाइट).

अल्ट्रामायक्रोस्कोपमध्ये मात्र प्रकाश साइडने (९० अंशात) टाकला जातो – एक तीव्र आणि फोकस्ड लाइट बीम (अनेकदा सूर्यप्रकाश किंवा आर्क लॅम्पचा) सॅम्पलवर लंबकोनात पडतो.

हे प्रकाश सॅम्पलमधून सरळ जात नाही, तर फक्त सूक्ष्म कण प्रकाश विखुरतात (scatter) आणि ते विखुरलेले प्रकाश डोळ्याकडे किंवा ऑब्झर्व्हेशन लेन्सकडे येतो.

पार्श्वभूमी पूर्णपणे काळी (डार्क फील्ड) राहते, आणि छोटे कण चमकणारे तारे किंवा ठिपके म्हणून दिसतात – जसे रात्रीच्या आकाशात तारे!

हे टिंडल इफेक्ट वर आधारित आहे: जेव्हा प्रकाश कोलॉइडल सॉल्यूशनमधून जातो, तेव्हा छोटे कण प्रकाश विखुरतात आणि मार्ग दिसतो (जसे धुकेात कारच्या हेडलाइट्सचा बीम).

***********************

फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप 

फ्रिट्स झर्निके (Frits Zernike) हे डच भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांनी १९३० च्या दशकात फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप शोधला आणि १९५३ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकला.

१९३० साली, फ्रिट्स डिफ्रॅक्शन ग्रेटिंग (प्रकाश विखुरणारे ग्रिड) वर संशोधन करत होते. ते एका पूर्ण काळ्या रंगाने रंगवलेल्या ऑप्टिकल लॅबमध्ये एका संध्याकाळी प्रयोग करत होते. अचानक त्यांना घोस्ट लाइन्स (भूत लाइन्स) दिसल्या – मुख्य लाइनच्या डावीकडे आणि उजवीकडे असलेल्या हलक्या लाइन्स! त्यांनी तपासले आणि समजले की या लाइन्सचा फेज (प्रकाशाच्या लाटेची स्थिती) मुख्य लाइनपेक्षा ९० डिग्री वेगळा आहे!

हे फेज काँट्रास्ट तत्त्व होते! प्रकाश पारदर्शक वस्तूतून जाताना फक्त फेज बदलतो, पण आमच्या डोळ्याला तो दिसत नाही. फ्रिट्सने हे फेज बदल वापरून काँट्रास्ट वाढवण्याची कल्पना केली. १९३२-३३ मध्ये त्यांनी हे मायक्रोस्कोपसाठी लागू केले. पारदर्शक जीवित पेशी (जसे अमीबा, स्पर्म) स्टेनिंगशिवाय मरून जातात, पण फेज काँट्रास्टने त्या जिवंत राहून स्पष्ट दिसू लागल्या – काळ्या-पांढऱ्या काँट्रास्टमध्ये!

फ्रिट्सने १९३३ मध्ये वॅगेनिंगेन येथील एका काँग्रेसमध्ये हे सादर केले. पण झाइस कंपनीने सुरुवातीला हे गंभीरपणे घेतले नाही! ते म्हणाले, "जर हे उपयुक्त असेल तर आम्ही स्वतः शोधले असते!" पण दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनाने (Wehrmacht) हे युद्धासाठी उपयुक्त असल्याने १९४१ मध्ये उत्पादन सुरू केले. युद्धानंतर हे जगभर प्रसिद्ध झाले!

फेज काँट्रास्टमुळे जीवित पेशींच्या आतील हालचाली पहिल्यांदाच स्पष्ट दिसल्या – कॅन्सर संशोधन ते जीवशास्त्र बदलले!




अदृश्य जगाचे कुतूहल -०१. १

 अदृश्य जगाचे कुतूहल -०१. १ 

सूक्ष्मदर्शिका -०२

१८४६ साली जर्मनीतील जेना शहरात कार्ल झाइस नावाच्या एका परफेक्शनिस्ट मेकॅनिकने एक छोटीशी वर्कशॉप सुरू केली. ते स्वतः प्रत्येक मायक्रोस्कोप हाताने बनवायचे आणि जर थोडासाही दोष आढळला तर हातोडा आणि अँव्हिलवर ठेवून ते तोडून टाकायचे! लोक म्हणायचे, "झाइसचे मायक्रोस्कोप परफेक्ट असतात कारण अपरफेक्ट वाले तो ते स्वतः नष्ट करतात!" सुरुवातीला ते साधे मायक्रोस्कोप बनवायचे, पण १८५७ मध्ये त्यांनी पहिले कंपाउंड मायक्रोस्कोप (स्टँड I) विकले.हा स्टँड I हा झाइस कंपनीच्या यशाचा पाया ठरला. १८६१ मध्ये थुरिंगियन इंडस्ट्रियल एक्झिबिशनमध्ये याला गोल्ड मेडल मिळाले.



पण खरी क्रांती घडली १८६६ मध्ये! कार्ल झाइसला समजले की फक्त हाताच्या कौशल्याने पुढे जाणे शक्य नाही – त्याला विज्ञानाची गरज आहे. त्यांनी जेनाच्या युनिव्हर्सिटीतील एका तरुण भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ असलेल्या अर्न्स्ट अॅबे यांना रिसर्च डायरेक्टर म्हणून नेमले. अबे फक्त २६ वर्षांचे होते, तर झाइस ५० चे! हे दोघे एकत्र आले आणि मायक्रोस्कोपच्या डिझाइनला गणितीय आणि सैद्धांतिक आधार दिला.

अॅबेने अॅबे साइन कंडिशन नावाची थिअरी विकसित केली, ज्यामुळे मायक्रोस्कोपची रिझॉल्व्हिंग पॉवर (सूक्ष्म दर्शन क्षमता) मर्यादा ठरली. पण त्यासाठी चांगल्या दर्जाच्या ऑप्टिकल ग्लासची गरज होती, जी तेव्हा उपलब्ध नव्हती. ट्रायल अँड एरर पद्धतीने वर्षानुवर्षे प्रयोग करावे लागायचे.



मग आली १८८० ची रोमांचक वळण! एका २८ वर्षांच्या केमिस्ट ओटो शॉट यांनी अॅबेला पत्र लिहिले की त्यांनी लिथियम-आधारित नवे ग्लास बनवले आहे. झाइस आणि अॅबे उत्साही झाले! त्यांनी शॉटला जेनात बोलावले आणि १८८४ मध्ये जेना ग्लासवर्क नावाची कंपनी सुरू केली. शॉटच्या नव्या ग्लासमुळे रंगांची विकृती (क्रोमॅटिक अॅबरेशन) पूर्णपणे दूर झाली.

ओटोने १०० पेक्षा जास्त नवे ऑप्टिकल ग्लास विकसित केले – ज्यात बोरोसिलिकेट ग्लास (ज्याला जेना ग्लास म्हणतात) सामील आहे. हे ग्लास उष्णता, रसायने आणि रंग विकृती सहन करतात. यामुळेच १८८६ मध्ये पहिले अपोक्रोमॅटिक लेन्स बनले, ज्याने मायक्रोस्कोप आणि दूरबिनीची दुनिया बदलली!ओटोने छोट्या बॅचमध्ये प्रयोगात्मक ग्लास बनवण्याची पद्धत विकसित केली, ज्यामुळे ट्रायल अँड एरर सोपे झाले. त्यांच्या मेहनतीमुळे झाइस कंपनी जगातील नंबर १ ऑप्टिकल उत्पादक बनली.आजही SCHOTT AG ही जगातील आघाडीची स्पेशल्टी ग्लास कंपनी आहे – आणि COVID वॅक्सीनच्या वायल्ससाठी त्यांचे ग्लास वापरले गेले!



१८८६ मध्ये जगातील पहिले अपोक्रोमॅटिक ऑब्जेक्टिव्ह लेंस तयार झाले – जे रंग आणि ब्लरिंग पूर्णपणे काढून टाकतात! यामुळे जीवाणू, कोशिका यांचे बारकावे स्पष्ट दिसू लागले. झाइस कंपनी जगातील नंबर १ मायक्रोस्कोप उत्पादक बनली – १०,००० पेक्षा जास्त मायक्रोस्कोप विकले गेले!आज ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे आणि तिची वार्षिक महसूल सुमारे ११.९ बिलियन युरो (२०२४/२५) आहे!एक छोटी वर्कशॉप आज जग बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जननी बनली – मायक्रोस्कोपपासून ते स्मार्टफोन चिप्सपर्यंत!

अॅबे फक्त वैज्ञानिक नव्हते, तर सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. १८९१ मध्ये त्यांनी कार्ल झाइस फाउंडेशन स्थापन केली – ज्यात कंपनीचा पूर्ण मालकी हक्क फाउंडेशनकडे दिला. यामुळे कर्मचाऱ्यांना त्या काळात क्रांतिकारी सुविधा मिळाल्या:

  • ८ तास कामाची दिवस (जगातील पहिले!)
  • पगारी रजा, पेन्शन, आरोग्य विमा
  • नफ्यातील वाटा

हे आजच्या आधुनिक कर्मचारी कल्याणाचे मॉडेल आहे!



हे तिघे – कार्ल झाइस (प्रॅक्टिकल जीनियस), अर्न्स्ट अॅबे (थिअरिस्ट) आणि ओटो शॉट (केमिस्ट) – यांचा ट्रायअँगल आजही ऑप्टिक्स आणि मायक्रोस्कोपीचा पाया आहे. एका छोट्या वर्कशॉपने संपूर्ण वैज्ञानिक जग बदलले!