Monday, November 23, 2026

त्रिपुरांतक शिव

 .


 कैलास मंदिरातील त्रिपुरांतक शिव




कैलास मंदिराला मी यापूर्वी सहा वेळा भेट दिली होती. त्यामुळे यावेळीही अगदी आत्मविश्वासाने शिल्पे पाहत पुढे जात होते. मंदिरातील एका शिल्पपट्टिकेमध्ये सुरुवातीला शिवाची विविध रूपे, त्यानंतर विष्णूची रूपे आणि पुढे इतर पौराणिक प्रसंग कोरलेले होते. सुरुवातीला रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग, त्यानंतर रावणानुग्रह, मग पार्वती-शिव, मार्कंडेय अनुग्रह आणि पार्वती-शिव विवाह अशी शिल्पे पाहत मी पुढे चालले होते.


पुढे जाताना अचानक एका शिल्पाजवळ माझी नजर थांबली. पण क्षणभर काहीच आठवेना. हे कोणते रूप? कोणती कथा? मनात प्रश्न निर्माण झाला.पण उत्तर काही केल्या सुचेना. म्हटलं, मोबाईलमध्ये शोधून पाहावं, पण वेरूळला मोबाईलला नेटवर्क मिळणं तसं कठीणच! कधी रेंज नसते, तर कधी इंटरनेट इतकं संथ असतं की काही उघडतच नाही. अशा वेळी शिल्पांची माहिती तिथेच शोधता आली तर किती बरं होईल, असा विचार मनात आला. आता पुढे काय करायचं, या विचारात असतानाच जवळच एक छोटासा पर्यटकांचा गट दिसला. त्यांच्यासोबत असलेले गाईड त्या शिल्पाची माहिती सांगत होते.


ते म्हणाले, "बघा, हे शिल्प त्रिपुरासुर वधाचे आहे. शिवाचे वाहन असलेला नंदी ऐवजी घोडे या प्रसंगात शिवाच्या रथाचे भाग आहे. भगवान शिव रथावर आरूढ झालेले असून त्यांच्या हातात धनुष्य आहे. या रथाचे सारथ्य ब्रह्मदेव करत आहेत. ही या शिल्पाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत."


अरेच्या! लगेच लक्षात आलं. हा तर त्रिपुरासुर वधाचा प्रसंग! क्षण संपूर्ण कथा आठवली.


त्रिपुर म्हणजे तीन नगरे. या तीन नगरांमध्ये राहणाऱ्या त्रिपुरासुरांचा वध करण्यासाठी भगवान शिवाने धारण केलेले हे रूप म्हणजे त्रिपुरांतक किंवा त्रिपुरारी शिव. या कथेचा संदर्भ आठवताच शिल्पातील प्रत्येक घटकाचा अर्थ उलगडू लागला.

ती कथा अशी...

भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेय यांनी महाबलाढ्य तारकासुराचा वध केल्यानंतर, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तारकासुराचे तीन पुत्र तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी अमरत्व देण्यास नकार दिल्यावर त्यांनी युक्तीने असा वर मागितला की, अंतराळात फिरणारी सोने, चांदी आणि लोखंडाची तीन अभेद्य शहरे (त्रिपुर) निर्माण व्हावीत आणि दर १,००० वर्षांनी ही तिन्ही शहरे एका विशिष्ट क्षणी (अभिजित नक्षत्रात) एका सरळ रेषेत आल्यावर, जो कोणी एकाच बाणाने त्यांचा भेद करेल, त्याच्याच हातून आमचा मृत्यू व्हावा. ब्रह्मदेवांनी ‘तथास्तु’ म्हटल्यावर असुरांचा शिल्पकार मयासुर याने ही तीन भव्य शहरे निर्माण केली, ज्यामुळे या तिन्ही भावांना एकत्रितपणे ‘त्रिपुरासुर’ असे नाव पडले.


वरदानामुळे अजिंक्य झालेल्या त्रिपुरासुराने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांत प्रचंड हाहाकार माजवत देवतांना स्वर्गातून हाकलून लावले आणि ऋषीमुनींच्या यज्ञांत विघ्ने आणायला सुरुवात केली. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देव भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांसह कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे मदतीसाठी गेले. देवांची विनंती मान्य करून शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार करण्याचे ठरवले. या महायुद्धासाठी संपूर्ण ब्रह्मांडाने शंकरांचे शस्त्र आणि रथ बनण्याचे ठरवले.पृथ्वी रथ बनली, सूर्य व चंद्र चाके बनले, ब्रह्मदेव सारथी झाले, मेरु पर्वताचे धनुष्य आणि वासुकी नागाची प्रत्यंचा बनली, तर भगवान विष्णू स्वतः बाण बनले, ज्याच्या टोकावर अग्निदेव आणि पाठीशी वायुदेव विराजमान झाले.


१,००० वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेचा शुभ योग जुळून आला आणि आकाशात फिरणारी ती तिन्ही शहरे एका विशिष्ट क्षणी एका सरळ रेषेत आली. त्याच क्षणी भगवान शंकरांनी आपल्या दिव्य धनुष्यावरून सोडलेल्या एकाच अमोघ बाणाने तिन्ही शहरांचा भेद केला आणि ती शहरे जळून भस्म झाली. तिन्ही असुरांचा अंत झाल्यामुळे भगवान शंकरांना ‘त्रिपुरारी’ असे नाव पडले. या विजयानंतर तिन्ही लोकांत पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि याचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व देवी-देवता काशी नगरीत अवतरले व त्यांनी गंगा नदीच्या काठावर लाखो दिवे लावून उत्सव साजरा केला. म्हणूनच दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘देवदिवाळी’ साजरी केली जाते, ज्या दिवशी मंदिरांमध्ये आणि घराबाहेर त्रिपुर वात लावून दीपदान केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सुख-समृद्धी लाभते.


पुढे अजून एकदा हेच शिल्प जरा थ्रीडी स्वरूपातही येते.



विशेष म्हणजे, हेच शिल्प लेणी क्रमांक १५ मध्येही पाहायला मिळते. या विषयाचा पुन्हा एकदा अभ्यास करताना लक्षात आले की, पट्टदकल येथील मंदिरांमध्येही त्रिपुरांतक शिवाची अशी शिल्पे आढळतात. यापूर्वी ती पाहिली होती. मात्र त्या क्षणी त्यांची आठवण झाली नव्हती. या शिल्पात शिवाचा रथ, सारथी म्हणून असलेले ब्रह्मदेव आणि तीन नगरांचे प्रतीक असलेले घटक विशेष लक्ष वेधून घेतात.





या सर्व शिल्पांचा मागोवा घेताना कांची येथील शृंगेरी मठाशी संबंधित मंदिरातील त्रिपुरांतक शिवाचे एक अतिशय सुंदर शिल्पही इंटरनेटवर पाहण्यात आले. ते शिल्प पाहून तर कांचीला जाऊन ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली.ज्या शिल्पात कथेतील सर्व प्रसंग, लांछने स्पष्ट प्रगट केलली आहेत.

Credit to-

https://kevinstandagephotography.wordpress.com/2026/03/20/vidyasa%E1%B9%85kara-temple-sringeri/



खरंच, एखाद्या शिल्पासमोर उभं राहिल्यावर त्यातील कथा आठवावीच असं नाही. कधी एखाद्या जाणकाराच्या दोन वाक्यांनी संपूर्ण पौराणिक संदर्भ उलगडतो आणि आपण पाहत असलेलं शिल्प नव्याने समजू लागतं. कैलास मंदिरातील त्या एका शिल्पाने मला पुन्हा एकदा याचीच जाणीव करून दिली. इतिहास, पुराणकथा आणि शिल्पकला यांचा अभ्यास कधीच संपत नाही, हेच खरं!



No comments: