Sunday, January 4, 2026

पावभाजी व्रताची गोष्ट!

 


अहो सख्यांनो, ऐका माझ्या या #पावभाजी च्या व्रताची एक गोष्ट! हे व्रत मी अगदी बालपणातच अंगिकारलं होतं – नववीत शाळेत असताना! एका काकूंकडे ती लालभडक भाजी तव्यावर रटरटताना पाहिली, आणि बस्! माझ्या डोक्यात व्रताचा घंटानाद झाला. पुढच्याच रविवारी घरी घाट घातला – "आज पावभाजी होणार!" आता इतकं आठवत नाही, पण ती पहिली पावभाजी एवढी छान जमली होती की, मैत्रिणींमध्ये फुशारकी मारली: "मी अशी मस्त पावभाजी बनवते, काय सांगू? स्ट्रीट स्टाइल भैय्यासारखी!"

एक मैत्रीण म्हणाली, "असं का ग ? मी येते तुझ्याकडे, शिकव ना!" मी म्हणाले, "ये की, माझ्या वाढदिवसाला मी पावभाजीच करणार आहे, तुला स्पेशल शिकवेन!" वाढदिवसाला ती आली, मी भाजी बनवली – मऊसूत, चविष्ट! ती पाहून म्हणाली, "अरे, मिक्सरमधून काढतेस का ग?" मी हसून म्हणाले, "ए बाई, असं काही नसतं करायचं! हाताने स्मॅश करूनच असला स्वाद येतो!" आणि दोघी खो खो हसत सुटलो. (आता विचार करते, तेव्हा मिक्सर वापरलंअसत तर किती सोपं गेलं असतं! )

तेव्हा पावभाजीसाठी कांदा चिरणे हे ऑलिम्पिक गेम्ससारखं महत्वाचं काम होतं! चॉपर-वॉपर काही नव्हतं, फक्त चाकू आणि डोळ्यात पाणी. परतायला, वरून घालायला – कांदाच कांदा! मग शिताफीने हे काम बाबांना देई: "बाबा, प्लीज ना..." आणि बाबा खरंच निगुतीने बारीक बारीक चिरायचे, जणू कांदा त्यांचा बेस्ट फ्रेंड! मटारच्या सीझनमध्ये तर पावभाजी फेस्टिव्हलच! फ्रोजन मटारचं नावही ऐकलेलं नव्हतं, वाळलेले मटार तर आई कधी आणतच नसत – फक्त वाळलेला हरभरा दिसायचा, जणू तोच मटारचा दूरचा नातलाग!

वाढदिवस असो की पाहुणे येणार, आईचं फर्मान: "पावभाजी कर!" मी म्हणे, "आई, अभ्यास आहे गं!" आणि पावभाजीच्या कढईतून अंग काढून पळ काढायचे. पण कॉलेजात मैत्रिणींनी रूमवर जमलो की, पावभाजीचा दरवळ उठे – तोच मैत्रीचा खरा आधार! आता लग्न झालं, दोनाचे चार हात झाले, पावभाजी कधीही होऊ लागली. फ्रोजन मटार, वाळलेले दाणे – सगळं मिळालं, आणि मास्टरी हळूहळू वाढली.

रंग लाल हवा? भाज्या उकडताना थोडं बीट टाका – लाल रंग लवकर येतो! आता तर एक चिमूट पनीर मसाला टाकला की, लालभडक होऊन जाते, जणू भाजीने लिपस्टिक लावली! जास्त पाहुणे येणार तर? बटाटे वाढवा, इतर भाज्या कमी – असा काळाबाजार मनात करून घ्यायचे. बाहेर भैय्या मोठ्या तव्यावर किती वेळ स्मॅश करतो ते पाहायचे, मग घरी बारीक गॅसवर रटरटू द्यायची. पण एकदा गरम शिंतोडे अंगावर उडाले – चार हात लांब उडी मारली! आता शिकले, सावध राहते.

सुहाना, एव्हरेस्ट, बादशाह, MDH ते आता सवाई – या जादूच्या दहा वीएस तीस रुपयांच्या पुडक्यांशिवाय पावभाजी शक्यच नाही! तरीही नवे मसाले शोधते, जणू चोखंदळपणे साडी शोधावी तसे!

आता "अहो, पावभाजी करायची आहे, भाज्या आणा!" म्हटलं की, नवरा फक्त बटाटे, शिमला, फ्रोजन मटार आणतो आणि निर्विकार चेहऱ्याने विचारतो, "काय, अजूनही भाज्या यात असतात?" मग आमची "तीन भाज्यांची स्पेशल पावभाजी" प्रसिद्ध! जैन, मुंबई स्ट्रीट, हिरवी – सगळ्या ट्राय केल्या, पण त्यांची "मिनिमलिस्ट" व्हर्जन बेस्ट!

पण आता तीन जण झालो – लेकीच्या पोटात सगळ्या भाज्या जायला हव्यात! म्हणून स्वतः बाजारात जाऊन आणते: बटाटा, फ्लॉवर, वाटाणे, गाजर, टोमॅटो, शिमला, कोबी, बीट, घेवडा – फुल्ल टू मिक्स व्हेज! नाहीतर लेकी मोठी होऊन म्हणेल, "आई, तू फक्त बटाट्याची भाजी बनवायचीस का?"

पावाचं काय सांगू? आधी पोळ्या लाटायची कटकट नको म्हणून लादी पाव! मग आरोग्यासाठी गव्हाचे पाव, आणि कधी थेट "पोळीभाजी" होऊन जायची! आता मक्खन? अमुलच्या वड्या झपाट्याने संपायच्या, पण आता हेल्थसाठी घरचं साजूक तूप – तरी स्वाद तसाच!

अशी ही पावभाजी व्रताची गमतीदार गोष्ट! चार-पाच वर्षांनी लेकीकडे ही व्रताची ड्यूटी दिल्यावर मी मुक्त होईन असं वाटतं. पण खरंच सुटेन का? की तेव्हाही फोन करून सांगेन, "लेकी, बीट टाकायचं विसरू नकोस!"

कशी वाटली सख्यांनो ही पुराणकथा? तुमची पावभाजी स्टोरी सांगा ना.

---भक्ती

चारचौघी नाटक

 


१९९०-९१ ला प्रथम सादर झालेले प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" नाटक २०२२ lरोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे  या कलाकारांच्या साथीने २०२२ ला नाटक ३१ वर्षांनी पुनरुज्जीवित केले होते .मागील वर्षी या नाटकाचे अखेरचे प्रयोग पार पडले.प्रत्यक्ष नाटक पाहायचा योग्य आला नाही आज झी फाईव्ह OTT वर हे नाटक  पाहिले.रोहिणी हट्टंगडी याचे संवाद नाही गर्जनाचं.. पितृसत्ताक संस्कृतीला, बंडखोर तरीही पुरुष द्वेष नाही, निर्णय घेतलास तर तो निभावणारी बाई हो ... पूर्ण नाटकभर या गर्जना ठसा पडतात, कानात गुंजत राहतात .रंगमंचावर नाटक पाहू शकले नाही याचे जरा वाईट वाटले.

स्त्रीने पितृसत्ताक पद्धतीने आखलेल्या कुंपणातच वागले पाहिजे. ती जरा जरी याहून वेगळी वागली तर ते अनैतिक वा चुकीचे समजले जाते. त्यांनी "चारचौघी" सारखेच वागले पाहिजे .अशावेळी नाटकातील चौघीचे निर्णय या समाजाला कसे पचतील? नाटकातील संवादानुसार ५० वर्षांनंतर कदाचित लागू होतील असे निर्णय आज घेतलं तर उठणाऱ्या वादळाला सामोरं आज जावं लागणारच.

आई सावित्रीबाई विवाहित पुरुषाशी लग्न न  करता तीन मुलींना जन्म देत एकटी सांभाळते...(आजही अशी उदाहरणे फारच दुर्मिळ आहे)

तिच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यात पितृसत्ताक चाकोरीमुळे वादळ आले आहे.

नाटकात अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे ...​पुरुषांच्या अनैतिक संबंध समाज सहज पचवतो ?? मठ्ठ पुरुषाला समाज प्रश्न न विचारता त्याच्या बायकोला लढायला लावतो ??(लग्न टिकवायला द्रौपदी प्रमाणे किंवा मातृसत्ताक पद्धतीनुसार बहुपतित्व आज शक्य आहे ??

हे प्रश्न विद्या वैजयंती विंनी आआपापल्या आयुष्यातील घटनांद्वारे सादर करतात आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

अशी काळाच्या पुढची नाटके आली तर यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल अशीही नकारात्मक घंटा समाजात वाजू लागतात.पण नाटकातील वैजयंती कुटुंब वाचवते पण स्वतःचे सत्व हरवते केवळ तडजोडीने ती आता जगणार हे एक आजच्या अनेक स्त्रियांचे प्रातिनैधिक उदाहरणही नाटकात आहे हे विसरता काम नये .

विद्या जेव्हा घटस्फोटाची केस लढताना ६- ६ महिने आई वडील दोघांनीही मुल का सांभाळू नये ? एकट्या बाईचीच जबाबदारी आहे का ? हा प्रश्न मांडते तेव्हा तिला एक उलट्या काळजाची आई ठरवलं जाते वडील मात्र इथे नाम निराळेच राहतात ...किती हास्ययास्पद आहे हे ..

विनीचा मी एकाचवेळी दोन्ही पुरुष का निवडू शकत नाही ? हा प्रश्न तर कुठूनच मेंदूत शिरत नाही यावरचे उत्तर तर लांबच !!

मग अशा प्रश्नासह बाईने करायचे काय ???

तर तिचे निर्णय तिला योग्य वाटतील ते ठामपणे घ्यायचे काळाच्या परिणामाच्या भीतीशिवाय ..हे नाटकाचे मर्म वाटते .

-भक्ती

Thursday, January 1, 2026

stranger things series

 या रे या 

stranger things च्या फ्यान लोकांनो 

इकडे या 

भावनांचे पाट वाहू द्या

stranger things ला भरलेल्या मनाने 

 गुड बाय करू या 

शेवटचा भाग right side up  अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण  एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात. कोणाचं कौतुक करावं ???

सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने  घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव )  :) की पिसाळलेल्या  कुत्र्यासारखे मागे लागणारे  डेमोगोर्गनच यांचं करायचं.२०१६ पासून १०  वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी  पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series  ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे . यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)

अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला  आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले.

हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!






तुरीची आमटी



 घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या  वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या.कुकरमध्येच फोडणी दिली.कांदा टोमॅटो लसूण,खोबरे,तीळ,धने , कोथींबीर,लाल मिरची यांच परतून केलेलं वाटण फोडणीत टाकून परतून घेतले.मग तुरीच्या यात शेंगा परतून घेऊन आवश्यकतेनुसार पाणी,मीठ टाकले.कुकरच्या चार शिट्ट्या होऊ दिल्या.



आधीच कालच्या कडक एकादशीने खुप भूक लागली होती.तीळ लावत भाकरी केली.गाजर किसून डाळिंब पेरत कोशिंबीर केली.भाकरी कुस्करून त्यात हवी तेवढी आमटी टाकत तृप्तीचा ढेकर भक्तीने दिला :) ;)

नवीन वर्षाची सुरुवात खमंग झाली..

-भक्ती

Monday, December 29, 2025

पर्व--लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा

 पर्व



मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे. 

व्यासरचित महाभारत वाचायची इच्छा असणाऱ्यांना, परंतु इतका मोठा ग्रंथ आतापर्यंत शक्य नसल्याची जाणीव असते. अशा वेळी 'पर्व' वाचून त्याची छोटी, प्रभावी आणि वास्तववादी वाचण्याची तहान काहीशी शमली जाते. 

आताच्या पिढीतील वाचकांसाठी खास सुंदरता म्हणजे अमानवी संकल्पना ,चमत्कार दूर करून महाभारतातील पात्रांच्या मनोव्यापाराचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे.भैरप्पा यांनी कादंबरी लिहिताना अनेक वर्षे संशोधन केले. त्यांनी महाभारतात वर्णन केलेल्या स्थळांना – द्वारका, राजगृह, लोथल, कुरुक्षेत्र इ. ठिकाणांना भेट दिली होती. असं वाचनात आलं की हिमालयातील गढवाल प्रदेशात बहुपतित्व प्रथा आजही आहे, ती द्रौपदीच्या काळापासून चालू असल्याचे संशोधन त्यांना प्रेरणा देऊन गेले. कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय विश्वसनीय वास्तववादी वाटते.


सुरुवात मद्रदेशातील राजघराण्यांतीळ पात्रांच्या युद्धासंबंधी संवादातून होते.हळूहळू कथा पांडवांच्या जन्माकडे कथा सरकते. इथला भाग पर्यंतचा 'देवसाहाय्याने पांडव जन्म' हे मिथक याचा उलगडा ,त्यांच्या नियोग जन्मरहस्याने होतो. उत्तरेकडील भारतात राहणाऱ्या हिमालयातील तत्कालीन लोकांना 'देव' संबोधले गेले आहे .तसेच राक्षस, नागयांनादेखील कादंबरीत लोकगण म्हणून वर्णन केले आहे. आपल्याला टीव्हीवरच्या महाभारताने खूप काळ भ्रमात ठेवले असं समजते :)

आतापर्यंत द्रौपदी, कर्ण, अर्जुन हे विविध लेखकांनी स्वतंत्रपणे मांडले आहेत. पण 'पर्व' कादंबरीत अनेक नावीन्यपूर्व तत्वचिंतनाने पात्रांची ओळख होते. भीम बलवान नायक तर दिसलाच, पण तो एक संवेदनशील, द्रौपदीसाठी जीव ओवाळणारा, प्रेम आणि कर्तव्य यात अडकलेला, हिडिंबा व घटोत्कचाबद्दल अपराधी भावनेने ग्रासलेला 'माणूस' म्हणून दिसला.

"मी हिडिंबेला वनात सोडून आलो, तिच्या मुलाला युद्धात बलिदान दिले. मी पांडवांचा भाऊ म्हणून जगलो, पण पती आणि वडील म्हणून अपयशी ठरलो."



'पर्व' मधील सर्वात व्यावहारिक आणि राजकीय-बुद्धिमान पात्र मला 'कुंती' वाटली. पण ती दृष्ट्या गांधारीपेक्षा वेगळी. आधी आपल्याला मूल हवं, ज्येष्ठत्व हवं यासाठी ती पांडूच्या नियोगाचा वापर करायचे ठरवते. याआधीच तिने कर्णाचा जन्म, त्याग गुप्त ठेवीत सामाजिक स्थितीचे रक्षण केले असते.

नंतरही पांडवांना नेहमी वास्तवाची जाणीव करून देते आणि त्यांना नैतिक अधःपतनापासून वाचवते. ती पांडवांना कधीही दासींबरोबर संबंधांना नकार द्यायला सांगते. भीम हिडिंबा व मुलात अडकलेला दिसताच ती लवकरच भीमासह ते स्थान सोडते. तिचा द्रौपदीला बहुपतित्व मानायला भाग पाडून भावांभाषांचे एकत्रित करणे? कर्णाकडे आपल्या पाच मुलांना जीवनदान मागते. इतकेच नाही तर शेवटी युद्धात कुरुवंशाचा महाविनाशानंतरही ती पुन्हा वंशासाठी गर्भधारणेचा द्रौपदीला सल्ला देते.

यामधील कायम भव्यदिव्य दिसणाऱ्या राजमहालांचे वातावरण युद्धकाळात चणचण भासणाऱ्या काळ्या सावटाखाली  होते, हे वाचणे अगदी वेगळा अनुभव देते. जसे –

दिवा लावायला तेल नाही म्हणून धृतराष्ट्र दासीला ऋण घेऊन तेल आणण्यास सांगतो.द्रोण दुधावर वा पाण्यात सातूवर भूक भागवतात. 

युद्धात सर्व मनुष्य, प्राणी शक्ती पूर्णपणे वापरली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे, सेनापतींचे दैनंदिन जीवन, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि युद्धपटांचे  वर्णन इतके तपशीलवार आहे की वाचताना पोटात खळबळ वाटते.

--युद्धात इतकी जीवितहानी होते की सर्वत्र मांस, रक्त यांचा खच पडतो, प क्षी प्राणी प्रेतांवर झुंबड उडवतात. 

--माणसांच्या मलाचा सर्वत्र दुर्गंध पसरतो.

या अशा कारणांमुळे युद्धभूमी-युद्धाचे ठिकाण बदलून ठराविक काळाने वा दररोज पुढे पुढे स्थान सरकवले जात असे.

--युद्धात मेलेल्या घोड्याच्या मांसाचे भक्षण अन्नटंचाईमुळे करावे लागते.

--संजयाला कुरुक्षेत्राकडे मोठमोठाले यानंतर कापत जाई आणि तितक्याच वेगाला पुन्हा परत महाली येऊन सर्व युध्द खबरबात धृतराष्ट्राला सान्गत असे ,दूरदृष्टीचा प्रश्नच मिटला. 

--शेवटी कृष्ण गांधारीला आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला सांगतो ,असा अकल्पनीय शेवट मी पाहिल्याचं वाचला . 

महाभारत ---

"कुरुक्षेत्र हे युद्धाचे मैदान नव्हे, ते एक प्रचंड कत्तलखाना होते. मनुष्य, प्राणी, रक्त, मांस आणि हाडांचा ढिगारा. जे जिंकले त्यांनाही काही मिळत नाही.फक्त रिकामे हात आणि रक्ताने माखलेले मन."

--भक्ती