Sunday, June 18, 2023

मेघदूत

 

आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस



तर आषाढ जवळ येतोय तेव्हा मेघदूत वाचायचे इच्छा पूर्ण करावी असं ठरवलं.संस्कृत थोड थोड कळते ,तेव्हा मराठीच्या भाषांतर असलेले मेघदूत कोणते घ्यावे याची विचारपूस जाणकारांत केली-कुसुमाग्रज आणि शांता शेळके यांचे मराठीतलं मेघदूत प्रसिद्ध आहे हे कळाले.दोन्ही पुस्तक मागावली.मेघदूताची जवळपास २००पेक्षा जास्त भाषांतर उपलब्ध आहेत त्यात चिपळूणकर गुरुजी,बोरकर,सीडी देश्स्मुख ,बोरवणकर यांचेही मेघदूत टीका प्रसिद्ध आहेत.

कुसुमाग्रज १९५६ साली तर शांता शेळके यांनी १९९४ साली मेघदूत मराठीत अनुवादित केलं आहे.दोन्ही अनुवाद आपआपली विशेषता,भाषा घनता दाखवतात.शांता शेळके यांनी ‘पादाकुलका’ या छंदाच वापर केला तर कुसुमाग्रजांनी छंदोबद्ध भावानुवाद केला आहे.शांता बाईंच्या मेघदुतामध्ये शब्द सामर्थ्य खुलून दिसते ,कुसुमाग्रजांच्या मेघदुतामध्ये एका सरल रसाळता आहे.



माझा अनुभवलेले मेघदूत:

११६ (कुसुमाग्रज अनुवादित) १२०(शांता शेळके अनुवादित)श्लोक असलेले मेघदूत एक खंडकाव्य आहे.जे दोन भागात आहे –पूर्वमेघ आणि उत्तरमेघ !

पूर्वमेघ:

पहिल्याच श्लोकामध्ये सेवेत प्रमाद केल्यामुळे कुबेराकडून शाप मिळालेला यक्ष रामगिरी पर्वतावर मायभूमी अलकनगरीपासून दूर एकटाच कंठत आहे हे सांगितले आहे.

कश्चित् कान्ताविरहगुरुणा कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।

 यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥ १

असा दूर शापित यक्ष विरह भावनेने कृश झाला आहे की त्याच्या हातामधून कंगणही गळून पडत आहे...या बारकाव्यातूनच पुढील काव्यात अशा अनेक रुपकाची लयलूट असणार हे लक्षात येते.अलकानगरी पासु आपल्या प्रिय पत्नी पासून दूर असणाऱ्या या यक्षाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी कृष्ण मेघ हा खेळकर गजाप्रमाणे डोंगराशी खेळणारा भासतो.आणि हाच आपला निरोप –विरह यातना आपल्या पत्नीकडे पोहचवू शकतो आणि ठरवतो या मेघालाच दूत करायचे-मेघदूत !

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः । आषाढस्य प्रशथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं (प्रशम) वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २

तिसऱ्या आणि चतुर्थ श्लोकामध्ये या मेघाचे कौतुक करून ,यक्ष त्याचे स्वागत करतो.

तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ । 

मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥


 प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिम्हारयिष्यन् प्रवृत्तिम् ।

प्रवृत्तिम् स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ॥ ४

पण असा मेघ नावाचा भौतिक घटक दूत कसा होणार?याचे उत्तर कवी देतोच ....विरहाने व्याकुळ प्रेमी ज्या प्रमाणे चंद्रमुख पाहून सजनीला आठवून गप्पा मारतो ,प्रेमिका फुलांशी प्रियकराच्या गप्पा मारते ,त्याचप्रमाणे अशा व्याकुळ यक्षाला चेतन अचेतन यांच्या सीमा राहत नाही...उरते केवळ उत्कट भावना!

धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः । 

इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तंइत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥ ५

यापुढे आठव्या श्लोकापर्यंत यक्षाने आपल्या विरह यातना मेघाला सांगितल्या आहेत.आता तू रामागीरीहून निघणार आणि अलका नगरीकडे आक्रमण करणार तेव्हा तो मार्ग कसा आहे याचे वर्णन केले आहे.कशा प्रकारचे शेत,विविध पक्षी ,फुलं ,जलाने भरलेले जलाशय ,पर्वतरांगा यांचे रसाळ वर्णन आहेच पण या मेघासह वाचकही या प्रवासाला निघतात.

विंध्य,विदिशा नगर,वेत्रवती सरिता,अवंती नगरी,सिंधू नदी,शिप्रा ,महाकाल नगरी ,देवगिरी,व्योमनदी,गंगा,,चंबल,ब्रम्ह्वार्ता,कुरुक्षेत्र ,सरस्वती नदी,क्रौंचगिरी,कैलास,मानस सरोवर आणि मग अलका नगरी असा मार्ग १५-२० श्लोकामध्येसांगताना कालिदास भूगोलाचाही अभ्यासक होता हे समजते.या श्लोकांमध्ये निसर्ग सौंदर्य  वर्णित केले आहे.मेघदूतमधला प्रमुख रस ‘शृंगार रस’!

नदीलादेखील एक सौदर्यवती ललना भासवली आहे(श्लोक २८)

 चिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः 

संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः । 

निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य 

स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥ 


मेघाला त्या नदीचा प्रियकर सांगितला आहे (श्लोक ३१,४०).

गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।

प्रवेशम् तस्मात् तस्याः तस्मात् कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान् मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥ 


शृंगारिक रतक्रीडेचे श्लोक केवळ शहारे देणारे आहेत (श्लोक ३७,३८,४१)

तस्याः किं चित् करधृतमिव चित् करधृतमिव प्राप्तवानीरशाखं नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम् ।

मुक्तरोधोनितम्बम् प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४1


ह्याच बरोबर भक्ती रसाचे श्लोक आहेत.मेघाला महाकाल शंकाराची पूजा करण्यासाठी तुझ्या मेघ गर्जना डमरूसम त्या मंदिरात घुमू देत(श्लोक ३४,३६)पुढे हिमायात पोहचल्यावर शंभूची अर्चना करावी सांगितले(श्लोक ५६).

अप्यन्यस्मिञ् जलधर अप्यन्यस्मिञ् महाकालमासाद्य काले स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः । 

कुर्वन् संध्याबलिपटहतांकुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीयां आमन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥गर्जितानाम् 

कार्तिकेयाचे सेवा करण्यासाठी मेघ तुझे जल येथे उतरू दे(श्लोक ४३).

उत्तरमेघ –

उत्तरमेघाचा प्रमुख भाव विरह आहे.अलकानगरीत पोहचल्यावर मेघा तुला अवंती नगरी कशी दिसेल याचे सौंदर्यात्मक विवेचन आहे.(श्लोक २ ते १२)आणि तेराव्या श्लोकामध्ये यक्षाचे घर नेमके कसे ओळखायचे याचेवर्णन आहे,दारी इंद्रधनू तोरण...

तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।

यस्योपान्ते कृतकतनयः कान्तय वर्धितो मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥ 

तिथे विरहाने तळमळनाऱ्या पत्नीचा दिनक्रम कसा संथ निरस झाला असेल ,ती सतत अश्रू ढाळत असेल (श्लोक ४४ ).मुखावरील तेज ,केसांची रया,रात्रीची तिची घालमेल ,एकांत व्याकुळ रात्री कशा ती जगात असेल हे सांगितल्या आहेत.

अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन । 

उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती सङ्कल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥ 

दोघांच्या प्रणयाच्या रात्री काही श्लोकात शृंगार रसात सांगितल्या आहेत.

अशा माझ्या प्रिय पत्नीला तू मेघा माझे कुशल सांग ,तिच्याविना मीही येथे तळमळतो आहे,आता केवळ चार मास धीर धर!असा निरोप सांग(श्लोक ५३)तिच्या कुशलतेचा निरोप घेऊन तू मेघा त्वरित माझाकडे निघून ये ही याचना यक्ष मेघदूताला करतो(श्लोक ५४)

कच्चित् सोम्यकच्चित् व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि ।

 निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥ 

-भक्ती



आषाढस्य प्रथमदिन.

 

 

 

Sunday, June 11, 2023

बेलफळाचे सरबत

 



बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाला.

तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिवळसर गर होता.कौट फळासारखाच बिया,शिराधागे होते.जरा चिकट होता.गर चमच्याने काढला.थोडासाच गर मिक्सरमधून फिरवला.गाळून घेतला,भलताच तुरट लागला.साखर वापरायची नव्हती.तेव्हा यु-ट्युबकडे जावेच लागले.तेव्हा योग्य पाककृती समजली.

कृती-बेलफळाचा गर अर्धे पाण्याने भरलेल्या पातेल्यात चमच्याने कुस्करून घ्यावा.बिया फुटू देऊ नये.तुरटपणाला त्याच जबाबदार असतात म्हणूनच मिक्सरमधून बियासह गर फिरवू नये.तर तो गर पाण्यात अर्धा -एक तास ठेवावा.नंतर गाळून घ्यावा.शक्यतो इथे पण साखर लागतेच.आवडीनुसार साखर ,पूदिना पानं,सैंधव मीठ घालावे.बर्फ आणि आणखीन गार पाणी घालावे.सुंदर रंगाचे बेलफळ सरबत तय्यार!चवही एकदम रिफ्रेशिंग आहे.

बेलफळ सरबत उपयोग -बेलफळात व्हिटामिन C मुबलक आहे.शुगर लेव्हलही याने कमी होते.अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.

माझ्या मिक्सरमधून वाटून एकत्र केलेल्या गरात पाणी, बर्फ,साखर टाकून निवांत उन्हाळ्यात अखेर अखेरच्या दुपारी याचा आस्वाद घेतला.आणि पुन्हा एक पारंपारिक पाककृती करण्याचे समाधान मिळवलं

-भक्ती

Saturday, June 3, 2023

पौर्णिमा

 पाहूनी शुभ्र चंद्रमुख

कोमल रात सजली

आरास चांदण्यांची

लयलूट प्रकाशाची


लक्ष दीप चमचमती

आकाश मंडप सजले

नित्य फुलले चांदण

केशर गंध वार्यावरती


लेवून सोनप्रभा

हिमकण अन् नदीजळ

कमलदेठ हर्षिले

पौर्णिमा साजरी


-भक्ती





Thursday, May 18, 2023

‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर, ऑल at वन्स’


 

जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.

मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.

सुरुवातीलाच कुरकुर करणारे,धोबी व्यवसाय असणारे पालक आणि एकुलती एक मुलगी जी गे आहे भेटतात.शेवट पर्यंत असच काहीतरी संथ चालेल तर असे वाटते.पण मग टेक्स ऑफीसमध्ये वेमोंडमुळे(नायक म्हणता येईल) जो काही धुमाकूळ सुरु होतो त्याने एवेलीन(नायिका)चे जसे डोकं गरगरत तसच आपलपण गरगरायला लागते.

तर पहिला भाग ‘एव्हरीथिंग’ सुरु होतो.तुम्ही Matrix पाहिला आहे का ? तर त्या सारखाच आपला वावर अनेक समांतर जगात असतो.प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका ,वावर वेगवेगळा पण इथे डेस्टिनी एकच आहे ...मृत्यु ,तो तुम्हाला येतोच.एवेलीनला अनेक समांतर जगाचे दर्शन देऊन त्या त्या जगातली तिची ताकद तिला मिळवून लढायचं आहे ,कोणा विरुद्ध  तर  जोबू (शत्रू) ती तिची मुलगी ‘जॉय’ च दाखवली आहे.

एवेलीनचे सिनेमा नायिका,शेफ,सिंगर,मोठ्या बोटाची बाई असे काही समांतर रूप आहेत.आता ही रूप का आली तर एवेलीनचं एक दु:ख आहे, ‘मी जर वडिलांविरुद्ध लग्नाचा निर्णय घेतला नसता तर माझ आयुष्य खूप वेगळे असले असते” असे तिला वाटते.हे लग्न नसत तर ती काय असती याचे हे अनेक समांतर जग ,त्यात तिचा शत्रू जोबू तिला मारणार असतो.एवेलीन मरते.पण परत जिवंत होते वेमोंडवर तिला विश्वास वाटू लागतो.

दुसरा भाग सुरु होतो ‘एव्हेरीव्हेअर यातही आता एवेलीन नशीब बदलायला त्या त्या समांतर लोकांची मदत घेवू पाहते.जरा कॉम्प्लेक्स घटना दिसतात.जॉय उर्फ जोबू आईला हे सगळ सोडून चाल दूर असं काहीतरी सांगत असते.ती तीच ऐकणारच पण वेमोंड तिला रोखतो ,सरतेशेवटी जगात प्रेमाहून मोठ काहीच नाही याचा तिला साक्षात्कार होतो.सर्वांनी प्रेमाने वागावे ,जगाला प्रेम अर्पावे असे ती सांगते.

जॉय ऐकत नाही तिला ती खूप समजावते जॉय परत येते.

मग सुरु होतो तिसरा भाग ‘ऑल at वन्स’ म्हणजे एवढे सगळ महाभारत न होता एवेलीन लग्नाचा निर्णय योग्य आहे-वेमोंडच सगळ्यात जवळचा आहे हे सगळ मान्य /accept करते तेव्हा ‘जॉय’ ही बरोबर असतो आणि सुखरूपपणे कुटुंब यशस्वी tax भरते.एकत्र नांदतात.

तर यात ‘जॉय’ हे पात्र आनंदाचे रूपक दाखवले आहे.आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची आनंदाने जबाबदारी घेतल्याने ‘जॉय’ दूर जात नाही.

-भक्ती

Monday, May 15, 2023

पैस भेट!

 


काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माउली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस  या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले  तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.

१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला  नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला  ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक  ‘अमृतानुभव’ पाहायला.

नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार  मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत  मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.

मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.

आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुबर आणि बहावाची पिवळी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.

-भक्ती