Sunday, June 11, 2023

बेलफळाचे सरबत

 



बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाला.

तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिवळसर गर होता.कौट फळासारखाच बिया,शिराधागे होते.जरा चिकट होता.गर चमच्याने काढला.थोडासाच गर मिक्सरमधून फिरवला.गाळून घेतला,भलताच तुरट लागला.साखर वापरायची नव्हती.तेव्हा यु-ट्युबकडे जावेच लागले.तेव्हा योग्य पाककृती समजली.

कृती-बेलफळाचा गर अर्धे पाण्याने भरलेल्या पातेल्यात चमच्याने कुस्करून घ्यावा.बिया फुटू देऊ नये.तुरटपणाला त्याच जबाबदार असतात म्हणूनच मिक्सरमधून बियासह गर फिरवू नये.तर तो गर पाण्यात अर्धा -एक तास ठेवावा.नंतर गाळून घ्यावा.शक्यतो इथे पण साखर लागतेच.आवडीनुसार साखर ,पूदिना पानं,सैंधव मीठ घालावे.बर्फ आणि आणखीन गार पाणी घालावे.सुंदर रंगाचे बेलफळ सरबत तय्यार!चवही एकदम रिफ्रेशिंग आहे.

बेलफळ सरबत उपयोग -बेलफळात व्हिटामिन C मुबलक आहे.शुगर लेव्हलही याने कमी होते.अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.

माझ्या मिक्सरमधून वाटून एकत्र केलेल्या गरात पाणी, बर्फ,साखर टाकून निवांत उन्हाळ्यात अखेर अखेरच्या दुपारी याचा आस्वाद घेतला.आणि पुन्हा एक पारंपारिक पाककृती करण्याचे समाधान मिळवलं

-भक्ती

No comments: