Monday, May 15, 2023

पैस भेट!

 


काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माउली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस  या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले  तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.

१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला  नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला  ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक  ‘अमृतानुभव’ पाहायला.

नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार  मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत  मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.

मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.

आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुबर आणि बहावाची पिवळी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.

-भक्ती

No comments: