" जंगलातील दिवस " या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यंकटेश माडगूळकर म्हणतात ,
****आपल्या जीवनाला फुरसदीचा एक भरजरी,लांबलचक पदर असावा, असे मनापासून वाटत असते, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करावयातच आपण फार खर्ची पडतो. आवडोचे, पण चरितार्थ साधेल, असे नसलेले आपण बाजूला टाकतो किंवा पुढे कधी तरी करू, म्हणून पुढे ढकलतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत धावपळ चाललेली असते. सारखी गती. गती. रिक्षातून, बसमधून, रेल्वेतून, विमानातून धावायचे. सगळे जीवन या यांत्रिक गतीने व्यापून टाकले आहे. कधी अंगावर चांदणे पडत नाही. कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकु येत नाही. कधी ओढ्यात अंघोळ होत नाही. कधी उताणे शोधून चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश पाहता येत नाही.****या व्यावहारिक जीवनातून मग तात्यांनी जवळपास दहा वर्षे (१९७४-८४)या काळात विविध जंगलांना ,मूळ प्राणी-पक्षी-ऐतिहासिक धरोहरे यांना भेटी दिल्या .व्यंकटेश माडगुळकर हे 'बंदुक टाकून हातात दुर्बिण घेतलेले जंगल-जीवन रेखाटनकार आणि शब्दचित्रकार' म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत.ही सगळी भटकंती ते वेळोवेळी विविध प्रसिद्ध नियतकालिकांमधून लिहीत होते.या जंगलातल्या अनोख्या अद्भुत अपरिचित गोष्टी ,आठवणी,अनुभूती एकत्रित करून ही जंगलाची शिदोरी एकत्रितपणे "जंगलातील दिवस"या पुस्तक रूपाने वाचकांना मिळाली .हे पुस्तक व्यंकटेश माडगूळकरांच्या जंगलप्रेम आणि निसर्गकुतूहलचा सुंदर वृतांत आहे.हे केवळ "प्रवासवर्णन" नाही, तर जंगलातील जीवन, प्राणी-पक्षी, निसर्गसौंदर्य, शिकारी अनुभव आणि जंगलातील छोटे-छोटे क्षण यांचे जिवंत चित्रण आहे. लेखक स्वतः शिकारीचा छंद असलेले, चित्रकार आणि साहित्यिक असल्याने त्यांचे वर्णन खूपच जिवंत आणि रंगीत आहे.
काझिरंगा आणि मानस, कांचनमृग ,नवेगाव बांध, भरतपूर, राजस्थानच वाळवंट,शेल्लरच्या अभ्यासिकेत,खजुराहोची शिल्पकला,शोध,मगर आणि वान, काळवीट पाहायला रेहेकुरीला ,पेरियार,मेळघाट याच त्या लेखमालिकेतल्या चिरतरू !ज्या आजही वाचतांना वनांची पाने दूर सारत तिथल्या प्राण्यांचे ,पक्ष्याचे अद्भुत जग माडगूळकरांच्या लेखणी सामर्थ्याने आपण जणू याची डोळी प्रत्यक्ष पाहत असतो .
यातली पशु पक्ष्यांची कमाल रेखाचित्रे व्यंकटेश माडगूळकर यांनीच त्या त्या जंगलातल्या भेटी दरम्यानच रेखाटली आहेत .काझीरंगाचा गेंडा, हत्ती,नवेगावच्या वाघाचा माग काढणे, रेहेकुरीला ,राजस्थानात काळवीटाचे जीवनक्रम जवळून अभ्यासणे , मगर ,माकड इत्यादी प्राण्यांचे वर्तन, त्यांचे संघर्ष आणि सौंदर्य यांचे वर्णन रसाळ आहे .
काझीरंगा प्रकरण वाचतांना समजतेच की जंगलातला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून गेंड्याकडे पाहिले जाते.
तसेच इतरही रोचक निरीक्षणे नव्याने समजतात जसे गंड्यांच्या पाठीवर बसणारे पक्षी जसे कोतवाल, मैना, बगळे हे तिथे आयुष्यभरही असतात .तर कीटकांपासून बचावासाठी गेंडे पाण्यात उभे राहतात.असलेल्या कीटकांपासून विशेषतः गोचीड बचाव करण्यासाठी काळा कोतवाल, मैना आणि बगळे त्यांच्या पाठीवर बसतात. हे पक्षी गेंड्याच्या अंगावरील कीटक खाऊन त्याला मदत करतात आणि स्वतःसाठी अन्न मिळवतात , ही एक परस्पर लाभाची -Symbiotic संस्था आहे.जंगल सफारीसाठी हत्तीवर स्वार होतांनाचा प्रसंग वाचतांना वाचकाला खरोखर हत्तीवर बसल्यासारखे आणि गंड्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटते.
नवेगावला अंजेनाचे झाड पाहतांना एक प्रसंग घडतो. हा भाग खूपच सुंदर आणि प्रभावी आहे.
****आणखी थोडे पुढे गेलो, आणि तो वृक्षविशेष दिसला. खोल, खडकाळ नाल्याच्या काठी एक उंचा, पुरा अंजन ताठ उभा होता. एखाद्या कुशल शिल्पकाराच्या नाजूक हत्यारानं नक्षीकाम करावं, असं त्याचं सगळं खोड खुशोभित झालं होतं.
माघवराव म्हणाले,
“हे अस्वलाचं झाड आहे. वर लागलेली मधाची पोळी खाण्यासाठी ह्यावर अस्वल चढतात आणि उतरतात. त्यांच्या नखांनी हे नक्षीकाम केलंय, असं.”
पुढे तात्या म्हणतात ,"आपल्या हाती कॅमेरा नव्हता म्हणून हळहळ वाटली. हे नक्षीकाम रेखाचित्रात दाखवण्यापेक्षा अधिक सुंदर होतं."
राजस्थानच्या शुष्क, काटेरी वाळवंट भागातील भटकंतीचे वर्णन राजस्थानातील वाळवंट या प्रकरणात करतात. हिरव्या जंगलापेक्षा पूर्णपणे वेगळ्या, कठोर आणि निर्जन निसर्गाचे चित्रण यात आहे.चिंकारा छोट्या, सुंदर हरणांचे कळप, त्यांचे वर्तन आणि सौंदर्य,रोहिडा फुले ही वाळवंटात फुलणारी सुंदर केसरी फुले.वनस्पती जशा केर, काटेरी झुडुपे आणि टिकाऊ वनस्पती.वाळवंटात राहणारे लोकांचे जीवनमान , उंट, शेळ्या-मेंढ्या आणि पाण्याची दुर्मिळता यांचे वर्णन यात आहे.
वाळवंटातील कठोर परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या प्राणी, वनस्पती आणि माणसांच्या जिवंतपणाचे आणि टिकाऊ शक्तीचे सुंदर चित्रण दिसते .
व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या भ्रमंतीदरम्यान मुख्यतः फॉरेस्ट बंगले आणि डाक बंगले येथे राहणे पसंत केले. त्यांचे वर्णन खूप रसाळ आहे.
माडगूळकर डाक बंगल्यांचे खूप कौतुक करतात. ते लिहितात:
“डाक बंगला ही संस्थाच मोठी लोभस आहे... गावापासून दूर, नदी-ओढा-तळ्याच्या काठी... जुना बंगला जितका जुना तितके बांधकाम उत्तम... आराम, सौंदर्य, शांतता... हात पडेल तिथे सोय... थोडी सोय, माफक गैरसोय... डाक बंगल्याला पर्याय नाही!”
ते म्हणतात की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे बंगले असले तर तर सोन्याहून पिवळे!
अजून किती किती ...खूप काही या पुस्तकातल्या जंगलातल्या रसाळ ,सहज वर्णनांची यात सुंदर माला आहे.
"जंगलातील दिवस" हे पुस्तक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी एक अमृतवर्षी अनुभव आहे. एकदा वाचायला सुरुवात केली की, जंगलाची हाक सोडवत नाही.
नक्की वाचा... जंगल तुम्हाला हाक मारत आहे!

.png)



No comments:
Post a Comment