Thursday, March 12, 2026

शेंगोळे



कुळीथ खर तर उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात कुळीथ ,कुळीथ पीठ वापरून याचे पदार्थ तयार करतात.पण मागे सांगितल्याप्रमाणे #शेंगोळे खूप आवडतात .एका कृषिप्रदर्शनात तयार शेंगोळे -कुळीथ पीठ विकत घेतले.त्यात आधीच गव्हाचे पीठ लसूण ,तीळ ,तिखट ,मीठ हे घातलेले होते.आज मी दुसऱ्यांदा शेंगोळे तयार केले .कुळीथ पीठ थोडं जड असतं, त्यामुळे जास्त तेल घालून मळल्यास शेंगोळे चांगले फुटतात
कुळीथ पीठ-अर्धा कप. पीठ चिकट होत असेल तर गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ २ ते ४ टेबलस्पून
कांदा-१
टोमॅटो-१
लसूण पाकळ्या १०
हिरव्या मिरच्या ४
कोथिंबीर १/४ कप
जीरे १ टीस्पून
ओवा १ टीस्पून
हळद १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल २-३ टेबलस्पून (पीठात घालायला)
फोडणीसाठी
तेल ४ टेबलस्पून
मोहरी १ टीस्पून
हिंग १/४ टीस्पून
सुक्या लाल मिरच्या २
पाणी – ग्रेव्ही साठी गरजेनुसार जास्त-कमी
कृती
मसाला वाटून घ्या
लसूण + हिरव्या मिरच्या + जीरे + थोडी कोथिंबीर + थोडं मीठ एकत्र बारीक वाटून घ्या.परतलेला कांदा,टोमॅटो यांचीही ग्रेव्ही यात एकत्र करा.
एका परातीमध्ये कुळीथ पीठ घ्या.त्यात ओवा,तीळ जिरे आणि २ चमचे तेल टाकत हळूहळू थोडं-थोडं गरम पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळा.
जरा घट्टच मळा .पण चिकट नको.५ मिनिटं चांगलं मळून घ्या. झाकण ठेवून १० मिनिटं राहू द्या.
शेंगोळे बनवा
हाताला थोडं तेल लावा.पीठाचा छोटा गोळा घेऊन बोटांनी लांबट, लहान लहान तुकडे करून वळा.ट्रेडिशनल पद्धतीत चकलीच्या सोऱ्यातून किंवा हाताने लांब लांब करून बनवतात, जाडाई बोटाएवढी ठेवा.
एका मोठ्या भांड्यात ४-५ कप पाणी उकळायला ठेवा.थोडं मीठ आणि १/२ टीस्पून तेल टाका.उकळी आल्यावर शेंगोळे हळूहळू सोडा शेंगोळे ८-१२ मिनिटं शिजवा ते वर तरंगायला लागतील आणि चांगले फुगतील.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी फोडणी हिंग सुक्या लाल मिरच्या ,ग्रेव्ही टाकत परतून घ्या.उकळलेले शेंगोळे यात सोडा .२-३ मिनिटं शिजवून गॅस बंद करा.
गरमागरम शेंगोळे वाटीत काढा, वरून कोथिंबीर टाका.
ताक, कोथिंबीरची चटणी किंवा लिंबू पिळून खाल्ल्यास मजा येते!
कुळीथ पीठ (हुलगा पीठ किंवा horse gram flour) हे Macrotyloma uniflorum या वनस्पतीपासून तयार केले जाते. हे पीक भारतातील प्राचीन काळापासून लागवडीत आहे आणि त्याचा इतिहास खूप जुना आहे.कुळीथ हे दक्षिण आशियातील उष्णकटिबंधीय भागातील मूळचे पीक आहे, मुख्यतः भारत हे त्याचे केंद्र मानले जाते.पुरातत्वीय पुराव्यानुसार, भारतात कुळीथाचे अवशेष इ.स.पू. २५०० ते २००० पासून सापडले आहेत. हे प्राचीन भारतातील प्रमुख पिकांपैकी एक होते.
भारतातील दक्षिणेकडील प्रायद्वीप( Peninsular India) आणि पश्चिम भारत (उदा. सौराष्ट्र) येथे स्वतंत्रपणे पिकवले जाण्याची शक्यता आहे. काही अभ्यासानुसार, उत्तर-पश्चिम भारतात सुमारे ४००० वर्षांपूर्वी आणि दक्षिण भारतात ३५०० वर्षांपूर्वी स्वतंत्र डोमेस्टिकेशन झाले.
वैदिक काळापासून कुळीथाचा उल्लेख आहे. आयुर्वेदात (अष्टांग संग्रह, सुश्रुत संहिता इ.) त्याचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत – उष्ण, तुरट, मूत्रल, कफघ्न इत्यादी. ते जनावरांच्या खाद्यासाठी (घोड्यांसाठी विशेष) आणि माणसांच्या आहारासाठी वापरले जायचे, म्हणून इंग्रजीत "horse gram" हे नाव पडले.
महाराष्ट्रात कुळीथ हे गावरान आणि पारंपरिक पीक आहे, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि डोंगराळ भागात.
खरीप किंवा रब्बी पेरले जाते. माळरान, हलकी-मध्यम जमिनीत चांगले येते आणि कमी पावसात)ही टिकते .म्हणून दुष्काळप्रतिरोधक पीक.
महाराष्ट्रात ते हुलगा / हुलगे / कुळीथ म्हणून ओळखले जाते. कोकण आणि मालवण भागात कुळीथ पीठ जात्यावर दळून पिठलं, शेंगोळे, थालीपीठ, उसळ इत्यादी पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी, कंबरदुखी, सर्दी-खोकला, मुतखडा, मधुमेह इत्यादींसाठी वापरले जाते. गरीब लोकांचे मुख्य कडधान्य म्हणून ओळखले गेले, पण आज पौष्टिकतेमुळे शहरातही लोकप्रिय झाले आहे.
भारतात मुख्य उत्पादक राज्ये: कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगढ इ.महाराष्ट्रात रत्नागिरी, कोकण भागात भातानंतर रब्बी म्हणून लागवड वाढली आहे.हे क्लायमेट रेसिलिएंट हवामान बदल सहन करणारे पीक आहे, कमी पाणी आणि कमी सुपीक जमिनीतही चांगले येते.
कुळीथ पीठाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे – प्राचीन काळापासून आजपर्यंत ते आरोग्य, अन्न आणि शेतीत महत्त्वाचे राहिले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत ते "poor man's food" नव्हे तर "powerful medicine and staple" होते! 😊

Monday, March 9, 2026

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार



सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन!

 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात "बुद्ध आणि त्यांचा धम्म " पुस्तक घेतल्यावर तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे यांचे "सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार "हे ते पुस्तक होते .पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्लेरा ब्रूस हायस्कुल फॉर गर्ल्स चे चित्र होते.आता शाळेच्या समोरच्या रस्त्याहून तर मी रोजच येते.शहरात मुख्य ठिकाणी खूप भव्य मैदान या शाळेचे आहे .पुढे गेले की अहमदनगर कॉलेज ,पलीकडे बूथ हॉस्पिटल ,तिकडून पुन्हा बाजारात जाण्याच्या रस्त्यावर ह्यूम चर्च आहे.पुढे माळीवाड्याचा राहण्याचा उल्लेख लक्ष्मीबाई टिळक (रेव्ह. नारायण वामन टिळक यांच्या पत्नी)यांनी आपल्या स्मृतिचित्रे पुस्तकात केला आहे.

तर सिंथिया फरार यांचे सावित्रीबाईच्या शिक्षिका म्हणून तर कार्य खूप महान आहे.पण तत्कालीन नगरच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट केले हे पुस्तक वाचतांना लक्षात आले.तरीही सिंथिया फरार हे फारच अपरिचित नाव राहिले आहे .याविषयी मग अजून उहापोह ,सन्दर्भ वाचले.त्याचा हा लेखाजोखा असा आहे.


भारतातील मुलींच्या शिक्षणाचा इतिहास हा १९व्या शतकात खूप महत्वाचा टप्पा आहे. त्यात मिशनरी शाळा, सिंथिया फरार यांचे काम, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका होण्याची प्रक्रिया आणि नंतर स्वदेशी म्हणजेच भारतीयांनी सुरू केलेल्या शाळा सुरू होणे हे सर्व क्रमाने घडले. 


फुलेंपूर्वी मुलींसाठी शाळा कशा होत्या? आधी मुख्यतः मिशनरी शाळा असायच्या.

१८४८ पूर्वी भारतात मुलींसाठी शिक्षण खूपच कमी होते. बहुतेक मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. बालविवाह, जातीव्यवस्था, समाजाचा विरोध आणि स्त्रियांना घराबाहेर जाण्याची बंदी यामुळे मुली अशिक्षित राहत होत्या. पण ब्रिटिश काळात ख्रिश्चन मिशनरी (धर्मप्रचारक) लोकांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. हे मिशनरी मुख्यतः अमेरिकन, ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांतून आले होते.

 १८२०-१८३० च्या काळात मुंबई , कलकत्ता, मद्रास इत्यादी शहरांत मिशनरी शाळा सुरू झाल्या.

उदाहरणार्थ मुलींसाठीची पहिली शाळा ज्याचा आपल्याला उल्लेख आढळतो ती मार्च १८२४ मध्ये मुंबईतील अमेरिकन मिशनने सुरू केली होती. ती गंगाबाई नावाच्या एका स्थानिक महिलेने शिकवली होती. असे मानले जाते की, भारतात अशा प्रकारची ही पहिली शाळा होती. 

१८४० पर्यंत मुंबई, अहमदनगर, पुणे परिसरात १०-२० मिशनरी शाळा होत्या. काही शाळांमध्ये १००-४०० मुली शिकत होत्या.

मुख्य उद्देश मुलींना शिक्षित करून ख्रिश्चन धर्माकडे वळवणे होता, पण त्यामुळे शिक्षणाची सुरुवात झाली.

या शाळा परदेशी प्रभावाखालील होत्या. भारतीय समाजातील लोक स्वतंत्रपणे अशा शाळा सुरू करत नव्हते, कारण समाजाचा प्रचंड विरोध होता.


सिंथिया फरार (Cynthia Farrar, १७९५-१८६२) ह्या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी होती. त्या  १८२७ मध्ये भारतात आल्या आणि अविवाहित अमेरिकन महिलांपैकी पहिल्या मिशनरींपैकी एक होत्या.

 १८२७-१८३७ पर्यंत त्यांनी मुंबईत मुलींच्या शाळा वाढवल्या. १८२९ पर्यंत ४००+ मुली शिकत होत्या. तिने शाळा चांगल्या पद्धतीने चालवल्या .परीक्षा घेतल्या, हस्तकला शिकवली.१८३९ मध्ये त्या  अहमदनगरला गेली आणि तिथे ४-५ शाळा चालवल्या. १८४५-४६ मध्ये १००+ मुली शिकत होत्या.

त्यांच्या  शाळा चांगल्या संघटित होत्या. तिने भारतीय मुलींना शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला. 

तेव्हा जोतीराव फुले यांनी १८४५-४६ मध्ये शाळांचे निरीक्षण करण्यासाठी अहमदनगरला त्यांनी चालविलेल्या शाळा पाहिल्या आणि प्रभावित झाले. १८५३ मध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणतात,


"एका मैत्रिणीसोबत मी अहमदनगरमधील मुलींच्या शाळांना भेट दिली, ज्या अमेरिकन मिशनरी विभागाच्या फरार मॅडम यांनी व्यवस्थापित केल्या होत्या. त्या शाळा पाहून मला खूप आनंद झाला कारण त्या खूप चांगल्या प्रकारे चालवल्या जात होत्या. पुण्यात परतल्यानंतर, मी लगेच मुलींसाठी एक शाळा सुरू केली जिथे वाचन, लेखन, गणित आणि व्याकरण हे विषय शिकवले जात होते."


जना त्चुरेनेव्ह आणि सुमीत म्हसकर यांनी एमजी माली यांचा हवाला देत त्यांच्या "वेक अप फॉर एज्युकेशन" या पेपरमध्ये म्हटले आहे की वसाहतवाद, सामाजिक परिवर्तन आणि भारतातील जातिविरोधी चळवळीची सुरुवात, सावित्रीबाई फुले यांनी स्वतःची अध्यापन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी काही महिने फरार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.


सिंथिया फरार सावित्रीबाईंच्या शिक्षिका कशा झाल्या?

सावित्रीबाई फुले जन्मतः निरक्षर होत्या. लग्नानंतर जोतिराव फुले यांनी घरीच तिला वाचायला-लिहायला शिकवले. पण व्यावसायिक शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक होते.सावित्रीबाईंनी दोन शिक्षक प्रशिक्षण कोर्स केले.

पहिला अहमदनगर मध्ये सिंथिया फरार यांच्या संस्थेत काही महिने केला. फरार यांनी त्यांना शिक्षण आणि शिक्षक कसे होतात हे शिकवले.आणि 

दुसरा पुण्यातील नॉर्मल स्कूल मध्ये. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.

.

 नंतर स्वदेशी मुलींच्या शाळा कशा सुरू करण्यासाठी भारतात चळवळ उभी राहू लागली.मिशनरी शाळांनी पाया घातला, पण भारतीयांनी स्वतःच्या समाजासाठी शाळा सुरू केल्या तेव्हा क्रांती झाली.यात फुले दांम्पत्य यांचा मोलाचा वाटा आहे.

जोतिराव आणि सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील पहिली स्वदेशी मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला ६-९ मुली होत्या यात सर्व जातीतील दलित, मागासवर्गीय यांचा सहभाग विशेष होता .शाळा भारतीयांनी चालवलेली होती. जातीव्यवस्था आणि स्त्रीदास्याविरुद्ध होती. या शाळेला विरोध खूप होता लोक शेण-दगड फेकत, बहिष्कार टाकत, पण सावित्रीबाई रोज शिक्षणाचा वसा राबवत राहिल्या.

१८४८-१८५२ पर्यंत फुले दांपत्याने एकूण १८ शाळा पुणे आणि आसपास सुरू केल्या. १८५२ मध्ये २७३ मुली शिकत होत्या.मिशनरी शाळा धर्मप्रचारासाठी होत्या, पण फुलेंच्या शाळा सामाजिक क्रांतीसाठी दलित-महिला शिक्षण, सर्व जाती एकत्र शिकणे.१८४७ मध्ये बंगालमध्ये प्यारी चरण सरकार यांनी, मुंबईत नाना शंकर शेठ यांनी शाळा सुरू केल्या, पण फुलेंच्या शाळेला सर्वसमावेशक आणि क्रांतिकारी म्हणून ओळख मिळाली.

१८६२ मध्ये सिंथिया फरार यां मृत्यूपर्यंत फरार अहमदनगरमध्ये राहत आणि काम करत.


सिंथिया फरार यांच्या अमेरिकन मिशनरी संस्थेत मुख्य प्रेरणा आणि व्यावहारिक प्रशिक्षण.प्रशिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी मुलींच्या शिक्षणाची क्रांती सुरू केली. सिंथिया फरार यांचे काम फुलेंच्या शाळांसाठी पाया ठरले. आजही सावित्रीबाईंना "भारतातील पहिल्या महिला शिक्षिका" म्हणून ओळखले जाते!

-भक्ती 



संदर्भ: विकिपीडिया, पुस्तके- MG Mali  संशोधन पेपर-Jana Tschurenev आणि Sumeet Mhaskar यांचेआणि मिशनरी रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. काही नवीन संशोधनात २०१० पूर्वीचा पुरावा कमी यावर वाद आहे, पण बहुतेक इतिहासकार हे मान्य करतात की फरार यांचा प्रभाव होता

https://thesatyashodhak.com/cynthia-farrar-missionary-woman-who-inspired-jotirao-phule/

https://seedbed.com/5-women-who-changed-the-face-of-missions/

https://www.punekarnews.in/cynthia-farrar-social-reformer-and-teacher-of-savitribai-phule/

https://www.esakal.com/education-jobs/american-marathi-mission-misses-cynthia-farrar-girls-education-at-early-age-ddn96


Sunday, February 22, 2026

वाचाल_तर_समृद्ध_व्हाल

 #वाचाल_तर_समृद्ध_व्हाल 

#कवीला_ऐकाल_तर_जाणीवा_विस्ताराल



वाचन का करायचे? ,वाचनालय वाचणाऱ्यासाठी का सुरु ठेवायचे? तर या पुस्तकांमधले विचार मनात झिरपत राहतात ,नकळत शबदांचा ओलावा आयुष्य सुखकारक,ताकदीचे करते.

सकाळ पुस्तक महोत्सवात अहिल्यानगर येथे दुसऱ्यांदा रंगला. पुस्तकांची मांदियाळी पुस्तक वाचन,वाचनालय या विविध मार्गांनी फुलवणाऱ्या वाचनवेड्याना मान्यवराकडून गौरवपत्रक दिले गेले.

यानिमित्ताने कविसंमेलन आयोजित होते.खूप दिवसांनी कवी संमेलन अक्षरशः अनुभवले.काव्य ही भावभावनांचा ,विचारांचा अनोखा मेळ सर्वांना लाभत नाही.म्हणूनच जाणलं पाहिजे "जे न देखे रवी ते ते देखे कवी "


माजी आमदार लहू कानडे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, तुकाराम धांडे, भरत दौंडकर, संदीप जगताप, अमोल बागूल यांच्या काळजाला हात घालणाऱ्या कविता अनुभवता आल्या.


ज्येष्ठ कवी **अरुण म्हात्रे यांनी अनेक मराठी कवींच्या कविता नारायण सुर्वे ,पाडगावकर कार्यक्रमात वेळोवेळी सादर केल्या .त्यात अत्रे व इतर साहित्यिकांच्या खुमदसार किस्से पेरून वातावरण अलगद हास्यमयही केले.त्यांचा उत्साह वय विसरायला लावणारा होता . म्हात्रे यांनी वेळ निराळी आहे' ही कविता आणि अखेर उंच माझा झोका हे गीत सुरांच्या साथीने सादर केले.


**तुकाराम धांडे यांनी 'आई होती तेव्हा' ही कविता सादर केली."आई होती तेव्हा,जातं जतंगाण गाण गायचं उखळामध्ये नाचताना, मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं" अहाहा डोळ्यासमोर नाचत आकाशाकडे झेपावणारे मुसळ उभं राहील.थेट ग्रामीण रंगढंगातला हा कवी नक्की ऐका https://www.facebook.com/share/v/1BjrThSPEv/

तुकाराम आणि आजोबा या कवितेत दोघांमधलं साम्य काय तर "डोंगर"तुकारामांचा भंडाऱ्याचा तर आजोबांचा गावातला खूप वेगळी निसरग-माणूस यांच्या नात्याची कविता आहे ."भूगोल "कविता तर जंगल.गाव गिळणाऱ्या ससत्तांधला चपराक आहे .


नाशिकचे कवी व शिक्षक **संदीप जगताप हे त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या, आई आणि सामाजिक विषयांवरील भावूक व प्रेरणादायी कवितांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 'शेतकरी मुलाशीच लग्न करा' अशी साद घालणाऱ्या त्यांच्या कविता तरुण वर्गात खूप व्हायरल झाल्या आहेत.https://www.facebook.com/share/v/1CNhjdyTYP/ लहानपणीची "इन्स्पेक्शन "कविता आई-तिचे कष्ट अधोरेखित करतात .


 ''बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..'' कवी **भरत दौंडकर यांची ही कविता आणि "मुलगा काय करत होता पुस्तक वाचत होता ",गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात , पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, -गोफ या कवीची या कविता आजचे वास्तव दाखवतात https://youtu.be/uzeNUZ0dfCI?si=_oj5_z4tfBv3BtE_ 


स्वतःचा वेगळा असा ठसा उमटविणारी कविता म्हणून 'क्रांतीपर्व', 'टाचाटिभा', 'तळ ढवळताना' या कवितासंग्रहांचे निर्माते माजी आमदार **लहू कानडे यांनी "लोकशाही "कवितेत सत्य स्वीकारायचे धैर्य देते हे दिसले .


नगरचे प्रसिद्ध ,हरहुन्नरी कलावंत कवी **अमोल बागुल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन तर केलेच पण त्यांच्या "सुलभ आत्महत्या सेतू केंद्र" या कवितेने आत्महत्या आणि मनाची अवस्था याचा निराळा आयाम सादर केला .


अशा काव्याने भरलेल्या संध्याकाळी मन हरखून गेले आणि मोबाइल हातात घेण्याची इच्छाच राहिली नाही. हा एक उत्तम उपाय आहे मोबाइल व्यसन कमी करण्याचा मनाला उभारी देणारा, आनंद देणारा. आता असे कविसंमेलन नियमित हजेरी लावण्याचा निश्चय केला :)

-भक्ती

Saturday, February 21, 2026

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

 ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी



युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.


नेक्सस या पुस्तकाची हेडलाईन आहे .“अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत-माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.”पुस्तकाची सुरुवात करण्यापूर्वी मुखपृष्ठावरील ‘कबूतर’ लक्ष वेधून घेते. या कबूतराची गोष्ट पुढे पुस्तकात आहेच.

शेर आमी (प्रिय मित्र) हा अमेरिकन आर्मी सिग्नल कोरचा एक होमिंग पिजन होता.सैनिकांनी त्याला संदेश पायाला बांधून  हवेत सोडले. जर्मनांनी त्याच्यावर जोरदार गोळीबार केला .एक शेल त्याच्या खाली फुटला, त्याच्या छातीला गोळी लागली, डावा डोळा आंधळा झाला, उजवा पाय पूर्णपणे कापला गेला.तरीही शेर आमी उडत राहिला! तो ४० किलोमीटर उडून ४५ मिनिटांत डिव्हिजन मुख्यालयापर्यंत पोहोचला. तिथे त्याने संदेश पोहोचवला, ज्यामुळे अमेरिकन तोफखान्याने हल्ला थांबवला आणि जवळपास २०० सैनिकांचे प्राण वाचले.हरारी ही गोष्ट पुस्तकात माहितीच्या शक्ती दाखवण्यासाठी सांग

माहिती केवळ मानवी बनवलेली नसते तर कबूतरासारखा प्राणीही माहिती वाहून नेऊ शकतो.एक छोटी माहिती किती मोठे जीवन वाचवू शकते.


पुस्तक तीन भागांत विभागले आहे.


भाग १ -मानवी नेटवर्क्स 


‘सत्य’ शोधण्याच्या प्रयत्नात लोकांनी जे काही वापरले असेल, ते म्हणजे माहिती. वास्तव समजून घेण्यासाठी आपण माहितीचा वापर करतो. जेव्हा माहिती वास्तवाचे अचूक प्रतिनिधित्व करते, तेव्हा ती ‘सत्य’ ठरते. माहितीचे काम केवळ जोडणी करणे हे असते. परंतु मानवी समाजातील बहुतांश माहिती आणि खरंतर इतर जैविक व भौतिक व्यवस्थांतील बहुतांश माहिती कशाचाही अचूक प्रतिनिधित्व करत नाही. हा व्यामिश्र मुद्दाच पुस्तकाचा पाया आहे.


मौखिक परंपरा, कथा, मिथके, चित्रलिपी, दस्तऐवज, कागदी लिखाण, छापखाना अशा विविध टप्प्यांतून माहितीची रूपे बदलत गेली आणि ‘माहितीची जाळी’ समाजासाठी निर्माण झाली.


सेपियन्स पुस्तकाप्रमाणेच येथेही हरारी ‘कथांची शक्ती’ अधोरेखित करतो. कथा सामूहिक श्रद्धा निर्माण करतात, लोकांना एकत्र आणतात. पुस्तके या कल्पनांचा आणि कथांचा प्रसार करतात. पण जेव्हा यामुळे लोकसमूह नियंत्रित करता येतो हे लक्षात आले, तेव्हा माहिती सत्ताव्यवस्थेचा भाग बनली.मग चुकीची माहिती दोष निर्माण करू लागली.छापील चुकीच्या माहितीच्या प्रसाराचे उदाहरण म्हणून ‘विच हंटिंग’ -जादूटोणा शोध मोहिमा दिले आहे. भीती पसरवून, छळाला कारणीभूत ठरवता येते. स्टॅलिन आणि हिटलर यांची माहितीचे नियंत्रण करून सत्ता टिकवणे व विरोधकांचा बिमोड करणे कसे शक्य झाले, याची अनेक उदाहरणे येथे दिली आहेत.


भाग २ आणि ३-संगणकाचे राजकारण,डेटा वसाहत ,ए आय 


पुढील भागांत संगणक, इंटरनेट आणि अल्गोरिदम यांमुळे ‘सत्य’ आणि ‘शास्त्र’ यातील समतोल कसा ढळत आहे, हे स्पष्ट केले आहे. माहितीला आकार देऊन आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन मानवी राजकारण ‘मानव व यंत्र संवाद’ या मिश्र स्वरूपात रूपांतरित होत आहे. संगणक आता ‘AI’च्या रूपात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि कल्पना निर्माण करू शकतात.


‘सिलिकॉन पडदा’ ही संकल्पना मांडताना हरारी सांगतो की, संगणक-सत्ता केंद्रीकरण होऊ शकते. नव्या साम्राज्यवादात मानवजात फुटून प्रतिस्पर्धी डिजिटल साम्राज्ये निर्माण होऊ शकतात. प्रत्येक राजवट स्वतंत्र एआय प्रणाली तयार करेल. परिणामी परस्परसंवाद कठीण होईल.


एआयची स्फोटक शक्ती नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. औद्योगिक क्रांतीत मागे राहिलेल्या राष्ट्रांवर प्रगत राष्ट्रांनी वर्चस्व प्रस्थापित केले. एआयच्या बाबतीतही असेच काही घडेल का, हा प्रश्न हरारी उपस्थित करतो.आजच्या काळात युद्धासाठी बंदुका आवश्यक नाहीत. केवळ डेटा गोळा करून, कॉर्पोरेशन किंवा सरकार ‘डेटा-वसाहती’ निर्माण करून माहितीच्या आधारे नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळेच अनेक देशांत विविध अॅप्सवर बंदी घातली जाते.

पूर्वी साम्राज्यवादासाठी जमीन, नंतर औद्योगिक युगात यंत्रे व इंधन महत्त्वाचे होते.आता डिजिटल डेटा आणि अल्गोरिदम जगावर नियंत्रण मिळवू शकतात. एआय व स्वयंचलनामुळे विकसनशील देशांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. नफा वाढवण्यासाठी स्वयंचलन वाढेल आणि अकुशल कामगारांची गरज कमी होईल.


हार्डवेअर प्रत्येक देशात वेगळे असल्याने स्थानिक उपकरणांची सक्ती करण्याचे महत्त्व वाढू शकते. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जगभरात देशांनुसार वेगळे होत राहिल्यास जग ‘माहितीच्या कोशां’मध्ये विभागले जाऊ शकते.


एआय, ओळख आणि भविष्य


एआयमुळे केवळ नोकऱ्या आणि राजकीय बदल होणार नाहीत, तर सांस्कृतिक बदलांनाही सामोरे जावे लागेल. ‘शरीर’ आणि ‘ऑनलाइन ओळख’ यातील नाते काय? विविध सभ्यतांनी मन व शरीर प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.


जोपर्यंत भौतिक शरीर हीच ओळख मानली जाते, तोपर्यंत एआयला व्यक्ती म्हणून स्वीकारले जाणार नाही. परंतु समाजाने शरीराचे महत्त्व कमी केले, तर एआयला व्यक्ती म्हणून अधिकार देण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.जर जग परस्परविरोधी डिजिटल कोशांत विभागले गेले, तर एका कोशातील अस्तित्वे दुसऱ्या कोशातील लोकांना दुर्बोध व अनाकलनीय वाटू शकतात.


स्वतःला अतिहुशार समजणाऱ्या माणसाने निर्माण केलेल्या एआय आणि अल्गोरिदमवर तो नियंत्रण ठेवू शकेल का? याचे ठोस उत्तर नसतानाही माणूस एआय विकसित करत आहे. माहितीच्या जाळ्याचा हा दोष आहे .सत्यासाठी नव्हे, तर व्यवस्थेसाठी ही निर्मिती होत चालली आहे.


नेक्सस -अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.

अनुवादक- प्रणव सखदेव

प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन

ISBN-978-81-980859-5-5.

पृष्ठसंख्या-४६४ पाने 

मूळ किंमत-₹५००.

Monday, February 9, 2026

माचीवरला बुधा

 

Friday, January 30, 2026

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(आता कोणाच्या वाटण्याने आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:))

तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.

तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा  "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती.

सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता. 

या अभ्यासक्रमात हीनयान (थेरवाद) आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला.

सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली.

तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही.

त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो.

बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात.







पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली.

तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात.




बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही.  

बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत .

अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप

मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ

वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप

क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा

समंतभद्र -घोड्यावर बसलेला





इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या .

तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत.

सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे.


इतर प्रमुख बौद्ध देवी 

महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे.

प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक.

मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित.

भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते.

जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी.

हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.



काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो.

मी काही अभ्यासक नाही हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.

परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते.

कायप्पा संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी - 


-भक्ती 

Wednesday, January 28, 2026

"प्राइड अँड प्रेज्युडिस"




अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.

 "प्राइड अँड प्रेज्युडिस" १८०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर  "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!

पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही  एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.

 १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत.   आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका  एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.

"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.

लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."

 तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."

ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.

-भक्ती 


Tuesday, January 27, 2026

"मंतरलेले बेट" -व्यंकटेश माडगूळकर



 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff. हे पुस्तक १९५३ मध्ये प्रकाशित झाले असून, ते लेखकाच्या स्वतःच्या बालपणावर आधारित आहे .१८९८ ते १९०० च्या आसपासच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावरचे जीवन.

पुस्तकाची सुरुवातच खूप जादुई आहे. नायक असलेला लहान मुलगा म्हणतो, "जन्माला यावे ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला. मॅनहॅटन म्हणजे एक लहानसे जगच होते." त्याला हे बेट "मंतरलेले" वाटते ,कारण ते त्याच्यासाठी जादुई, छोटे, स्वतंत्र आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेले आहे. पहिल्या चार-पाच वर्षांच्या आयुष्यात तो शहरात मोकळेपणाने भटकतो, रस्ते, इमारती, लोक, दुकाने, पार्क हे सर्व त्याच्या बालक नजरेतून जिवंत होतात.

तेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यात तणाव होता, स्पॅनिश-अमेरिकन युद्धाची धमकी होती. लहान मुलगा सैनिक होण्याची स्वप्ने पाहतो, तशी इटुकली पिटुकली मित्रांबरोबर तयारी करतो .हे सगळे त्याच्या बालसुलभ उत्सुकतेने आणि गमतीने वर्णन केले आहे. शहरात अनेक इमिग्रंट्स राहतात .वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांच्या संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ, व्यवसाय, एकमेकांशी तालमेल हे सगळे मुलाच्या डोळ्यातून खूप रोचक दिसते. ते "मेल्टिंग पॉट" सारखे आहे, जिथे सगळे एकत्र येऊन नवीन अमेरिकन जीवन बनवतात.

१९०० साल सुरू झाल्यावर विज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीमुळे जीव वाचवले जाण्याचे अनुभव येतात. मुलाला हे आश्चर्य वाटते. नंतर तो न्यूयॉर्क जवळच्या खेड्यात -Countryside जातो (मला लहानपणापासून Countryside शब्द फार आवडतो.) तिथे पहिल्यांदा दूध काढणे पाहतो, कुत्र्याशी मैत्री होते, निसर्ग आणि ग्रामीण जीवन त्याला नवीन जग दाखवते. शहर आणि खेडे यांच्यातील फरक त्याच्या मनात रुजतो.

मोठा होताना तो विचार करतो .जीवनात काय करावे? धावपटू व्हावे की नाटकात काम करावे, की दुसरे काही? अनेक वाटा धुंडाळतो. शेवटी अब्राहम लिंकनवर एक लेख लिहितो, तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध होतो आणि पदक मिळते. तेव्हा त्याला खात्री होते , "आपण लेखक व्हायचे!" आणि तिथूनच त्याचे लेखनकार्य सुरू होते.

हे पुस्तक लहान मुलांसाठी तर नक्कीच वाचण्यासारखे आहे .भाषा सोपी, उत्सुकता कायम ठेवणारी, आणि शहर,देश,संस्कृती यांची ओळख करून देणारी. पण मोठ्यांनाही आवडते, कारण २०व्या शतकाच्या सुरुवातीचे न्यूयॉर्कचे जिवंत चित्रण आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या मराठी अनुवादामुळे ते मराठी वाचकांना खूप जवळचे वाटते .जणू आपल्याच भाषेत न्यूयॉर्क फिरत आहोत!

न्यूयॉर्क करून आठवले, असाच न्यूयॉर्क जवळच्या 'स्टेटन आयलंडचा' 'नानास' सिनेमा मी पाहिला होता.तेव्हापासून इथल्या मंतरलेल्या बेटांच्या  मोहात आहे...आता ब्रूकलिन, क्वीन्स या बेटांवर आधारित खुसखुशीत पुस्तक किंवा सिनेमा पाहायचा ,शोधायचा आहे.

-भक्ती 





Saturday, January 24, 2026

महामाया निळावंती (लेखक-सुमेध)

 महामाया निळावंती 

लेखक-सुमेध



दोन वर्षांत  २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे.

जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते. जीवनदेवी महामाया निळावंती सतत सूचवत असते,

"गेलेल्याला आपल्या ठिकाणी जाऊ द्यावे,तुझ्यामध्ये विश्व आहे, त्याचा शोध घे!"

सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून उगवलेली एक प्राचीन दंतकथा, रहस्यमयी निळावंतीची कथा, आजच्या काळात पुन्हा जिवंत होते. चारशे वर्षांपूर्वी निळावंती ही एक रहस्यमयी स्त्री होती .ती पशु-पक्ष्यांची, झाडांची, निसर्गातील मूक चेतनांची भाषा जाणत होती. तिच्याकडे मृत्यूला आव्हान देण्याची, प्राण फुंकण्याची कला होती.काळाच्या अनंत चक्रात निळावंती पुन्हा पुन्हा जागी होते.काळपुरुषाचा अवतार हा निळावंतीचा साथीदार हाही पृथ्वीच्या जन्मापासून तिचा शोधक आहे. काळाच्या अनंत उलथापालथीनंतर माणूस स्वार्थी-आत्मकेंद्रित होत गेला. 

निळावंतीशी निगडित एक प्राचीन पोथी आहे, जी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर खेळते. आधुनिक काळात एक बाप आपल्या वैयक्तिक दु:खातून या पोथीचा शोध घेत सह्याद्रीत येतो, आणि तिथून कथा उलगडू लागते.कादंबरीत अनेक रहस्य एकात एक गुंफलेले आहेत. विक्रम, बाजिंदा, हेलबर्ग यांच्या रूपाने निळावंतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची कला त्या स्वार्थी माणसाला आपल्या कडे पाहिजे. तेव्हा निळावंतीचा भाबडा जीव, मूक प्राणीमात्रांचे अस्तित्व याचा त्याला सतत विसर पडत राहतो.निळावंती मात्र निसर्गाशी एकरूप असते, ती मायाजाळ सहज पार करते, प्राण फुंकते, पण स्वार्थी मनाच्या काळ्या बाजू तिला पूर्णपणे समजत नाहीत आणि शेवटपर्यंत दगाफटका होत राहतो.

लेखक सुमेध यांनी अठरा पौराणिक पोथ्या, ऐतिहासिक दस्तऐवज आणि तांत्रिक आख्यायिकांचा अभ्यास करून ही मेटाफिक्शन कादंबरी निर्माण केली आहे. वाचकांना खिळवून ठेवते आणि वाचून झाल्यावरही विचार करायला लावते.

आणि हो, त्या ताम्हण फुलाच्या गूढाबद्दल तर खूप चर्चा झाली होती! काही आवृत्त्यांमध्ये वाचकांसाठी ताम्हण फुलांच्या बिया दिल्या होत्या.कोणाकोणाला मिळाल्या ताम्हण फुलांच्या बिया ?? कोणाकोणाचे त्या बिया रुजल्या?

लेखकाच्या हस्ते हस्ताक्षरीत अशी प्रत मिळालेली मी एक भाग्यवान वाचक आहे!

-भक्ती 




Thursday, January 22, 2026

पक्षी रूपके

 #पक्षी_रूपके 



पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ।

पिलुवाट पाहे उपवासी ॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥

तान्हे वत्स घरी बांधलेसे देवा ।

तया हृदयी धावा माउलीचा ॥३॥

नामा म्हणे केशवा तु माझा सोईरा ।


इवलाश्या पक्ष्यांचे दाणे टिपयाची सकाळची लगबग रोज पाहते हे दाणे टिपून त्यांना पिल्लाना भरवायचे असते.संतांनी यात रूपक शोधलं .मराठी संतांची निसर्गातील घटना रूपक म्हणून वापरायची प्रतिभा अभंग ओव्या वाचताना एका प्रतिसृष्टीत डोकवायचा आनंद देतात.या अभंगात ईश्वराच्या मातृत्वपूर्ण कृपेचे प्रतीक आहे. जसे आई पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे आणते आणि ते उपाशी राहून वाट पाहतात तरी आई येऊन पोसते, तसे भक्त विरहात असला तरी विठ्ठल त्याच्याकडे धावतो.


 आणि हे दाणे संचय करणे हे पक्षांत नाही ते रोजच्या रोज येणार दाणे टिपणारी ...हवे तेव्हडेच मग अजून रूपक यावर आहे ,

पक्षी अजगर न करी संचित ।

तयासी अनंत प्रतिपाळी ॥२॥

तुका म्हणे तया भार घातलिया ।

उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

निसर्गातील प्राणी -पक्षी, अजगर, बेडूक हे उदाहरण देत तुकोबा सांगतात की, जो संचित करत नाही, त्यालाही ईश्वर पोसतो. भक्तानेही प्रपंच करावा, पण त्यात गुंतून जाऊ नये..सर्व ईश्वरावर सोपवावे.


पक्ष्यांचे हि वागणूक इसापनीतीतही रूपकाने कथांमध्ये गुंफली गेली.चतुर कावळा कथा तर प्रसिद्धच आहे .


असाच एक चतुर कावळा मला रविवारी भेटला.एक कावळा इतका काव काव करत होता. तब्बल १५ मिनिटे न थांबता तो काव काव करत होता ..काय आज पाहुणे येणार का ? वगैरे विचार झाले .पण हा आपला काव काव करीत होता .मग लक्षात आलं कठड्यावर उरलेली खिचडी ठेवली होती. याला ती पाहिजे तो मला काव काव संदेश देऊन तिथून उठायला सांगतोय .मी हळूच उठून दूर गेले .तर पटदिशी आला आणि खिचडी खात बसला.एक मोठा घास घेऊन उडून गेला .खरंच कावळा किती हुशार त्या दिवशी पटले.


त्याच्या काव काव ने मला ज्ञानेश्वर माउलींचा अभंग/विरहिणी आठवली .भक्ताची विठ्ठलभेटीची तळमळ इतकी तीव्र आहे की साधा कावळा ओरडला तरी तो शुभशकुन वाटतो. कावळ्याला प्रेमाने, सन्मानाने बोलावले जाते ,जसे आई मुलाला बोलावते


पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

-ज्ञानेश्वर महाराज

#आळशीचे_शेत

 #आळशीचे_शेत



स्वतःच्या दुर्गुणांचा उदोउदो कोणी करत नाही, मी तर स्वतःचा "आळशी" हा मेडल घालून फिरते. शेत-बागकाम? अरे बाबा, "जर झाडं स्वतः उगवत नाहीत तर मी काय करू? रिज्युम पाठवू का त्यांना?" तशी ती खूप चंचल-तरबेज आहे. पण शेत-बागकामाबाबत मी आळशी आहे. आता बागकाम केलं नाही तरी काही अडणार नाही. पण इथलाच कोपरा बहरतोय. सुगंधी कुंड्या दिसतात, त्यांची काळजी घेणं हे किती सुखकारक असतं! आता उंच आकाशाकडे कोणी धावतंय असं वाटतं. पण नाही, मी अशा कित्येक कुंड्या आणल्या, जोपासल्या, तरी खूप कमी टिकल्या. उरलेल्यांना कृश होताना पाहून त्रासच होतो. वाटतं, आपणच आळशी आहोत.
मागच्या महिन्यात स्वयंपाकासाठी आणलेले कांदे… ओलसर-खराब, एकदम "डिप्रेशन मोड" मध्ये. रोज चिरायला घेतला तर कधी छोटे, कधी मोठे त्यांच्या डोक्यावर हिरवा कोंब / पात फुटलेली. राग यायचा. एकदा असाच हिरवा शेंडा फुटलेला कांदा माझ्याकडे दु:खाने टुकूटुकू पाहत होता मी म्हटलं, "चल रे, तुझी पात होईल का? पात उगवून तरारली की "कापणी करूया!" मग कांद्याच्या पातींचा फेस्टिव्हल सुरू ...धपाटे ,भरीत ,डाळीची भाजी,सॅलड "ऑर्गेनिक लाइफ!"
जुन्या पसरट भांड्यात तो टुकुटुकु बघणारा हिरव्या फेट्याचा कांदा काळ्याभोर, पाण्याने ओलसर मातीत रोवला. दुरडीतले इतर हिरव्या फेट्यावाले भाऊबंदही आमचा भाऊ कुठे म्हणून विचारू लागले . तेव्हा त्यांचीही रवानगी मातीत झाली. फेटेवाले गॅंग!!!"अरे भाऊबंद, तुम्ही स्वतः उगवा, मी फक्त लाईक्स देतो!" लवकरच पाती तरातरा उगवल्या .मी कात्री घेऊन ,माझ्या शेताची कापणी करते "आजचा क्वोटा पूर्ण!"
कांद्याचा तो ताजा गंध मला फार आवडतो! "हे गंध नाही, माझ्या आळशीपणाचा परफ्यूम आहे!" कोवळेपणा जीभेला ताजेपणा देतो .
आता जमिनीत नाही, तरी ही शेती कशी? अरे, ही आळशी शेती आहे! झाडं उगवली की मी सेलिब्रिटी!!
बाबा-काका सांगतात. लहानपणी शाळेत 'क्रॉप सायन्स' सारखा विषय होता. त्यात शेतजमिनी सुपीक करणे, वाफे करणे, बियाणे तयार करणे, रोप लावणे, सेंद्रिय खत वापरणे... असा सगळा जम… मध्यंतरी काळात शिक्षण कारकुनी व्यवस्थेसाठी जुंपलं गेलं. मग माझ्यासारखे आळशी शेतकरी तयार झाले. AI च्या जमान्यात सगळं काम माणसाच्या हातून निसटतंय. पण येणाऱ्या काळात AI करू शकणार नाही असं फळं-भाज्या पिकवायचं.
आळशी शेतकरी म्हणजे काय? जो काम टाळत नाही, तर कामाला सोपं बनवतो. ज्याला माहिती आहे की, एका छोट्या कुंडीतही जग बदलता येतं .आपलं आरोग्य, आपला स्वाद, आणि आपला मूड!
तुम्हीही सुरू करा ना? एक छोटी कुंडी, थोड्या बिया, आणि भरपूर आळशीपणा. पाहा, कसं मजेत "शेत" उभं राहतं!

Saturday, January 17, 2026

पत्र निमित्तमात्र....

 


पत्र निमित्तमात्र

सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री... ही मैत्री फक्त शब्दांची नव्हती, ती हृदयाच्या गहन कोपऱ्यातून उमललेली, पत्रांच्या माध्यमाने फुललेली एक अनोखा आयुष्यघन होता.पत्रे ही फक्त कागदावरची अक्षरे नव्हती ती दोन संवेदनशील आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करत गेली.
या पत्रव्यवहाराची सुरुवात अगदी साधी होती – पुलं एकदा दीर्घकाळी बाहेरगावी असताना सुनीताबाईंना जी. ए. यांचे पुलं. यांना लिहिलेले पत्र वाचायला मिळाले. त्यांनी उत्तरासाठी जी. ए. यांना पहिले पत्र लिहिले. त्या पत्राने सुरू झालेला हा संवाद ८ वर्षे (सुमारे १९७७ ते १९८५) चालला.
पुढे या पत्रव्यवहारांची स्वतंत्रपणे या दोन्ही लेखकांच्या नावे पुस्तकेही प्रकाशित झाली.
सुनीताबाईंनी जी.ए यांना लिहिलेली त्यांच्या या पत्रांचे संकलन म्हणजे "प्रिय जी.ए." हे पुस्तक (मौज प्रकाशन, २००३) प्रसिद्ध झाले.जी. ए. यांची उत्तरपत्रे समाविष्ट नाहीत, फक्त सुनीता ताईंची पत्रे.हे पुस्तक २००८ मध्ये पहिल्या "जी. ए. कुलकर्णी पुरस्कार" ने सन्मानित झाले.
तर दुसरे पुस्तक --
"जी.एं.ची निवडक पत्रे" हे जी. ए. कुलकर्णी यांनी विविध आप्तेष्ट, मित्र आणि साहित्यिकांना लिहिलेल्या पत्रांचे संकलन आहे. हे मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले चार खंड आहेत:
खंड १: १९९५
खंड २: १९९८
खंड ३: २००६
खंड ४: नंतरचे (मरणोत्तर प्रकाशन)
हे पत्रव्यवहार जी. ए. यांच्या खोलवरचे, वैचारिक, कधी व्यंग्यपूर्ण, कधी भावनिक आणि नेहमीच साहित्यिकदृष्ट्या समृद्ध आहे.यात सुनीता देशपांडे, पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, जयवंत दळवी, माधव आचावल,अनंतराव कुलकर्णी, मा. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या व्यक्तींना लिहिलेली पत्रे समाविष्ट आहेत.
जणू दोन प्रगल्भ मनांच्या आत्मसंवादाचा एक दस्तऐवज!
जी. ए. यांचे वाचनक्षेत्र अफाट होते.भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चिमात्य साहित्य, कविता, संगीत... सर्व काही त्यांच्या मनात रुजलेले. सुनीताबाईंचीही भारतीय ग्रंथांची ओळख आणि साहित्यिक जाण कमालीची सूक्ष्म होती. या दोघांच्या पत्रांतून साहित्याचा आस्वाद, जीवनमूल्ये, प्रवासवर्णने, थोर-मोठ्यांच्या आठवणी, आरोग्याची काळजी... असे अनेक विषय मायावी धाग्याने गुंफले गेले. कधी ग्रेसच्या कवितांच्या ओळींनी पत्रे काव्यमय होत, कधी बोरकरांच्या शब्दांनी मन उदास होत, तर कधी गायकांच्या गायनशैलीच्या कौतुकाने पत्रे संगीतमय होत. "माया" या संकल्पनेवरचे विचार तर जणू मायावी धुंदीत बुडवत.प्रवासवर्णांनी पत्रांना पंख मिळत,पानाफुलांच्या ओळखीने पत्रात वसंत फुलत असे !
जी. ए. यांचे जीवन अत्यंत सुसंस्कृत, आत्ममग्न आणि संवेदनशील होते. प्रभावती आणि नंदा या बहिणींची साथ, कथांच्या रंगीत-गूढ मालिका, मित्रांचे गोतावळे... हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देत. सुनीताबाईंचास्पष्टवक्तेपणा हाही पत्रांत ठळकपणे उमटतो .पण तोही प्रेमळ, जिव्हाळ्याचा. माधव आचवल, वसंतराव देशपांडे यांच्या जाण्याने दोघांच्या आयुष्यात एक आभाळच हरवले, हे त्यांनी पत्रांतून स्पष्टपणे व्यक्त केले. ते शब्द वाचताना थोरांच्या आयुष्यातली पोकळी अनुभवली.
जी. ए. यांच्या आजारपणाची बातमी लागल्यावर सुनीताबाईंच्या पत्रांत काळजीचा सूर अनेकदा येत असे . "पुण्यात या, इथल्या डॉक्टरांकडून इलाज करून घेऊ या" असा आग्रह अनेकदा त्या करत .पण जी. ए. यांचा स्वाभिमान अढळ होता. त्यांनी कधीच आजारपणाचा विषय सुनीताबाईंच्या मदतीपर्यंत पोहोचू दिला नाही. हा स्वाभिमान... अखेरच्या श्वासापर्यंत जपलेला. अगदी शेवटच्या क्षणी सुनीताबाईंच्या घराजवळच हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पण ती बातमीही त्यांनी सुनीताबाईंना लागू दिली नाही. किती गहन, किती दुःखद...
दोघांमध्ये अनेक विषयांवर मतभेदही होते. शरदचंद्रांच्या लेखन त्यातला नायिकांचे दु:ख सुनीईताबाईंना कथा-पात्रांचा उत्कृष्ट नमुना वाटत .तर जी.ए. यांना चक्क हास्यपद वाटत .अशा अनेक रुपरेखेवर,साहित्यातील एकमेकांच्या विरुद्ध विचारांवर पत्रामध्ये विचारांच्या फेऱ्या चालत
कधी पत्रांत खंड पडत.दोघांमध्ये गैरसमजाणे जागा घेतलीय काय ,असा विचार येऊन उदास वाटत होत, मन रुखरुखत होत.पण एकाच्या तीन-चार पत्रांनंतर दुसऱ्याचे सावकाश होईना ... उत्तर येत असे .सूर्याच्या स्वच्छ प्रकाशासारखे निर्मळ, भावनांच्या लवलेशाशिवाय शुद्ध!!तेव्हा हायसे वाटत... नाते पुन्हा ताजे, अधिक गहिरे होत.
जी. ए. गेल्यानंतर सुनीताबाईंनी "Good Bye Friend " हे निरोपाचे अखेरचे पत्र लिहिले.ते वाचताना सुनीताबाईप्रमाणे जी. ए. आपल्याला असे अचानक कसे सोडून गेले असे गहिवरून येते.आपणही एक मैत्र गमावला असे वाटते. कोलाहलाच्या या जगात दोन बुद्धिवादी, संवेदनशील आत्मे इतक्या निर्मळपणे, जिव्हाळ्याने पत्रव्यवहार करत होते... हे ऐकणे-वाचणे म्हणजे आपल्यातही असाच समंजसपणा, प्रेमळ स्पष्टता आणि गहन आदर रुजवण्यासाठी एक प्रेरणा आहे.
हा पत्रसंवाद फक्त साहित्यिक नाही,तो हृदयाचा आहे. वाचताना जाणवते.खरी मैत्री ही पत्रांच्या ओळींमधून नव्हे, तर दोन आत्म्यांच्या मधल्या शांत, गहन संवादातून उमलते. आणि ती मैत्री... काळाच्या पलीकडे अमर राहते.
-भक्ती

Tuesday, January 13, 2026

अदृश्य जगाचे कुतूहल -१.४

 अदृश्य जगाचे कुतूहल -१.४

सूक्ष्मदर्शिका -०५



Atomic microscope म्हणजे मुख्यतः Atomic Force Microscope (AFM) – एक अत्यंत उच्च रिझोल्यूशनचा स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोप जो अॅटॉमिक स्तरावर (fractions of a nanometer, म्हणजे ०.१ नॅनोमीटरपेक्षा कमी) सर्फेस इमेजिंग करतो. हे "atomic microscope" म्हणून ओळखले जाते कारण ते अॅटॉमिक फोर्सेस (interatomic forces) वापरून सॅम्पलच्या पृष्ठभागाला "फील" करून इमेज बनवते – जणू एका सूक्ष्म सुईने सर्फेसला स्पर्श करून तिचे नकाशे काढते!

१९८१ मध्ये गर्ड बिनिग आणि हेनरिक रोहरर यांनी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप (STM) शोधला – ज्याने अॅटॉम्स दिसले आणि त्यांना १९८६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. पण STM फक्त कंडक्टिव्ह सॅम्पल्ससाठी काम करत असे.

मग १९८६ मध्ये बिनिगने Calvin Quate आणि Christoph Gerber यांच्यासोबत Atomic Force Microscope (AFM) चा शोध लावला – हे STM चे "बहिण" आहे! त्यांच्या पहिल्या पेपरमध्ये त्यांनी सांगितले की हे यंत्र insulating सॅम्पल्स (जसे प्लास्टिक, बायोलॉजिकल सेल्स) साठीही काम करेल आणि अॅटॉमिक रिझोल्यूशन देईल. पहिल्या AFM मध्ये एक diamond shard टिप gold foil cantilever वर लावलेली होती – आणि van der Waals forces ने इंटरॅक्शन मोजले!
१९८९ मध्ये पहिले व्यावसायिक AFM बाजारात आले, आणि आज ते नॅनोटेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, बायोलॉजीचा आधार आहे. १९९३ मध्ये पहिल्यांदा ambient (हवेत) आणि liquid मध्ये अॅटॉमिक रिझोल्यूशन मिळाले!

प्रयोगांमध्ये हे समाविष्ट आहे:

नमुन्यांमधून अणू ओळखणे
अणूंमधील बल परस्परसंवादाचे मूल्यांकन करणे
अणूंच्या भौतिक बदलत्या गुणधर्मांचा अभ्यास करणे
प्रथिने संकुल आणि सूक्ष्मनलिकांसारख्या असेंब्लीच्या संरचनात्मक आणि यांत्रिक गुणधर्मांचा अभ्यास करणे.
कर्करोगाच्या पेशी आणि सामान्य पेशींमध्ये फरक करण्यासाठी वापरले जाते.

शेजारच्या पेशींचे मूल्यांकन आणि फरक करणे, त्यांचा आकार आणि पेशीभित्तीची कडकपणा.