Saturday, April 29, 2023

चर्चबेल-पुस्तक परिचय

 चर्चबेल#लघुकथासंग्रह#लेखक-ग्रेस

शब्द अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण!
सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस काव्यात!
बालपणात “भय इथले संपत नाही” या गीताने आत्मा इंद्रियाची गाठ करून दिली.आत्म्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे शब्द अलगद गाभ्यात घुसून घर करतात. “ती गेली तेव्हा रिमझिम ,पाऊस निनादत होता” या गाण्याची पार्श्वभूभी समजल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावतात.हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरीचे त्यांची गाणी “घर थकले संन्यासाचे”,”तुला पहिले नदीच्या किनारी”,”वार्याने हलते रान” कर्णमाधुर्याच्या निळाईत आत्मसुख देते. माझ्याकडे सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा काव्य संग्रह आहे जो मनोमन पुजला आहे.
तर ग्रेस यांचा पहिला ललितलेख संग्रह “चर्चबेल” कवितेतून मोहक दुर्बोध वाटणारे शब्द गद्यात कसे सजले हे वाचण्याची अनुभवण्याची उत्सुकता होती.सर्व लेख लहू स्वरूपाचे आहेत.पण कमालीचे ओढ लावणारे आहेत.त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तीच्या जीवनकळा अधिकतर वेदानाच्या रूपकातून साकारताना एक मूर्त रूप डोळ्यासमोर नक्क्कीच उभे राहते.
चिमण्या कथेतील त्यांच्या वरचा राग नंतर त्या ण येण्याने वाटणारी हुरहूर आहे.नेपाली,पल्लवीचे पक्षी तारायंत्राचा खांब, हे विशेष व्यक्तीमत्व चंद्रकलेसारखा रेखाटताना मृत्युच्या वेदनेने कधी लाटा ,कधी झाडं त्यावरचे पक्षी यांच्याशी मान्खेलाचे संबंध दाखवतो.
गुलमोहर,टेकडीवरचा पाऊस ,रोशनची गाणी,उरलेला चंद्र ,नूरजहा आणि रिल्के या लेखातून सृजनाचे दान वाचकांना ,रसिकांना मिळते.w.s ,प्रो सम्युल यातून इंग्रजी साहित्यिकांच्या साहित्याप्रती संपूर्ण समर्पण ग्रेस त्यांच्या लेखन शैलीतून घडवतात.
हात ,त्वचा –तंतू,यात्रा शिबानी या कथेतून इंद्रियांचा आत्मा उलगडतो.,माई,उन्हातील आई ,वाळूचे घर हे लेख एका गर्द हिरव्या प्रांतात नेतात.
शेवटचा लेख आहे ‘चर्चबेल’ सुंदर कथा आहे.एका प्रेक्षकाने ग्रेस यांना विचारले,”वाय आर यु रीन्गिंग चर्चबेल?”
ते उत्तरले “आय रीन्गिंग ड चर्चबेल टू आव्हाईड फरदर क्रुसीफीकेशन ईन माय माय लिटल अराउंड”
“माझ्या आजूबाजूला कोणी अजून ख्रिस्त सुळावर चढत नाही ,ते होऊही नये म्हणून मी चर्चबेल वाजवतोय”
साहित्यिकाने कायमच समाजाचे हितमर्म मांडताना एक सृजन जपले आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ काळ्या पांढऱ्या खिडकीतून घुमणारी चर्चबेल आहे जी एक नाद मनावर उमटवते.
-भक्ती
२६ मार्च –कवी ग्रेस स्मृतीदिन

No comments: