Saturday, April 29, 2023

दुपानी -पुस्तक परिचय

 दुपानी

लघुलेख संग्रह
लेखिका –दुर्गा भागवत
पुस्तकाच्या सुरुवातीलाच दुर्गाबाई म्हणतात,”आजच्या परिस्थितीला मिनी लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला ‘दुपानी’ उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.”
१९७४ पासून लघुलेख अगदी दोन पानांत बसतील असे लेख दुर्गाबाई लिहित होत्या,एक प्रयोग म्हणून .मनात रुंजी घालणारे विचार शब्दांकित करणे हेच लेखकाचे कौशल्य आहे!
यातील बरचसे लेख पूर्व प्रकाशित आहेत.
निसर्ग ,आणीबाणीचे दिवस ,पाककला,आप्तेष्टांच्यागोष्टी,आशियिक सोसायटी, सुरस पौराणिक कथा,तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असतानाचे प्रसंग अशा विविध विषयावरचे जवळपास ६३ लेख दुपानीत समाविष्ट आहेत.
पुष्प्सुगंध,फसवा पौष,आनंदाचे मोती यासारख्या लेखांत निसर्ग वैभव मनात बहरते.
सौंदर्याची परिसीमा,शुक्र आणि चांदणी,वैशाख अमावस्या,मावळता चंद्र यात बाईनी केलेले मर्मदृष्टी पूरक आकाश दर्शन दिसते.
इंदिरा संत यांना ‘चंद्रकिरनांकुर’ या ’मोहक’ शब्दावर कविता लिहिण्याचे दुर्गाबाई आवर्जून सांगतात ,याचा एक सुंदर लेख आहे.
‘आजीची शेवटची संक्रांत ‘,कृष्णाष्टमीची खुण यात सणांच्या मुलाम्यात बाईंच्या तरळ आठवणी भरभरून वाहतात.
जायफळ,मिरवड,पारिजात ,मृगाचा पाऊस यात निसर्गातील सूक्ष्मगोष्टींची नोंद घेणारी संशोधिका सापडते.
आणीबाणच्या काळातील अनुभव बराचश्या लेखातून दिसून येतात.
तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असताना आलेले खडतर प्रसंग अनेक लेखांत मांडले आहेत.
खापुरला,ती पोळी,सयाजीराव व पाककृती,सीताबाचे लोणचे,थोरोसाठी भाकरी,पाककला यात दुर्गाबाईंच्या पाककलेच्या आवडीशी निगडीत किस्से आहेत.
एवढ्या थोर ज्ञानतपस्वीच्या जीवनात अनेक माणसांचा गोतावळा होता,तोही अनेक लेखांतून वाचायला मिळतो.
दुर्गाबाई ज्या अनेक परिघांसाठी ओळखल्या जातात,ते सर्व परीघएकमेकांना छेदून एक वेन आकृती तयार होते ती म्हणजे ‘दुपानी’ !
-भक्ती
२३/०४/२३
जागतिक पुस्तक दिन

No comments: