Saturday, April 29, 2023

सिद्धेश्वर वाडी ,पारनेर



 सिद्धेश्वर वाडी ,पारनेर मंदिराचा बेत ठरला होताच पण समजल की आज चतुर्थी जामगावच्या मळगंगा देवीची यात्रापण आहे .तेव्हा देवीचे दर्शनही करून पुढे जायचे ठरवलं.आणि सकाळीच दोन घास सांजा खाऊन आपण चतुर्थी मोडली आहे हे ही लक्षात आलं.सुट्टीच्या दिवशी उपवास आले की पारड सुट्टीचच वरचढ ठरत.

रस्ता आता लेकीलाही चांगलाच ओळखीचा झाला आहे .तेव्हा उन्हाळ्याच्या दारात फुललेले पर्पल गुलमोहर,पान गळून झाडांनी धरलेल्या शेंगा त्याही वाळल्या होत्या.चिंचेची झाडं वाळलेल्या चिंचानी लगडल्या होत्या.
जामगावचा वाडा आधी समोर आला त्याच्या पलीकडेच रामेश्वर मंदिरातलं चाफ्याचे झाड पूर्ण पांढर- पिवळसर रंगांनी सजले होत.
मळगंगा देवीच्या वेशीपासून वळालो.तडमताशाचा आवाजाने मनात जागर सुरु झाला.देवीला नवसाचा नैवैद्य म्हणजे गुळ वा शेरणी दाखवला जातो.तो वाजत गाजत डोक्यावर मिरवत आणला जातो.घंटेला छानपैकी ज्वारीची कणसे बांधली होती.अगरबत्तीचा धूप दरवळत होता.हिरव्या रंगाच्या साडीमध्ये देवीचे चांदीचे मुखवटे लखलखत होते.पुरी भाजीचा नैवैद्य ते असंख्य प्रमाणात चढवले जात होते. ताशाचा आवाज दुमदुमत होता,मनाचा जागर असाच राहू दे साकड घातलं.
मध्येच एक मुलगा अचानक समोर आला ,”madam कशा आहात?” जुना विद्यार्थी होता.त्याची प्रगती मला कळाली होतीच पण त्याच्या तोंडून समाधानाने ऐकून छान वाटलं.बायकोला गर्दीतून शोधून आणलं आणि भेट घडवली.
तर ...
यात्रेचे रंगेबेरंगी फोटो घेतले.लेकीला सटर फटर घेतलं.सिधेश्वरला जाण्यासाठी पारनेर कडे जाणाऱ्या रस्त्यानेच पुढे जाऊ लागलो.
पारनेरला पोहोचताच आधी पोटोबा ,मिसळपाव खाल्ली.नवऱ्याला फार आवडली ,मला इतकी आवडली नाही.
पारनेर पासून सहा – सात किलोमीटरवरच दोन डोंगरांच्या मधल्या दरीत आहे सिद्धेश्वर वाडी मंदिर!उन्हातही चाफाच्या झाडांनी नटलेला परिसर दुरूनच मोहक दिसत होता.पावसाळ्यातल्या पाचुंनी तर कमाल होत असणार. मंदिर परिसरात शंकराची दोन मंदिर आहेत .एक भूमिगत आणि एक मुख्य मंदिर आहे.आधी भूमिगत पिंडीचे दर्शन घेतले.संगमरवरी पिंड आणि जवळच संगमरवरी पार्वतीची मूर्ती होती.मंदिराबाहेर एक दगडी मंडप आहे .त्यामध्ये एक भली मोठी घंटा टांगलेली आहे.वसईतल्या विजयानंतर मराठ्यांनी चर्चसाठीच्या घंटा आणून आपल्या देवस्थानांना अर्पण केल्या त्यातील ही एक घंटा आहे,त्यावर क्रासही नीट पाहिल्यास दिसतो.पूर्वी ह्या मंडपाचा /चतुष्कीचा वापर यज्ञासाठी होत असावा.उजव्याबाजुलाच महाभूनाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचे स्थान आहे.भव्य नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात गेलो.आणि मग मूळ गाभाऱ्यात पिंडीजवळ..तर इथे आवाजाचा प्रति ध्वनी ऐकू येतो समजल्यावर “ओम नम: शिवाय” हा जप सुरु केला.खूपच सुंदर वाटत होते.


शांत चित्ताने बाहेर आले.एक गरगरीत दगडी गोल घुमट दिसला. दरीच्या दिशेने खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरले.डावीकडेच पराशर ऋषींचे स्थान आहे.आणि समोर प्रचंड दरी.अनेक पक्ष्यांची साद ऐकू येत होती.निसर्गाच्या जवळ जाणं म्हणजे हेच निर्भेळ त्या झाडांचेच ,पशु पक्ष्यांच्याच सानिध्य,ध्यान या गोष्टीची उकल कशी होत असेल हे समाजत होत,पण असो....
आजूबाजूला असंख्य पिंडी आहेत,काही छोट्या काही मोठ्या आकाराच्या होत्या.जुन्या काळातल्या महिषासुर मर्दिनी,शंकर पार्वती,विष्णू लक्ष्मी,गणपती अशा अनेक मूर्ती होत्या.तसेच मंदिराची रचना पाहून हे यादव कालीन मंदिर असावे आणि जीर्णोधार पेशवाईत झाला असावा हा अंदाज केला.
मी सर्व पाहत असताना माझी लेक बागडणाऱ्या कोकारांकडे पाहत होती आणि शेवटी बाप लेकीने कोकाराशे मैत्री करत त्याला कुशीत घेतल होत.
पुढेच मंदिराच्या वरच्या बाजूस पुष्करणी आहे.तिथे एक शिलालेखही दिसला.विठ्ठल रखुमाईची सोनेरी डोळ्यांची अखंड काळ्या पाषाणातली भरीव मूर्तीने हृदय चोरून घेतले.अक्षरशः डोळ्यांचे पारणं फिटले.
पावसाळ्यात पुन्हा हिरवा निसर्ग अनुभवायायचे ठरवून परतीकडे निघाले.
-भक्ती

No comments: