Sunday, October 15, 2023

सृष्टी माया

 


वाजे लडिवाळ  घुंगूरवाळा

चरितसे गोजिरी कपिला |


धरती गळा फुलांच्या माळा

फुलपाखरांनी श्वास रंगला |

वाहे धीरगंभीर निर्झर निळा

नाद ,सृष्टी मंदिरा घुमला |


स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा

पाकळ्यांची बरसात रान सजला|


अवचित पावा वाजला सावळा

समाधी मनीची ,हरी हसला |


-भक्ती


Friday, September 29, 2023

ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे पुस्तक परिचय

 

सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत  मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.



अनुक्रमणिका पाहता,चार विविध विषय क्षेत्रातील संस्कृती,दैवत , आस्थेची स्थाने,लोकमान्यता असलेले श्रद्धा विषयांचे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. पहिल्या भागातील लेखांत महाराष्ट्र आणि जवळील राज्यातील माहित नसलेल्या व माहिती असलेल्या ‘गुरु’  परंपरेविषयी समजते.दुसऱ्या भागात स्त्री देवता माहिती वाचायला मिळते.यातील सीता,उमा राधा यांचे निराळे पैलू समोर येतात.राधा या लेखात राधा नाचवणे या परंपरेपासून तमाशा पर्यंतचा प्रवास वाचण्यासारखा आहे.कालिदासरचित  नायिका शकुंतला,यक्ष प्रिया,अनुसया मृछाकटीकम ची नायिका वसंतसेना ,गीतगोविन्दम रचना जयदेव या अभिजात साहित्याची रसाळ वर्णने लेखांत आहे.

संत चक्रपाणी यांवर रा .ची  यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलेच आहे ,पण एका गुजराती मनुष्याचा महाराष्ट्रात संत चक्रपाणि आणि महानुभाव पंथाचा उगम वाढ यात अनेक नवीन माहिती दाखवतो.शैव पंथाविषयी अनेक गोष्टी विविध लेखात विस्तृत मांडली आहे.जय गंगे जय भागीरथी या लेखात एक शिव भक्तीची उगम गंगा आणि एक कृष्णसावळी यमुना यांचा संगम ,कुंभयात्रेसाठीचे महत्व वाचनीय आहे.विंचू चावला लेखात संत एकनाथ यांच्या साहित्याने भारुड ही देणगी जनमानसाला दिली.लंकेची पार्वती हा शब्द अपभ्रंश आहे  ‘लंजा पार्वती’ ‘,लज्जागौरी’ म्हणजेच ‘अनावृत्त जगन्माता’ याचा गंधही सामन्यांना नसेल.निषाद या आदिम जमातींची मनोरंजक तितकीच विश्वसनीय माहिती वाचताना त्यांनी प्रथम नांगर वापरले तसेच अनेक शब्द संस्कृत भाषेला प्रदान केले.वीस अंक निषादसाठी महत्वाचा त्यांनीच अठरा वीसे म्हणजे १८*२०=३६० असे वर्षाचे दिवस मोजले पण अपभ्रंश झाला ‘अठरा विश्वे’ सदाकाळ या अर्थानेच.आदित्य राणूबाई सौराष्ट्र ,काश्मीर,राजस्थान ,नेमाड ,महाराष्ट्र अशा अनेक भागांत सुर्योपासक गटाची माहिती देतेच .तर हिचे मूळ इराणचे राज्ञई (रानी)याच्याशी निगडीत आहे.इराण मधील सुर्योपासक सूर्यच्या राण्या रशन आणि  नर्शेफ नावावरून भारतात झाल्या राज्ञई आणि निक्षुभा.

असे अनेक धर्मोइतिहात्मक संशोधांवर आधारलेले लेख वाचत राहणे या पुस्तका निमित्ताने पर्वणीच आहेत.

रा.चि.ढेरे या उपासकांचे तत्त्वज्ञान ,संस्कृतीचे  महान  कार्य पाहून मी थक्क झाले.

-भक्ती


Thursday, August 17, 2023

जुन्नर भटकंती -२

 


पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं.

सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती.

साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान!





यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सोपी वाट निवडली.पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा(विकिपीडिया).आमची कोकरं उत्साहात धावत होती.एका कैदेतून सुटून स्वतः फोटोंच्या कैदेत अडकवत निवांत चाललो होतो.एकूण दरवाज्यांपैकी काहीच दरवाजांवर व्याघ्र शिल्प होते.सातवाहन काळात नाणेघाटावर देखरेखीसाठी या गडाची निवड झाली आणि इतर राजवटीत अभेद्य किल्ला अशी वाटचाल आणि बांधणी झाली.इथले महत्त्वाचे ठिकाण 'शिवाईदेवी मंदिर' जिजाऊ मातेने शिवाईहून 'शिवाजी'‌ नाव छत्रपती यांना दिले.देवीचा गाभारा प्रसन्नतेने ओतप्रोत आहे.त्याचे बाह्य बांधकाम आणि शेजारील लेण्या पाहून कार्लाची आठवण झाली.शिवाईदेवी मंदिराच्या बाजूला पुरातन लेण्या खोदलेल्या आहेत.एक स्तुप आणि इतर भिक्खूच्या राहण्याची सोय असलेल्या दगडी खोल्या आहेत.इथे पाण्याच्या खोदलेल्या खुप टाक्या आहेत.लेण्यांचा समूह पाहून.छत्रपती जन्मस्थान पाहायला निघालो.हा गड बहू झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे चालतांना जीव सुखावतो.कोकरांची एनर्जी जरा कमी झाली होती.जन्मस्थळी पोहचलो.गड राजांच्या घोषणेने दुमदुमत होता.इतर वाडा पडला होता पण एकच ती प्रसिद्ध इमारत उभी आहे.त्या पाळण्यात अंगाई गात जिजाऊ शिवरायांना निजवित असेल,माझ्या मुखातून अंगाई उमटली "गुणी बाळ असा जागसी का तू राजा निज रे निज शिवबाळा"

सध्या वाचत असलेल्या 'दास डोंगरी राहतो ' पुस्तकातल्या दोन पानांचे अभिवाचन केले ज्यात रामदास स्वामी शिवबांना शिकवण देतात

“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”

“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”

“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”

समोर भव्य बदामी आकाराचा तलाव आहे.त्यापुढे कडेलोट स्थान.बाजूलाच 'महादेव कोळी चौथरा' मोगलांच्या क्रूर कृत्याची, महादेव कोळींचे बंड मोडण्यासाठी त्यांचा केलेला शिरच्छेद यांची साक्ष देणारा चौथरा.परतीची वाट जराशी सोपी होती, तपासले असता जवळपास दोन्ही बाजूंनी मिळून ५ किमीची ही भटकंती-चढाई चार तासांची झाली.फुस्स झालेले कोकरू किरकोळ खरदेमुळी परत टणाटण उड्या मारु लागले



 .शिवनेरीवर पावसाने साधारण दर्शन दिल्यामुळे नाणेघाटाकडे पाऊसधारांच्या आशेने निघालो.शंभू डोंगरापासून स्वर्ग अवतरू लागला.



पावसाची माया 

न्हाऊ घाली

डोंगराची काया

सुखावली दिठी

हिरव्या डोंगरा

देता चपळ मिठी...

असेच दृश्य या जुन्नरच्या दुसऱ्या भटकंती पाहिले.



सृष्टीचा मुक्त हस्त वरदान भाताच्या इवल्या रोपांवर,जागोजागच्या छोट्याशा झर्यांतून,डोंगरांवर लहणार्या तलम ढगांच्या पदरांवर दिसत होते.तो खळाळता गोड आवाज..रोज मेडिटेशनला 'प्ले' करते ,आज प्रत्यक्ष तृप्ती कानांना होताना रोमांच उठले.नाणेघाटला पोहचल्यावर तोच खळाळ हजारो वर्षांपासून ऐतिहासिक घाटातून आजही वाहत होता.हा काहीसा कठीण मार्ग प्रत्येक जण मोठ्या धीटाईने करतोच कसा याचे मला आश्चर्य वाटत असते.मी दुसऱ्या वेळी इथे आले हा आनंदही अवर्णनीय होता.पुढल्यावेळी पायथ्यापासून वर चढाई करणार असं ठरवलं.


नानाचा अंगठा अनेक चढत होते पण मला पाहायचा होता नाणेघाटचा प्रसिद्ध उलटा धबधबा(reverse waterfall).पण जायचं कसं?जसा विठोबा भक्ती भावाने आठवला की सामोरी येतोच अगदी तसेच एक काहीसे वृद्ध आजोबा समोर आले "जीवधनच्या पायथ्याशी उलटा धबधबा पाहायचा का?चला अमूक अमूक दक्षिणा द्या नेतो"असे म्हणाले.चला त्याच्यामागून अर्ध्या रस्त्यात वाहनाने गेलो आणि मग पायी निघालो.ओहो...हिरव्या जीवधन किल्ल्याहून धावणारे शुभ्र मऊ ढग.. स्वर्गच!

कोकरू बदकाच्या मागे धावत होतं..प्रचंड गोड व्हिडिओ आलाय.

माझी लेक 'आबा आबा'  नाना प्रश्न निरसण करत त्या वृद्ध आजोबांचे बोट पकडून पुढे गेली.ज्या क्षणी उलटा धबधब्यापाशी  पोहचलो ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले.खालच्या दरीतील वार्याच्या प्रचंड दाबामुळे कड्यांवरून खाली पडणारे पाणी मोठ्या फोर्सने वर फेकले जाते.त्यात जो तो मनसोक्त भिजत होता.भारतात चारही उलटे धबधबे केवळ याच नाणेघाट डोंगर रांगांत आहेत की त्यातील एक मी पाहत होते.परतीच्या वाटेतही आबाचे 'विठोबा'चे बोट तिने सोडले नव्हते.

नाणेघाट 


उलटा धबधबा 





नाणेघाट नेहमीप्रमाणे मन जड झाल होत.

Tuesday, August 8, 2023

हिंग बीज सुप्तावस्था

 



वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच हिंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.

 माहितीनुसार फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थेचे(seed dormancy) प्रमाण खूपच जास्त आहे.

बियाणे सुप्तावस्थेच्या दोन भिन्न श्रेणी आहेत: बाह्य आणि अंतर्जात

बीजाच्या गर्भाच्या बाहेरील परिस्थितीमुळे एक्सोजेनस सुप्तता उद्भवते. एक्सोजेनस सुप्तावस्थेचे उदाहरण म्हणजे जेव्हा बियाणे आवरण ओलावा आत शिरण्यासाठी खूप टिकाऊ असते, प्रभावीपणे उगवण रोखते. 

बीजाच्या गर्भामध्ये रासायनिक बदलांमुळे अंतर्जात सुप्तता उद्भवते. अंतर्जात सुप्तावस्थेमुळे वनस्पती अंकुरू शकत नाही याचे एक कारण म्हणजे भ्रूण अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नाही किंवा विशिष्ट हंगामी संकेत मिळालेले नाहीत .अंतर्जात रासायनिक अवरोधकांमुळे उगवण देखील दडपले जाऊ शकते.

अशावेळी बीजांची सुप्तावस्था  का असते ?

१.बीज आवरण पर्मिअबल ,कठीण असणे

२.बीज भ्रुण परिपक्व नसणे

३.ABA बीज रोपण प्रतिकूल संप्रेरकाचे प्रमाण अधिक असणे

४.थंड हवामान न मिळणे (vernalization)

बीजांची सुप्तावस्था लवकर  मोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकिया कराव्या लागतात.

१.बीजावारण कोमल करणे-(scarification) –Acid,रब्बिंग,कॅत्तिंग

२.वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे-

३.ABA चे प्रमाण कमी करणे,ऑक्सिजन देणे,हिटिंग

४.थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे.

 फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थ (seed dormancy) वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे आणि थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे या पद्धतीने मोडली आहे.त्यातही थंड वातावरण ५ C,१५C आणि २५C ह्या प्रकिया वेगवेगळ्या काळासाठी जसे आठवडा ते २४-२८ दिवस वगैरे.यातील ५ C –वीस दिवसांसाठी सर्वात यशस्वी परिणाम देते.

या cold scarification नन्तर बीज सहा वेगवेगळ्या मेडिया  संयोजन (मिडिया कॉम्बिनेशन) मध्ये ग्लास हाऊस मध्ये वाढवले. ऊती संवर्धन पद्धतीत कृत्रिम पोषक द्रव्ये (macro,micro,vitamin,hormones,sugar),प्रकाश,तापमान पुरवले जाऊन एकाच,उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेले हजोरो निरोगी रोप ग्लासमध्ये तयार तयार केले जातात.

संशोधन प्रबंधामध्ये हे सहा मिडिया संयोजन काय हे दिसत नाहीये .पण साधारणत: हाफ स्ट्रेन्थ मुराशिगे आणि स्कूग कृत्रिम मिडियात (1/2 MS मिडिया) GA3,cytokinin संप्रेरके वेगवेगळ्या प्रमाण संयोजनात वापरलले जातात.अशी महत्वाची(endangered) बियाणे,वनस्पती वनस्पती ऊती संवर्धन (plant tissue culture)  या पद्धतीने वाढविले जातात. अशा पद्धतीने ८०० वनस्पती सप्लिंग तयार करून लावली आहेत.वनस्पती ऊती संवर्धन मूळ हेतू शेतकऱ्यांना निरोगी,अधिक उत्पादकता असणारी  रोपे मिळवून देणे आहे.एका माहीतीनुसार हा प्रयोग येत्या दशकात याशावी झाल्यास  हिंगाच्या शेतीत  दर हेक्टरी  ३ लाख रुपये गुंतवणूक करून शेतकरी १० लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकतो.त्यानुसार बीज पासून रोपे तयार झाल्यानंतर इतर एक्क्सप्लान्ट नवीन रोप निर्मितीसाठी वापरता येईल का हे पाहणे मनोरंजक आहे.

Monday, July 24, 2023

ओपनहायमर नोलन कलाकृती



 यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे  सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी.

अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे चरित्र आहे.या‌ पुस्तकावरून प्रेरणा घेत नोलनने एक जबरदस्त बायोपिक बनवला आहे.

भौतिक शास्त्राच्या अनेक शाखांपैकी पुढे क्वांटम फिजिक्स, न्यूक्लियर फिजिक्स या शाखेने कमालीचे संवेदनशील संशोधन अणू-भंजन /अणू विखंडन जगाला बहाल केलं.आणि बाटलीतला जिनी बाहेर पडला अणुबाँब बनून.हा जिनी बाटलीत परत टाकता येणार नाही तरीही त्याचा वापर करावा लागला ते घडवणार्या पैकी एक ओपनहायमर.

सिनेमात नोलनच्या शैलीप्रमाणे प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता माणूस म्हणून येणाऱ्या पिढीसाठी चांगलं उत्तम द्यायला बांधील आहात  हे अधोरेखित  करायला सांगितले आहे. काही सीन  ब्लॅक अँड व्हाइट (जेव्हा ओपनहायमर/परिस्थिती अणुबाँबच्या समर्थनात आहे.)तर रंगीत सीन जेव्हा ओपनहायमर अणुबाँबपासून दूर जाण्याचा लोकांचा,सृजनाचा विचार करतो तेव्हा येतात असं मला वाटतं.

सिनेमाच्या सुरुवातीला खुप व्यक्ती सतत येत राहतात, त्यासाठी माझा होमवर्क कमी पडला.हे बरेचसे शास्त्रज्ञ होते ज्यांची नावं आज पर्यंत शाळा , महाविद्यालयात पुस्तकात वाचली आहेत.

याच दरम्यान महायुद्ध, कम्युनिस्ट, सोशलिस्ट यांचे संदर्भ येत राहतात.यावर ओपनहायमर आधी डाव्या विचारसरणीचे होत,हे समजले.हळूहळू काही नावांभोवती सिनेमा फिरू लागतो  कैथरिन ,लेस्ली ग्रोव्ह,जिन,टेलर,लारेन्स,बोरिस,नील बोर्ह,फ्रंक ओपनहायमर  इत्यादी (ही यादी खूप मोठी आहे)यांचं योगदान मैनहट्टन प्रोजेक्टसाठी बहुमूल्य आहे.

लॉस एलामोस,न्यू मैक्सिको येथे ओपनहायमरच्या म्हणण्यानुसार शहरच वसवलं.हजारो लोक गुप्तपणे अमेरिकाच्या 'महासत्ता' होण्याची तयारीत आहेत.प्रेशर आहे जर्मनीच्या आधी अणुबाँब बनवण्याचे.तीन अणुबाँब प्लुटोनियम २३९, युरेनियम २३५ युरेनियम २३९ हे तयार झाले.

ट्रायल -ट्रिनिटीचा प्रसंग त्यावेळच्यानुसार हुबेहूब चित्रित झालाय...आधी हजार सूर्याचा प्रकाश काही मिनिटे आणि मग धडकणारा आवाज...प्रकाशाचा वेग ध्वनी पेक्षा जास्त आहे तेच शाळेत असतानाही हेच उदाहरण शिकवला होतं ना.

ओपनहायमरलाही धडकी भरते..गीतेतला श्लोक आठवतो ज्यात कृष्ण म्हणतो..


"काल: अस्मि लोकक्षयकृत्प्रविद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त:।।"

..."आता मी काळ आहे जो जगाचा नाश करणार आहे."

ओपनहायमरला भगवद्गीताने आयुष्यात समतोल राखण्यासाठी मदतच केली होती असे वाचनात आले.


जर्मनीने शरणागती पत्करली पण ओपनहायमरमधला वैज्ञानिक आपल्या  बांम्बचा प्रभाव पाहण्यासाठी उत्सुक होता? त्यालाही ठाऊकच असणार अणुबॉम्बने मोठी जीवितहानी होणार पण हिरोशिमा आणि नागासाकी घडतं ओपनहायमर अणुबॉम्बचा जनक होतो.

आणि पडद्यामागच्या लेविस स्ट्रास (रॉबर्ट जॉन डाउनी जूनियर अबबब कमाल अभिनय :)हा अध्याय १९५४ ला सुरू होतो.एका देशप्रेमीला थेट कम्युनिस्ट हेर म्हणून आरोपित केलं जाते. यात खुद्द आईन्स्टाईन त्याला हा खटला सोडून द्यायला‌ सांगतो पण ओपनहायमर आपण चूक नाही  तेव्हा लढा लढायाचा हे ठरवतो.....

शेवटचा प्रसंग दोन महान‌ शास्त्रज्ञांना समजलं आहे की जिनी आता एक नाही अनेक बनणार...जग परत पूर्वीप्रमाणे नसणार...चेन रियाक्शन सुरू झाली आहे....


-भक्ती