Wednesday, August 13, 2025

#गीतारहस्य -प्रकरण८ विश्वाची उभारणी व संहारणी

 #गीतारहस्य 

#प्रकरण८ वे

( पान क्र. १०२-११८)

#विश्वाची_उभारणी_व_संहारणी


**विश्वाची उभारणी व संहारणी

सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.


प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे. पुरुषाचा व तिचा संयोग झाला म्हणजे तिची टांकसाळे सुरू होते आणि प्रकृतीची मूळची साम्यावस्था मोडून तिच्या गुणांचा विस्तार होऊ लागतो असे सांख्यांचे म्हणणे आहे. उलटप‌क्षी वेदसंहितेत, उपनिषदांत स्मृती ग्रंथांत व प्रकृति मूळ न मानिता परब्रम्ह मूळ मानून त्यापासून 'हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकः आसीत् 'प्रथम हिरण्यगमे (ऋ१०.१२१.१) आणि या हिरण्यगर्भापासून किंवा सत्यापासून सर्व सृष्टि झाली (ऋ. १०.७२, १०.१९०) किंवा प्रथम पाणी उत्पन्न होऊन  ऋ. १०.८२.६ ( त्यापासून सृष्टि त्यांत ब्रम्हदेव, ब्रम्ह‌देवापासून सर्व जग किंवा तोच ब्रम्हदेव अर्ध्या भागाने स्त्री झाला होता. अगर पाणी उत्पन्न होण्यापूर्वी पुरुष होता (कठ ४.६.) अगर ब्रम्हा-पासून प्रथम तेज, पाणी, व पृथ्वी (अन्न) ही तीनच तत्वे होऊन टंग मिश्रणाने पदार्थ झाले.


तथापि आत्मरूपी मूळ ब्रम्हापासूनच आकाशादिक्रमाने पंचमहाभूते निघाली (तै.उ. २.१.) हे अबेर वेदांतसूत्रात ठरविले.

वेदान्ती प्रकृति स्वतंत्र मानीत नसले तरी एकदा शु‌द्ध ब्रम्हातच मायात्मक प्रकृति, हा विकार दिसू लागल्यावर पुढील सृष्ट्युत्पत्तिक्रमासंबंधाने त्यांची आणि सांख्यांची अखेर एकवाक्यता झालेली होती, हे यावरून दिसून येते.


#सृष्ट्युत्पत्तिक्रमाची जुळणी


१.प्रकृतीची कळी उमलण्याच्या क्रमाबद्‌दल #गुणोत्कर्ष किंवा 'गुणपरिणामवाद' असे म्हणतात.


२.अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढे व्यक्त सृष्टि निर्माण करणाऱ्याचा निश्चय करीत असते, निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणे हे बुद्‌धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतीत #व्यवसायत्मिक बु‌द्धी हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असे सांख्यांनी ठरविले आहे.


३.मनुष्याला एखादे कृत्य करण्याची बु‌द्धी प्रथम होते, त्याचप्रमाणे प्रकृतिलाही आपला पसारा करण्याची बु‌द्धी प्रथम व्हावी लागते. या गुणास पाहिजे तर अचेतन / अस्वयंवेद्य म्हणजे स्वतः स न कळणारी बुद्‌धी म्हणा. (आधिभौतिक उदा. गुरुत्वाकर्षण / लोहचुंबकाचे आकर्षण).


४ प्रकृतित उत्पन्न होणारा बुद्‌धी हा गुण, सत्व, रज आणि तम या मिश्रणाचा असला तरी, त्यातील प्रत्येकाचे प्रमाण अनंत रीतींनीं भिन्न होत असल्यामुळे, या तिघांच्या प्रत्येकी अनंत भिन्न प्रमाणांनी झालेले बु‌द्धीचे प्रकारहि त्रिघात अनंत होऊ शकतात. हे सर्व इंद्रियगोचर असल्यान व्यक्त तत्त्व मानले जातात.


५.पण प्रकृति अजूनही एकजिनसी असते, तो मोडून बहूजिनसीपणा उत्पन्न होतो, यासच 'पृथकत्व म्हणतात

६.बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.

मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात.


१ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि

२.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि


** इंद्रिय याचा अर्थ इंद्रियवान प्राण्यांच्या इंद्रियांच्या शक्ती

 #सेंद्रिय प्राण्यांचा जड देह होतो. म्हणून फक्त इंद्रियांचा देहाचा समावेश जड म्हणजे निरिंद्रय सृष्टींत सांख्यांत सेंद्रिय सृष्टी म्हणजे देह विचार केला आहे. व आत्मा सोडून फक्त इंद्रियांचा विचार केला आहे.


अहंकार (एकूण १६ गुणोत्कर्ष)


#सत्त्वगुणोत्कर्ष

पाच इंद्रिये

पाच कर्मेंद्रिये व मन

(एकूण अकरा इंद्रिये)

#तमोगुणोत्कर्ष

निरिंद्रिय सृष्टी

पाच तन्मात्रद्रव्ये


९ तन्मात्रे - शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची जिस तन्मात्रे, मिसळ न होता प्रत्येक गुणाची निरनिराळी अतिसूक्ष्म मूलस्वरुपे ही निरिंद्रिय सृष्टीची मूलतत्वे आहेत.

१०.या पंचतन्मात्रद्रव्यांपासून क्रमाक्रमाने स्थूल पंचमहाभूतें (यांस 'विशेष' असेहि नांव आहे) व स्थूल निरिंद्रिय पदार्थ होऊ लागतात, या पदार्थांचा यथासंभव अकरा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग होऊन सेंद्रिय सृष्टि बनले, असे सांख्यांनी ठरविले आहे.


#स्थूलपंचमहाभूते व #पुरुष धरून याप्रमाणे एकंदर २५ तत्त्वे होतात. हे मूल प्रकृतिचेच विकार होत

त्यांतही विकार सूक्ष्मतन्मात्र व पाच स्थूल महाभूते हे द्रव्यात्मक असून बुद्धि, अहंकार गुण आहेत, ही असा भेद आहे. तेवीस व इंद्रिये या केवळ शक्ति किंवा तत्त्वे व्यक्त तर मूळ प्रकृति अव्यक्त


#ब्रम्हवृक्ष किंवा ब्रम्हवन [ ममा. अश्व ३५. २०-२३ व ४७.१२-१५] पान. नं १०८-१०९.

माह (मा, अश्व. २५. २०-२३ व ४७. १२-१५), 

अव्यक्तबीजप्रभवो बुद्धिस्कन्धमयो महान् ।

महाहंकारविटपः इन्द्रियान्तरकोटरः ।।

महाभूतविशाखश्च विशेषप्रतिशाखवान् ।


सदापर्णः सदापुष्पः शुभाशुभफलोदयः ।।


आजीव्यः सर्वभूतानां ब्रह्मवृक्षः सनातनः ।


एनं छित्वा च भित्त्वा च तत्त्वज्ञानासिना बुधः ।।


हित्त्वा सङ्गमयान् पाशान् मृत्युजन्मजरोदयान् ।


निर्ममो निरहंकारो मुच्यते नात्र संशयः ।।



"अव्यक्त (प्रकृति) हें ज्याचें बीं, बुद्धि (महान्) हें ज्याचें खोड, अहंकार हा ज्याचा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रियें हीं ज्याच्या आंतल्या ढोल्या, (सूक्ष्म) महाभूतें (पंचतन्मात्रे) या ज्याच्या मोठ्या शाखा, आणि विशेष म्हणजे स्थूल महाभूतें या ज्याच्या आडशाखा किंवा डहाळ्या, असा हा नेहमीं पानें, फुलें व शुभाशुभ फळें धारण करणारा, सर्व प्राणिमात्रांना

आधारभूत, पुरातन मोठा ब्रह्मवृक्ष आहे. याला तत्त्वज्ञानरूप तरवारीनें छेदून व त्याचे तुकडे तुकडे करून ज्ञानी पुरुषानें जन्म, जरा व मृत्यु उत्पन्न करणारे संगमय पाश तोडावे, आणि ममत्वबुद्धि व अहंकार यांचा त्याग करावा, म्हणजे तो निःसंशय मुक्त होतो." सारांश, हा ब्रह्मवृक्ष म्हणजेच 'संसृतीचा पिंगा' किंवा प्रकृतीचा अगर मायेचा 'पसारा' होय. याला 'वृक्ष' म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन म्हणजे ऋग्वेदापर्यंत पोंचलेली असून, उपनिषदांतून यासच 'सनातन अश्वत्थवृक्ष असें म्हटलें आहे (कठ. ६. १). परंतु तेथे म्हणजे वेदांत या वृक्षाचे मूळ (परब्रह्म) वर आणि शाखा (दृश्यसृष्टीचा पसारा) खालीं एवढेच वर्णन केलेलें असतें. हैं वैदिक वर्णन आणि सांख्यांचीं तत्त्वें यांची जोड घालून गीतेंतील अश्वत्थवृक्षाचे वर्णन बनविलें आहे. हैं गीता १५.१ व २ या श्लोकांवरील आमच्या टीकेंत स्पष्ट करून दाखविलें आहे.


वर वृक्षरूपानें दिलेल्या पंचवीस तत्त्वांचेंच सांख्य आणि वेदान्ती निरनिराळ्या प्रकारें वर्गीकरण करीत असल्यामुळे, या वर्गीकरणाबद्दलचीहि थोडी माहिती येथें सांगितली पाहिजे. सांख्य असें म्हणतात कीं, या पंचवीस तत्त्वांचे मूलप्रकृति, प्रकृतिविकृति, विकृति आणि न-प्रकृति-न-विकृति, असे चार वर्ग होतात. (१) प्रकृतितत्त्व दुसऱ्या कोणापासून झालेलें नाहीं म्हणून त्यास मूलप्रकृति हैं नांव प्राप्त होतें. (२) ही मूलप्रकृति सोडून दुसऱ्या पायरीवर आलें म्हणजे महान् हें तत्त्व लागतें. महान् प्रकृतीपासून निघाला म्हणून तो 'प्रकृतीची विकृति किंवा विकार' आहे; व पुढें अहंकार या महान् तत्त्वापासून निघाला म्हणून महान् या अहंकाराचें प्रकृति किंवा मूळ आहे. एतावता महान् किंवा बुद्धि हा गुण एका बाजूनें अहंकाराची प्रकृति किंवा मूळ होतो; आणि दुसऱ्या बाजूनें मूळ प्रकृतीची विकृति म्हणजे विकार होतो. म्हणून सांख्यांनीं त्यास 'प्रकृति-विकृति' या वर्गात घातले आहे; व याच न्यायानें अहंकार व पंचतन्मात्रे यांचा समावेशहि 'प्रकृति-विकृति' या वर्गांतच करण्यांत येतो. जें तत्त्व अगर गुण स्वतः दुसऱ्यापासून निघालेलें (विकृति) असून पुढे आपणच दुसऱ्या तत्त्वांचें मूलभूत (प्रकृति) होतें त्यास 'प्रकृति-विकृति' असें म्हणतात. महान्, अहंकार व पंचतन्मात्रे हीं सात तत्त्वें अशा प्रकारचीं आहेत. (३) पण पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, मन आणि स्थूल पंचमहाभूतें या सोळा तत्त्वांपासून पुढे दुसरी कोणतींहि तत्त्वें निघालेलीं नाहींत. उलट तींच दुसऱ्यापासून निघालीं आहेत. म्हणून या सोळा तत्त्वांस 'प्रकृति-विकृति' असें न म्हणतां नुसतें 'विकृति' किंवा 'विकार' असें म्हणतात. (४) पुरुष प्रकृति नाहीं व विकृतीहि नाहीं, तो स्वतंत्र व उदासीन द्रष्टा आहे.


११.मूलप्रकृतिरविकृतिः महादादयाः प्रकृतिविकृतयः सप्त । षोडषकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः ।।

" मूळ प्रकृति ही अविकृति म्हणजे कशाचाच विकार नाही. महदादि साल, महत्, अहंकार व पंचतन्मात्र या प्रकृति विकृति होत. आणि मनासकट अकरा इंद्रिये व स्थूल पंचमहाभूतें मिळून सोळा तत्त्वांस नुसत्या विकृति किंवा विकार असे म्हणतात. पुरुष प्रकृति नाही आणि विकृति नाही. (सां.का.३)


१२.पण वेदांतशास्त्रात प्रकृति स्वतंत्र न मानता परमेश्वरापासून पुरुष व प्रकृति निर्माण होतात हा सि‌द्धांत आहे. त्यामुळे प्रकृति- विकृती या सांख्यभेद शिल्लक राहत नाही. ती परमेश्वरापासून उत्पन्न झाली असून ती प्रकृति-विकृतिच्या वर्गात येते.

वर्गात येते


१३.एका बाजूस जीव व दुसऱ्या बाजूस ८ प्रकारची प्रकृति निर्माण झाली. म्हणजे वेदान्त्यांनुसार पंचवीस तत्त्वापैकी सोळा तत्त्वे सोडून देऊन बाकी राहिलेल्या नऊ तत्त्वांचे जीव' व "अष्धा प्रकृति' हे दोनच प्रकार आहेत.


१४.गीतेत पुरुष' याला जीव म्हटले आहे, जी ईश्वराची 'परा प्रकृति - श्रेष्ठ रुप' आहे तर मूळप्रकृति गीतेत 'अपर' म्हणजे कनिष्ठ स्वरूप मानली जाते. (गी. ७.४५.)


# पंचीकरण - पाच महाभूतांपैकी प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणाने नवा पदार्थ तयार होणे.


# पंचमहाभूते यांच्या उत्पत्तीचा क्रम तैतिरीयोपनिषदांत असा दिला आहे.


"आत्मनः आकाशः संमूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्नि। अग्नेरापः ।


अद्‌भ्यः पृखिवी । पृथिव्या ओषधयः । इ"


आणि पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर.


'पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः"


१५.परंतू श्वेताश्वतरोपनिषद, छांदोग्योपनिषादांत पंचतत्त्वां ऐवजी तेज, आप व अन्न (पृथ्वी) ही तीनच मूलतत्वे त्रिवृत्कारणाने सृष्टी निर्माण झाली असे कोन आहे.


परंतू तैत्तरीय (२.१), प्रश्न (४.८), बृहदारण्यक ८४.४.५ वगैरे दुसया उपनिषदांतून, श्वेताश्वेतर (२०१२) वेदांत सूत्रर (२.३१-४) व शेवटी गीता (७.४, १३.५) यातही तिहींत ऐवजी पाच महाभूते सांगितली आहेत. गर्भोपिनिषदांत 'पंचात्मक' आहे असे आरंभीच म्हटले आहे.


#सचेतन तत्व-#पुरुष'


१..मूळ प्रकृतीपासून निघालेल्या पृथिव्यादि स्थूल पंचमहाभूतांम सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाला म्हणजे शरीर तयार होते पण ते सेंद्रिय तरीही जडच असते. या इंद्रियांना प्रेरणा करणारे तत्त्व जड प्रकृतिहून निराळे असून त्यास पुरुष म्हणतात.


२.हा पुरुष अकर्ता असून त्याचा प्रकृतीशी संयोग झाला म्हणजे सजीव सृष्टीस सुरुवात होते, व 'मी निराळा व प्रकृति निराळी हे ज्ञान झाल्यावर पुरुषाचा प्रकृतिशी झालेला संयोग लुटून तो मुक्त होतो.


#ज्ञानाखेरीज जो मनुष्य मरतो त्याच्या आत्मा प्रकृतीच्या चक्रांतून अजीबात सुटत नाही हे उघड आहे."


म्हणजेच ज्ञान नसतो प्राणी मेला तर मरतेवेळी त्याच्या आत्म्याबरोबर प्रकृतीच्या १८ तत्त्वांचे हे लिंगशरीर पंचमहाभूततत्त्वे) देहातून बाहेर पडते आणि ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्या पुरुषास नवे नवे जन्म घेण्यास लावीत असते.

(पान ११४)

३.पंचमहाभूते संपल्यावर इतर १३ तत्त्वे पंचतन्मात्रांसह राहते. पुढे वेदांतात कर्माकर्मानुसार तर सांख्यात सत्त्व, रज, तम गुणानुसार या लिंगशरीराला निवृत्ती अथवा देवयोनी (सत्व अधि मनुष्ययोनी (रज अधिक) तिर्थक्‌योनी (तमगुण अधिक] येथे जन्म प्राप्त होतो.


#संहार 

सांख्यशास्त्रानुसार मूळ अव्यक्त प्रकृतीपासून किंवा वेदांतानुसार मूळ सद्रूपी परब्रम्हापासून सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव व्यक्त पदार्थ क्रमाक्रमाने निर्माण झाल्यावर सृष्टीच्या संहाराची वेळ आली म्हणजे उभारणीचा वर जी गुणपरिणामक्रम सांगितला त्याच्या उलट क्रमाने सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्त प्रकृतीत किंवा मून ब्रम्हांत लय पावतात असा सांख्य व वेदांत या दोन्हीं शास्त्रांचा सिद्‌धांत आहे.


पुढे श्रुतिस्मृतिपुराणांत ब्रम्हदेवांपासून / हिरण्य गर्भापासून / शैव / वैष्णव निमित्तकारणापासून सृष्टी कशी निर्माण झाली हे वर्णिले आहे.


भगवद्‌गीतेंतहि "मम योनिमहत ब्रम्ह" (गी. १४.३)असे त्रिगुणात्मक प्रकृतीलाच ब्रम्ह नाव देऊन या बीजापासून प्रकृतीच्या त्रिगुणाने अनेक मूर्ति झाल्या हे सांगितले.


तर (गी.१.६) मध्ये ब्रम्हदेवापासून सात मानसपुत्रांची उत्पत्ती व पुढे चराचर सृष्टी निर्मिती झाली आहे.


परंतू भागवतातील  संकर्षण, प्रद्युमन्न, अनिरुद्‌ध यांचा सृष्टीरचनेचा उल्लेख गीतेत कोठेही नाही. हा भागवत आणि गीता भेद पुन्हा दर्शित करतो.

-लोकमान्य टिळक 

Tuesday, July 29, 2025

नागपंचमी निमित्ताने


नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे.


उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते.

या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग? सर्वांनाच ठाऊक आहे "विष" या हत्याराचा साप मोठा स्वामी आहे, ज्यामुळेच आपण याला खुप घाबरतो.

या विष ग्रंथी सापाला जनुकीय बदलांमुळे मिळाल्या.मानवाच्या तोंडांत लाळ अन्न पचवण्यासाठी लाळ स्त्रवते, पण सापाच्या तोंडांत विष स्त्रवणारी ग्रंथी जनुकीय उत्क्रांतीची,Gene duplication ची भेट ठरवली.





जर आपल्याकडे एकाच युनिफॉर्मचे दोन जोड असेल तर आपण बिनधास्त राहतो.तसेच सापाकडे एकाच जनुकाचे चक्क दोन जोड(set) जीन‌ डुप्लीकेशनने तयार होतात.आता या जास्तीच्या जीन सेटपासून मग अमृत बनवावे ना,तर नाही साप भावाने विष बनवलं 😀 जितकं जहाल विष तो या उत्क्रांतीच्या काळात बनवत गेला तितकं जास्त त्याचा वंश या survival of the fittest या घमासानात पुढे जायची शक्यता वाढली.

तर होत काय ..

जिथे सुरुवातीला इतर शारीरिक कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांना विषाच्या घटकांमध्ये रूपांतरित केले गेले. यामध्ये लाळ, स्वादुपिंड आणि अगदी रोगप्रतिकारक प्रथिने यासारख्या विविध स्त्रोतांमधून जनुकांची भरती समाविष्ट होती. या भरती केलेल्या जनुकांमध्ये नंतर उत्परिवर्तन झाले आणि ते विष ग्रंथींमध्ये व्यक्त झाले, शिकारवर विशिष्ट परिणाम करणारे विविध विषांमध्ये विकसित झाले.

बरंय माणसात Gene duplication नाही,नाहीतर सगळीकडे विषकन्या,विषकुमार दिसले असते😀तर मग उंदिर,ससा तर मोठा प्राणी खात साप मस्त जगत होता.

मग माणसाची उत्क्रांतीही होत होती ना..

माणसाला या सर्पदंशाचे परिणाम समजले. शक्तीशाली जीवाला पूजण्याचे,श्रद्धास्थान करण्याचे मानवाची विचारशक्ती पोहचली होती.अनेक जुन्या संस्कृतीपासून सिंधू संस्कृती पर्यंत सर्प चिन्ह सापडल्याची नोंद आहे.मिनोअन संस्कृती ईसापूर्वची दोन्ही हातात साप पकडलेली मूर्ती सापडली आहे.



या हजारोंवर्षांपुर्वीच्या संस्कृतीत प्रजनन हे मुख्य सूत्र मानले जाई.त्यानुसार श्रद्धा विकसित होत.

सापाच्या शरीररचनेमुळे तो पुरुष प्रजनानचे रूप मानले गेले.भूमीवरील सापाचे वारूळ हे योनीरूप मानले गेले.वारूळ-स्थ नाग हा पुरुषत्तत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतीक आहे,हे संशोधन रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.



पुढे अमूर्त श्रद्धांनी मूर्त घेतल्यावर याची मूर्ती रूपात पुजा होत गेली.लज्जा गौरी हे अनावृत्त शिल्प स्त्री प्रजनन शक्ती रूप दाखविताना तिच्या हातात पुरुषतत्व सर्प अंकन दिसते.


वैदिक काळात नागाचे स्तुती श्लोक आहेत.

पुराणात तर समुद्रमंथन,शेषनाग असा बलाढ्य नाग दाखवला गेला.

पुढे शेती संस्कृती बहरत गेली.उंदिरांना खाणाऱ्या सापाचा माणूस कृतज्ञ तर होताच पण शेतात काम करताना दंश नको म्हणून सापाला,वारूळाला पूजा होत राहिली.

पण त्यात लाह्या दुधाची अंधश्रद्धा कधी आली कोणास ठाऊक?

बरं मग आज पंचमीला ते पुरणाचे उकडलेले दिंड करायचं असतात हे माझ्या सारख्या सुगरणींना काम असतें.



-भक्ती

Monday, July 21, 2025

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ -पुस्तक परिचय

गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत.

हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे . 



मागे केलेल्या चर्चनुसार अनेकांना हि कादंबरी १००-२०० पानानानंतरच रटाळ वा वाचावी अशी वाटली नाही. मी छापील पुस्तक वाचायला घेतले असता माझीही तीच अवस्था झाली असती कारण कादंबरीच्या शीर्षकामुळे माझ्यासारखे अनेक वाचक याकडे आकृष्ट झाले आहेत यात मुळीच   दुमत नाही. परंतु शीर्षकानुसार हि कादंबरी पहिल्या भागात  अजिबात  मनाला भिडत नाही. मग शीर्षकाचे ओझे व आपल्या अपेक्षा बाजूला सारत ,खंडेराव याची कहाणी म्हणून वाचताना कादंबरीची मुळे समजायला लागतात . 

कादंबरीच्या सुरुवातीला भारत -पाकिस्तान सिंधू संस्कृती यांच्या पासून सुरुवात होते.स्वातंत्र्याचा लढा त्याचा अर्थ यांची संक्षिप्त विविध कथांद्वारे उहापोह दिसते. नंतर खंडेरावच्या आयुष्यात आई वडील,भाऊ,बहिणी ,आत्या ,काकू .काका यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुकडा कादंबरीत त्याच्या लाहानपणासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत जोडला जातो. तसेच ग्रामीण जीवनातील आजूबाजूचे विविध जातीपातीतील लोकांचे जीवन त्यातील दु:ख आनंदाचे प्रसंगही  त्याचा आयुष्याशी जोडून एक रंगेबेरंगी उबदार गोधडीच तयार होते.पण असे हे ग्रामीण जीवन ,रोजच्या जीवनातील प्रसंग कधीच उजेडात आले नाही .केवळ अभिजात संशोधन कथाच  प्रकाशित होतात .आणि मग अशा अनेक ग्रामीण कथा एक अडगळ होतात पण त्याही समृद्ध आहेतच ना म्हणून या हिंदू भूमीवरच्या ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे वाटून गेले 

असा खंडेराव ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ,संशोधनासाठी शहरात गेल्यावर ग्रामीण मुळांपासून दूर होत जात असतानाच वडिलांच्या अखेरच्या काळात त्याला एकाच मुलगा या नात्याने पुन्हा मागे फिरावे लागतेच ,तेव्हा पुन्हा  एकदा जगण्याच्या बदलेल्या व्याख्या अनेक छोट्या छोट्या संभाषणातून रेखाटल्या आहेत. 

या कादंबरीची अस्सल ग्रामीण कथा साहित्याच्या दृष्टीने नक्कीच वाहवा करायला पाहिजे.अशा खिळवून ठेवणाऱ्या खुसखुशीत पद्धतीने कथा समोर रेखाटल्या आहेत. कादंबरीच्या शेवटी घरात  खंडेराव एकटाच पुरुष ,तेव्हाही आणि संपूर्ण कादंबरीतही बाईचे सोशिक जीवन ,गौण स्थान याविषयी अनेकदा स्पष्टपणे नावड दाखवलीच आहे ,हि अजून एक जमेची बाजू वाटते. 

कांदबरीत शिव्यांची लाखोटी भरभरून आहे.आपण तरीही कादंबरीचा गाभा दूषित न करता वेगच वाढवतात . 

खूप दिवसांनी ग्रामीण जीवनावरची काठावरची कादंबरी न वाटता खोल डोहात नेणारी कादंबरी वाचाल्याची करमणूक नक्कीच झाली." वंशवृक्षाच्या पारंब्या " हा कादंबरीचा पुढचा भाग असणार आहे व तसेच हि कादंबरी एकूण चार भागांची असणार आहे असे वाचनात आले आहे. 

-भक्ती

Wednesday, July 16, 2025

निसर्गायण-पुस्तक परिचय

 निसर्गायण

#लेखक #दिलीपकुलकर्णी.



जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे.

हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो. आधुनिक माणसाला तंत्रज्ञानाचा जिनी प्राप्त झाला, आणि तो हे चक्र सोडून एकरेषीय असंतुलित, विषमतापूर्ण प्रगतीला भुलला आहे. या सगळ्यांवर मात करत संतुलन प्राप्त करण्यासाठी  स्वतःच्या मनोवृत्तीवर काम करायला पाहिजे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात मनोवृत्ती  स्थिर करणाऱ्या विविध पाश्चात्य आणि भारतीय वैचारिक पद्‌धतींचा उहापोह केला आहे. निसर्गाला जाणून तद् रुप त्यासह एकात्म स्थापन करायला हवे. वस्तुनिष्ठता ते व्यक्तीसापेक्षता याचा विचार केला आहे. निसर्गाशी आनंदाचे नवं नात कसं स्थापन करायचे हे सांगितले आहे. दुसऱ्या भागात अन्न, आरोग्य ऊर्जा या प्राथमिक गरजा  पूर्ण  करताना शस्त्रस्पर्धा,व्यसने,शोषण इत्यादी विकृतीकडे न झुकता सुसंस्कृत होण्याची मानवी  नैसर्गिक उर्मी कशी असते ,जपावी कशी हे  सांगितले आहे.


***

हे पुस्तक वाचताना असेच एक चिंतन सुचले..


वस्तुनिष्ठ विचारांपासून, चालीरीती, परंपरा, उपाय योजना, उपचार यापासून आज व्यक्तीनिष्ठ व्यक्ती सापेक्ष पद्‌धतीचा सर्वत्र वापर होत आहे. अगदी  न्यूटनचा नियमांनाही वस्तुनिष्ठ आईनस्टाईनच्या सापेक्षवादी नियम/थेअरीने मोडीत काढले. उपचार पद्‌धतीत तर आमुलाग्र बदल होत आहे.आता customized diagnosis report आधी अभ्यासले जातात. अगदी थेट DNA based profile वापरून nutriogenomic DNA based customized diet ही दिले जाते. माणसाच्या मनातल्या विचारांची सुसुत्र‌ता आधी केवळ छापील मोजक्यांचीच होती. आता म्हणजे गेल्या १५ वर्षापासून ती स्वतंत्रपणे प्रत्येकाने मांडायची सोय सोशल मिडियाने केली .आता AI तर वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे सतत व्यक्तीबरोबर आहे.तेही चकटफू!! वर्गात शिकवलेले समजत नाही तर पसर्नल क्लासेसही आहेतच. customized कपडे,दागिने, घर सजावट सारे काही आहेच. यातून फक्त काही ठिकाणी गोंधळ कमी होण्याऐवजी तो वाढल्याचे दिसते.जसे सोशल ‌मिडियावर या व्यक्ती निष्ठतेने बिभत्सरूप अतातायी विचार, व्हिडिओ, भाषण, हिंसक प्रचार रूपात दिसतो. customized वस्तूंच्या नावाखाली प्रचंड लूट व्यक्तींची होत आहेच.


खरं पाहता व्यक्तीनिष्ठता ही देगणी गोंधळ (Universal randomness) न वाढवता काही एकात्मिक पुन्हा  घडवण्यासाठी हवा. जसा योग्य custemized diet, उपचारांनी व्यक्ती मग समाज आरोग्यदायी होईल. customized वस्तू बनवण्यासाठी स्वतःच्या सृजनाचा वापर करून मार्केटचा बळी न होता, योग्य माफक दृष्टिकोन हवा.

-शिक्षण‌क्षेत्रात प्रत्येक मुलाला मदत करण्याची वृत्ती' भविष्य या लहान मुलांचे आयुष्य आणि आपले भविष्य सुंदर करेल.एकमेका साहाय्य करु असे धोरण घेत नैतिकता पाळून प्रत्येक गोष्टीचा वापर हवा. AIचा वापर वैश्विक ज्ञानाच्या साहाय्यानेज्ञानी होण्यास व्हायला हवा.


या सगळ्या वस्तुनिष्ठ कडून व्यक्तीनिष्ठते कडून -- एकात्मिता धोरण --वैश्विक  सुजाणता येण्यासाठी भोगवादी, ओरबडण्याची (ग्राहक-मालक दोन्ही दृष्टीने) संपुष्टात यायला हवी.

-भक्ती

Wednesday, July 2, 2025

स्वार्थी फुलांचा परमार्थ

 हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे  निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना  म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,

ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!

पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला  प्रश्न पडलेला.पारिजात फुलांच्या टप टप वर्षावात भिजलेल्या‌ पहाटेची मौज कधी संपूच नये वाटतं.बकुळीच्या फुलांनी गंधाळलेली ओंजळ कधी रीती व्हावी असं वाटतच नाही.मोगऱ्याचं फुलणं क्षणाक्षणाने इवल्या पाकळ्यांचे वाढणारं टपोरं सौंदर्य केसांत दिवसभर रेंगाळून माळून घ्यावंच वाटतं.कन्हेरीचा पिवळा साज डोळे दिपून टाकणारा ,सर्वत्र संचार करतो.

अशा वेचलेल्या फुलांना सूत्रात बांधयची ,हार ,गजरे करायची कल्पना सृष्टीच्या आदिमापासून माणसाची सौंदर्य कल्पना जागृत झाल्याची पहिलीच खुण असणार!तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत पुरातन ते आजतायगत बेधुंद प्रेमवीरांचे प्रेम बंधन साकार होत आले.

माणसानेच घडवलेल्या मूर्तीला मग श्रद्धेचे प्रतिक म्हणून याचे हार श्रद्धाभावानेच एक एक फूल ईश्वर नावाने ओवले जाऊ लागले.त्या सूत्राला केशरी,हिरवट,जांभळट,लाल असा देठांचा फुलांचा रंग चढतोच पण बोटांची टोकही या रंगात बुडतात .

तयार झालेल्या मालेचा गंध त्या मूर्तीच्या सर्वांगाला भिणला की अरुपाचे स्वरुप भक्तांच्या दिठी उजळून निघत राहिले..राहत आहे.

-भक्ती



(ता.क.- आधी हिंदू कादंबरी ऐकताना जड जात होती.पण आता अतुल पेठे यांचे अभिवाचन, कांदबरीत असे कुठून कुठून अचानक येणारे संदर्भ एका कथेचा कोलाजच होते.हे लिहितांना त्याचा प्रभाव घडून हे लिहिलेय हे जरा जाणवतंय )