Wednesday, July 2, 2025

स्वार्थी फुलांचा परमार्थ

 हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे  निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना  म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,

ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!

पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला  प्रश्न पडलेला.पारिजात फुलांच्या टप टप वर्षावात भिजलेल्या‌ पहाटेची मौज कधी संपूच नये वाटतं.बकुळीच्या फुलांनी गंधाळलेली ओंजळ कधी रीती व्हावी असं वाटतच नाही.मोगऱ्याचं फुलणं क्षणाक्षणाने इवल्या पाकळ्यांचे वाढणारं टपोरं सौंदर्य केसांत दिवसभर रेंगाळून माळून घ्यावंच वाटतं.कन्हेरीचा पिवळा साज डोळे दिपून टाकणारा ,सर्वत्र संचार करतो.

अशा वेचलेल्या फुलांना सूत्रात बांधयची ,हार ,गजरे करायची कल्पना सृष्टीच्या आदिमापासून माणसाची सौंदर्य कल्पना जागृत झाल्याची पहिलीच खुण असणार!तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत पुरातन ते आजतायगत बेधुंद प्रेमवीरांचे प्रेम बंधन साकार होत आले.

माणसानेच घडवलेल्या मूर्तीला मग श्रद्धेचे प्रतिक म्हणून याचे हार श्रद्धाभावानेच एक एक फूल ईश्वर नावाने ओवले जाऊ लागले.त्या सूत्राला केशरी,हिरवट,जांभळट,लाल असा देठांचा फुलांचा रंग चढतोच पण बोटांची टोकही या रंगात बुडतात .

तयार झालेल्या मालेचा गंध त्या मूर्तीच्या सर्वांगाला भिणला की अरुपाचे स्वरुप भक्तांच्या दिठी उजळून निघत राहिले..राहत आहे.

-भक्ती



(ता.क.- आधी हिंदू कादंबरी ऐकताना जड जात होती.पण आता अतुल पेठे यांचे अभिवाचन, कांदबरीत असे कुठून कुठून अचानक येणारे संदर्भ एका कथेचा कोलाजच होते.हे लिहितांना त्याचा प्रभाव घडून हे लिहिलेय हे जरा जाणवतंय )

No comments: