Friday, May 13, 2022

मेथांबा

 


मेथांबा

कैरी म्हणजे माझ पाहिलं प्रेमच आहे .लहानपणी अशा तिखट मीठ लावून कैरी खायचे की समोर बघणाऱ्याचेच दात आंबायाचे.आता तर कलमी आंब्याच्या कैऱ्या अजिबात आंबट नसतात तेव्हा छान आंबट गोड लागतात.अगदी दुकानदार सुट्ट्या पैशांऐवजी  कच्चा आंब चोकलेट(गोळी) द्यायचा ती पण मलाच दिली जायची ;)

 कैरीच लोणचे घातलं की आई बरणी लपवून ठेवायची ,नाहीतर कधी फडशा पडेल सांगता येत नसे.सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही पण माझ्यासाठे एक बरणी राखीव असते .

साखर आंबा ,गुळांबा एवढा नाही आवडत.पण आता दिवेकरबाई डायटवाल्या यांनी सांगितल्या प्रमाणे गोड खाण्याची इच्छा झाल्यास गुळांबा हा सर्वात योग्य पर्याय आहे,कारण गुळाचे लोह तत्व शरीरास मिळते.

कैरी किसून ,फोडी करून झटपट लोणची करता येतात.त्यातलाच मेथांबा हा एक सुंदर झटपट होणारा प्रकार आहे.

हा मेथांबा कैरीची साल काढून फोडणी देऊन करतात.पण मला जास्त उकडलेल्या कैरीचा आवडतो.फायदा असा कि पन्ह करण्यासाठी कैरी उकडून ठेवल्यावर दोन एक कैऱ्यावापरून कधीही मेथांबा करता येतो.मेथ्या ह्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.तशाही मेथ्या कमीच खाल्या जातात.

आंबट गोड आणि त्यात मेथ्यांचाचा किंचित वेगळा स्वाद बराच काळ जिभेवर रेंगाळत राहतो.


साहित्य:

दोन उकडलेल्या कैरी

१ कप गुळ

१ चमचा मेथ्या

१ चमचे जिरे

१/२ चमचा मोहरी

१/२ चमचा हळद आणि हिंग

फोडणीसाठी तेल

तिखट मीठ आवडीनुसार –मेथांबा हा प्रकार तिखट अधिक छान लागतो.

उगाच कांदा,लसूण हे प्रकार कैरी बरोबर अजिबात आवडतं नाही.कैरीच्या स्वादाचा स्वत:चाच एक तोरा असतो J

कृती

उकडेल्या कैरीचा गर काढावा.सुरीने त्याचे तुकडे करावे.गर smash करू नये.फोडणीसाठी कढईत तेल घ्यावे .तेल गरम झाल्यावर जिरे ,मोहरी, हळद,हिंग घालावे.या सगळ्यांनी तडमताशा करत हळद लावून हिंगाचा अत्तर उधळल की मेथ्या त्यात टाकाव्यात gas मंद करावा.मेथ्या जळू नये याची काळजी घ्यावी.

आता उकडलेल्या  कैरीच्या फोडी त्यात टाकाव्यात.एक वाफ येऊ द्यावी.आता त्यात किसलेला गुळ घालावा .गुळ जसा हळू हळू एक जीव होता आणि पदार्थाचा रंग बदलू लागतो ते मोहक वाटत.आवडीनुसार तिखट टाकावे.मीठ टाकावे.

पुन्हा एक चांगली वाफ येऊ द्यावी,कैऱ्या उकडलेल्या असल्यामुळे अगदी कमी वेळ वाफ द्यावी.पाण्याची तर अजिबात गरज नाही.बरेच दिवस हा तयार मेथांबा बरणीत टिकवता येतो.तो जसा मुरेल तसा आणखीनच कमाल लागतो.

 

-भक्ती

Sunday, April 10, 2022

शिशिर ऋतू

 थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.

पितात सारे गोड हिवाळा
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्यार नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्याा शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कवी - बा. सी. मर्ढेकर
सौजन्य-https://kavitabhavlelya.blogspot.com/2008/05/blog-post_22.html
हिवाळ्याच इतक सुंदर काव्य !आता मुंबईतच काय कुठे इतका गोड हिवाळा दिसतो का?

वातावरण शुष्क ,पानगळीचा मोसम पुन्हा सुरु होतो.पाण्याची कमतरता झाडांना जाणवते आणि बाष्पीभवन थांबवण्यासाठी पान गळतात.ज्या झाडांची मुळे खोल गेली आहेत त्यांची पानगळ होत नाही .ज्याची पानगळ झाली आहेत त्यांवर भडक फुलांचा साज चढतो आणि परागीभवन सोपं होत.

जास्वंद
१
3
2

शासनाने घाटाघाटात लावलेले ग्लीरीसिडीया म्हणजे उंदीरमारी/गिरिपुष्पचे मोहक फुले संक्राती नंतरच्या भटकंतीत दिसून येतात.
a
2

होलीहोक
a

शमीचा बहार /फुले मी पाहिल्यांच या काळात पाहिले.

z

सूर्याची किरणे मोहक असून या काळात गोड पदार्थ विशेषतः गुळ ,तीळ याचे सेवन आवडते.
महाकवि श्रीहर्ष संस्कृत महाकाव्य ‘नैषधीयचरित काव्यात शिशिरला दान देणारा श्रेष्ठ ऋतू मानला आहे
स्वत:चे सुंदर रूप शिशिरात दान करून कमळांनी पुण्याच कमावले आहे .त्यामुळे ते दमयंतीचे नेत्र आणि त्यांच्या कळ्या चकोराचे नेत्र झाले आहेत.

  • वर्णन


a

ऋतुसंहारात कालिदासाने थंडीचा हा ऋतू स्त्रियांसाठी ,प्रेमींसाठी लाभदायक याची पाचव्या सर्गात वर्णने केली आहेत.त्याचा सुरस आस्वाद यात घेता येईल.

ऋग्वेदात पाच ऋतू मानले गेले आहेत ज्यात शिशिर ऋतूचा समावेश हेमंत ऋतूशी एकत्रित केला आहे.
या पुरातन काळापासूनच इक्षु म्हणजेच ऊस याला शिशिरातील धरणीचे आच्छादन म्हंटले आहे.आजही संक्रातीनंतर ऊसाचे रस यथेच्छ प्यायला जातो 
सणांचा विचार करता ,महाशिवरात्री,माघी चतुर्थी आणि होळी,रंगपंचमी हे येतात.नवरंगात सगळा आसमंत प्रत्येक राधा –कृष्ण रंगून जातात !उत्तर भारतात याचा विशेष आनंद असतो.

पिचवाई चित्र
3

असा हा शिशिर उत्तरायण पाहत सरून फाल्गुन सुरुवातीलाच वसंत आगमनाने नाहीसा होत जातो.

-भक्ती

Saturday, February 19, 2022

हेमंत ऋतू!

 

हेमंत ऋतू!

हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं.

थंडी ही हेमंत आणि शिशिर या ऋतूत विभागली आहे. या दोन ऋतुंमध्ये फारसा फरक करायचा तर तापमानावरून करता येईल. तरीही काही ठिकाणी याचा उल्लेख प्री-विंटर असा आहे. तापमान १० डिग्री ते २५ डिग्री असते.

ऋतूसंहार मध्ये कालिदासाने हेमंतचे वर्णन असे केले आहे

नवप्रवालोद्रमसस्यरम्यः प्रफुल्लोध्रः परिपक्वशालिः।
विलीनपद्म प्रपतत्तुषारोः हेमंतकालः समुपागता-यम्‌॥ 

बीज अंकुरित झाले आहेत .फुले लगडली आहेत.धान्य आता कापणीस योग्य आहे.परंतु कमळ कोठेही दिसत नाही त्यामुळे स्त्रिया अन्य फुलांचा वापर श्रुंगारासाठी करत आहेत.दवबिंदू पडायला लागले आहेत,पूर्व थंडीचा हा असा काळ आहे.स्त्रिया सुगंधी चंदनाचा वापर उटणे म्हणून करत आहेत.शेत आणि सरोवर पाहून मन हर्षित होत आहेत.

चरक संहिता मध्ये देखील हेमंत ऋतूला स्वास्थ्य प्रदान करणारा सांगितलं आहे.

"शीते शीतानिलस्पर्शसंरुद्घो बलिनां बलीः।
पक्ता भवति..."

गजपतिद्वयसीरपि हैमन्तस्तुहिनयत्सरितः पृषतां पतिः।

सलिलसंततिमध्वगयोषितामतनुतातनुतापकृतं दृशाम्॥

 

हिवाळ्यातील  थंड वारे,दवबिंदू ,खोलवर गोठलेलली नदी अगदी बलाढ्य हत्तीएवढी,त्यात उष्ण काही उष्ण वारे अशा वेळी जिचा पती दूरदेशी आहे तिच्या डोळ्यांतून दुख:दायी अश्रू वाहत आहेत.

कवी माघ

अवश्यायतमोनद्धा नीहारतमसा ऽवृता।

प्रुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः॥

 

हेमंत काळातील पुष्पहीन वातावरण असूनही दूरवर पसरलेले हे रान पंखांप्रमाणे भासणाऱ्या बर्फाच्या चादरीच्या अंधारात निजलेले आहे.

वाल्मिकी रामायण

हा गुलाबी थंडीचा काळ प्रेमी युगालासाठी अतीव आनंद देणारा.एकमेकांच्या मिठीत शेकोटीजवळ रात्रभर ऊब अनुभवण्याचा.यावर  ओडिसातील पट्टचित्र सुंदर हेमंत ऋतू दाखवतांना.



तसेच भारतीय टपाल खात्याने प्रसिध्द केलेले हेमंत ऋतुवरील तिकीट एक ऊबदार म्हणाव लागेल.



पण याच ऋतूमध्ये प्रवाशांची थंडीत गारठून ततपप होत असते.

सायबेरियन व इतर पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्र भिगवण ,गुजरात या ठिकाणी या काळात  स्थलांतर करतात.

गुलाब ,प्राजक्त याच काळात दवाने भिजलेली सुंदर दिसतात. 

गोल्डन शॉवर



डिसेंबर मधली स्लाईम वीड




मराठी महिन्यांनुसार मार्गशीर्ष आणि पौष महिन्यातील दत्त जयंती,श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली ती गीता जयंती येते.

सूर्याची उपासना आणि शेतात गव्हाच्या ओंब्या डुलू लागतात.कोवळी पिके पाहून सृजनाची भावना होते.बर्याचशा झाडांना आता फळ,शेंगा लगडलेल्या दिसून येतात.लवकरच ही चांगली पक्व होणार असतात.

संक्रांत ,बैसाखी,ओणम अश्या वेगवेगळ्या नावाने पिक अन्न धान्याबद्दल कृतज्ञता दाखवली जाते.तीळ-गुळाचा गोडवा आणि स्निग्धता नात्यांत उतरावा अशी कामना करून यथेच्छ सेवन केले जाते.

तीळगुळ वड्या


सुवासिनी सुगट

हेमंत ,शिशिर ऋतू साऱ्या थकलेल्या पानांना,सृष्टीला बर्फाच्या चादरीमध्ये निवांत निजायला सांगत आहे कारण त्यांना लवकरच वसंताचे स्वागत करायचे आहे.

---भक्ती


Saturday, January 22, 2022

झटपट जळगावी भरीत

 

झटपट जळगावी भरीत

पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे.

शेवटी हे एकच राहिले  होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे  करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो.

साहित्य :

१.पावशेर जळगावी वांगे

२.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली)

३.एक वाटी कच्चे शेंगादाणे

४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे

५.एक वाटी चिरलेला ओला कांदा

६.५-६ हिरव्या मिरच्या

७.७-८ लसून पाकळ्या

८..कोथिंबीर चिरलेली

९.फोडणीचे साहित्य

कृती:

१.वांग्याला तेल लावावे.सुरीने चुहू बाजूंनी टोचे मारून घ्यावेत.त्यात चार लवंगा खोचून घ्याव्यात .

२.वांगी आचेवर भाजून घ्यावेत.जळगावात धान्य काढल्यानंतरच्या उरलेल्या काड्यांवर शेतात भाजतात.

३.वांगे भाजताना बरोबर हिरव्या मिरच्याही भाजून घ्याव्यात.

४.भाजलेल्या वांग्याचे वरचे टरफल काढून टाकावे.भाजलेले वांगे वाटून/ठेचून घ्यायचे .यासाठी लाकडी खलबत्त्ता(बडगी) वापरला जातो .वा पाटा वरवंटा .यात कोणतेही धागे न राहता एकजीव  व मऊ होणे महत्वाचे.

५.हिरव्या मिरच्या व लसून एकत्र  वाटून घ्यावेत.

६.फोडणीसाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करावे .जिरे ,मोहरी.मिरची लसून वाटण टाकावे.

७.भाजलेले आणि कच्चे शेंगादाणे परतून घ्यावेत.

८.यात चिरलेला ओला कांदा परतून घ्यावा.नन्तर चिरलेली कांद्याची पात टाकून परतून घ्यावी.

९. आवडीनुसार हळद ,मीठ ,कोथिंबीर टाकावी.तिखट जास्त हवे असेलं तर तिखटही वापरू शकता.

 

१०.आता वाटलेला वांग्याचा गर यात टाकून परतून घ्यावा .१० मिनिटे वाफ येऊ द्यावी.

११.गरमा गरम जळगावी भरीत भाकरी बरोबर खायला तयार.

-भक्ती





Monday, January 10, 2022

ऐसी अक्षरे....मेळवीन-- एक होता कार्व्हर


 

एक होता कार्व्हर

लेखिका :वीणा गवाणकर

साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे  मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ  ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.

अमेरिकन गुलामगिरीच्या काळात १८६० च्या दरम्यान झाला ,आपल्या जन्माची तारीख कार्व्हरयानाही माहित नव्हती.आईवडील दोघेही गुलाम होते,मोजेस कार्व्हर यांनी त्यांना विकत घेतले होते.एका नाट्यमय अपहरणात मेरी- जॉर्ज कार्व्हरची आई कायमची नाहीशी होती. केवळ जॉर्ज वाचतो ज्याला मोजेसबाबा एका घोड्याच्या मोबदल्यात पुन्हा विकत घेतात.जॉर्ज कार्व्हर  मोजेस आणि त्यांची पत्नी सुझेन यांच्या घरातलाच छोटासा भाग होतो.काहीही न बोलणारा हा कृष्ण मुलगा मुका असेच सगळ्यांना वाटत.परंतु फुलांविषयी,पक्षांविषयी निसर्गाविषयी त्याचे ममत्व सगळ्यांना आश्चर्यचकित करते.एका जादुगाराप्रमाणे हिरमुसलेली झाडं,रोपं तो खुलवीत असे.कार्व्हर कृष्णवर्णियांना डायमंड ग्रोव्हला शिक्षणासाठी परवानगी नसते.मोजेसबाबाचे घर सोडून निओशोला पोहचतो.रात्रभर थंडीत कुडकुडत काढणाऱ्या जीवाला मारिया नावची चांगली स्त्री आसरा देते आणि त्यांचे नाव कार्व्हर बाबांचा जॉर्ज ‘जार्ज कार्व्हर’ होते.शिक्षणासाठी कार्व्हरची धडपड ,कष्ट करून पैसे कमवायचे ,प्रवेश घ्यायचा ,शिकायचे आणि पैसे संपले की पुन्हा शाळा सोडायची.नंतर तेच कष्ट,पैसे कमवा,शिका हे चक्र त्याचे चालूच राहत असे.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हायलंड विद्यापीठाने देऊ केलेला प्रवेश प्रत्यक्षात ते कृष्णवर्णीय आहे समजताच रद्द केला जातो.कार्व्हारंची शिक्षणासाठीची तगमग सिम्पसन कॉलेजमुळे पूर्ण होते परंतु आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या उद्धारासाठी कला आणि संगीतातली आवड आणि संधी सोडून कार्व्हर शेतकीमहाविद्यालयात प्रवेश घेतात.तिथेच पुढे ते प्राध्यापक महानुन्ही रुजू होतात.मायकोलॉजी आणि  वनस्पती पथोलोजीमध्ये नवनवीन संशोधन करू लागतात.अनेक दुर्मिळ वनस्पती,कीड ,बुरशी यांवर काम करत असतात.

शेकडो वर्ष गुलामगिरीतच जगलेल्या असंख्य कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळते पण त्याचा उपयोग त्यांना मुळी येत नव्हता.अशांसाठी वाशिंग्तोन यांनी  दक्षिण अमेरिका मध्ये टस्कीगी संस्थेची स्थापना केली.भांबावलेल्या कृष्णवर्णियांना स्वत:च्या पायावर उभे करायचे हा त्यांचा निर्धार होता.त्यानुसार अनेक लघुउद्योग ते शिकवतात.लक्षात येते की गुलामगिरीत शेतीत गुरांप्रमाणे राबणाऱ्या या बांधवांना शेतीचे खरे ज्ञान मिळाले पाहिजे हे वाशिंग्तोन ओळखतात.यासाठी एकच नाव त्यांच्या समोर येते जॉर्ज कार्व्हर.ते कार्व्हर्नाना निवडीचे पत्र धाडून टास्कीगीत येण्याचे आमंत्रण देतात.आणि कार्व्हरही “येत आहे “या वाक्याने काही दिवसात जुन्या प्रयोगशाळेत सर्व नीट व्यवस्था करून  तिथे पोहचतात.तिथे आपल्या बांधवांची डळमळीत अवस्था पाहून कार्व्हर  बदलाचे एक मोठे शिवधनुष्य उचलतात.

टस्कीगीतच पुढचे सारे आयुष्य ते व्यतित करतात.सकाळी चारला फिरून आल्यावर ते प्रयोगशाळेत पूर्ण व्यग्र होऊन जात.रोटेशन क्रॉप,कापसाऐवजी सोयाबीन ,भुईमुग असे जमिनीचे पोत वाढविणारे पिकांचा पर्याय ते देतात.भुईमुगाचा एक हंगाम अतिपिकामुळे आणि मागणी कमी असल्याने वाया जाणार तेव्हा कार्व्हर स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतात आणि जवळपास शेकडो बाय प्रोडक्ट तयार करूनच श्वास घेतात.तीच गोष्ट रताळी पिकाची,सोयाबीन ,कापसाची!कृत्रिम  रंग महाग म्हणून मातीपासून रंग बनविणे,शाकाहारी मांसाहार असे एज्का अनेक प्रयोग वाचतांना कमालीची मौज वाटते.

त्यांच्या अफाट संशोधनाने हळूहळू जगालाही भुरळ पडणार नाही तर नवलच.पण तरीही फंडची गरज म्हणून कार्व्हर पियानोचे प्रयोग करून तो मिळवतात.अनेक त्यांना मोठमोठ्या संशोधन केंद्राचे त्यांना नोकरीसाठी निमंत्रण येते पण ते सर्व नाकारतात.अगदी तुटपुंज्या पगारात  काम करतात,तोही ते शेवटी फंड म्हणूनच देतात. आयुष्यभर मित्रांनी दिलेला एकच कोट वापरला.कधीही सुट्टी घेतली नाही.

एव्हढे असूनही या सेवाव्रतीची कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी थांबत नाही.अनेक अपमान पचवून आपल्या कार्यापासून ते तसूभरही मागे हटले नाही.तुम्ही याचा प्रतिकार का करत नाही यावर ते उत्तर देत संघर्ष करण्याऐवजी  तो वेळ मी संशोधनासाठी देईल’ हवी तुमचा वर्ण ,धर्म ,जात ई. गोष्टी नाही हे पुन्हा महान लोकांचे लक्षण  अधोरेखित होते.

आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हा  सेवाव्रती आपला कधी हयातीत इतर शास्त्रज्ञाशी मिसळला नाही एकलकोंडा राहिला,पण कार्याच्या बाबतीत एकाग्र राहिला.जास्त सहवास लाभालाही नाही तरीही  आईला  ते कधीच विसरले नाही ,मातृभक्त राहिले.आपल्या कार्याचे बीज योग्य हाती देऊन कार्व्हर १९४३ ला कर्मभूमीतच अनंतात विलीन झाला.

वीणा गवाणकर लिखित हे पुस्तक मराठीतले एक अमुल्य साहित्य आहे.पुस्तक लिहितांना सरळ सोपी तरीही तरल भाषा हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.पुस्तकातली चित्रे,पुस्तकातील उत्कृष्ट दर्जाची पाने हे  पुस्तकाची जमेची बाजू आहे

प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे स्थान खूप मोठे आहे.

-भक्ती


या पुस्तकाच्या परीक्षणाचा एक सुंदर व्हिडीओ 

 https://youtu.be/kRERzKw2Jlo

कार्व्हर यांच्या फोटोंसाठी 

https://en.wikipedia.org/wiki/George_Washington_Carver