Wednesday, October 28, 2026

लक्ष लक्ष दीप उजळले--समई

 'समई' या शब्दाच्या उत्पत्तीमागे भाषातज्ज्ञ आणि अभ्यासकांचे तीन मुख्य मतप्रवाह आढळतात. 



पहिल्या प्रवाहानुसार, 'महाराष्ट्र शब्दकोशा'त या शब्दाचा संबंध संस्कृतमधील 'संदीपिका' या शब्दाशी जोडला गेला आहे, ज्याचा अर्थ मजकुराचा किंवा जागेचा सदासर्वकाळ उद्धार करणारा दिवा असा होतो. तसेच समदीपिका' (समान प्रकाश देणारा दिवा) काळाच्या ओघात प्राकृत आणि अपभ्रंश होत 'संदीपिका'पासून 'समई' हा शब्द तयार झाला असावा.


 दुसऱ्या प्रवाहानुसार, भारताच्या मध्ययुगीन काळात परकीय संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अरबी भाषेतील 'शमअ' हा शब्द मराठीत आला, ज्याचा अर्थ 'दिवा' किंवा 'मेणबत्ती' असा होतो आणि याच शब्दावरून पुढे 'समई' हा शब्द रूढ झाला. 


याव्यतिरिक्त, तिसऱ्या एका विचारसरणीनुसार प्राचीन काळी मंदिरात किंवा शुभ कार्यात "निश्चित वेळेसाठी (समयासाठी) प्रकाश देणारा मोठा दिवा" म्हणून याला 'समयी' किंवा 'समई' म्हटले गेले असावे, म्हणजेच याचा संबंध थेट 'समय' (वेळ) या संकल्पनेशी जोडला जातो.


भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याची किंवा मंगल प्रसंगाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्याची अत्यंत प्राचीन परंपरा आहे. जेव्हा मंचावर किंवा देवघरात एक भलीमोठी समई ठेवली जाते आणि मान्यवरांच्या हस्ते तिच्यातील एक-एक वात पेटवली जाते, तेव्हा तो केवळ अंधार दूर करण्याचा उपक्रम नसून, एकत्रित शुभेच्छा, सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा एक पवित्र क्षण असतो. आपल्या संस्कृतीमध्ये समईचे स्थान आणि तिची महत्ता मनामनात ठासून भरलेली दिसते.


संध्याकाळच्या सांध्यप्रकाशामध्ये जेव्हा घरात समई लावली जाते, तेव्हा अवतीभवतीचे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र भासू लागते. समईच्या चारी बाजूंनी पडणारा तो मंद, पिवळसर प्रकाश संपूर्ण देवघराला जसा उजळून टाकतो, तसाच तो दिवसभराचा थकवा दूर करून आपल्या मनालाही एका अनामिक शांततेने प्रकाशित करतो. तो प्रकाश केवळ डोळ्यांनाच नाही, तर आत्म्यालाही सुखावून जातो.


समईचा संबंध आपल्या कौटुंबिक नात्यांशी आणि भावनांशी खूप जवळून जोडलेला आहे. लग्नकार्यात, बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा कोणत्याही मोठ्या आनंदाच्या प्रसंगी समई भेट देण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. माझ्या मुलीच्या जन्मानंतर सासरच्यांनी आईला दिलेली मोठी समई दिली होती तशीच जावेला तिच्या माहेरकडून कमरेच्या उंची एवढी भव्य समई मिळाली होती या वस्तू केवळ 'भेट' नाही तर , तर त्या नवीन पिढीच्या आयुष्यात प्रकाश आणि समृद्धी यावी म्हणून दिलेले आशीर्वाद असतात. अनेकांच्या दिवाणखान्यात किंवा देवघरात माणसाच्या उंचीएवढ्या समया ऐटीत उभ्या असलेल्या आपण पाहतो, ज्या त्या घराण्याच्या वैभवाची साक्ष देतात.


समईच्या रचनेत आपल्याला भौगोलिक आणि प्रादेशिक विविधता पाहायला मिळते.

• महाराष्ट्र आणि उत्तर भारत येथे प्रामुख्याने ५ किंवा ७ ज्योतींच्या (वातींच्या) समया वापरल्या जातात, ज्या आकाराने मध्यम आणि सुटसुटीत असतात.

जसे आपण दक्षिण भारताकडे (तामिळनाडू, कर्नाटक, केरळ) जातो, तसा समईचा आकार आणि रूप बदलत जाते. तिथे माणसाच्या उंचीएवढ्या, अत्यंत नक्षीदार आणि अनेक वाती असलेल्या भव्य समया मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये पाहायला मिळतात.


 तामिळनाडूमध्ये या पारंपरिक समईला 'कुतुविळक्कू' म्हटले जाते, जी अत्यंत पवित्र मानली जाते.

तामिळनाडूतील 'नाचिआरकोईल' या गावच्या नक्षीदार कुतुविळक्कू समया जगप्रसिद्ध असून त्यांना भारत सरकारचा 'जीआय टॅग' मिळाला आहे. 

एक संपूर्ण कुतुविळक्कू मुख्यत्वे ५ भागांमध्ये विभागलेली असते, ज्याला आध्यात्मिक भाषेत सृष्टीच्या विविध तत्त्वांचे प्रतीक मानले जाते:

• कीळभागम समईचा सर्वात खालचा गोल पाया, जो ब्रह्माचे प्रतीक मानला जातो.

• कंदम मधला उंच दांडा (स्तंभ), जो विष्णूचे प्रतीक मानला जातो.

• मेळभागम वरचा मुख्य भाग जेथे तेल किंवा तूप भरले जाते, हे शिवाचे प्रतीक मानले जाते.

• नेई/एण्णई वाती ठेवण्याच्या जागा आहे.

• प्रभाई समईच्या सर्वात वरच्या टोकावर असणारी नक्षी. सहसा या टोकावर 'अण्णम' हंस किंवा मोर याची अतिशय सुंदर पितळी मूर्ती असते.


शब्दाची उत्पत्ती काहीही असो, पण कवीच्या प्रतिभेत उतरताना समई हे स्त्रीच्या अंतर्मनाचे, तिच्या सोशिकतेचे आणि तिच्या मूक वेदनेचे प्रतीक बनते. कवी आरती प्रभू यांनी लिहिलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या 'समईच्या शुभ्र कळ्या' या सुप्रसिद्ध भावगीतात समईच्या माध्यमातून सासरी गेलेल्या एका नवोढ प्राजक्तासारख्या हळव्या मुलीचे भावविश्व उलगडले आहे.


"समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते

केसातच फुललेली जाई पायांशी पडते."

सांजवेळी देवघरात समई लावताना तिच्या कापसाच्या वातींची शुभ्र कळ्यांची ज्योत उजळते. जशी ती समईची ज्योत थरथरते, तसेच सासरी आलेल्या मुलीचे मनही भूतकाळ आणि वर्तमानाच्या हिंदोळ्यावर थरथरत असते. लग्नात केसात माळलेली जाई आता कोमेजून पायाशी पडते आहे, म्हणजेच तिचे बालपण, तिचे स्वातंत्र्य संपून ती एका नव्या बंधनात -वैवाहिक जीवनात बांधली गेली आहे.

भावार्थ -शब्दयात्री 


समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते

केसातच फुललेली जाई पायांशी पडते.


भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे

मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.


साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.


गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्‍याची बोटे

वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते


थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये

पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये.


उगा बावरते मन भरू येताना केसर

अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर 


डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे

असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?


हसशील, हास मला, मला हसूही सोसेना

अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !

-आरती प्रभू 



'ग्लो ऑफ होप' (Glow of Hope) या अतिशय प्रसिद्ध चित्रकृतीमागची कथा तितकीच मोहक आहे. या उत्कृष्ट कलाकृतीमध्ये चित्रित झाल्यामुळे गीता उपळेकर भारतीय कलाविश्वातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व बनल्या.


प्रसिद्ध चित्रकार एस. एल. हलदणकर यांची कन्या असलेल्या गीता कोल्हापूरयेथे राहत होत्या. दिवाळीच्या एका संध्याकाळी, दिवा लावताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला मंद प्रकाश आणि ज्योत जपण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांनी जो आडोसा केला होता, तो पाहून त्यांचे वडील भारावून गेले.


त्या क्षणी असलेल्या शांत आणि सुंदर दृश्याने प्रभावित होऊन, हलदणकर यांनी आपल्या मुलीला तीन तास स्थिर बसून पोझ देण्यास सांगितले. यातून साकारलेली कलाकृती पुढे भारतातील सर्वात प्रतिष्ठित कलाकृतींपैकी एक ठरली.


१९४५-४६ च्या सुमारास पूर्ण झालेल्या या चित्रात, गीता हातात दिवा घेऊन उभी आहे आणि ज्योत सुरक्षित राहावी म्हणून तिने अतिशय नजाकतीने आपल्या हातांनी तिला वेढले आहे.

Source -TheBetterIndia

No comments: