Monday, September 28, 2026

टोमॅटो_बेसन_सार

 #टोमॅटो_बेसन_सार



अहाहा! खरं सांगू का, पूर्वी माहेरी ‘खिचडी’ म्हणजे अगदी क्वचित प्रसंगीच व्हायची. माझी आई इतकी भारी सुगरण होती की काय सांगू! आमच्या घरात रोज रात्री गरमागरम पोळी, छानशी भाजी आणि दुपारी उरलेला नसेल तर ताजा भात... असा मस्त बेत असायचा. त्यामुळे मला आधी कधी खिचडी खायची सवयच नव्हती, उलट खिचडी म्हणजे आजारी माणसाचं जेवण असंच वाटायचं! 😜

पण लग्न झालं आणि सासरी आले, तर बाबो! इथे तर वेगळंच विश्व होतं. रात्रीच्या जेवणात थेट खिचडी, सार, पापड आणि भजी... बास, एवढाच बेत! पहिल्यांदा तर मला जरा नवलच वाटलं. पण म्हणतात ना, सवयीने सगळं होतं. आता नोकरी सांभाळताना संध्याकाळी जेव्हा दमून घरी येते, तेव्हा जाणवतं की ही खिचडी म्हणजे आम्हा नोकरदार बायकांचा हक्काचा, सोपा आणि एकदम स्ट्रेस-बस्टर पदार्थ आहे! आता तर मलाही याची मस्त सवय झाली आहे.

या सगळ्या बेतात माझ्यासाठी सर्वात नवीन आणि भारी प्रकरण ठरलं ते म्हणजे '#टोमॅटो_बेसन_सार'! 🍅

टोमॅटो सूप म्हणून मी आधी खूप वेळा पिला होता, पण जेवणात भातासोबत किंवा खिचडीसोबत हा 'सार' खाणं माझ्यासाठी एकदम नवीन होतं. आता टोमॅटो म्हटले की ते उपजतच आंबट असणार! आणि रात्रीच्या वेळेस जास्त आंबट खाणं अनेकांना चालत नाही, कारण पित्त किंवा खोकल्याचा त्रास होतो. पण आमच्या या सासरच्या साऱ्यात एक भारी 'सायन्स' लपलंय!

टोमॅटोच्या आंबट रसात जेव्हा आपण दोन चमचे बेसन पीठ घालतो ना, तेव्हा टोमॅटोचा तो उग्र आंबटपणा एकदम मऊ पडतो! बेसनामुळे हा सार मस्त रस्सादार, दाटसर होतो आणि त्याला एक वेगळीच अप्रतिम चव येते.

आपल्याकडे जसा मेतकूटाचा सार करतात, किंवा तो खान्देश-विदर्भाकडचा 'येसर' चा सार असतो ना... ज्याची खमंग चव जिभेवर रेंगाळते, अगदी तसाच हा टोमॅटो-बेसन सार लागतो! आणि जर या टोमॅटोच्या सोबतीला घरात तयार असणारी खमंग 'येसर पावडर' असेल, तर मग विचारूच नका, येसर घातलेला टोमॅटोचा सार तर अगदी स्वर्गीय लागतो!

माहेरच्या पोळी-भाजीतून सुरू झालेला माझा हा प्रवास आता सासरच्या या चमचमीत 'खिचडी-सार आणि पापड-भज्यांवर' येऊन स्थिरावला आहे आणि मी तो पूर्ण एन्जॉय करतेय! 😊


टोमॅटो बेसन सार बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.

साहित्य 


* टोमॅटो: २

* बेसन (चणा डाळीचे पीठ): २ मोठे चमचे

* आले-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा

* हिरव्या मिरच्या: ४ 

* गुळ: १ ते २ छोटे चमचे

* लाल तिखट: १ छोटा चमचा

* हळद: १/२ छोटा चमचा

* जिरे व मोहरी: प्रत्येकी १/२ छोटा चमचा

* हिंग: १/४ छोटा चमचा

* कढीपत्ता: ७-८ पाने

* कोथिंबीर: बारीक चिरलेली

* तेल किंवा तूप: २ मोठे चमचे 

* मीठ: चवीनुसार

* पाणी: गरजेनुसार


कृती 


   सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची मऊ प्युरी तयार करा.

एका वाटीत २ मोठे चमचे बेसन घ्या. त्यात थोडे पाणी घालून चमच्याने नीट मिक्स करा, जेणेकरून पिठाच्या गाठी राहणार नाहीत.कढईत तेल किंवा तूप गरम करा.

 तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून छान तडतडू द्या. 

त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतून घ्या.फोडणीमध्ये हळद आणि लाल तिखट टाका. लगेचच त्यावर तयार केलेली टोमॅटोची प्युरी ओता आणि तेल सुटेपर्यंत २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.

आता यात बेसनाचे तयार केलेले मिश्रण आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला (सार फार घटही नको आणि अगदी पातळही नको).

 यात चवीनुसार मीठ आणि गुळ घाला. सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या.

साराला मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून बेसनाचा कच्चापणा निघून जाईल आणि सार छान दाटसर होईल.

   


तुमचा गरमागरम आणि चवदार टोमॅटो बेसन सार तयार आहे!

No comments: