Saturday, March 28, 2026

हंपी ४ (हंपी इतिहास -२)

 


इ.स. १४०६ च्या ताम्रपटांमध्ये नोंदवल्यानुसार, राजा हरिहरचे पाच पुत्र, जे पंच संगम बंधूम्हणून ओळखले जातात , ते भारतातील १५ व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील प्रमुख व्यक्ती होते. हरिहर, कंपा, बुक्का, मारप आणि मुद्दप या बंधूंनी संगम घराण्याची स्थिरता आणि वंश टिकवून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. 

विजयनगर साम्राज्य च्या पहिल्या घराण्याला संगम घराणे -Sangama Dynasty म्हणतात. हे घराणे १३३६ ते सुमारे १४८५ ई. पर्यंत राज्य करत होते.

संगम घराण्याचे राजे 

हरिहर प्रथम-१३३६ ते १३५६

बुक्का राय प्रथम -१३५६ ते १३७७

हरिहर द्वितीय -१३७७ ते १४०४

विरूपाक्ष राय -१४०४ ते १४०५

बुक्का राय द्वितीय -१४०५ ते १४०६

देव राय प्रथम -१४०६ ते १४२२

रामचंद्र राय -१४२२

वीर विजय बुक्का राय -१४२२ ते १४२४

देव राय द्वितीय -१४२४ ते १४४६

मल्लिकार्जुन राय -१४४६ ते १४६५

विरूपाक्ष राय द्वितीय -१४६५ ते १४८५


हरिहर पहिला (इ.स. १३३६-१३५६)

संगम राजवंशाचा संस्थापक, हरिहर प्रथम याने इ.स. १३४४ मध्ये दख्खनमधून मुस्लिमांना हाकलून देण्याच्या उद्देशाने, वारंगलच्या कृष्ण नायकाच्या नेतृत्वाखालील संघराज्यात सक्रियपणे भाग घेतला होता.त्याने अनेगुंडी ही आपली पहिली राजधानी म्हणून आणि नंतर विजयनगर ही दुसरी राजधानी म्हणून स्थापित केली.

पहिल्या दोन दशकांत, हरिहर प्रथमने तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडे आपल्‌या साम्राज्याचा विस्तार केला आणि पूर्वपश्चिम समुद्रधिश्वर  ही उपाधी मिळवली. त्याने टप्प्याटप्प्याने कोकण आणि मलबार किनारपट्टीच्या प्रदेशांपर्यंत आपला विस्तार केला.

कालादगी पर्यंतचा विस्तार केला.उत्तर कर्नाटकातील (आजचे बागलकोट-बीजापूर भाग) प्रदेश जिंकण्यासाठी स्थानिक कदंब आणि इतर छोट्या राजवटींवर मोहीम राबवली. यात हरिहरांच्या भावंडांनी मरप्पा, कांपण  मदत केली. 

होयसळ राज्याच्या र्हासाचा फायदा घेऊन, हरिहर आणि बुक्का यांनी आपल्या नव्याने स्थापन केलेल्या राज्याचा विस्तार केला आणि अखेरीस १३४६ पर्यंत संपूर्ण होयसळ राज्य आपल्या नियंत्रणाखाली आणले.होयसळ साम्राज्य हे दक्षिण भारतातील एक प्रमुख हिंदू राजवंश होते. त्यांनी सुमारे ९५०–१३४६ ई.पर्यंत राज्य केले.

कन्ननूर  येथील युद्ध १३४२ ते १३४३ हे युद्ध होयसळ साम्राज्य आणि मदुराई सुलतानत यांच्यात झाले. हे दक्षिण भारतातील मध्ययुगीन इतिहासातील एक महत्वाचे आणि दुःखद युद्ध मानले जाते.

वीर बल्लाळ तृतीय यांच्या मृत्यूबाबत इब्न बतूताचे वर्णन उपलब्ध आहे .

इब्न बतूता स्वतः मदुराई शहरात उपस्थित होता जेव्हा कन्ननूर  येथील युद्धानंतर होयसळ राजा वीर बल्लाळ तृतीय (तेव्हा सुमारे ८० वर्षांचे) पकडले गेले.

त्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेचे वर्णन असे आहे .

सुलतानाने बल्लाळ तृतीय यांना जिवंत पकडले.त्यांची कातडी काढली.कातडी भरून (stuffed with straw) केली.ही भरलेली कातडी मदुराई किल्ल्याच्या भिंतींवर किंवा खांबावर सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आली इतर हिंदू राजांना इशारा म्हणून हा क्रूर कृत्य केले .

काही वर्णनांनुसार त्यांचे डोके देखील भिंतीवर लटकवले गेले होते.

इब्न बतूता याने मदुराई सुलतानाच्या अत्यंत क्रूर स्वभावाचे विस्तृत वर्णन केले आहे. 

हिंदू कैद्यांना जिवंत खांबांवर लटकणावे त्यांच्या पत्नी आणि मुलांना त्यांच्यासमोर मारणे.जंगल तोडताना कैद्यांना क्रूरपणे मारणे.

एका प्रसंगी सुलतान समोर बसलेल्या इब्न बतूताच्या डोळ्यादेखत एका हिंदू पुरुष, त्याची पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाचा शिरच्छेद केला गेला.

इब्न बतूता याने लिहिले की, “अशी क्रूरता मी इतर कोणत्याही राजाकडे पाहिली नाही.”

हरिहर प्रथम यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू बुक्का प्रथम हे संगम राजवंशाचे पाचवे सम्राट म्हणून सिंहासनावर बसले.

तिकडे तुघलकाकडे बंड होऊन बहमनी सत्ता नव्याने स्थापन झाली.विजयनगर आणि बहामनी सत्ता यात कायम संघर्ष होत राहिले 

फरिश्ता सारख्या मध्ययुगीन इतिहासकारांनी सांगितलेल्या लोकप्रिय आख्यायिकेवर बहमनी सत्ता स्थापन कथा आधारित आहे. आधुनिक इतिहासकार या कथेची पूर्णपणे पुष्टी करत नाहीत आणि अलाउद्दीन बहमन शाह यांच्या मूळ उत्पत्तीबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तरीही बहमनी साम्राज्याच्या उदयाच्या कथांमध्ये ही आख्यायिका प्रसिद्ध आहे.

हसनचा जन्म १२९० साली अत्यंत साध्या-सरळ परिस्थितीत झाला असे सांगितले जाते. त्याच्या आयुष्यातील पहिल्या ३० वर्षांपर्यंत तो गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या शेतात साधा शेतमजूर म्हणून काम करत होता.

हसन मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा होता, त्यामुळे ब्राह्मण गंगूने त्याच्या कष्टाची दखल घेत त्याला एक छोटेसे शेत आणि दोन बैल भेट म्हणून दिले.

एके दिवशी आपल्या शेतात नांगर चालवत असताना हसनला एक प्राचीन सोन्याच्या नाण्यांचा साठा सापडला. त्याने ताबडतोब तो गंगू ब्राह्मणाकडे नेला. या गरीब मजुराच्या प्रामाणिकपणाने गंगू खूप प्रभावित झाला.

गंगू ब्राह्मण हा राजघराण्यातील ज्योतिषीही होता, त्यामुळे त्याने सुलतानाला हसनच्या प्रामाणिकपणाची माहिती दिली.

त्या काळचे सुलतान गियासुद्दीन तुगलक होते. त्यांनी हसनला बक्षीस म्हणून सैन्यात सेनाधिकारी बनवले आणि घोडदळात १०० घोड्यांचा अधिकारी म्हणून नेमले.

गंगू ज्योतिषी असल्याने, आपल्या एकेकाळच्या नोकराच्या पूर्णपणे बदललेल्या परिस्थिती पाहून त्याने हसनचा कुंडली घातला. कुंडलीत असे दिसले की, हसन एक दिवस राजा होईल.

ही माहिती लपवून न ठेवता गंगूने हसनला ही भविष्यवाणी सांगितली आणि त्याच्याकडून वचन घेतले की, जेव्हा तो राजा होईल तेव्हा तो गंगूचे नाव स्वीकारेल आणि त्याला आपल्या भविष्यातील राज्याचा वित्तमंत्री  बनवेल.

नंतर हसन हसन गंगू झाला. मुस्लिम इतिहासकारांनी त्याला ‘कंगोह’ (Kangoh) असेही उल्लेख केला आहे.हसनने आपल्या जुन्या मालकाला दिलेल्या वचनाचा सन्मान करण्यासाठी 'बहमन' हे नाव स्वीकारले, कारण 'ब्राह्मण' या शब्दाचा उच्चार पूर्वी आणि आजही अनेकदा 'बहमन' असाच केला जातो. फरिश्ता यांचा आग्रह आहे की, हसन हा एका निम्न-कुलीन अफगाण होता.


बुक्क-१ (१३५६ ते १३७७)

बुक्का प्रथमाच्या काळात विजयनगर साम्राज्य शक्तिशाली झाले आणि दक्षिण भारतात हिंदू वर्चस्व प्रस्थापित झाले.

अलाउद्दीन बहमन शाह यांचे कापय्या नायक आणि इतर नायकांशी युद्ध. त्यांनी काही किल्ले जिंकले आणि विजयनगरच्या सीमेपर्यंत छापे टाकले.मृत्युशय्येवर असताना, बहमन शाहने राजकुमार मुहम्मद यांना आपला वारस म्हणून घोषित केले मुहम्मद गादीवर आल्यावर, वारंगलहून तेलंगणावर राज्य करणाऱ्या कपयाने आणि नव्याने स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्यावर राज्य करणाऱ्या बुक्काने, कौलाचा प्रदेश वारंगलला आणि रायचूर दोआबचा प्रदेश विजयनगरला परत देण्याची मागणी नव्या सुलतानाकडे केली. 

रायचूर दोआब  या सुपीक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोघांचा रस होता.कृष्णा नदी आणि तुंगभद्रा नदी यांच्यामधील सुपीक, काळी मातीचा प्रदेश रायचूर दोआब ओळखला जाई .

बहमनी सुलतान मोहम्मद शाह प्रथम यांनी आडोनी किल्ल्यावर हल्ला करण्याची तयारी केली होती. याची माहिती मिळताच बुक्का राय प्रथम यांनी आडोनी किल्ल्याला आपले मुख्य तळ बनवले. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला  होजे मुल राय आडोनीचे संरक्षण सोपवले आणि स्वतः मोठ्या सेनेसह तुंगभद्रा नदीच्या दक्षिण काठावर तैनात झाले.

मोहम्मद शाह प्रथम यांनी मोठ्या सेनेसह (१५,००० घोडदळ आणि ५०,००० पायदळ) तुंगभद्रा नदी ओलांडली (सिरुगुप्पा जवळ). त्यांनी खान मुहम्मद यांच्या नेतृत्वाखाली पुढील तुकडी पाठवली (१०,००० घोडदळ, ३०,००० पायदळ आणि तोफखाना).

दोन्ही सेनांमध्ये कौथल तुंगभद्रा नदीजवळ  जवळ निर्णायक लढाई झाली.विजयनगर सेनेचे नेतृत्व  होजे मुल राय यांच्याकडे होते.

बहमनी सेनेच्या केंद्रात खान मुहम्मद,  मुसा खान आणि  इसा खान होते.

लढाई अतिशय भीषण होती. प्रारंभी विजयनगर सेनेने बहमनींच्या  मुसा खान आणि इसा खान यांना ठार केले. बहमनी सेना जवळजवळ पराभूत होत होती.

या निर्णायक क्षणी मोहम्मद शाह प्रथम स्वतः ३,००० ताज्या घोडदळासह आले. त्यामुळे बहमनी सेनेत नवीन उत्साह संचारला.

खान मुहम्मद यांचा हत्ती शेर-ए-शिकार याने विजयनगर सेनेच्या मध्यभागात घुसून मल्लिनाथ यांना गंभीर जखम केली. हातोहाती लढाई झाली. विजयनगर सेना पूर्णपणे पराभूत झाली आणि पळून गेली. युद्धानंतर बहमनींची लूटमार आणि नरसंहार केला .

विजयानंतर बहमनी सेनेने आडोनी भागात उरलेल्या विजयनगर सैनिकांचा बंदोबस्त केला.

नंतर मोहम्मद शाह प्रथम यांनी विजयनगर शहराकडे कूच केले. या मोहिमेदरम्यान बहमनी सेनेने विजयनगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि नरसंहार केला.इतिहासकार फरिश्ता यांच्या मते, या युद्धात हिंदू बाजूचे ५ लाखांपर्यंत लोक मारले गेले गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांसह.बहमनी सेनेने क्रूरपणे हल्ला चढवला.फरिश्तानुसार, मोहम्मद शाहने “ काफिरांच्या वध” चा आदेश दिला.

बुक्का राय प्रथम यांनी वन्य आणि डोंगराळ भागातून गनिल्ला (छापामार) युद्धतंत्र वापरले. त्यांच्या सैनिकांनी बहमनी सेनेच्या पुरवठा मार्ग तोडले, छोट्या-छोट्या हल्ल्यांमधून त्रास दिला आणि बहमनी सेनेला सतत हैराण केले.

बहमनी सेनेत अन्न-पाण्याची टंचाई आणि थकवा निर्माण झाला. शेवटी मोहम्मद शाह प्रथमला माघार घ्यावी लागली.

शांतता स्थापित झाली. बुक्का राय प्रथम यांना काही प्रदेश गमावावे लागले किंवा वार्षिक कर द्यावा लागला. या युद्धानंतर १३६७ ते १३७५ पर्यंत दोन्ही बाजूंमध्ये काही वर्षे शांतता राहिली.

१३६६ च्या पराभवानंतर त्यांनी दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले.

त्यांनी दक्षिणेकडील छोट्या राजवटी आणि प्रदेश जिंकले.गोवा आणि कोकण भागात नियंत्रण मिळवले.पूर्वेकडे ओडिशा -गजपती च्या काही भागांवर छापे टाकले.श्रीलंका (जाफना राज्य) आणि मालाबार (केरळ) च्या राजांना कर देण्यास भाग पाडले.

मदुराई सुलतानाचा पराभव हा बुक्का राय प्रथम यांच्या काळातील सर्वात महत्वाचा आणि गौरवशाली विजय होता.

कुमारा कम्पण्णा बुक्का राय प्रथम यांचा मुलगा याने या मोहिमेचे नेतृत्व केले.सुमारे १३६५ ते १३७०/१३७१ ई. (

कम्पण्णाने प्रथम तोंडैमंडलम (आजचे उत्तर तामिळनाडू) जिंकले.नंतर मदुराई सुलतानत वर मोठी मोहीम राबवली.

शेवटचा मदुराई सुलतान अलाउद्दीन सिकंदर शाह  याला मदुराईच्या युद्धात पराभूत केले आणि शिरच्छेद केला.

मदुराई सुलतानतचा पूर्ण अंत झाला .विजयनगर साम्राज्याने रामेश्वरम् पर्यंत दक्षिणेकडे विस्तार केला.

कम्पण्णाने मदुराईतील नष्ट झालेल्या मंदिरांचे (मीनाक्षी मंदिर, श्रीरंगम इ.) जीर्णोद्धार केले. हिंदू धर्म आणि मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.

या विजयाचे वर्णन कम्पण्णाची पत्नी गंगादेवी यांनी मधुरा विजयम् या संस्कृत महाकाव्यात केले आहे. यात मदुराई सुलतानांच्या अत्याचारांचे आणि विजयनगरच्या विजयाचे सुंदर वर्णन आहे.

बुक्का राय प्रथम यांचा राज्यकाल १३५६ ते १३७७ ई. पर्यंत होता . ते विजयनगर साम्राज्याचे दुसरे सम्राट होते आणि संगम घराण्याचे प्रमुख शासक मानले जातात.

No comments: