हंपी लेखमालिकेची सुरुवात हंपी इतिहासाने व्हायला पाहिजे .पण आज रामनवमी निमित्त प्रभू राम यांना अर्पित हंपीमधील हजारा राम मंदिर आणि कोदंडराम मंदिर विषयी सांगते .
हजाराराम मंदिर १५व्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे १४३०-१४४० च्या दरम्यान विजयनगर साम्राज्याच्या राजा देवराय द्वितीय यांनी बांधले. काही ठिकाणी देवराय प्रथमचा उल्लेख येतो, पण बहुतेक विश्वसनीय इतिहासकार आणि संदर्भांनुसार देवराय द्वितीय यांचेच श्रेय दिले जाते.
हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या राजधानी हम्पी येथील राजवाडा परिसर म्हणजेच रॉयल इनक्लासार Royal Enclosure मध्ये आहे. हे राजघराण्याचे खासगी पूजा स्थळ होते. सामान्य लोकांसाठी नव्हते, फक्त राजा, राण्या आणि राजकुटुंबीयांसाठी होते.
“हजारा राम” म्हणजे “हजार राम”. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर रामायणातील सुमारे हजारो दृश्ये कोरलेली आहेत.पण काही शिलालेखांत याचा उल्लेख 'रामचंद्र मंदिर' असाच आहे
रामाच्या जीवनाची संपूर्ण कथा जन्म, सीतास्वयंवर, वनवास, सीताहरण, राम-रावण युद्ध, राज्याभिषेक दगडात “कॉमिक स्ट्रीप” सारखी क्रमवार कोरलेली आहे. यामुळे हे मंदिर “दगडात कोरलेली रामायण” म्हणून प्रसिद्ध आहे.
ही नक्षी बालकांडापासून युद्धकांडापर्यंत जवळजवळ सर्व घटना कव्हर करतात.
**पुत्रकामेष्टी यज्ञ- दशरथ राजा यज्ञ करताना, यज्ञातील पावित्र्यपूर्ण पदार्थ तीन राण्यांना दिल्याचे दृश्य.
**राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म.
**अहल्या उद्धार
**सीतास्वयंवर-रामाने शिवधनुष्य तोडल्याचे सुंदर दृश्य.
**वनवास -राम-सीता-लक्ष्मण वनात जाणे.
**श्रावण बाळाची कथा -रामायणाची मूळ कारणे दाखवणारी ४ स्वतंत्र पॅनेल्स
**मारीच हरण -सुवर्णमृगाचा भ्रम ,आणि रामाकडून मारीच वध
**सीताहरण आणि जटायूचा-रावणाचा संघर्ष.
**वालि-सुग्रीव युद्ध -रामाने ७ वृक्ष भेदून बाण मारल्याचे दृश्य.
**हनुमानाची लंका यात्रा -हनुमानाने शेपूटाने सिंहासन उंच केल्याचे, अशोकवाटिकेत सीतेशी भेट, “सीता राम” संदेश.
**राम-रावण युद्ध - युद्धाचे अनेक थरारक दृश्ये, सेना, रथ, अस्त्र-शस्त्रे.
**राम राज्याभिषेक - विजयानंतर रामाचे राज्याभिषेक.
**सीता वाल्मिकी आश्रमात जाते
**लव कुश -लक्ष्मण संघर्ष
याशिवाय काही ठिकाणी कृष्ण लीला बालकृष्ण, कालीयमर्दन, गजेंद्रमोक्ष आणि विष्णूच्या अवतारांचे छोटे दृश्य देखील आहेत.
मंदिराच्या मुख्य मंडप मध्ये चार खास खांब आहेत.हे खांब काळ्या पॉलिश केलेल्या दगडाचे आहेत. दगड इतका चमकदार पॉलिश केलेला आहे की, मंदिराच्या अंधुक प्रकाशात ते खूप सुंदर आणि चमकदार दिसतात.ह्यासाठी काळा दगड खास दुसरीकडून आणला आहे.
या खांबावर होयसळ शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो.प्रत्येक खांबाच्या चारही बाजूंना ३ ते ५ स्तरांमध्ये छोट्या-छोट्या नक्षी कोरलेल्या आहेत. एकूण चार खांबांवर अनेक देव-देवतांच्या मूर्ती आणि दृश्ये आहेत.
राम, लक्ष्मण आणि सीता: सर्वात प्रसिद्ध नक्षी. राम धनुष्य-बाण घेऊन, सीता कमळ घेऊन आणि लक्ष्मण सोबत उभे असलेले दृश्य. ते मकर तोरण मध्ये कोरलेले असते.विष्णूच्या विविध रूपांचे दर्शन जसे राम, लक्ष्मण, लक्ष्मी-हयग्रीव, कल्की अवतार, इतर दशावतार. हनुमान आणि गणेशाची सुंदर मूर्ती महिषासुरमर्दिनी दुर्गा, शिव-पार्वती, कृष्ण लीला ,काही खांबांवर २४ विष्णू रूपे दाखवली आहेत.
मंदिर उभारताना सुरुवातीला गर्भगृह आणि साधा हॉल होता. नंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीला खुला पोर्च आणि हे सुंदर चार खांब जोडण्यात आले. हे खांब राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी बनवले गेले असावेत, म्हणून त्यात देवतांच्या रूपांची समृद्धी आहे.
बाहेरील भिंती पूर्णपणे रामायणाच्या कथांनी भरलेल्या आहेत. रथांची मिरवणूक, युद्धाचे दृश्ये, प्राणी-पक्षी, नृत्य इत्यादी नक्षी असे भव्य १०-१२ -फूट उंच आणि २० मीटर रुंद पॅनल आहे आहेत.
कोदंडराम मंदिर
हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे, चक्रतीर्थ नावाच्या पवित्र स्नानघाटासमोर काही पायऱ्या चंदन वर गेल्यावर आहे.विरूपाक्ष बाजाराच्या शेवटी, पूर्वेकडे आहे.गर्भगृहात एका एका मोठ्या नैसर्गिक खडकातून कोरलेल्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या उंच सुमारे १५ फूट -मूर्ती आहेत.
राम धनुष्य म्हणजेच कोदंड धरलेल्या मुद्रेत आहेत, म्हणून नाव कोदंडराम- धनुष्यधारी राम.
काही कथेनुसार सुग्रीवही रामासमोर वाकलेला दाखवला आहे.रामायण कथेनुसार हे ठिकाण किष्किंधा राज्याशी जोडलेले आहे:
भगवान राम सीतेला शोधत हम्पी -किष्किंधाप्रदेशात आले.सुग्रीवाने वालीशी युद्ध करण्यासाठी रामाची मदत मागितली.रामाने वालीला मारले आणि लक्ष्मणाने सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून अभिषेक केला.या घटनेच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते.काही स्थानिक कथांनुसार रामाने सुग्रीवाला राज्याभिषेक केल्याचे ठिकाण हे आहे.तर सुग्रिव याने ही मूर्ती बनवून घेतल्याची धारणा आहे .

















No comments:
Post a Comment