प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड!
मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पहिल्यांदाच जाणार आहे.तेव्हा तो म्हणाला १० मिनिटांत चढून जाता येते.खरोखर १० मिनिटांत मी गड चढले.उगाच इतके दिवस घालवले असं वाटलं.गडावर गेल्यावर पूर्वेकडे एक मुख्य दरवाजा- कमान आहे .जिचे छत ,भिंती,खिडक्या आकर्षक आहे.सकाळचे ६.४५ वाजले होते.सूर्योदयाचे ते रंग उधळणीचे मोहक आकाश डोळ्यांत साठवत होते.सूर्याची लाल केशरी चमचमती बिंदी गोजिरी होती.सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा पूर्व सूर्योदय तिरंग्यासह फोटो घेत अनुभवला.पुढे आत गेल्यावर एक विस्तीर्ण पठार आहे.तिथेच एक अर्धवट सुरक्षित वास्तू बाकी आहे.समोर पूर्वेलाच पाण्याचे भव्य टाके आहे.
मांजरसुंबा हा गड- किल्ला १४ व्या शतकात निजामाच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधला होता.संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता.याचे मूळ नाव मंजर -ए- सुब्हा असे होते जे अपभ्रंश होऊन मांजरसुंबा /मांजरसुभा झाले.
या किल्ल्याला अजून एक ओळख आहे ती म्हणजे हत्तीची मोट!
पठाराच्या दुसऱ्या बाजूला एक दुमजली हवा महाल/ बुरूज आहे.त्याला हत्तीची मोट म्हणतात कारण बुरूजाची खाली तीन पाण्याची टाके आहेत.तसेच तिथे मोट बांधायची सोय आहे.टाक्याकडे खाली जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.पण नंतरची वाट थोडी अवघड आहे.वेळेअभावी आम्ही बुरूजावरूनच टाके पाहिले.
ट्रेक कॅम्पने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नोत्तरे घेतले.तसेच एका कागदावर स्वतःमध्ये काय बदल करू इच्छितो ज्याने स्वतःचे आणि समाजाचे हित साधले जाईल हे लिहून ही अँक्टिव्हिटी केली.राष्ट्रगीतासह छोट्याशा सुरेख ट्रेकची सांगता केली.
हा फोटो अभ्यासक रोहन गाडेकर यांच्या सौजन्याने देत आहे.
















No comments:
Post a Comment