Thursday, July 4, 2024

कारलं माझ्या आवडीच!



जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!! 😊
किंचित कडू -गोट-आंबट-ठसकेदार-चमचमीत!
जीभेच्या रसना तृप्त करणारी!
शरीरालाही गुणकारी!

कृती-
१.कारल्याच्या गोल चकत्या प्रमाणे  फोडी करा.एका कारल्याच्या पाच फोडी होतील.देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा.
२.त्या फोडीतील बिया काढून टाकाव्यात.कारल्याच्या फोडी आता पोकळ असतील.
३.त्या फोडींना हळद,मीठ,लिंबाचा रस(२-३ लिंबाचा)लावून वीस मिनिटे  तशाच ठेवाव्या.
४.नंतर उकळी आलेल्या पाण्यात त्या मध्यम शिजवाव्या.
५.मसाला-एक मोठी वाटी दाण्याचा कूट,अर्धी वाटी तिळाचा कूट,दोन चमचे तिखट,एक चमचा कोणताही आवडीचा मसाला,अर्धी वाटी चिरलेला गूळ,चिरलेली कोथिंबीर,मीठ ,किंचित लिंबू पिळावे.हा कोरडा मसाला तेलात एकत्र करावा.
६.कारल्याच्या फोडींत तो भरावा किंवा फोडी या मसाल्यात घोळून घ्याव्यात.
७.तेलात मोहरी जिर्याची तडतडीत फोडणी करावी.त्यात भरलेल्या कारल्याच्या फोडी चांगल्या परताव्यात.अर्धा फुलपात्र पाणी टाकून मंद आचेवर भाजी वाफवून घ्यावी.

कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये😄

अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा😜
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?


**भरली कारली 

भरली अख्खे कारले करून पाहिले.तो दोरा गुंडाळायचा राहिला पण पुढच्यावेळी छोटी कारली मिळाली की परत निगुतीने भरली कारली करेन.



यात आधी स्वच्छ धुतलेल्या कारले सोलून वरील खडबडीत आवरणही मसाला करताना वापरले.

साहित्य:कारले सोलून, बिया काढून,मधोमध कापून त्यात मीठ,लिंबू रस,हळद लावून वाफवून घेतले.

मसाला -

सोललेले कारल्याचे वरचे खडबडीत हिरवे आवरण,

एक वाटी शेंगदाणे,पाच सहा हिरव्या मिरच्या,तीळ, लसूण पाकळ्या,

३ चमचे लाल मिरची पावडर -   १ चमचा धने पावडर - 

१ चमचा जिरे पावडर -  

१ चमचा गरम मसाला - 

१ चमचा तेल - 

मीठ - स्वादानुसार 

लिंबाचा रस -  (ऐच्छिक)

चिरलेली कोथिंबीर)

सर्व परतून मिक्सरमधून बारीक केले.

गूळ -४ चमचे


कृती:वाफवलेल्या कारल्यांना हलके दाबून त्यांच्यातील पाणी काढून घ्या.

कारल्यात भरायला तयार केलेला मसाला, चिरलेला गूळ थोडे तेल टाकून कारले भरून घ्या.

नंतर तुम्ही याला दोऱ्याने बांधूनही टाकू शकता.नॉन-स्टिक कढईत तेल गरम करा. 

भरलेली करले त्यावर मंद आचेवर शिजवून घ्या, दोन्ही बाजूंना सोनेरी रंग येईल आणि मसाला नीट शिजेल.

शिजल्यानंतर कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.भाकरीसोबत गरमागरम खा. 

भरली कारली भरपूर चविष्ट लागते.


No comments: