Thursday, October 17, 2024

मेथी के शर्ले

 


असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले.

मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात.


साहित्य 

एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत.

तीन मोठे बटाटे 

आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस्ट 

हिंग,धने पावडर,आवडीचा मसाला

एक वाटी डाळीचे पीठ 



कृती

१.मोठे बटाट्याच्या साल न काढता बारीकहून थोड्या मोठ्या फोडी करायच्या.

२.त्यात स्वच्छ केलेली मेथी व बाकीचे जिन्नस एकत्र करायचे.चवीनुसार मीठ टाकायचे.

३.या मेथी ,बटाट्याला पाणी सुटल्यावर एक वाटी डाळीचे पीठ टाकून मिक्स करायचे.

४.आता हे मिश्रण कापडावर छोट्या आकाराचे गोल वडे थापायचे.

५.चांगले खरपूस तळून घ्यायचे.

कालची थाळी पंजाबी मेथी के शर्ले आणि राजस्थानी दाल बट्टी यांचा समेट झाला :)

६.हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर यायचे.





Sunday, October 6, 2024

भोंडला खेळू

 


सखे फेर धरू ...गरागर

जात्यावर दळण फिरे... गरागर


पीठाचे मांडे करू...भराभर 

चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर


रानातून सरपण आणू... झरझरा 

अशी पावले टाकू...झरझरा


रानात गवत पसरले...दूरवर

मागे फिरू ,घर राहिले...दूरवर


घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर 

चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर


दाणे जवारीचे उडाले... घरभर

हस्ताची समृद्धी पसरू दे...घरदारावर


-भक्ती

(भोंडला लिहिण्याचा एक प्रयत्न)


Wednesday, October 2, 2024

पारनेर -४ कोरठण खंडोबा

 #कोरठण खंडोबा 




सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार!

नगर -पुणे सीमारेषेवरचे कोरठण खंडोबा,दरवेळी चकवा देत होतं.

मंदिर गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच एक शिलालेख आहे.

पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२, १० फेब्रुवारी १५७१ माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे बांधले.



श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशदाराजवळ कोरलेला हा लेख अनेक वर्ष झाकला गेला होता. १९९४ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा लेख उजेडात आला. अनेक वर्ष झाकला गेला असल्याने लेख चांगल्या स्थितीत असला तरी पहील्या पाच ओळी पूर्ण वाचता येत नाहीत. शेवटच्या चार ओळी मात्र व्यवस्थित वाचता येतात. संपूर्ण लेख नऊ ओळीचा व खोदीव अक्षरांचा आहे.


लेखाचा मुख्य उद्‌देश कुमाजीरावांनी शके १४९२ मधे हे मंदिर बांधल्याची माहीती देणे हा आहे.


१ श्री गणेशाय नमः ०००००००००० पा ह ००० मरन्नी सुत ००० मा सुत २० गौड नायक इति थि तो सदा संमुख भी की तिं ॥१॥ तस्या


३ सा सुशीला ००० या ब्राह्मण पोळ ० स्य ना००० स्य निजाम पो वीरवास ० ४० दा ०० ता जना के ना दुर्जय किनीय०० चांदी ०००० बुची ० सीन ०० श्रीद्यानो १० या हि मु० सुमुस्तदीय सुरवात ००० के युगी क० मि ते प्रमेदिते माघे मासेसी तप ६ स्यां ०० दीने सीहगते शरीक ००० राज ००० ६ णा श्रीशके १४९२ प्रमोद स


७ वत्सरे माथ सुद्ध पौर्णमासी सुक्रवासरे मघा नक्षत्रे शोभन नाम योने ००० ८ र सुभदिने श्री जावजी विस्वासराव सुत कुमाजिराव खंडेरायाचे देए


९ तक केळे येणे सु०० श्री भवानि संकर सुप्रसनो भवतु ॥


जावजि विश्वासरावांचा मुलगा कुमाजिराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२ प्रमोद संवत्सर शुकवार या दिवशी मघा नक्षत्र व शोभन योग असताना हे मंदिर बांधले.


लेखातील कालोल्लेख सुस्पष्ट व सविस्तर असून सहाव्या व सातव्या ओळीत शक संवत्सर महिना तिची वार नक्षत्र योग या कमाने दिलेला आहे.


माथ शुद्ध १५ शके १४९२ १० फेब्रुवारी १५७१, प्रमोद संवत्सर, शुक्रवार (१), मघा नक्षत्र, शोभन योग लेखात शुक्रवार असा उल्लेख येतो पण पिल्लेजंभीप्रमाणे या दिवशी शनिवार होता.


ओळ क. ३ मचे निजामाचा उल्लेख आहे. हा आलेख पहिल्या मुर्तजा निजामशहा या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता व पहिला मुर्तजा निजामशहाजादीवर होता.



(संदर्भ -कोरठण खंडोबा माहिती फलक)

Monday, September 16, 2024

सातारा-कास पठार

 


महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी

सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.

शिलाहार राजा भोज(दुसरा) याने ११९० मध्ये बांधला.पुढे तो यादव-बहामनी-आदिलशाही-मराठा साम्राज्य (१६७३)-मोगल-ताराराणी-मोगल-शाहू-इंग्रज अशा क्रमानुसाऊ विविध राजवटींत समाविष्ट झाला.यातल्या ठळक गोष्टी म्हणजे पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती.

गडावर शेवटी मंगळादेवीचे मंदिर आहे मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.येथून सातारा शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते.समोरच हिरवाईने नटलेल्या ढगांचा पदर आणि सूर्य बिंबाची चमचमती टिकली लावलेल्या अनेक  डोंगररांगा मोहक भासतात.किल्ल्याच्या पायवाटा,भिंती सोनकी फुलांच्या निसर्ग भाषेत बोलक्या झाल्या आहेत.

रात्रीचे जेवण पितळी थाळीतसह पितळी गडू पाहून मजा वाटली.जेवणही रूचकर होतं, आमच्याकडे हाॅटेलमधलं व्हेज जेवण म्हणजे सगळ्या भाज्यांची ग्रेव्ही सारखी चवही सारखीच लागते.इथे सगळ्या भाज्या वेगळ्या लागत होत्या.यावरून सातऱ्याचे मांसाहारी जेवण का प्रसिद्ध आहे याचा अंदाज आला,काटा किर्रच असणार ;)

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो.पावसाची मस्त भुरभुर सुरु होती.कासचे बुकिंग ११ वाजताचे होते.त्यामुळे आधी ठोसेघर धबधबा पाहायला निघालो.रस्त्याने फुललेली कारवी डोळे भरून पाहिली.धुक्यात हरवलेला डोंगर मध्येच पावसाच्या सरी मधेच कोवळ ऊन अगदी सुंदर वातावरण होतं.ठोसेघरला पण तिकीट काढल्यावर आत निघालो.दूरपर्यंत येणारा धबधब्याच्या प्रवाहाचा आवाज रोमांचित करीत होता.इथे पेबल लावलेली पायवट होतीच.इथेही बऱ्यापैकी कारवीची फुलं होती, यथेच्छ कारवी पाहिली.काही मशरूम ही झाडांवर वाढलेली होती,त्यांचे निरीक्षण केले.ठोसेघर धबधबा ६६० फूट उंचीवरून कोसळतो.ठिकाणी ३ धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा ,तिसरा धबधबा या दोघांपेक्षा पासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे.

पण भारतातील सर्वात जास्त  उंचीचा १८४० फूट वजराई धबधबा जवळच होता तो आम्ही पाहिला नाही ही छोट्या ट्रिपमधली मोठी चूक -१ ;)

 ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे . तिथल्या प्रचंड उंच पवनचक्की पाहिल्या ज्या इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या?

पुढे सज्जनगडावर पोहचलो.शाळेत असतांना इथे आले होते,तेव्हाचा प्रसंग जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला.रामदास स्वामींचे शेजघर ,पाणी भरायच्या  मोठमोठ्या हंडे पाहून हरखून गेले होते ते परत आठवले.सज्जनगड आधी परळी किल्ला (गड ) म्हणून होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना हा किल्ला सज्जनगड विस्तारासाठी दिला होता.गडाच्या टोकावर धान्या मारूतीचे मंदिर पाहायला जातांना दूरवरच्या तलावाचे दृश्य पाहायला छान वाटत होते.रामभक्तीचा वसा मला माझ्या आजी आजोबांकडून मिळाला.त्या रामाचे परम भक्त रामदास स्वामी यांच्या कार्याने पवित्र सज्जनगडावर माझं मन भरून येतं होतं.श्रीराम जयराम जय जय राम या सामूहिक नामस्मरणाच्या वेळी  रामभक्तीतमुळे माझ्या डोळ्यांना अश्रू अनावर झाले.ते का हे मला ठाऊक आहे पण हे मी शब्दात मांडू शकत नाही,जय जय रघुवीर समर्थ! ही छोट्याशा ट्रिप मधली मोठी बरोबर गोष्ट-१;)


सज्जनगडावर रेंगाळल्यावर २ वाजता मुख्य आकर्षण 'कास पठार" याच्याकडे वळालो.आता मात्र गर्दी , ट्रॅफिक भयानक वाढली होती.आमचा वाहक चांगला असल्याने कमी वेळात तिथून बाहेर पडलो.कास पर्यंत पोहचू पर्यंत ३.३० वाजले.बुकिंग ३ पर्यंत होतं.काय होईल याची काळजी होती,पण गर्दीच इतकी प्रचंड होती की तिकिट असणं हीच बाब महत्त्वाची होती.

आता फुलांच्या त्या जादुई जगात शिरल्यावर हा स्वर्ग  आहे का ,असाच भास झाला.कास पठार चार एकापेक्षा अधिक भागात पसरले आहे.


फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले उत्तर पश्चिम घाटाच्या शिखरावर एक लॅटरिटिक पठार आहे. आणि मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती जीवन टिकवून ठेवते. विशेष म्हणजे, कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे, जे थेट वातावरणाच्या संपर्कात आहे.(माहिती सौजन्य -आंतरजाल)


गेट क्र.१-४ अशा दोन्ही बाजूंनी हे  पठार विविधरंगी फुलांच्या उत्सावासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपल्यासाठी डोलत असते.

गेट क्र.१ मध्ये फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे.इथे टोपली कारवी,आभाळी यांची निळसर फुलं तर जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत.गेट क्र.२ आणि. ३ एकाच पठार भागासाठी दूरवर आहेत इथे वेगळ्याच प्रकारची गुलाबी तगर,दीपकाडी,धनगराचा फेटा,पांड,गेंद,चावर,डालजेलियाना ही मला ओळखता आलेली फुलं पाहिली.इतरही अनेक फुलं आहेत जी ओळखता आली नाहीत.

याबद्दची माहिती देणारा एक अल्बम

आता आम्हांला खुप उशीर झाला होता आणि ट्रॅफिक खूप वाढलं होतं तेव्हा लवकर परत फिरणं गरजेचे होते.त्यामुळे गेट क्र.४ कुमुदिनी तलावाकडे जाऊ शकलो नाही ही मोठी चूक -२ :(

पण पिवळी सोनकी आणि मिकी माऊस नाही दिसली.मी नेटवर खुपदा वाचलं की कास पठार उगाच ओव्हररेटेड ठिकाण आहे.एकदम सफेद झूठ आहे हे अजिबात विश्वास ठेवू नका .कास पठार खरच अद्वितीय आहे !

 सकाळी ७ ते रात्री ७ वेळ आहे,१५० रू.तिकिट आहे, ऑनलाईन पण साईटवर जाऊन काढू शकता.सकाळी कास पाहून ‌तपोळा,कास तलाव,वजराई धबधबा पाहुन मग बामणोली, यवतेश्वर वगैरे पाहू शकता.वेळेअभावी आणि नियोजन अभावी आम्ही फक्त कास केला.

धुक्यात हरवलेलं हे पठार कधी जोरदार कधी भुरभुर पाऊस, सर्रकन पडणारे कोवळ ऊन आणि फुलांचे डोळ्याचे पारणे फेडणारे पृथ्वीवरचा स्वर्ग याची डोळा याची देही एकदा-अनेकदा अनुभवावा असाच आहे.

-भक्ती

अजिंक्यतारा 

सोनकी
फुलांची भाषा बोलणाऱ्या भिंती
ही वाट दूर जाते 
सातारा शहर


पितळी गडू

कारवी
ठोसेघर धबधबा 
कारवी


जांभळी

चवळेवाडी 


सज्जनगड 

कास 

टोपली कारवी 
जंगली आल


गुलाबी तेरडा

दीपकाडी

निसुरडी


सीतेची आसवं
छोटागेंदफूल









Friday, August 30, 2024

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् -पुस्तक परिचय


जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेलल ते दुसयांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही  व्यवस्था कोलमडत नाही. कारण गरजेपेक्षा जास्त ओरबडणाऱ्या पासून इथे संरक्षण असते. गरजेपेक्षा जास्त घेणारा परतफेड करत नाही, त्याने अधिक घेतले तर तेही संपून जाते आणि तो स्वता: ही तग धरू शकत नाही.


पीटर वोह्ललेबेन या जर्मन वनरक्षकांनी जंगलातील झाडांचे, त्यातील परिसंस्थांचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यातूनच जगप्रसि‌द्ध पुस्तक - द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्  लिहिले गेले. मराठीत याचा अनुवाद गुरुदास, नूलकर यांनी केला आहे पुस्तकाचे


झाडांच्या अबोल विश्वाचे बोलक दर्शन हे पुस्तकाचे ब्रीद  खरोखर सार्थ आहे. लहानपणी झाडाच्या फांदया त्याचे हात, मूळ, खोड़ त्याचे पाय तर पानांचा वृक्षाचा डेरा त्याचे डोके असे चित्र सहज रेखाटायचो.. पण हे प्रत्यक्षात उलट आहे. जमिनीच्या काळोखात वाढणारे मूळं त्याच्या मेंदूसारखे काम करतात त्यांच्या / मूळांच्या टोकांना संवेदना असतात. जिकडे पाणी तिकडे ते वळतात. आणि हेच टोक उपयोगी बुरशीबरोबर मैत्री करून एक जाळ, जंगलाचे इंटरनेट संपूर्ण जंगलभर पसरवतात.(wood wide web-www.) या जाळयातून नायट्रोजन फॉस्फरस , पोषकद्रव्ये वाटप, एखाद्‌या -सर्व झाडांशी संपर्कात राहणे, पोषकद्रव्याचे आजारी, वठलेल्या झाडाला, झाडांच्या छोट्या पिलांना पोषकद्र‌व्ये पाठवणे हे करत राहतात, बुरशीला या बदल्यात भरघोस साखर झाडांकडून मिळते. तसेच सुगंध 

पसरुन कीटकांना पराग धूळ उडवण्यासाठी आकर्षित करतात.

तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स

 या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रक्रियेत  निर्माण झालेले टॅनिन  यामुळे ओकच्या लाकडाच्या पिपाचा वाईन मुरायला उपयोग होतो .झाडांनी दरवर्षी फुलून रुचकर बिया तयार केल्यातर डुक्कर  आणि हरिण ते खाऊन पुष्ट होऊन जोमाने प्रजनन करतील,यांची खूप संख्या वाढेल. त्यामुळे बिया रूजणार कशा?  तेव्हा दरवर्षी न फुलता वर्षाआड /ठराविक वर्षानंतर झाड फुलते. या प्राण्यांची संख्याही नियोजित होऊन डोकेदुखी होत नाही. 

लॉटरी लागून लाखो लाखो बियांपैकी एखादेच बी 'पूर्ण वृक्षात रूपांतरीत होते. बी अवस्थेत हरिण इतर प्राण्यांपासून रक्षण पाहिज.मग जरा एखादे मोठे उंच झाड वठून जाऊन पडल्यावर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो मग त्याची वाढ जोमाने होते. मग हे झाड जंगलाच्या शिष्टचारानुसार समांतर फांद्या, मजबूत बुंधा, व्हि आकारातल्या फांदया, डेरेदार आकार घेत सौंद‌र्यवान होते, पुढच्या २००-किंवा ५०० वर्षांप‌र्यंतही तो राजा होतो.


निसर्गमात्र झाडांची ही कडक शिक्षकाप्रमाणे शाळा घेतो. कधी बर्फाचे वादळ  अस्ताव्यस्त फांद्यांना बर्फाच्या ओझ्याने मोडून टाकतो .जखमी झाडांच्या वाकवून मोडून टाकतो आत बुरशी शिरतात त्यासी पोखरू लागतात. बार्क बीटल, अफीडच्या लोभाने वूडपीकर पक्षी झाडांच्या खोडांना टोची मारत अळ्या खाऊन टाकतो पण झाडाला इजा होते. पण एक झाड शहीद झाल्यामुळे इतर झाड या कीटकांपासून वाचते.


झाडांतून पाण्याचे पंप चालू असतात, टेस्थोस्कोप लावून पाहिल तर प्रवाहाचा आवाज ऐकू येतो? 


झाड आपल्या वाढीने हवेचाही वेग नियंत्रित करतात, बाष्पीभवन कमी करून जास्त पाणी मिळवून वेगाने वाढतात.


अफिड लागल्यास झाडावर चिकट हनीड्यूवर मुंग्या, काही भ्रमर तुटून पडतात.

पान झाडांना वेळेचे, दिवसाच्या लांबीचे भान असते मुल त्यानुसार वसंताची चाहुल, शरदाचे आगमन त्यांना समजते.


जंगलात प्रकाशासाठी स्पर्धाच असते.सर्वांत करती ९७% तर बाकीची खालील पिलाना-रोपांना प्रकाशाची देवाण असते. 

प्रकाशसंश्लेषण जोमाने होऊन ती अधिक अन्नसाठा करायची ही स्पर्धाच असते.


 झाडांच्या बिया पक्षी जमिनीत खाण्यासाठी पुरतात नंतर विसरतात मग रूजून झाड येते, काही बियांना दूर जाता यावे म्हणून पंखही असतात, जणू त्या उडणाऱ्या बियाच!


*झाडांच्या स्वप्नातील स्वर्ग


त्यांना पोषणयुक्त, मोकळी, हवेशीर आणि आर्द्रता टिकवणारी माती आवडते. जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे. उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये. बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते. तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा. "

पण याने जैवविविधता वाढणार नाही एकच शक्तिशाली प्रजाती अशा स्वर्गात जोमाने वाढेल.


माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल.

-भक्ती