अशी ही यमुना नदी ! भारतीयांच्या जीवनात तिने गंगेप्रमाणेच तिच्या जोडीला जोड अशी श्रेष्ठ महती प्राप्त करून घेतलेली आहे.
स्वर्गातील गंगा प्रथम हिमालयावर उतरली. भगीरथाच्या तपस्थाना-जवळ या पवित्र गंगेचे अवतरण झाले. स्वर्गातून येणारा तिचा प्रचंड वेगवान स्त्रोत भगवान श्रीशंकरांनी आपल्या जटेत सामावून घेतला आणि गंगेचा गर्व हरण केला. नंतर त्यांनी जटेतून तो गंगाप्रवाह सोडला.
काळ्या डोंगरातून गंगेची रुपेरी धार वाहू लागली. त्या स्थानाला 'गंगोत्री' म्हणू लागले. हे स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे २ मैल उंच आहे. नक्की ठिकाण-उत्तर अक्षांश ३१, पूर्वरेखांश ८०, उंची १३८०० फूट !
गंगोत्रीपासून हरिद्वारपर्यंत या प्रचंड वेगवान नदीच्या एका प्रवाहाला 'अलकनंदा' असे नाव आहे. ही पवित्र अलकनंदा भागीरथीनावाच्या प्रवाहासह देवपवागरासून पुढे वाहत जाते.
देवप्रयागचा आसमंत अत्यंत मनोहर व भव्य आहे. देवदाराचे वृक्ष, साल कन्हेरी, हिरवट निळ्या टेकड्या यांमुळे अलकनंदा व भागीरथी यांचे संगमस्थान फारच आल्हाददायी वाटते. येथे पितरांना पिंडदान करणे हे फारच पुष्पकारक मानतात.
गंगोत्रीपासून देवप्रयाग, हृषीकेश वगैरे पवित्र क्षेत्रांची यात्रा म्हणजे हिमालयाची यात्रा असते. हरिद्वारला ही गंगा येते तेव्हा ती हिमालय उतरून मैदानी प्रदेशात आलेली समजतात.
पवित्र क्षेत्र म्हणून हरिद्वारला फारच मोठा मान आहे. येथे गंगेला सुंदर सुंदर असे अनेक भव्य घाट बांधलेले आहेत. घाटाघाटावर शेकडो मंदिरेही बांधलेली आहेत. या ठिकाणी हिंदुस्थानातून लाखो लोक नित्य गंगास्नानासाठी येत असतात.
हरिद्वार सोडल्यावर ही गंगामाता पांडवाची प्राचीन राजधानी हस्तिनापूर येथे येते. या ठिकाणी गंगेने दुष्यंत, भरत आणि पांडव यांचे वैभव पाहिले. या ठिकाणी झालेला विनाशही तिने शांतपणे पाहिला.
हस्तिनापूरच्या ऐतिहासिक आठवणींना उजळीत उजळीत गंगेचा प्रवाह गढ़मुक्तेश्वर आणि इतर गावांचे धर्मवैभव पहात आणि रामगंगेचे जीवन आपल्या जीवनात सामावून घेत पुढे कानपूरला जातो.
कानपूरच्या गंगेला कनोजच्या अत्तराचा सुगंध आहे. कनोजच्या इतिहासप्रसिद्ध राजांचा कीर्तिगंधही त्यात मिसळलेला आहे आणि कानपूर येथील उद्योगधंद्यांची गडबडही त्यातच मिसळून गेली आहे. कानपूरची गंगा त्रिविध स्वरूपाची आहे.
कानपूर म्हणजे उद्योगधंद्यांनी गजबजून गेलेली नगरी. मागांचा खडखडाट, कमावलेल्या कातड्याच्या हरतदेच्या वस्तू, पोलादाचे कारखाने, रेयॉनची गिरणी, साखरेचे सुप्रसिद्ध कारखाने, औषधांच्या प्रयोगशाळा वगैरे हजारो धंदे येथे आहेत.
कानपूरचा इतिहास म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाची मूर्ति संत स्मारके, विठूर किंवा ब्रह्मावर्त येथील पेशव्यांचे वाडे. इतिहासाच्या या स्मृती आपल्या समृद्ध जीवनात सामावून घेत घेत गंगा नदी पुढे अपाठ्याने निघते.
प्रयाग किंवा अलाहाबाद येथे आल्यावर गंगेचा प्रवाह शांत होतो. या ठिकाणी गंगेला तिची सखी यमुना येऊन मिळते. यमुनेचे कृष्णजल, सोचे विशुद्ध शुभ्र वारी आणि त्या दोहोंमध्ये गुप्तपणे वाहणाऱ्या सरस्वतीचे पाणी या तीन नद्यांचा तो त्रिवेणी संगम अत्यंत पवित्र आहे.
प्रयागच्या त्रिवेणी संगमाचा अद्वितीय असा सुंदर देखाबा पाहून अनेक कवींनी काव्य केले आहे. त्यातील नरहरी कवीच्या या काव्य पंक्ती पाहा:
भागीरथीचे अतिशुभ्र वारी काळी दिसे सूर्यसुताहि भारी दोघीमधे जे जल लाल आहे सरस्वती ती प्रगटोनि वाहे ।
प्रयाग संगमावरील कुंभमेळा फारच प्रचंड असतो. येथील पंड्या-जवळ लाखो लोकांच्या शेकडो वर्षापासूनच्या वंशावळ्या लिहिलेल्या वह्या आहेत.
प्रयाग हे आर्याचे प्राचीन प्रसिद्ध शहर आहे. द्रविडांची राजधानी लंका. तेथून पुष्पक विमान जे उड्डाण घेई ते प्रथम प्रयागला येऊन उत्तरे, असे म्हणतात. या प्रयागक्षेत्रात आर्य, अनार्य, द्रविड या तिन्ही संस्कृतींचा पवित्र त्रिवेणी संगम होई.
येथील किल्ल्याच्या तळघरात अत्यंत जुना असा प्रचंड वटवृक्ष आहे.
प्रयाग म्हणजे देवभूमी, दुसरे नंदनवन. म्हणूनच मोगल काळात या अलाहाबादला मोगल सम्राट आपला तळ देऊन राहात असत. अकबर-औरंगजेबाच्या सैन्यासारख्या विराट सैन्याला सावली पुरविणारे येथील प्रचंड वृक्ष, घनदाट आंबराया आणि भव्य मजबूत किल्ले आजही त्या गोष्टींची साक्ष देत आहेत.
मोगलांच्या कितीतरी पूर्वी भारताच्या महान सम्राट अशोक याने प्रयागक्षेत्री आपला एक प्रचंड स्तंभ उभा केलेला होता. तो अद्याप अशोकाची कीर्तिध्वजा फडकावीत उभा आहे.
अशा प्रकारे बहुविध कार्याचा संगम साधून हा गंगानद पुढे पूर्वेकडे संथपणे वाहात जातो.
शहाजहानपूरच्या विणकरांना आपल्या वस्त्रविद्येत गंगाजलाचे पावित्र्य मिळते. तेथील मोगल कारागीर त्यामुळेच फार प्रसिद्ध होते. तेथील फुटका बुरुज पाहून तेथील गतवैभवाची साक्ष पटते. तीच गत मिर्झापूर या गावाची !
काशी किंवा वाराणशी या क्षेत्राला बनारस हेही नाव आहे. या क्षेत्रापाशी ही थोर परमपावनी गंगा येते तेव्हां तिचे पात्र फारच रुंद बनते. प्रवाह अत्यंत संथ होतो आणि स्नानाला, प्रवासाला, व्यापाराला हे पात्र फारच सोयीचे होते. येथे गंगेच्या ऐन प्रवाहात हजारो मचवे सतत असतात. येथील गंगेच्या काठावर अनेक घाटांवर शेकडो लोक नित्य वास्तव्य करतात.
काशी येथील विश्वेश्वर-मंदिर, काळभैरव मंदिर, मनकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट आणि संत तुळसीदासांचे मारुतीमंदिर वगैरे अनेक स्थळे प्रेक्षणीय आहेत. तेथे भाविकांची आणि यात्रेकरूंची सतत गर्दी असते.
हिंदू संस्कृतीचे व विद्येचे केंद्र म्हणून फार पूर्वीपासून काशीक्षेत्र प्रसिद्ध आहे. आजही तेथे पं. मदनमोहन मालवीय यांनी स्थापिलेले हिंदू विश्वविद्यालय ज्ञानदानाचे महान कार्य करीत आहे.
काशीच्या पुढे चार मैलांवर सारनाथ आहे. बुद्धधर्मीयांचे ते अधि पवित्र क्षेत्र. येथील मूलगंध-कुटिविहार वगैरे भागात पूजा, आरती व जयघोषांनी वातावरण दुमदुमून जाते.
गोमती, घोग्रा, गंडकी वगैरे हिमकन्यका उड्या घेत येऊन गंगेला मिळतात. शोणभद्र, शरयू वगैरेंच्या जलराशी गंगेच्या जळात मिळतात. त्यामुळे बिहार प्रांतात गंगेचे पात्र एक मैलापेक्षाही जास्त रुंद आणि विशाल होते.
चुनारगडाच्या किल्लयाजवळून गंगा वाहात जाते आणि पाटलीपुत्र किंवा पाटण्याजवळ येते. पाटणा हे इतिहासप्रसिद्ध शहर. तेथील गंगेने त्या थोर शहराचा सारा इतिहास समक्ष पाहिलेला आहे.
नंद घराण्याचा शेवट, चाणक्याची नीती, चंद्रगुप्त मौर्याचे शौर्य, सेल्युकस निकेटर, मेगॅस्थनीस या परकीय प्रवाशांची स्तुती, अशोकाचे धर्मपरिवर्तन, समुद्रगुप्ताचा सुवर्णकाळ, गुरुगोविंदसिंगाचे जन्मस्थळ आणि महेंद्राचे सीलोन-प्रयाण वगैरे अनेक घटना येथे घडल्या. भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींनीं येथेच चिरनिद्रा केली. त्या बाबू राजेंद्रप्रसादांच्या समाधीला वंदन करून गंगाप्रवाहातून आपण पुढे जातो तेव्हा आणखी काही प्रसंग आपल्या डोळ्यांना दिसतात. त्यांपैकी येथील कार्तिक शुद्ध षष्ठी व सप्तमी या दिवशी होणारा सूर्यपूजेचा समारंभ फारच प्रेक्षणीय असतो.
कोसी ही गंगेची उपनदी. ती हिमालयात उगम पावून नेपाळ आणि बिहारमधून वाहात येऊन गंगेला मिळते. या नदीला मोठाले पूर येतात आणि त्यामुळे फार नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या नदीवर नेपाळमध्ये वराहक्षेत्र येथे एक आणि बिहारमध्ये एक अशी दोन धरणे बांधली जात आहेत. या धरणांमुळे तीस लक्ष एकर जमिनीस पाणी-पुरवठा होणार आहे आणि बीस हजार किलोवॅट वीज निर्माण होणार आहे.
मयूराक्षी ही गंगेची आणखी एक उपनदी आहे. पश्चिम बंगाल सरकारने मयूराक्षी नदीवर 'मोर योजना' किंवा 'मयूराक्षी योजना' आखली आहे.
पुढे ब्रह्मपुत्रा नदीशी भेट झाल्यावर गंगेला पुनः सहस्रधारा फुटतात. पद्मा हे नाव धारण करून हा प्रचंड नद पुढे सरकतो. कलकत्त्या जवळ हुगळी हे नाव गंगेच्या एका फाट्याला मिळाले आहे. याच फाट्यावर गंगासागर हे विशाल जलक्षेत्र आहे.
हुगळी नदीवरील भव्य प्रचंड आणि भक्कम असा हावडा पूल हे कलकत्त्यचे एक महान भूषण आहे.
दामोदर नदी ही गंगेची उपनदी आहे. ती छोटा नागपूरच्या प्रदेशात उगम पावते. तेथून ती पूर्वेकडे बिहार आणि बंगालमधून वाहात जाऊन हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. या नदीला प्रचंड पूर येऊन भोवतालच्या प्रदेशात फार नुकसान होत असते. म्हणून तिला 'दुःखाची नदी' म्हणत. पुरापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी ही नदी व तिच्या उपनद्या यांवर एकंदर आठ धरणे व वीजघरे बांधण्याची योजना आहे. त्यासाठी शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम व्यवस्थित होण्या-साठी 'दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन' स्थापन झाले आहे. ही योजना पूर्ण झाली म्हणजे पुराचे नियंत्रण होईल, मलेरियाच्या साथीला आळा बसेल, दहा लक्ष एकर जमीन लागवडीखाली येईल. जमशेदपूर व सिंद्री येथील कारखान्यांना भरपूर वीजपुरवठा होईल.
बंगाल प्रांतातच गंगेला 'जाह्नवी' असे नाव मिळाले. कारण जहनु राजाने त्या स्वर्गातून आलेल्या गर्विष्ठ गंगेचे पाणी एका आचमनात पिऊन टाकून तिचा गर्व हरण केला. नंतर भगीरथाच्या नम्र प्रार्थनेने लोककल्याणासाठी त्या जन्दू राजाने तो गंगाप्रवाह आपल्या कानातून पुनः बाहेर सोडला. तेव्हा ती गंगा जान्हवी बनली. त्या जान्ह्वी गंगेने पुढे सगरपुत्रांचा उद्धार केला त्या ठिकाणी सुंदरबन बनले.
राजा भगीरथाच्या प्रयत्नाने स्वर्गातील पवित्र गंगा भूलोकावर अवतरली, तो सुदिन म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध दशमी तिथीचा दिन होता. त्या दिवशी दशहरा उत्सव मोठ्या थाटाने आपण करतो. मकराच्या पाठोवर उभ्या असलेल्या गंगेच्या सुंदर मृतांची पूजा गंगा-तटकी येथे होतो.
सवाकी प्रत्येक क्षेत्रात त्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने करतात.
कलकत्याच्या दुर्गापूजेचा घाट पाहून गंगेच्या सहस्त्र धारा सुंदरबनाच्या चक्रव्यूहात शिरतात आणि नंतर ब्रह्मपुत्रेच्या जलराशीसह बंगालच्या सागराला आपले जीवन अर्पण करतात.
समुद्रात शिरलेल्या गंगेचा प्रचंड प्रवाह हा इतक्या खोलवर वेगाने शिरतो की, तेथून जलप्रवास करणे धाडसाचे व कौशल्याचेच काम झाले आहे. तेथील उसळणाऱ्या प्रचंड लाटांनी इ. स. १८७६ साली एक लाख लोक गिळले, असे सांगतात.
-शं.रा.देवळे
(भारताच्या ललाटरेषा या नदीवरील पुस्तकातून साभार)